Jump to content

प्रभाकर आत्माराम पाध्ये

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(प्रभाकर पाध्ये या पानावरून पुनर्निर्देशित)


प्रभाकर पाध्ये
जन्म नाव प्रभाकर (प्रल्हाद) आत्माराम पाध्ये
जन्म ०४ जानेवारी १९०९
मृत्यू २२ मार्च १९८४
कार्यक्षेत्र पत्रकारिता, साहित्य
भाषा मराठी
प्रसिद्ध साहित्यकृती तोकोनोमा, कलेची क्षितीजे
वडील आत्माराम
आई मथुरा
पत्नी कमल पाध्ये
अपत्ये प्रशांत पाध्ये

प्रभाकर आत्माराम पाध्ये (जानेवारी ४, १९०९[] - मार्च २२, १९८४) हे मराठी पत्रकार, विचारवंत, लेखक होते.

व्यक्तिगत जीवन

[संपादन]

पाध्ये ह्यांचा जन्म लांजे (जि. रत्‍नागिरी) येथे झाला. पाध्ये ह्यांचे जन्मनाव प्रल्हाद असे होते. पुढे त्यांनी ते प्रभाकर असे केले आणि प्रभाकर पाध्ये ह्याच नावाने ते पुढे प्रसिद्ध झाले[]. पाध्ये ह्यांच्या वडिलांचे नाव आत्माराम तर आईचे नाव मथुरा[]. पाध्ये ह्यांना एकूण पाच भावंडे असून पाध्ये हे आपल्या आईवडिलांचे दुसरे अपत्य होते[]. त्यांचे वडील कोहिनूर मिलमध्ये नोकरी करत असत[].

बालपण

[संपादन]

शिक्षण

[संपादन]

१९२७मध्ये पाध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. मॅट्रिक उत्तीर्ण झाल्यानंतरच्या काळात त्यांनी यूसुफ मेहेर अली ह्यांच्या यूथ लीग चळवळीत सहभाग घेतला[]. मॅट्रिकनंतर साधारणतः दीड वर्षे पुणे येथे पुढील शिक्षण घेतल्यावर पाध्ये मुंबईत परतले आणि मुंबई येथील एल्फिन्स्टन महाविद्यालयातून त्यांनी अर्थशास्त्र आणि इतिहास ह्या विषयांतून बी. ए. ही पदवी प्राप्त केली[]. महाविद्यालयीन शिक्षणाच्या काळात पाध्ये ह्यांना इंग्लिश वाङ्मयाची आवड लागली. जॉर्ज बर्नाड शॉ आणि एच. जी. वेल्स हे त्यांचे आवडते लेखक होते[]. प्रभाकर पाध्ये यांनी पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूटमधून प्रा. धनंजयराव गाडगीळ यांच्या हाताखाली शिकून अर्थशास्त्र विषयात एम.ए. पदवी मिळवली.

कारकीर्द

[संपादन]

पदवीनंतर त्यांनी मुंबईस परतून पत्रकारिता आरंभली. मो.ग. रांगणेकरांच्या 'चित्रा' साप्ताहिकात पाध्ये रुजू झाले. या साप्ताहिकातून पाध्यांनी राजकीय विषयांवर व्यासंगपूर्ण लिखाणास आरंभ केला. याशिवाय हरिभाऊ मोटे यांच्या 'प्रतिभा' साप्ताहिकात पाध्ये साहित्यिक घडामोडींवर लिहीत असत. चित्रा साप्ताहिकातले त्यांचे लिखाण झाल्यावर ते १९३८ - १९४५ सालांदरम्यान 'धनुर्धारी'चे संपादक होते. त्यानंतर १९४५ - १९५३ सालांदरम्यान ते 'नवशक्ती'चे संपादक होते; परंतु फ्री प्रेस समूहाचे मालक एस. सदानंद यांच्याशी वैचारिक मतभेद उद्भवल्यावर ते नवशक्तीतून राजीनामा देऊन बाहेर पडले.

प्रभाकर पाध्ये १९५३-५४मध्ये इंडियन कमिटी फॉर कल्चरल फ्रीडम या संस्थेचे चिटणीस, तर १९५५-५७ या काळात याच संस्थेच्या आशिया विभागाचे जनरल सेक्रेटरी होते. १९६७-७८ या काळात प्रभाकर पाध्ये सेंटर फॉर इंडियन रायटर्स या संस्थेचे संचालक होते.

साहित्यिक कारकीर्द

[संपादन]

पत्रकारितेच्या जोडीनेच पाध्यांनी ललित साहित्यही लिहिले. त्यांची 'मैत्रीण' ही कादंबरी, 'त्रिसुपर्ण' (इ.स. १९८३) हा दृष्टांतकथासंग्रह व अन्य चार कथासंग्रह प्रकाशित झाले. पाध्यांनी प्रवासवर्णने व समीक्षाही लिहिल्या. त्यांच्या 'सौंदर्यानुभव' या समीक्षापर ग्रंथाला साहित्य अकादमी पुरस्कार लाभला.

मार्च २२, १९८४ रोजी पाध्यांचे निधन झाले.

पुरस्कार

[संपादन]

प्रकाशित साहित्य

[संपादन]
नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
अगस्तीच्या अंगणात निवडक साहित्याचे संकलन पाॅप्युलर प्रकाशन, मुंबई इ.स. १९५७
अंधारातील सावल्या कथासंग्रह पाॅप्युलर प्रकाशन, मुंबई इ.स. १९६५
अर्धवर्तुळे कथासंग्रह स्कूल अँड काॅलेज बुक स्टाॅल, कोल्हापूर इ.स. १९४६
असेही विद्वान व्यक्तिचित्रे आणि आठवणी साधना प्रकाशन इ.स. २०१८
आजकालचा महाराष्ट्र वैचारिक कर्नाटक पब्लिशिंग हाऊस, मुंबई इ.स. १९३५
आभाळातील अभ्रे कॉंटिनेन्टल प्रकाशन
उडता गालिचा प्रवासवर्णन पाॅप्युलर प्रकाशन, मुंबई इ.स. १९५९
कलेची क्षितिजे समीक्षा इ.स. १९४२
कादंबरीकार खानोलकर समीक्षा नूतन प्रकाशन, पुणे इ.स. १९७७
कृष्णकमळीची वेल कथासंग्रह केशव भिकाजी ढवळे, मुंबई इ.स. १९४५
जग नवे नवी क्षितिजे प्रवासवर्णन इ.स. १९५३
तीन तपस्वी व्यक्तिचित्रे दा.ना. मोघे प्रकाशन, कोल्हापूर इ.स. १९४६
तोकोनोमा प्रवासवर्णन पाॅप्युलर प्रकाशन, मुंबई इ.स. १९६१
त्रिसुपर्ण कथासंग्रह मौज प्रकाशन इ.स. १९८३
नवे जग नवी क्षितिजे प्रवासवर्णन पाॅप्युलर प्रकाशन, मुंबई इ.स. १९५४
पत्रकारितेची मूलतत्त्वे वैचारिक इ.स. १९९१
पाकिस्तानी की पन्‍नास टक्के राजकीय इ.स. १९४४
पाटणकरांची सौंदर्यमीमांसा समीक्षा) इ.स. १९७७
प्रकाशातील व्यक्ती व्यक्तिचित्रे कॉंटिनेन्टल प्रकाशन, पुणे इ.स. १९४१
मर्ढेकरांची सौंदर्यमीमांसा समीक्षा मौज प्रकाशन इ.स. १९७०
मानव आणि मार्क्स राजकीय इ.स. १९८०
मैत्रीण कादंबरी
लघुमंत्रजागर माहितीपर ढवळे प्रकाशन
वामन मल्हार आणि विचारसौंदर्य समीक्षा मौज प्रकाशन इ.स. १९७८
विचारधारा कॉंटिनेन्टल प्रकाशन
व्यक्तिवेध व्यक्तिचित्रे केसरी प्रकाशन, पुणे इ.स. १९७३
व्याधाची चांदणी कथासंग्रह रामकृष्ण प्रकाशन मंडळ, मुंबई इ.स. १९४४
सौंदर्यानुभव समीक्षा मौज प्रकाशन
हिरवी उन्हे प्रवासवर्णन पाॅप्युलर प्रकाशन, मुंबई इ.स. १९६४

प्रभाकर पाध्ये यांच्याबद्दल लिहिली गेलेली पुस्तके

[संपादन]
  • प्रभाकर पाध्ये : वाङ्‌मय दर्शन (संपादक - गंगाधर पाटील, म.सु. पाटील)

संदर्भ

[संपादन]

संदर्भसूची

[संपादन]
  • खोले, विलास. "परीघ" : (अगस्तीचे अंगण ह्या पुस्तकात समाविष्ट). pp. चौदा ते त्रेपन्न. (परीघ ह्या प्रकरणात प्रभाकर पाध्ये ह्यांच्या चरित्राचा आणि लेखनाचा आढावा घेण्यात आला आहे.)
  • पाध्ये, प्रभाकर. अगस्तीचे अंगण.