म.सु. पाटील

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

प्राचार्य डाॅ. मधुकर सु. पाटील (जन्म : अलिबाग, रायगड जिल्हा, महाराष्ट्र, इ.स. १९३१; - मुंबई, ३१ मे २०१९) हे एक मराठी काव्यसमीक्षक व वैचारिक लेखन करणारे मराठी साहित्यिक होते. त्यांचा जन्म रायगड जिल्ह्यात खारेपाटातील खाऱ्या जमिनीच्या शेतीवर जगणाऱ्या कष्टकरी शेतकऱ्याच्या कुटुंबात झाला. त्यांच्या लहानपणी त्यांना ग्रांथिक मराठी प्रमाणभाषेचा अभ्यास करण्याची साधनेच नव्हती.

त्या वेळच्या व्हर्नाक्‍युलर फायनलच्या परीक्षेत कुलाबा जिल्ह्यातून मधू पाटील पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. इंग्रजी शिक्षण घेण्यासाठी ते मुंबईला आले. वडील वरळी कोळीवाड्यानजीकच्या गिरणीत कामाला होते. पाणी, शौचालय, सांडपाण्याच्या निचऱ्यासाठी मोरी अशा गोष्टींची सोय नसलेल्या झोपडीसदृश घरात ते त्या वेळी राहत असत.

वडिलांनी मधूला गिरणीत कामाला लावून रात्रशाळेत घातले. इथेही सर्व रात्रशाळांमधून ते मॅट्रिकला पहिले आले.

शिक्षणसमाप्तीनंतर म.सु. पाटील हे मनमाड महाविद्यालयात आधी प्राध्यापक आणि नंतर सन १९६९ ते १९८९ या काळात प्राचार्य होते. मनमाडला प्राचार्य असताना त्यांनी लिहिण्याची ऊर्मी असलेल्यांना नियतकालिक चालवण्यासाठी चालना दिली. त्यांच्या प्रेरणेतूनच ‘अनुष्टुभ’ हे नियतकालिक सुरू झाले व अल्पावधीतच दर्जेदार नियतकालिक म्हणून गणले जाऊ लागले.

म.सु. पाटील यांच्या पत्‍नीचे नाव विभावरी पाटील. त्यांनी आगरी लोकगीते संकलित केली आहेत. कवयित्री आणि लेखिका नीरजा या त्यांच्या कन्या आहेत.

प्रा. म.सु.पाटील यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]

 • इंदिरा यांचे काव्य विश्व
 • तुकाराम - अंतर्बाह्य संघर्षाची अनुभवरूपे
 • दलित कविता व दलित साहित्याचे सौंदर्यशास्त्र
 • प्रभाकर पाध्ये : वाङ्मय दर्शन (संपादित, सहलेखक - गंगाधर पाटील)
 • बदलते कविसंवेदन
 • लांबा उगवे आगरीं (आत्मकथन, अनुभव कथन, माहितीपर)
 • सर्जनप्रेरणा आणि कवित्वशोध
 • स्मृतिभ्रंशानंतर : भारतीय साहित्यसमीक्षेची परंपरा आणि तिच्यातील परिवर्तन (अनुवादित, मूळ लेखक - गणेश देवी)
 • ज्ञानेश्वरीचा काव्यबंध
 • ज्ञानेश्वरीचा तृष्णाबंध

पुरस्कार[संपादन]

 • ‘सर्जनप्रेरणा आणि कवित्वशोध’ या समीक्षाग्रंथाला साहित्य अकादमी पुरस्कार (२०१८)
 • मराठीतील श्रेष्ठ साहित्यिकेला म.सु. पाटील यांच्या पत्नी विभावरी पाटील यांच्या नावाचा 'विभावरी पाटील पुरस्कार' दिला जातो.