Jump to content

दत्तो वामन पोतदार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(द.वा. पोतदार या पानावरून पुनर्निर्देशित)
दत्तो वामन पोतदार
जन्म नाव दत्तात्रेय वामन पोतदार
जन्म ऑगस्ट ५, १८९०
मृत्यू ऑक्टोबर ६, १९७९
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अध्यापन, संशोधन
भाषा मराठी
विषय इतिहास
प्रभाव विश्वनाथ काशिनाथ राजवाडे

महामहोपाध्याय दत्तात्रेय वामन पोतदार ऊर्फ दत्तो वामन पोतदार (जन्म : बिरवाडी (रायगड जिल्हा, ऑगस्ट ५, १८९० - पुणे, ऑक्टोबर ६, १९७९) हे मराठी इतिहासकार, लेखक व वक्ते होते. १९६१ ते १९६४ सालांदरम्यान ते पुणे विद्यापीठाचे कुलगुरू होते. भारताच्या केंद्र शासनाचे ते मान्यताप्राप्त पंडित होते.

अध्ययन आणि अध्यापन

[संपादन]

द.वा. पोतदार यांचे शिक्षण पुण्याच्या नूतन मराठी विद्यालयात झाले. १९०६ मध्ये ते मॅट्रिक झाले. १९१० मध्ये पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून ते बी.ए. झाले. त्यानंतर त्यांनी न्यू पूना कॉलेजात (पुढे ह्याचेच सर परशुरामभाऊ कॉलेज असे नामांतर झाले) इतिहास आणि मराठी ह्या विषयांचे अध्यापन केले. नूतन मराठी विद्यालय मराठी शाळेचे व नूतन मराठी विद्यालयाचे अधीक्षक म्हणूनही त्यांनी काम केले. त्यांनी आयुष्यभर अव्याहत विद्याव्यासंग केला.

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या बौद्धिक मार्गदर्शनात त्यांनी भाग घेतला होता. मराठी शुद्धलेखन महामंडळाचेही काही वर्षे ते अध्यक्ष होते. तमाशा सुधारणा समितीचे अध्यक्ष ह्या नात्याने त्यांनी बहुमोल कामगिरी केली आहे. त्यांचा इतिहासाचा अभ्यास फार मोठा होता. प्राचीन मराठी साहित्य आणि मराठ्यांचा इतिहास ह्या विषयांवर त्यांनी भारत इतिहास संशोधक मंडळाच्या नियतकालिकांत आणि अन्यत्रही बरेच स्फुट लेखन केले आहे.

इ.स. १९६२ साली जे शुद्धलेखनाचे नियम मराठी महामंडळाने मान्य केले, त्याखाली दत्तो वामन पोतदारांनी सुचवलेली एक टीप होती. ‘हे नियम असले तरी जुन्या नियमांप्रमाणे केलेले लेखन अशुद्ध आणि त्याज्य मानू नये.’ सुरुवातीला काही वर्षे नियमांच्या यादीखालची ही टीप छापली जात असे.. मात्र पुढे संबंधितांनी ती सोईस्करपणे वगळली..

त्यांना महाराष्ट्राचा साहित्यिक भीष्म म्हणतात. या कार्यासाठी त्यांनी आजीवन अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला.

मराठी भाषेच्या जतनासाठी आणि संवर्धानासाठी दत्तोपंतांनी सांगितलेला कार्यक्रम

[संपादन]

दत्तोपंत पोतदारांनी मराठीच्या संवर्धनासाठी जो कार्यक्रम सुचवला होता त्यात त्यांनी पुढील मुद्दे सुचवले होते- १) मी प्रत्यक्ष काहीतरी उत्कृष्ट मराठी मजकूर रोज वाचीन. २) मी एक तरी चांगले मराठी पुस्तक प्रतिमासी विकत घेईन. ३) मी एक तरी प्रतिष्ठित मराठी मासिक वर्गणी भरून घेईन. ४) मी आपल्या मुलाबाळांत आणि आप्‍तेष्टांत मराठीचा योग्य अभिमान जागृत करण्यासाठी झटेन. ५) मी रोज एक तरी मराठी वर्तमानपत्र विकत घेईन. ६) शक्य असेल तर माझ्या अज्ञान बांधवांसाठी मी मराठीत ग्रंथ लिहीन. ७) मराठी वाङ्मयेतिहास अभ्यासण्याकरता झटणाऱ्या संस्थांना मी शक्य होईल तशी मदत करीन.

दत्तो वामन पोतदारांची सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि साहित्यिक कारकीर्द

[संपादन]
  • १९१५ साली ते पुण्याच्या शिक्षण प्रसारक मंडळी ह्या संस्थेचे आजीव सदस्य झाले.
  • १९१८ ते १९४७ ह्या काळात भारत इतिहास संशोधक मंडळाचे चिटणीस व नंतर १९७३ पर्यंत ते याच मंडळाचे कार्याध्यक्ष होते.
  • १९२२ मध्ये भारतीय ऐतिहासिक अभिलेख आयोगाच्या मुंबई बैठकीस स्वीकृत सदस्य म्हणून त्यांना निमंत्रित करण्यात आले. १९४० मध्ये भारत सरकारतर्फे त्याच आयोगाचे सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती झाली.
  • १९३३ ते १९३६ ह्या काळात ते महाराष्ट्र साहित्य पत्रिकेचे संपादक होते.
  • १९४६ ते १९५० ह्या काळात ते पुण्याच्या शिक्षण प्रसारक मंडळीच्या अध्यक्षपदी होते.
  • १९३९ मध्ये अहमदनगर येथे भरलेल्या मराठी साहित्यसंमेलनाचे ते अध्यक्ष झाले.
  • १९४३ मध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदेचे ते कार्याध्यक्ष होते.
  • १९४६ ते १९५० ह्या काळात संयुक्त महाराष्ट्र परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले.
  • १९४८ मध्ये पुण्याच्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे ते कुलगुरू झाले.
  • १९६० ते १९६३ ह्या काळात पुणे विद्यापीठाचे ते कुलगुरू होते.
  • १९३९ ते १९४२ ह्या काळात हिंदुस्थानी बोर्डाचे ते सदस्य होते. १९४२ मध्ये ह्या बोर्डाचे ते अध्यक्ष झाले.
  • १९५० ते १९५३ ह्या काळात हिंदी शिक्षण समितीचे ते अध्यक्ष होते. काही वर्षे ते संस्कृत महामंडळाचेही अध्यक्ष होते.

दत्तो वामन पोतदारांनी स्थापन केलेल्या संस्था

[संपादन]
  • मॉडर्न इंडियन हिस्टरी काँग्रेस (१९३५). हिची पुण्यास स्थापना करून तिचे पहिले अधिवेशन पुण्यासच भरविले. पण पुढील अलाहाबाद येथील अधिवेशनात तिचे नाव इंडियन हिस्टरी काँग्रेस असे झाले. या संस्थेच्या दिल्ली येथे भरलेल्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते (१९४८).
  • महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा. या संस्थेचे ते अध्यक्ष होते.

पोतदारांना मिळालेले सन्मान

[संपादन]
  • भारत सरकारने त्यांना ‘महामहोपाध्याय’ ही पदवी दिली (१९४८).
  • हिंदी साहित्यसंमेलनाने त्यांना ‘साहित्यवाचस्पति’ ही उपाधी प्रदान केली.
  • बनारसच्या हिंदू विश्वविद्यालय व पुणे विद्यापीठ या दोन्ही संस्थांनी डी.लिट्. पदवी देऊन त्यांचा सन्मान केला.

द.वा. पोतदार यांनी लिहिलेली पुस्तके

[संपादन]
  • ऐतिहासिक चरित्रलेखन (१९३८)
  • दगडांची कहाणी
  • पुरोगामी वाङ्‌मय - दोन टिपणे (१९३७, १९३८)
  • पोतदार विविध दर्शन (१९३९)
  • प्रांतिक भाषांचे भवितव्य (१९३५)
  • भारताची भाषासमस्या (१९६८)
  • भाषावार विद्यापीठे (१९३७)
  • मराठी इतिहास व इतिहास-संशोधन (विहंगम निरीक्षण) (१९३५)
  • मराठी गद्याचा इंग्रजी अवतार (१९२२)
  • महाराष्ट्र-साहित्यपरिषद्-इतिहास, वृत्तविभाग व साधन विभाग (१९४३)
  • महाराष्ट्रातील सौंदर्यस्थळे (१९३७)
  • मी युरोपात काय पाहिले?' (प्रवासवर्णन; १९६०)
  • देवदासकृत संतमालिका (संपादित, १९१३)
  • सुमन-सप्तक (व्यक्तिचित्रणे, १९५०)
  • श्रोते हो (व्याख्यानसंग्रह)
  • श्रीशिवदिनकेसरि विरचित ज्ञानप्रदीप (संपादित, १९३४)

पोतदारांविषयीची पुस्तके

[संपादन]
  • सन १९३७मध्ये प्रसिद्ध झालेल्या मारुती पै यांच्या 'वाङ्मय लेखन व जीवन' या पुस्तकात दत्तो वामन पोतदारांचे व्यक्तिचित्रण असलेला लेख आहे.

पुरस्कार

[संपादन]

संकीर्ण

[संपादन]

दत्तो वामन पोतदार हे १९३९ साली अहमदनगरात भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.