Jump to content

नारायण हरी आपटे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ना. ह. आपटे तथा नानासाहेब आपटे
जन्म नाव नारायण हरी आपटे
टोपणनाव नानासाहेब, नरेंद्र
जन्म ११ जुलै १८८९
समडोळी (सांगली जिल्हा)
मृत्यू १४ नोव्हेंबर १९७१
कोरेगाव
राष्ट्रीयत्व भारतीय
धर्म हिंदू
कार्यक्षेत्र बाल-साहित्यिक, कादंबरीकार, संपादक, मुद्रक, प्रकाशक, चित्रपट कथाकार
भाषा मराठी
साहित्य प्रकार कादंबरी, ऐतिहासिक कादंबरी
कार्यकाळ १९०५-१९७०
प्रसिद्ध साहित्यकृती न पटणारी गोष्ट, गृहसौख्य, सुखाचा मूलमंत्र, सुगरणीचा संसार, आम्ही दोघे (ते आणि मी)
प्रभाव ह. ना. आपटे, राम गणेश गडकरी
प्रभावित स्नेहलता दसनूरकर, ब. ल. वष्ट
वडील हरी नारायण आपटे, लेखक नव्हे
पत्नी सरस्वतीबाई आपटे (गोदावरी काणे, जत)
अपत्ये सहा मुली, एक दत्तक मुलगा

नारायण हरी आपटे (जन्म : समडोळी-सांगली जिल्हा, ११ जुलै १८८९; - कोरेगाव-सातारा, १४ नोव्हेंबर १९७१) हे मराठी , कादंबरीकार, व्याख्याते आणि प्रकाशक होते. त्यांचे शिक्षण समडोळीला आणि नंतर सातारा येथे झाले. ते किर्लोस्कर खबर (पहिले उपसंपादक), उद्यान, लोकमित्र तसेच आल्हाद साप्ताहिक व मधुकर या मासिकाचे संस्थापक-संपादक होते. ‘आपटे आणि मंडळी’ या नावाने प्रकाशनगृह स्थापन केले. प्रकाशन करण्यासाठी स्वतःचा ‘श्रीनिवास छापखाना’ कोरेगाव येथे सुरू केला

  • २, ३ व ४ नोव्हेंबर १९६२ सातारा येथे भरलेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते.
  • १,२ डिसेंबर १९३३ बडोदा वांग्मय परिषदेच्या अधिवेशनाचे संमेलनाध्यक्ष, (http://vangmayparishadbaroda.org/adhiveshan.php Archived 2020-09-23 at the Wayback Machine.)
  • २५ मे १९४१, पुणे येथे भरलेल्या शारदोपासक संमेलनाचे अध्यक्ष. (ध्रुव मासिक जून १९४१).

नारायण हरि आपटे यांनी मुख्यत: कादंबऱ्या लिहिल्या असल्या, तरी त्यांच्या लघुकथासंग्रह आणि वैचारिक लेखनही प्रकाशित झाले आहे . त्यांनी जवळपास साठ कादंबऱ्या लिहिल्या आहेत. त्यांतल्या थोड्याशा ऐतिहासिक सोडल्या तर बाकीच्या सामाजिक कादंबऱ्या आहेत. त्यांची एकूण साहित्य-ग्रंथ संख्या सुमारे १०० इतकी आहे. इंग्रजांची परकीय नोकरी करावयाची नाही अशी हिंमत बाळगून केवळ लिखाण करून संसार करणारे ते काही लेखकांपैकी एक होत.

आपटे हे ‘किर्लोस्कर खबर’ या नियतकालिकाचे काही काळ सहसंपादक होते. साताऱ्यातून ते आल्हाद साप्ताहिक प्रसिद्ध करत. कोरेगावहून त्यांचे स्वतःचे ‘मधुकर’ नावाचे मासिक प्रसिद्ध होत असे.

न पटणारी गोष्ट (१९२३), सुखाचा मूलमंत्र (१९२४), पहाटेपूर्वींचा काळोख (१९२६), उमज पडेल तर (१९३९), एकटी (१९४५) या आपट्यांच्या काही प्रसिद्ध सामाजिक कादंबऱ्या होत. त्यांच्या ऐतिहासिक कादंबऱ्यापैकी अजिंक्यतारा (१९०९), संधिकाल (१९२२), लांच्छित चंद्रमा (१९२५) आणि रजपूतांचा भीष्म (१९४९) या विशेष उल्लेखनीय आहेत. आराम-विराम (१९३४) आणिबनारसी बोरे हे त्यांचे कथासंग्रह. यांशिवाय गृहसौख्य (१९३१), आयुष्याचा पाया (१९४६), कुर्यात् सदा मंगलम् (१९४९) यांसारख्या ग्रंथांतून संसारसुखाचे मूलभूत सिद्धान्त, वैवाहिक नीती, तरुण विद्यार्थ्यांचे आदर्श वर्तन इ. विषयांसंबंधी विवेचन त्यांनी केले आहे. त्यांनी सारेच लेखन बोधवादी भूमिकेतून केलेले आहे. त्यांची शैली प्रसादपूर्ण आणि प्रसन्न आहे.

नारायण हरी आपटे यांच्या ‘न पटणारी गोष्ट’ या कादंबरीवर प्रभातने ‘कुंकू’ चित्रपटाची निर्मिती करून जरठकुमारी विवाह ही त्या काळातील ज्वलंत समस्या चव्हाट्यावर मांडली. ट्रेलरची पद्धत कुंकू चित्रपटापासून सुरू झाली. ट्रेलरमुळे सिनेप्रेक्षकांची उत्सुकता कमालीची ताणली गेली होती.

(खालील मजकूर http://www.lokprabha.com/20110923/mumbai-talkies.htmवरून साभार)

"""" कुंकू सिनेमा गाजला तो, शांतारामबापूंच्या कल्पक दिग्दर्शनामुळे. तसेच पार्श्र्वसंगीतासाठी वाद्यांऐवजी नैसर्गिक ध्वनींचा प्रयोग यामुळे, यात परशुरामचे ‘मन सुद्ध तुझं..’ हे लोकप्रिय गाणे, शांता आपटेंनी केलेला मीरेचा सहजसुंदर अभिनय, केशवराव दातेंनी रंगविलेला जरठ काकासाहेब, ‘कुंकू’ आणि हिंदीतील ‘दुनियाना माने’ हा चित्रपट सिनेउद्योगातील मैलाचा दगड ठरला. १९३७ साली विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर मुंबईत कृष्ण सिनेमात ‘कुंकू’ प्रदर्शित झाला. गिरगाव रोडच्या कृष्ण सिनेमात ‘कुंकू’ने आपले बस्तान ठोकले. ‘कुंकू’ हा कृष्ण सिनेमाच्या (OPERA HOUSE, KRISHNA CINEMA, TRIBHUVAN ROAD, GIRGAON) इतिहासातील सर्वाधिक गाजलेला चित्रपट म्हणून नोंद झाला. ‘दुनिया न माने’ हा मुंबईतील 'एक्सेलसियर'ला लागलेला पहिला हिंदी चित्रपट होता.

या आधी नारायण हरी आपटे यांच्याच ‘भाग्यश्री’ कादंबरीवर प्रभातने ‘अमृतमंथन’ (१९३४) चित्रपटाची निर्मिती केली. सुविद्य नटी नलिनी तर्खडने यात राणी मोहिनीची भूमिका केली. चित्रपटाच्या शेवटी तत्त्वासाठी अंध झालेला राजगुरू देवीसमोर स्वहस्ते आपले शिर कापून अर्पण करतो असा क्लायमॅक्स आहे. हिंदीमध्ये राजगुरूची ही आव्हानात्मक अवघड भूमिका भेदक आणि पाणीदार डोळ्याच्या चंद्रमोहनने केली होती. सुमित्राच्या भूमिकेतील शांता आपटेची गाणी संपूर्ण हिंदुस्थानात लोकप्रिय झाली होती. ‘अमृतमंथन’च्या दिग्दर्शनासाठी व्ही. शांताराम यांना, तर उत्कृष्ट अभिनयासाठी चंद्रमोहन यांना गोहर सुवर्ण पदक देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. ‘अमृतमंथन’ची हिंदी आवृत्ती कृष्णमध्ये एकोणतीस आठवडे चालली. त्या काळी चित्रपटांचे रौप्य महोत्सव इतक्या सहजासहजी होत नसत.

नारायण हरी आपटे यांच्याच ‘रजपूत रमणी’ कादंबरीवर प्रभातने ‘रजपूत रमणी’ (१९ ३६) चित्रपट तयार केला. यात मानसिंहाची भूमिका नानासाहेब फाटकांनी तर सौदामिनीची भूमिका नलिनी तर्खडने केली होती. केशवराव धायबरने दिग्दर्शित केलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला.

आपट्यांच्या लघुकथांवरून काही चित्रपट बनले आहेत. ‘भाग्यरेखा’ हा चित्रपट ना.ह.आपट्यांच्या ‘पाच ते पाच’ या कथेवरून केला होता. चित्रपटाची पटकथा, गीते आणि दिग्दर्शन शांताराम आठवले यांचे होते. त्या चित्रपटात १९४२ सालच्या चळवळीतील भूमिगत क्रांतिकारकांचे खडतर साहसी जीवन दाखवले होते. सामान्यांचा क्रांतिकारकांना मिळणारा सक्रिय व धाडसी पाठिंबा, भाकरी मोर्चा सारखे सामाजिक लढे, आदर्श, ध्येयनिष्ठ प्रेम, मोहाच्या क्षणातून उद्भवलेला कुमारी माता हा पेचप्रसंग, हे सर्व दाखवणारे आणि "निर्भयतेने जीवन जगा" असा संदेश देणारे हे राजकीय पार्श्वभूमी असलेले चित्रण होते. चित्रपट फारच उत्तम बनला होता, परंतु महात्मा गांधींचा खून झाला, आणि दंगे, जाळपोळ यांत चित्रपटाची वाताहत झाली.

कुंकू हा प्रभात चित्रपटसंस्थेचाचा गाजलेला चित्रपट, ना.ह.आपटे यांच्या ‘न पटणारी गोष्ट’ या कादंबरीवर आधारित आहे. 'महाराष्ट्र टाईम्स' आपल्या २९ जून १९८६ च्या अंकात १५० निवडक मराठी पुस्तकांची यादी 'सर्वोत्कृष्ट/नावाजलेली' म्हणून प्रसिद्ध केली होती. या पुस्तकांची निवड 'महाराष्ट्र टाईम्सने स्वतःच केली होती. वाचकांच्या प्रतिक्रिया विचारात घेऊन २७ पुस्तकांची या यादीत नंतर भर घालण्यात आली त्यात ‘न पटणारी गोष्ट’ ही कादंबरी निवडली गेली.

१९६२ सालच्या सातारा येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाचे ना.ह. आपटे हे स्वागताध्यक्ष होते. अध्यक्ष बॅरिस्टर न.वि.गाडगीळ होते.

नारायण हरी आपटे हे सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथे १४ नोव्हेंबर, इ.स. १९७१ रोजी निवर्तले.

प्रकाशित साहित्य

[संपादन]
नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
अजरामर
अजिंक्यतारा ऐतिहासिक कादंबरी इ.स. १९०९
अपेक्षा सामाजिक कादंबरी
अमरसंग्राम
अमेरिका पूर्वखंड
अर्वाचीन रामराज्य
आनंदमंदिर सामाजिक कादंबरी
आपण आहो माणसे सामाजिक कादंबरी
आम्ही दोघे सामाजिक कादंबरी
आयुष्याचा पाया वैचारिक इ.स. १९४६
आराम कथासंग्रह
आराम-विराम कथासंग्रह इ.स. १९३४
उमज पडेल तर सामाजिक कादंबरी इ.स. १९३९
एकटी सामाजिक कादंबरी इ.स. १९४५
ऐरणीवर
कड्याच्या टोकावर
कथाकौमुदी कथासंग्रह
कर्मगति इ.स.
कुठे आहे तो देव
कुर्यात सदा मंगलम बोधप्रद लेख इ.स. १९४९
केवळ नवलाई
कोंडा-कणी
कोणी कोणाचे नव्हे
गृह सौख्य बोधप्रद लेख इ.स. १९३१
ग्रीष्मागमन
जवानांचा जीवनधर्म इ.स. १९६२
जाऊबाई सामाजिक कादंबरी
ते आणि मी
त्या अबला होता
दिवाकरदृष्टी
दुरंगी दुनिया
न पटणारी गोष्ट सामाजिक कादंबरी इ.स.१९२३
पंजाबचा लढवय्या शीख ऐतिहासिक कादंबरी इ.स. १९१७
पहाटे पूर्वीचा काळोख सामाजिक कादंबरी इ.स. १९२६
पांच ते पांच दीर्घकथा
पाणी आणि शेवाळ
पिशाचसाधन
पुरुषाचे भाग्य
फसगत
बनारसी बोरे कथासंग्रह इ.स. १९३२
भाग्यश्री सामाजिक कादंबरी
भुरळ इ.स. १९१४
मानवी आशा
मी वाट पाहीन
याला कारण शिक्षण
रजपुतांचा भीष्म ऐतिहासिक कादंबरी इ.स. १९१९
रत्नगुंफा
लांच्‍छित चंद्रमा ऐतिहासिक कादंबरी इ.स. १९१३
लोकमित्र इ.स. १९२१
वेटिंग रूम
वैभवाच्या कोंदणात
व्यवसायपत्रे
संगदोष
संधिकाल ऐतिहासिक कादंबरी १९२२
संसारांत पडण्यापूर्वी बोधप्रद
समर्थ शिष्य इ.स. १९१७
साजणी
सायंकाळी ५ ते प्रभातकाली ५
सुखाचा मूलमंत्र सामाजिक कादंबरी इ.स. १९२४
सुगरणीचा संसार
सुमन गंध
सोन्याचे बिल्वर
हंसा आणि रुसा
हदयाची श्रीमंती इ.स. १९२०

चित्रपट - भाग्यरेखा

[संपादन]

(http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%BE_(%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F) )

भाग्यरेखा हा इ.स. १९४८ साली चित्रपटगृहांत झळकलेला व शांताराम आठवले यांनी दिग्दर्शिलेला मराठी भाषेतील चित्रपट आहे. शांता आपटे, पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांच्या यात प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटातील गीते शांताराम आठवले यांनी लिहिली होती, तर त्यांना केशवराव भोळ्यांनी चाली बांधल्या होत्या.

अन्य चित्रपट http://www.imdb.com/name/nm0032545/ येथे.

ना.ह. आपटे यांच्यावरील पुस्तके

[संपादन]
  • ना.ह. आपटे व्यक्ती आणि वाङ्मय (डॉ. सौदामिनी चौधरी)

बाह्य दुवे

[संपादन]
  • "नारायण हरी आपटे यांच्या साहित्यकृती" (इंग्लिश भाषेत). २१ सप्टेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)