स्त्रीवाद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे.
उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा.


Broom icon.svg
या लेखाचे शुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरण मराठी विकिपीडियासाठी अनुकूल नाही. कृपया लेख तपासून शुद्धलेखन करावे. हा साचा अशुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरणविषयक चुका आढळल्यास वापरला जातो. नेहमी होणाऱ्या चुकांबद्दल या पानावर माहिती आहे. या संबंधी अधिक चर्चा करायची असल्यास अथवा काही शंका/ प्रश्न असल्यास कृपया चर्चापान वापरावे.
स्त्रीवाद 
स्त्रीयांचे समान हक्कांची व्याख्या करणाऱ्या, सिध्द करणाऱ्या, मागणी करणाऱ्या अनेक चळवळीं आणि वि�
Woman-power emblem.svg
प्रकार social movement,
political ideology
अधिकार नियंत्रण
विकिडाटा
Blue pencil.svg

स्त्रीवाद म्हणजे लिंगभेद झुगारून स्त्री-पुरुष समानतेकडे वाटचाल करणारा विचारप्रवाह. सामान्यतः जरी स्त्रीवाद ही पुरुषविरोधी चळवळ समजली जाते. त्यामुळे ही स्त्रियांचे ऐतिहासिक दुय्यमत्त्व उजेडात आणून हे शोषण संपवण्याचा प्रयत्‍न करते. ही एक सामाजिक, राजकीय जाणीव आहे. स्त्रीवाद ही संकल्पना जरी पाश्चात्त्य आधुनिकतेत उदयास आली अशी सामान्य समजूत असली तरी ही जाणीव त्यापूर्वीही वेगवेगळ्या कालखंडात आणि ठिकाणी आढळून आलेली दिसते. म्हणूनच एकच स्त्रीवाद नसून अनेक स्त्रीवाद दिसून आले आहेत व येतात.

पाश्चात्त्य स्त्रीवाद[संपादन]

जागतिक वाङ्मयात सॅण्ड्रा गिल्बर्ट, हेलन सिझू, एलेन शोवाल्टर, सिमॉन दि बोव्हा आदी विदुषींनी स्त्रीवादी वाङ्मयविचाराची मांडणी केली. वाङमयातील स्त्रीशरीरनिष्ठ अनुभव, मनोविश्लेषण, शब्दसंग्रह आदींचे चित्रण व छुपे पुरूषवर्चस्व यांचा शोध घेण्यावर स्त्रीवादी वाङ्मयाचा भर असतो.[१]

आधुनिकोत्तर (पोस्ट मॉडर्निझम)[संपादन]

भारतीय स्त्रीवाद[संपादन]

भारतीय समाजव्यवस्थेत स्त्री-पुरुषांची निखळ मैत्री, निरामय प्रेमसंबंध असण्यात अडथळे असतात. असे समान पातळीवरचे स्त्री-पुरुष संबंध, प्रेमासारख्या अस्सल जिवंत, उत्कट संवेदना ठरावीक सत्तासंबंधाच्या प्रदूषित पर्यावरणामुळे अ-वास्तव ठरतात.[२]

१९ व्या शतकातील स्त्री-पुरुष समतेचा विचार आणि स्त्रीवादी साहित्य[संपादन]

बाळशास्त्री जांभेकर यांनी इ.स. १८३2 मध्ये दर्पण नावाचे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू केले. आपल्या सुधारणावादी विचारांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी वृत्तपत्राचा उपयोग करून घेतला. बालविवाह, सतीप्रथा, स्त्रियांवर होणारे अन्याय या विरोधात त्यांनी समाजजागृती केली. बाळशास्त्री जांभेकर यांनी इ.स. १८४० मध्ये गंगाधर शास्त्री फडके यांच्याकडून विधवाविवाहास अनुकूल असे पुस्तक लिहून घेतले होते.[ संदर्भ हवा ]

गोपाळ हरी देशमुख यांनी सुद्धा आपल्या शतपत्रांमधून स्त्रीशिक्षणाचा पुरस्कार केला. लोकहितवादी या नावाने इ.स. १८४८ ते इ.स. १८५० या दोन वर्षात त्यांची शतपत्रे प्रभाकर मासिकातून प्रसिद्ध झाली. पुरुषांना पुनर्विवाहाची परवानगी असेल, तर स्त्रियांनाही पुनर्विवाहाची परवानगी असली पाहिजे, असे लोकहितवादींचे म्हणणे होते. त्यांनी विधवांचे केशवपन करण्याच्या प्रथेवरही कडाडून टीका केली. काडीमोड करायचा झाल्यास तो पती-पत्‍नीच्या संमतीनेच झाला पाहिजे. पती जर पत्‍नीचा छळ करत असेल तर तिला पतीपासून विभक्त होता आले पाहिजे, आणि अशा प्रकरणात तिला पोटगी मिळाली पाहिजे, असा विचार लोकहितवादींनी मांडला.

महादेव गोविंद रानडे हे सुधारक विचारवंत स्त्री-पुरुषांच्या समान हक्कांचे कट्टर पुरस्कर्ते होते. त्या काळी गाजलेल्या रखमाबाई विरुद्ध दादाजी खटला ह्या खटल्यात कोर्टाने रखमाबाईने शिक्षा भोगावी किंवा स्वतःच्या मनाविरूद्ध नव्या नवर्‍याकडे नांदावे असा पर्याय ठेवला होता. तेव्हा म.गो.रानडे यांनी वक्तृत्वोत्तेजक सभेत भाषण देऊन आपला पुरुषार्थ केवळ स्त्रियांशी वागतांनाच दाखवणार्‍या पुरूषवर्गावर जोरदार टीका केली व स्त्रियांच्या अधिकारांचा पुरस्कार केला होता. विवाहयोग्य ठरण्यासाठी मुलामुलींची किमान वयोमर्यादा कायद्याने ठरवली पाहिजे, सरकारी यंत्रणेने परवानगी दिल्यानंतरच विवाहविधी केले पाहिजेत, वृद्धांनी कुमारिकांशी विवाह करू नये अशी आग्रहाची मागणी करणारे विचार रानडे ह्यांनी मांडलेले दिसून येतात.

गोपाळ गणेश आगरकरांनी इ.स. १८८८ मध्ये सुधारक वर्तमानपत्र काढले. सुधारकात लिहिलेल्या स्वयंवर, विवाहनिराकरण (घटस्फोट), प्रियाराधना अशा निंबंधांमधून स्त्रीजीवनासंबंधी सुधारणा आगरकरांनी सुचविल्या आहेत. त्यांनी बालविवाहाची चाल कायद्याने बंद व्हावी म्हणून प्रयत्‍न केले. स्वयंवर पद्धतीनेच म्हणजे स्त्रीच्या इच्छेने विवाह व्हावा असा त्यांचा आग्रह होता. स्त्री पुरुषांसाठी समान स्वातंत्र्याची व समान संधींची मागणी आगरकरांनी केली होती.

या सर्व सुधारकांच्या कार्याच्या पार्श्वभूमीवर महात्मा जोतीराव फुले यांचे क्रांतिकार्य स्त्रियांच्या आत्मसन्मानाला जागृत करणारे आणि तत्कालीन स्त्रीसाहित्याला प्रेरणा देणारे आहे. इ.स. १८४८ मध्ये त्यांनी पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. पत्‍नी सावित्रीबाई फुले यांना स्वत: शिकवून शिक्षिका बनवले. स्त्रीशिक्षण म्हणजे अनैतिकता व सामाजिक अनाचाराला निमंत्रण आहे, असा दांभिक प्रचार तत्कालीन सनातनी वर्गाने केला. त्यांनी सावित्रीबाईंना दगड व शेण फेकून मारले. जोतीरावांच्या वडलांवर दडपण आणून त्यांनी जोतीबा व सावित्रीबाईंना घराबाहेर काढण्यास भाग पाडले. पण जोतीरावांनी सर्व विरोधांवर मात करून मुलींसाठी आणखी शाळा काढल्या. शिक्षण मिळाल्याने कशी जागृती येते याचे प्रत्यंतर जोतीरावांच्या शाळेत शिकणार्‍या मुक्ता नावाच्या मांग समाजाच्या मुलीने वयाच्या अकराव्या वर्षी लिहिलेल्या (इ.स.१८५५) एका निबंधातून मिळते. हा निबंध अहमदनगर येथून प्रकाशित होणार्‍या ज्ञानोदय पत्राने छापला होता. त्यात ती म्हणते, 'ब्राह्मण लोक म्हणतात, की इतर जातींनी वेद वाचू नयेत याचा अर्थ आम्हास धर्मपुस्तक नाही. इंग्रजी राज्यापूर्वी उच्चवर्गातील लोकांचा अपराध करणार्‍या महार-मांगांचे डोके मारीत असत. गुलटेकडीच्या बाजारात फिरण्याची मोकळीक नव्हती, ती आता मिळाली.' या देशातील स्त्रीमुक्तीचा हा पहिला उद्गार होता.

महात्मा फुले यांनी इ.स. १८६३ साली बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना करून मोठमोठाली पोस्टरे गावभर सर्वत्र लावली. अडचणीत सापडलेल्या विधवांनी तेथे यावे आपल्या मुलांना जन्म द्यावा. त्यांची नावे जाहीर होणार नाहीत. जातांना त्यांनी मूल घेऊन जावे किंवा ठेवून जावे. अनाथाश्रमात त्यांच्या मुलांचे संगोपन केले जाईल अशी सोय जोतीरावांनी केली होती. विधवांच्या केशवपनाला विरोध करण्यासाठी त्यांनी न्हाव्यांचा एक दिवसाचा संप घडवून आणला. लग्नाला अनेक वर्षे होऊनही त्यांना मूलबाळ नव्हते तेव्हा वडीलधार्‍यांनी त्यांना दुसरे लग्न करण्याचा सल्ला दिला. पण जोतीरावांनी त्याला ठाम नकार दिला. स्त्रीला जर अपत्यप्राप्तीसाठी दुसरा नवरा करता येत नाही तर पुरुषाला तरी दुसरी पत्‍नी करण्याचा अधिकार का असावा? असा प्रश्न त्यांनी केला. अशा अनेक प्रयत्‍नांतून जोतीबा फुले यांनी स्त्री-पुरूष समतेचा पुरस्कार केला.

त्या काळच्या स्त्रीलेखिका जरी तथाकथित उच्चवर्गातून आलेल्या व उच्चवर्गातील स्त्रियांचे प्रश्न मांडणार्‍या असल्या तरीसुद्धा त्यांनाही आप्तस्वकीयांच्या प्रखर रोषाला सामोरे जावे लागले. या स्त्रीवादी साहित्याच्या पहिल्या हुंकाराच्या पाठीशी आपल्या विचाराचे पाठबळ समर्थपणे उभे करण्याचे महत्त्वाचे कार्य जोतीबांनी केले. विख्यात विदुषी पंडिता रमाबाईंना मराठी पत्रकर्त्यांनी दिलेली दूषणे खोडून काढण्यासाठी, तसेच बुलढाण्याच्या ताराबाई शिंदे यांनी लिहिलेल्या 'स्त्री पुरूष तुलना' नामक पुस्तकावरील पुरुषी पूर्वग्रहदूषित टीका परतून लावण्यासाठी 'सत्सार॔ या आपल्या अनियतकालिकाचा विशेष अंक जोतीरावांनी काढला आणि संवादरूपाने त्यातून स्त्रीमुक्तीचा संदेश सांगितला. सारांशाने इ.स.१८८५ ते इ.स.१९५० या काळात मराठी वाङ्मयात लिहिल्या गेलेल्या स्त्रीवादी साहित्याची प्रमुख प्रेरणा म्हणून जोतीबा फुले यांच्या विचारकार्याचा मोठा वाटा आहे.

महात्मा जोतीबा फुले यांच्यानंतर विसाव्या शतकाच्या सुरूवातीला महात्मा गांधी यांनी स्त्रियांच्या आत्मसन्मानाची ठेवलेली जाणीव ही या काळातील स्त्रीवादी साहित्याची प्रेरणा म्हणावी लागेल. ऑल इंडिया वीमेन्स कॉन्फरन्सला पाठविलेल्या संदेशात महात्मा गांधी म्हणतात, 'जिला आपण अबला म्हणतो ती स्त्री ज्या क्षणी सबला होईल त्या क्षणी जे कोणी असहाय आहेत ते सर्व शक्तिमान होतील. गांधीजींनी या विचारधारेला अनुसरूनच स्त्रीस्वातंत्र्य, स्त्रीशिक्षण आणि स्त्रीसबलीकरणाचा पुरस्कार केला. विनोबा भावे, महर्षी कर्वे यांनीही स्त्रीमुक्तीचा पुरस्कार केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू स्त्रीला हिंदू पुरुषाच्या बरोबरीने हक्क आणि अधिकार मिळावेत म्हणून 'हिंदू कोड बील॔ तयार केले होते. या बिलाचा आग्रह नाकारला गेल्याने त्यांनी कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यांनी दलित स्त्रियांना आत्मसन्मानाची जाणीव करून दिली. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी एका विधवेबरोबर विवाह केला आणि तिला स्त्रीशिक्षणाच्या कार्यात सहभागी करून घेतले. त्यांनी पुण्यात हिंगणे येथे महिलाश्रमाची सुरुवात केली. इ.स. १९०६ साली त्यांनी महिला महाविद्यालय सुरू केले. इ.स. १९१६ साली महिलांसाठी महिला विद्यापीठ सुरू केले.

महात्मा फुले यांच्यानंतर स्त्रीवादी साहित्याला प्रेरणा ठरणारे विचारकार्य करणार्‍यांमध्ये महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा मोलाचा सहभाग होता. आपल्या व्याख्यानांमधून, वेळोवेळी केलेल्या लिखाणांमधून त्यांनी स्त्रीस्वातंत्र्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. एकंदरीत मानवी विकासक्रमात स्त्रीचे असलेले महत्त्वाचे स्थान त्यांनी अतिशय सखोल चिंतनातून पटवून देण्याचा प्रयत्न केला. शिंदे यांच्या मते मानवी जगाच्या इतिहासाच्या आरंभी घरात व समाजातही स्त्रीला अधिकाराचे राज्य होते. त्या काळी स्त्रीसत्ताक पद्धती अस्तित्वात होती. त्या काळात स्त्रीजवळ आजच्या प्रमाणे असलेल्या भावनांसोबतच उपजत बुद्धी, विवेचक बुद्धी व प्रयत्‍नशक्ती असली पाहिजे. नंतरच्या काळात घडत गेलेल्या सामाजिक स्थित्यंतरांमुळे स्त्रीसत्ताक पद्धती लयास जाऊन पुरूषवर्चस्व निर्माण झाले आणि पुरूषप्रधानतेमुळे स्त्रीच्या ठायी विवेचक बुद्धीचे आणि प्रयत्‍नसामर्थ्याचे खच्चीकरण होऊन स्त्रियांनी पुरूषांपुढे गौणत्व स्वीकारले असावे. असे असले तरी फक्त पाळण्याचीच नव्हे तर घरगुती राज्याची दोरी स्त्रीच्याच हाती आहे. स्त्रीला केवळ शिष्टाचारयुक्त वागण्यात मान दिल्याने स्त्रीला समानतेने वागवले असा त्याचा अर्थ होत नाही. स्त्रीच्या विवेचक बुद्धीत म्हणजेच विचारशक्तीत वाढ घडवून सामाजिक जडणघडणीत तिला क्रियाशील बनवायचे असेल तर तिला खरेखुरे स्वातंत्र्य द्यायला हवे असे आग्रहाचे प्रतिपादन वि.रा. शिंदे यांनी केले.

इ.स. १९२० मध्ये मुंबई इलाख्यातील निवडणूक लढवितांना शिंदे यांनी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. यात विद्याबळ, द्रव्यबळ व अधिकारबळ नसलेल्या व म्हणून मागास राहिलेल्या वर्गामध्ये त्यांनी स्त्रियांचा समावेश केला. स्त्रीवर्गाच्या हिताची कळकळ व स्त्रीवर्गाचे महत्त्व नमूद करतांना त्यांनी जाहीरनाम्यात म्हटले आहे, 'चालू राज्यक्रांतीत आमच्या देशातील स्त्रीवर्गाच्या हाती काहीच लागले नाही. आमचा पक्ष विद्वानांचा नाही, वक्त्यांचा नाही, ओरडणार्‍यांचा नाही, म्हणून तो स्त्रीवर्गाला विसरणारा आहे असे थोडेच होणार आहे? स्त्री वर्ग म्हणजे तर आमचा पाळणा! त्याची हयगय करू तर पाळण्यातच आमचे थडगे डोलू लागेल हे आम्ही पूर्णपणे जाणून आहोत.

सारांशाने इंग्रजी राजवटीमुळे झालेली आधुनिक जाणीव, शिक्षणाने व नव्या विचाराने जागृत झालेला आत्मसन्मान आणि वरील सर्व समाजसुधारकांच्या विचारकार्याच्या पाठबळाने स्त्रियांच्या व पुरुषांच्याही स्त्रीवादी लेखनाला चालना मिळाली. रमाबाई रानडे, पार्वतीबाई आठवले, लक्ष्मीबाई टिळक, संजीवनी मराठे, शांता आपटे, आनंदीबाई कर्वे, लीला पटवर्धन, अन्नपूर्णाबाई रानडे, इंदिरा भागवत आदी स्त्रियांनी प्रामुख्याने आत्मचरित्रेर, कथा व स्फुट लेखनांतून स्त्रियांचे भावविश्व उलगडले. स्त्रीवादी विचाराचे लेखन करण्यात सुधारक विचारवंत पुरूषांनी जे धाडस दाखवले ते धाडस दाखवणे साहित्यिक वर्तुळातल्या अन्य पुरुषांना मात्र अपवादानेच जमल्याचे आढळून येते. गो.ब. देवल (संगीत शारदा), प्र.के. अत्रे (घराबाहेर), कृ.प्र. खाडिलकर (मेनका) अशा काही नाटककारांनी स्त्रीवादी विचारांची नाट्यरचना केली. कृ.प्र. खाडिलकर यांच्या मेनका या नाटकात स्त्रीच्या मातृत्वाच्या हक्काचा प्रश्न चर्चिला गेला आहे. पण खाडिलकर हे स्त्रीच्या मातृत्वाच्या अधिकाराची मांडणी देशकार्याच्या पूर्तीच्या उद्दिष्टांशी जोडून करतात.

पुरूष समाजसुधारक आणि पुरोगामी साहित्यिक यांचा स्त्रियांच्या प्रश्नावर लढा सुरू असतांनाच स्त्रियांनीही आपल्या प्रश्नांवर लेखन करण्यास सुरूवात केली. शिक्षणामुळे आलेले आत्मभान आणि याच काळात महात्मा गांधींनी स्वातंत्र्याच्या चळवळीत घेतलेला स्त्रियांचा सहभाग यातून स्त्री लेखिकांमध्येही आत्मविश्वास निर्माण झाला. स्त्रियांनी कथालेखनाच्या माध्यमातून आपल्या विविध अनुभवांना अभिव्यक्त केले. स्त्रियांनी आत्मचरित्र हा प्रकारही विपुल प्रमाणात हाताळला. स्त्रियांनी लिहिलेल्या आरंभीच्या आत्मचरित्रांमध्ये पारंपरिक स्वरूपाचेच विचार मांडलेले दिसून येतात. हौस म्हणून किंवा दुःख विसरण्याचा मार्ग म्हणून बहुतांशी उच्च मध्यम वर्गातील स्त्रियांनी ही आत्मचरित्रे लिहिली.

ताराबाई शिंदे यांनी आपल्या स्त्रीपुरूषतुलना या पुस्तिकेत काळाच्या पुढचे व अतिशय परखड असे विचार व्यक्त केले. ताराबाई शिंदे यांनी स्त्रीचे विविध स्तरावर होणारे शोषण, पुरुषसंस्कृतीची वर्चस्व राखण्याची रानटी वृत्ती यावर त्यांनी आपल्या खास शैलीत प्रहार केले. 'नवरा कसाही दुर्गुणी असला तरी त्याला देवाप्रमाणे मानून कोण बरे वागेल?' असा सवाल ताराबाई शिंदे यांनी आपल्या लेखनातून केला आहे.

इ.स. १९५० पर्यंतच्या मराठी वाङ्मयात स्त्रीवादी विचारांची पात्रे परखडपणे चित्रित करण्याचे धाडस विभावरी शिरूरकर यांनी सर्वप्रथम केले. विभावरी शिरूरकर यांचा 'कळ्यांचे निःश्वास॔ हा कथासंग्रह प्रकाशित झाल्यावर स्त्रियांच्या लेखनाला स्त्रीचे खरे सत्त्व सापडलेले आढळून येते. 'कळ्यांचे निःश्वास॔ कथासंग्रहातील तसेच 'हिंदोळ्यावर॔ या कादंबरीतील नायिका या व्यक्तिस्वातंत्र्याच्या प्रखर जाणिवांचा आविष्कार करतात. व्यक्तिस्वातंत्र्य आणि वास्तववाद अशा प्रेरणा जागृत होऊन विभावरीबाई स्त्रीविश्वाचे खरेखुरे दर्शन घडविण्याकडे वळल्या. जागतिक वाङ्मयाच्या प्रेरणेतून इ.स. १९६० नंतर मराठी वाङ्मयात उदयास आलेल्या स्त्रीवादी साहित्यप्रवाहाच्या प्रेरणांमध्ये विभावरींच्या लेखनाचा मोठा वाटा आहे.

इ.स. १९६० नंतर जागतिक वाङ्मयात स्त्रीवादी साहित्यविचाराने जोर धरला. मराठीतही त्यामानाने बऱ्याच लवकर साधारणतः इ.स. १९७० च्या दशकात जागतिक स्त्रीवादी वाङ्मयविचाराने प्रेरित होऊन स्त्रीवादी लेखन होऊ लागले. भारतीय समाजसुधारक, इ.स. १९५० पर्यंतचे विभावरी शिरूरकर, ताराबाई शिंदे आदींचे लेखन व विचारकार्य आधुनिक युगाचा मूळधर्म ठरलेला वास्तववाद, मार्क्सवादी विचारधारा, दलित साहित्याची चळवळ, साक्षरता मोहीम, स्त्रियांना तेहतीस टक्के आरक्षण अशा अनेक विचार व घटनाक्रमांच्या प्रेरणेने मराठी वाङ्मयात नवा स्त्रीवाद अवतरला.[१]

१८८५ ते १९५० या काळातील स्त्रीवादी साहित्याच्या प्रेरणा[संपादन]

ताराबाई शिंदे १८८२ साली प्रसिद्ध झालेल्या ‘स्त्री-पुरुष तुलना‘ हा निबंध हे महाराष्ट्रातील पहिले स्त्रीवादी लेखन म्हणून गणले जाते. स्त्रीवादी साहित्य हे भारतात एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आधुनिक साहित्याच्या बरोबरीनेच उदयास आलेले आहे. या स्त्रीवादी लिखाणाच्या प्रेरणास्थानी मात्र जगातील स्त्रीवादी विचार होता असे म्हणता येत नाही. या काळात लोकहितवादी, न्या.रानडे, म. फुले, आदींनी केलेले स्त्रीवादी लिखाण हे भारतीय संस्कृतीतील अन्यायी पुरुषप्रधानतेच्या अनुषंगाने केलेले होते.

सतीच्या चालीविरुद्ध आंदोलन करणारे राजा राममोहन रॉय हे पहिले कृतीशील स्त्रीवादी विचारवंत म्हणून पुढे आले. सती प्रथेबरोबरच स्त्रियांवर होणार्‍या सर्वच प्रकारच्या अन्यायाविरुद्ध त्यांनी आंदोलन छेडले. मृत पतीच्या मालमत्तेत मुलांसोबत पत्‍नीलाही वाटा मिळाला पाहिजे असा विचार त्यांनी मांडला. त्यांनी विधवाविवाहाचा पुरस्कार केला. समाजातील स्त्रियांची गुलामी ही पुरूषांच्या अहंकारामुळे निर्माण झालेली असून जोपर्यंत त्या शिक्षण घेत नाहीत तोपर्यंत ही गुलामी नष्ट होणार नाही. असे विचार राजा राममोहन रॉय यांनी मांडले. पुढे ईश्वरचंद्र विद्यासागर ह्यांच्या प्रयत्‍नसंतून विधवा पुनर्विवाहाचा कायदा संमत झाला.

जागतिक पातळीवरील स्त्रीवादी साहित्यचळवळीतून मिळालेली प्रेरणा[संपादन]

१९६० नंतर मराठीत जे स्त्रीवादी लिखाण झाले त्याची प्रेरणा मात्र भारतीय संस्कृतीतील स्त्रीपक्षपाताची चिकित्सा व त्याचबरोबर जागतिक पातळीवरील स्त्रीवादी साहित्यचळवळीतून मिळालेली प्रेरणा दिसून येते.

स्त्रीवादी लेखन जरी १९४० ते १९५० च्या दशकांदरम्यान होऊ लागले तरी स्त्रीवादाची तात्त्विक बैठक ही मात्र १९७० च्या दशकाच्या आसपास मराठी वाङ्मयात स्वीकारली जाऊ लागली. आज स्त्री गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त झाली आहे.तरी पण तिला दुहेरी भूमिका पार पाडाव्या लागतात.नोकरी व घराची जबाबदारी तिलाच पार पाडावी लागते.

संदर्भ[संपादन]

  1. १.० १.१ http://marathimaitree.blogspot.com/2009/03/blog-post_22.html#more
  2. Google's cache of http://www.miloonsaryajani.com/node/234.[मृत दुवा] It is a snapshot of the page as it appeared on 14 Dec 2009 20:25:40 GMT.