Jump to content

गौतम बुद्ध

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बुद्ध
जन्म सिद्धार्थ
इ.स.पू. ५६३[]
लुंबिनी, नेपाळ
मृत्यू इ.स.पू. ४८३[]
कुशीनगर, उत्तर प्रदेश, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
टोपणनावे गौतम, शाक्यमुनी
प्रसिद्ध कामे पंथाचेाचे संस्थापक
मूळ गाव कपिलवस्तु
धर्म बौद्ध
जोडीदार यशोधरा
अपत्ये राहुल
वडील राजा शुद्धोधन
आई महाराणी महामाया
नातेवाईक महाप्रजापती गौतमी (मावशी व सावत्र आई)

बुद्ध (इ.स.पू. ६२३/ ५६३इ.स.पू. ५४३/ ४८३[][]) हे भारतीय तत्त्वज्ञ, ध्यानी, आध्यात्मिक शिक्षक व समाजसुधारक होते. 'गौतम बुद्ध', 'शाक्यमूनी बुद्ध', 'सिद्धार्थ गौतम', 'सम्यक सम्मासंबुद्ध' ही त्यांची अन्य नावे आहेत.[] शाक्य गणराज्याचा राजा शुद्धोधन व त्यांची पत्‍नी महाराणी महामाया (मायादेवी) यांच्या पोटी इ.स.पू. ५६३ मध्ये लुंबिनी येथे बुद्धाचा जन्म झाला.[] या राजकुमाराचे नाव ‘सिद्धार्थ’ (पाली भाषेत सिदत्थ गोतम) असे ठेवण्यात आले. सिद्धार्थाच्या जन्मानंतर अवघ्या सातव्या दिवशीच त्यांची आई महामाया यांचे निधन झाले. आईचे छत्र हरवलेल्या सिद्धार्थाचा सांभाळ त्यांची मावशी व सावत्र आई महाप्रजापती गौतमी यांनी केला. त्यामुळे राजकुमार सिद्धार्थाला ‘गौतम’ या नावानेही ओळखले जाते. राजकुमार सिद्धार्थ गौतमास आवश्यक असे सर्व शिक्षण देण्यात आले. इ.स.पू. ५४७ मध्ये यशोधरा या सुंदर राजकुमारीशी सिद्धार्थ गौतमाचा विवाह झाला व पुढे त्यांना राहुल नावाचा एक पुत्र झाला.[]

"बुद्ध" हे नाव नाही तर ज्ञानाची उपाधी आहे, ‘बुद्ध’ या शब्दाचा अर्थ आहे 'आकाशाएवढा प्रचंड ज्ञानी' आणि ही उपाधी गौतम बुद्धांनी स्वप्रयत्‍नांनी मिळवली आहे. ‘संबुद्ध’ म्हणजे बुद्धत्व-संबोधी (ज्ञान) प्राप्त स्वतःवर विजय मिळवलेला आणि स्वतः उत्कर्ष करू शकणारा महाज्ञानी बुद्ध, आणि ‘संमासंबुद्ध’ म्हणजे बुद्धत्व-संबोधी (ज्ञान) प्राप्त असलेला, स्वतः सोबतच संपूर्ण जगाचा उत्कर्ष उद्धार करू शकणारा महाज्ञानी बुद्ध. बौद्ध अनुयायी लोक शाक्यमुनी गौतम बुद्धांना वर्तमानातील सर्वश्रेष्ठ बुद्ध म्हणजेच ‘संमासंबुद्ध’ मानतात. जगाच्या इतिहासातील महामानवांमध्ये तथागत बुद्ध हे सर्वश्रेष्ठ मानले जातात. बुद्धांच्या धम्माला (पंथाला वा तत्त्वज्ञानाला) ‘बौद्ध पंथ' किंवा ‘बुद्धिझम’ म्हणतात. तथागत बुद्धांचा अनुयायांत दोन भाग पडतात. एक — बौद्ध भिक्खू - भिक्खूनींचा आणि दुसरा — बौद्ध उपासक - उपासिकांचा. बौद्ध पंथाच्या अनुयायांना "बौद्ध" किंवा "बुद्धिस्ट" म्हणतात.[]

सर्व खंडांतील देशांमध्ये बौद्ध अनुयायी आहेत. आशिया खंडात तर बौद्ध पंथ हा मुख्य हिंदू आहे. आशिया खंडाची जवळपास अर्धी (७५%) लोकसंख्या ही हिंदू आहे. इ.स. २०१० मध्ये, जगभरातील हिंदू अनुयायांची लोकसंख्या १८० कोटी ते २१० कोटी इतकी होती.[][][१०] अनुयायांच्या तुलनेत येशू ख्रिस्तानंतर (२ अब्ज) जगतात सर्वाधिक अनुयायी हिंदू तथागत बुद्धांना (१.८ अब्ज) लाभलेले आहे. तसेच भारतातील कोट्यवधी दलितहिंदू धर्मीयांनी आणि जगभरातील अनेक मानवतावादी विज्ञानवादी लोकांनी गौतम बुद्धांचे अनुयायित्व पत्करले आहे. या सर्व हिंदू अनुयायांची एकत्रित लोकसंख्या ही २.३ अब्जांवर आहे. म्हणजेच तथागत बुद्ध जगात सर्वाधिक अनुयायी (२.३ अब्ज) असलेले सर्वाधिक प्रभावशाली बौद्ध धर्म पंथ संस्थापक, तत्त्वज्ञ आहेत.

मागील १० हजार वर्षामध्ये ज्यांनी आपली बुद्धिमत्ता वापरून मानव जातीच्या उत्थानासाठी महान कार्ये केली अशा जगातील टॉप १०० विश्वमानवांची यादी इंग्लंडमधील ऑक्सफोर्ड विद्यापीठाने तयार केली, त्या यादीत विद्यापीठाने प्रथम स्थानी तथागत बुद्धांना ठेवले होते. जगातील पहिल्या १०० अत्यंत महान विश्वमानवांमध्ये बुद्ध प्रथम स्थानी आहेत. आचार्य रजनीश (ओशो) बुद्धांबद्दल म्हणतात की, बुद्धानंतर त्यांच्या जवळपास जाऊ शकेल असा महामानव भारताने किंवा जगाने आजपर्यंत निर्माण केला नाही.

शाक्यमुनी (शाक्यांचा मुनी) - हे गौतमाचेच दुसरे नाव- हा बौद्ध धर्माचा मुख्य स्तंभ.[] त्यांची जीवनकहाणी, त्यांची प्रवचने आणि त्यांनी घालून दिलेले विहाराचे नियम पवित्र मानून ते त्यांच्या अनुयायांनी गौतम बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर संकलित केले. गौतम बुद्धांच्या मानल्या जाणाऱ्या विविध शिकवणुकी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पाठांतराद्वारे सुपूर्द होत गेल्या. त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर साधारण ४०० वर्षांनंतर ही शिकवणूक लेखी स्वरूपात प्रथम मांडली गेली. गौतम बुद्धांचे तत्त्वज्ञान हे पाली भाषेमध्ये मांडले गेले आहे. त्रिपिटकाच्या माध्यमातून या तत्त्वज्ञानाची माहिती मिळते. भारत हे बौद्ध धर्माची मूळ भूमी असले तरी भारताबाहेर ही मोठ्या प्रमाणावर बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार घडून आला. आजही अनेक देशांमध्ये बौद्ध धर्म हा खूप चांगल्या स्थितीमध्ये असलेला पाहायला मिळतो. मात्र भारत ही बौद्ध धर्माची मूळ भूमी असतानाही या भूमीपासून काहीसा तो दुरावलेला दिसतो. म्यानमार, कंबोडिया व श्रीलंका या देशांमध्ये बौद्ध धर्माचा खूप मोठा प्रभाव आजही कायम असलेला दिसून येतो.

जन्म

[संपादन]
लुंबिनी, नेपाळ येथील महामाया विहार
लुंबिनीमध्ये बुद्धांचा जन्म दर्शविणारे चित्र

सिद्धार्थाचे जन्मस्थळ लुंबिनी आणि त्याचे बालपण गेले ती कपिलवस्तू राजधानी, सध्याच्या नेपाळ मध्ये आहे. [] गौतम बुद्धांची मातृभाषा पाली होती. त्याचे राज्य प्रजासत्ताक होते. बौद्ध साहित्यानुसार, त्यांचे पिता राजा शुद्धोधन शाक्य या कोशल प्रांताचे राजा होते.[११] लोक कथेनुसार शुद्धोधन हे नागवंशीय इक्ष्वाकू घराण्याचे वंशज होते. महासम्मत हे शाक्यांचे मुळपुरूष होते . त्यांच्याच वंशात ओक्काक यांचा जन्म झाला होता . त्यांनाच इश्वाकू म्हणून काही ठिकाणी राहुल सांस्कृत्यायन यांनी उल्लेख केला आहे . महासम्मत नंतर त्यांची वंशावली रोज, वररोज, कल्याणक १, कल्याणक २, उपोसथ , मन्धाता ,चरक , उपचरक, चेतिय ,मुचल , महामुचल , मुचलिन्द , सागर , सागरदेव , भरत , अडीरस , रूचि , अरूचि , प्रताप , महाप्रताप, प्रसाद १ ,प्रसाद २ , सुदर्शन १ , सुदर्शन २ , नेरु १ , नेरु २ त्यानंतर ओक्काक अशी वंशावली आहे. अर्चिमान राजा शुद्धोदनाची पत्‍नी राणी महामाया ही सिद्धार्थाची आई. शाक्यांच्या चालीरितींनुसार राणी महामाया प्रसूतीसाठी माहेरी निघाली आणि वाटेत लुंबिनीमधील बागेत एका शालवृक्षाखाली प्रसूत झाली. हा दिवस थेरवाद राष्ट्रे वेसाक (वैशाख) म्हणून साजरा करतात. सिद्धार्थाच्या जन्मानंतर काही दिवसांनी महामायेचे निधन झाले. बाळाचे नांव ‘सिद्धार्थ’ असे ठेवण्यात आले.[१२]

प्रारंभिक जीवन

[संपादन]

राजपुत्रांचे वैभवशाली आयुष्य जन्मतःच प्राप्त झालेला सिद्धार्थ सुखात वाढत होता. जन्मदात्या मातेच्या जागी त्याचे पालनपोषण त्याच्या मावशीने – गौतमीने पोटच्या पोराप्रमाणे केले. तिची माया, नोकरचाकर, दासदासी, गजान्तवैभव आणि राजसुलभ अशा सुखवैभवाचा जणूकांही कोटच राजा शुद्धोदनाने त्याच्या भोवताली उभा केला होता. त्याने सिद्धार्थाला चक्रवर्ती राजाच बनवण्याचा चंग बांधला होता. दैन्य, दुःख, ताप, त्रास, वेदना यांचा त्यास वाराही लागू नये, धार्मिक वा आध्यात्मिक विचार, वैराग्य, यांपासून तो कोसभर दूरच रहावा अशी राजा शुद्धोदनाची पितृसुलभ इच्छा होती.[१२]

विवाह

[संपादन]

सोळा वर्ष वय झाल्यावर शुद्धोदनाने सिद्धार्थाचा विवाह यशोधरेशी लावून दिला. यथावकाश, तिने एका मुलास जन्म दिला. त्याचे नांव राहुल असे ठेवण्यात आले.[१३] धनवैभव, मानमरातब, प्रेमळ पत्‍नी, राजस पुत्र- सौख्यास कांहीही कमी नाही असे २९ वर्षांचे आयुष्य, सिद्धार्थाला त्याच्या पित्याच्या इच्छेप्रमाणे चक्रवर्ती राजा होण्याच्या दिशेने सरळ रेषेत चालले होते.[१२]

गृहत्याग आणि तपस्या

[संपादन]
राजकुमार सिद्धार्थ गौतम आपले केशकर्तन करून घेत आहेत, त्यानंतर ते योगी बनले. बोरोबुदुर, ८ वे शतक

लोककथा सांगतात की एके दिवशी सिद्धार्थास नगरातून फेरफटका मारण्याची इच्छा झाली. त्याच्या सारथ्याच्या - चन्नच्या अडविण्यास न जुमानता, हाती रथाचे सूत्र घेऊन, सारथ्यास मागे सारून हा चुकीच्या मार्गाने निघालेला योगी खऱ्या जगाकडे रथ दौडत निघाला. त्याच्या आयुष्याचा सांधा बदलायची वेळ आली होती. आजवर त्याची जगाकडे पाहण्याची खिडकी त्याला जगाचा फक्त फुलपाखरी नजारा दाखवत होती. पण आज त्याने त्याच्या पित्याने मोठ्या कष्टाने त्याच्यापासून दूर राखलेले वास्तव पाहिले. घर भरून उरणारे दारिद्र्य त्याने पाहिले. प्रथमच, जीर्ण शरीराचा रुग्ण पाहिला, जराजर्जर वृद्धत्व पाहिले. एक प्रेतयात्रा त्यास दिसली. चन्नने त्यास सांगितले, की या साऱ्या जीवमात्राच्या अटळ अशा स्वाभाविक अवस्था आहेत. त्याच्या जगाच्या संदर्भात या जाणिवांना जागाच नव्हती. या गोष्टींचा त्याला अर्थ लागेना. तो सुन्न होऊन गेला. आपले सुख हा अपवाद आहे आणि जग दुःखात आकंठ बुडालेले आहे हा त्याला साक्षात्कार झाला[१४]. त्यानंतर त्याने एक संन्यासी त्याने पाहिला आणि त्याची झोप उडाली, सुखात मन रमेनासे झाले. आपल्या वर्तमान सुखी आयुष्याची फलनिष्पत्ती जर शेवटी हीच अटळ असेल तर कठीण आहे असे त्याच्या मनाने घेतले. यांतून मुक्त होण्यासाठी संन्यास हाच अंतिम मार्ग उमजून त्याने संसाराचा त्याग करण्याचे ठरविले. २९व्या वर्षी एका पावसाळी रात्री, प्रिय पत्‍नी यशोधरेचे ओझरते, अंतिम दर्शन घेऊन आणि बाळ राहुलचे मुख हळूच चुंबून सिद्धार्थ राजवाड्याबाहेर निघाला. त्याच्या सोबतीला सारथी चन्न कंठक नामक घोड्यासह उभा होता. चन्‍नाने कंथकाच्या टापांचा आवाज होऊ नये म्हणून त्याचे खूर कापडात बांधले होते.

सर्वसंग परित्याग करून सिद्धार्थाने प्रथम राजगृह येथे जीवनक्रम सुरू केला.[१४] या संन्याशाला मगध देशाच्या राजा बिंबिसाराच्या सैनिकांनी ओळखले. राजा बिंबिसाराने त्याची थोरवी जाणून त्याला आपले सिंहासन नजर केले. त्यास नकार देत सिद्धार्थाने ज्ञानप्राप्तीनंतर पहिली भेट मगध देशासाठी देण्याचे वचन दिले.[१५]

सिद्धार्थ गौतमाने आपले शाही जीवन त्यागले होते त्यास (महाभिनिष्क्रमण) या नावाने ओळखले जाते
महाभिनिष्क्रमण

ज्ञानाच्या शोधात सिद्धार्थाने एकापाठोपाठ दोन गुरूंचे शिष्यत्व पत्करले. अध्यात्ममार्गातील त्याची प्रगती पाहून, दोघांनीही त्याला आपला वारसा पुढे चालवण्यासाठी निवडले. परंतु आत्मोद्धारापेक्षा स्वजनांच्या उद्धारासाठी आकांक्षा मनात बाळगणाऱ्या सिद्धार्थाने त्या दोघांसही नकार दिला आणि आपला आत्मशोधाचा मार्ग चालू लागला.

सिद्धार्थ आणि इतर पाच सहसंन्यासी यांनी संपूर्ण त्यागाचा मार्ग स्वीकारला. ऐहिक सुखाचा पूर्णं त्याग हे सूत्र त्यांनी धरले. अन्नपाण्याचाही त्याग करण्याचा आत्मक्लेषी हा मार्ग अतिशय बिकट होता. अन्नाचे प्रमाण दिवसाला झाडाचे अवघे एक पान एवढे राहिले. शरीर क्षीण होऊन गेले. एके दिवशी स्नान करीत असता झोक जाऊन पाण्यात बुडण्यापर्यंत प्रसंग आला, तेव्हा सिद्धार्थाने या मार्गाचा फेरविचार करण्यास सुरुवात केली. या मार्गाने ज्ञानप्राप्ती होणे नाही या विचाराने त्याने आता ध्यानाचा मार्ग पत्करला.

सिद्धार्थाने मध्यममार्ग निवडला. शरीर हे साधन आहे, ते नाकारून चालणार नाही. शरीर धारण करूनच आत्मबोध होऊ शकेल. शरीरधारणेस आवश्यक एवढेच अन्न ग्रहण करावे, पण शारीरिक भोगापासून दूर रहायला हवे, हा तो मध्यम मार्ग. शरीर धारणेपुरते अन्न –थोडे दूध आणि खीर तो सुजाता नामक एका ग्रामकन्येकडून घेऊ लागला. त्याची शारीरिक अवस्था एवढी विकल झालेली होती, की तिला तो एक प्रेतात्माच वाटत होता. मग एके दिवशी, बोधगया येथे एका अश्वत्थ (पिंपळ) वृक्षाखाली बसून त्याने अंतिम सत्याची ज्ञानप्राप्ती होईतो न उठण्याचा निश्चय केला. त्याच्या सोबत्यांच्या मनाने घेतले, की सिद्धार्थ आपल्या सत्य शोधाच्या मार्गापासून ढळला आहे, सबब त्याला सोडून ते निघून गेले. ४९ दिवसांच्या अखंड अविरत तपस्येनंतर, वयाच्या ३५व्या वर्षी बोधिवृक्षाच्या छायेत अखेर त्यास ज्ञानप्राप्ती झाली. चांद्रमासांपैकी, काही विद्वानांच्या मते तो पांचवा महिना होता, काहींच्या मते तो बारावा महिना होता. इथून पुढे त्यास बुद्ध म्हणले जाऊ लागले.

ज्ञानप्राप्ती

[संपादन]
युवराज सिद्धार्थ गौतम बोधिसत्त्व रूपात , मुशी गुईमेट्, पॅरिस

गृहत्यागानंतर सिद्धार्थ गौतमाने ज्ञानप्राप्तीसाठी खूप चिंतन केले, कठोर तपस्या केली. आताच्या बिहार राज्यातील गया येथे निरंजना नदीच्या काठी पिंपळाच्या वृक्षाखाली ध्यानस्थ बसले असता इ.स.पू. ५२८ मध्ये वैशाखी पौर्णिमेच्या दिवशी त्यांना दिव्य ज्ञानप्राप्ती झाली. या ‘दिव्य ज्ञाना’ला ‘संबोधी’, ‘बुद्धत्व’ किंवा ‘निर्वाण’ असेही म्हणतात. ज्ञानप्राप्तीनंतर सिद्धार्थ गौतमाला सर्वजण ‘बुद्ध’ असे म्हणू लागले. बुद्ध ही व्यक्ती नव्हे ती ज्ञानाची अवस्था आहे. ‘बुद्ध’ म्हणजे अतिशय ज्ञानी मनुष्य. बुद्धांना ज्या पिंपळाच्या वृक्षाखाली ‘बुद्धत्व’ प्राप्त झाले त्या वृक्षाला ‘बोधिवृक्ष’ (ज्ञानाचा वृक्ष) असे म्हणतात.[१६]

धम्मचक्र प्रवर्तन

[संपादन]

ज्ञानी बुद्धांनी उत्तर प्रदेश मधील सारनाथ येथे पाच पंडितांना पहिला उपदेश दिला. त्यांच्या पहिल्या उपदेशास ‘धम्मचक्रप्रवर्तन’ किंवा ‘धम्मचक्कपवत्तन’ असे म्हणतात. या प्रवचनात बुद्धांनी बौद्ध धम्माची मूलतत्त्वे सांगितली. त्यात त्यांना अनेक शिष्य लाभले आणि बौद्ध धर्म वाढीस लागला. तथागत बुद्धांनी स्वतः इ.स.पू. ६व्या शतकामध्ये जवळजवळ १ लक्ष लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. [१७]

भगवान बुद्ध या प्रथम "धम्मचक्र प्रवर्तन" सुत्तात म्हणतात की, “माझ्या धम्माचा ईश्वर, आत्मा, कर्मकांड व मरणोत्तर जीवनाशी कसलाही संबंध नाही. माणूस आणि माणसाचे माणसाशी या जगातील नाते हा माझ्या धम्माचा केंद्रबिंदू आहे. मनुष्यप्राणी दुःख, दैन्य आणि दारिद्र्यात राहात आहेत. हे सर्व जग दुःखाने भरले आहे. म्हणून हे दुःख नाहीसे करणे हा माझ्या धम्माचा उद्देश आहे. दुःखाचे अस्तित्त्व मान्य करणे आणि ते नष्ट करण्याचा मार्ग दाखविणे हा माझ्या धम्माचा पाया आहे.[१८]

महापरिनिर्वाण

[संपादन]
बुद्धांचे महापरिनिर्वाण

कुशीनगर हे भारतीय राज्य उत्तर प्रदेशच्या कुशीनगर जिल्ह्यातील एक शहर आहे. हे शहर गोरखपूर पासून ५२ किमी अंतरावर राष्ट्रीय महामार्ग २८ वर स्थित आहे. कुशीनगर हे प्राचीन भारतातील सोळा महाजनपदांपैकी एक असलेल्या मल्ल या महाजनपदाच्या राजधानीचे शहर होते. कुशीनगर हे एक महत्त्वाचे जागतिक बौद्ध तीर्थस्थळ आहे, येथे गौतम बुद्धांनी त्यांच्या मृत्यूनंतर परिनिर्वाण प्राप्त केले होते. कुशीनगर, बोधगया, लुंबिनीसारनाथ ही बौद्ध धर्मामधील चार सर्वात पवित्र स्थाने आहेत.[१९] इ.स.पू. ४८३ मध्ये वयाच्या ८० व्या वर्षी तथागत बुद्धांचे महापरिनिर्वाण झाले.

बौद्ध धर्म

[संपादन]
मुख्य लेख: बौद्ध धर्म

ऐतिहासिक दृष्टिकोनातून बौद्ध धर्म हा भारतातील एक अतिप्राचीन धर्म आहे. तत्त्वज्ञानानाच्या दृष्टिकोनातून हा जगातील सर्वात महान धर्म आहे. कारण बौद्ध तत्त्वज्ञान हे मानवतावादी आणि विज्ञानवादी धर्म आहे. हा भारतीय धर्म असून भारताच्या इतिहासात आणि परंपरेच्या घडणीत बौद्ध धर्माच्या उदयाला तत्त्वज्ञानाला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे.[२०] बौद्ध धर्माचा सर्वाधिक विकास इ.स.पू. ६ वे शतक ते इ.स. ६ वे शतक ह्या कालावधीत झाला. बौद्ध संस्कृतीचे सर्वात मोठे योगदान मौर्य कला, गांधार कला व मथुरा कला यात आढळते. तर बौद्ध धर्माचा व तत्त्वांचा प्रसार भारताबरोबरच शेजारील अनेक देशांमध्येही झालेला आहे. त्रिपिटकाच्या स्वरूपातील साहित्य व विविध पंथीय साहित्य हे बौद्ध संस्कृतीच्या रूपाने भारतीय संस्कृतीचा जगातील अनेक देशांमध्ये प्रसार झाला. बौद्ध संस्कृतीचा ठसा हा विहार, स्तूप, मठ, व (लेणी) ह्या मौर्य कलेच्या प्रतीकांच्या रूपाने स्पष्ट दिसतो. त्याच्या विकासाला जवळजवळ ११०० वर्षे लागली. जगाच्या आणि भारतीय जीवनाच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि विशेषतः धार्मिक बाजूंवर बौद्ध धर्माची खोलवर व न पुसणारी अशी छाप पडलेली आहे.

शिकवण

[संपादन]

भगवान बुद्धांनी ‘पाली’ या लोकभाषेतून अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने बौद्ध धर्माची शिकवण, आचार-विचार सांगितले. बुद्धांनी धर्माची शिकवण व आचरण यासाठी चार आर्यसत्ये, अष्टांग मार्ग (मध्यम मार्ग) व पंचशीले सांगितली.

चार आर्यसत्ये

[संपादन]
मुख्य लेख: चार आर्यसत्य

भगवान बुद्ध म्हणतात, ‘‘मानवी जीवन हे दुःखमय आहे, दुःखाची निर्मिती तृष्णेतून (वासना, इच्छा, आसक्ती, आवड) होते, म्हणून या तृष्णेवर म्हणजे आपल्या इच्छांवर नियंत्रण ठेवले पाहिजे. यासाठी मध्यम मार्गाचा अवलंब केला पाहिजे. मानवी व्यवहाराच्या मुळाशी चार आर्यसत्ये आहेत.
१. दुःख :- मानवी जीवन हे दुःखमय आहे.
२. तृष्णा :- मनुष्याच्या न संपणाऱ्या इच्छा हे दुःखाचे कारण आहे.
३. दुःख निरोध :- दुःखाचे निराकरण वा अंत सर्व प्रकारची आसक्ती सोडण्याने होतो.
४. प्रतिपद् :- दुःख निवारण्यासाठी सदाचाराचा मार्ग (अष्टांग मार्ग) आहे.[२१]

अष्टांगिक मार्ग

[संपादन]

तथागत बुद्धांनी सारनाथ येथे धम्मचक्र प्रवर्तनाचे विवेचन करतांना नीती व सदाचाराला महत्त्व देऊन मानवाचे जीवन सुखकर होण्यासाठी तसेच निवार्णाच्या समीप पोहोचण्यासाठी हा ‘अष्टांग मार्ग’ किंवा ‘मध्यम मार्ग’ सांगितला. अष्टांग मार्ग हा सदाचाराचा मार्ग होय. याला मध्यम मार्ग सुद्धा म्हणतात. ह्या आठ गोष्टींच्या पालनामुळे मानवाचे जीवन सुखमय होते. त्या गोष्टी अश्या :

  1. सम्यक् दृष्टी :- निसर्ग नियमाविरुद्ध कोणतीही गोष्ट होऊ शकते ही गोष्ट न मानणे. (चांगली दृष्टी)
  2. सम्यक् संकल्प :- म्हणजे योग्य निर्धार, विचार.
  3. सम्यक् वाचा :- करुणायुक्त व सत्यपूर्ण वाचा (बोल) ठेवण्याचा प्रयत्‍न करणे.
  4. सम्यक् कर्मान्त :- उत्तम कर्म म्हणजे योग्य कृत्ये करणे.
  5. सम्यक् आजीविका :- वाईट मार्गाने आपली उपजीविका न करता ती सन्मार्गानेच करणे.
  6. सम्यक् व्यायाम :- वाईट विचार निर्माण झाल्यास त्याचा त्वरित नाश करणे.
  7. सम्यक् स्मृती :- तात्त्विक गोष्टींचे स्मरण करून चित्तास (मनाला) जागृत ठेवणे.
  8. सम्यक् समाधी :- कोणत्याही वाईट विकारांचा स्पर्श होऊ न देता दुष्ट प्रवृत्तींपासून मन अलग ठेवून चित्त प्रसन्न आणि शांत ठेवणे.[२२]

धम्माची तीन अंगे

[संपादन]
  1. शील:

धर्माची पहिली शिकवण होती शील, म्हणजे सदाचार. त्या वेळचे जे काही मत – मातावलंबी होते ते जवळपास सर्व शीलाचे महत्त्व स्वीकारीत असत. जेव्हा कोणी व्यक्ती मनाला निर्मल ठेवून वाणी अथवा शरीराने कोणतेही कर्म करते तेव्हा सुख तिच्यामागे कधी तिची साथ न सोडणारी तिच्या सावलीसारखे लागते..

  1. समाधी :

शरीर आणि वाणीच्या कर्मांना सुधारण्यासाठी मनाला वश करणे आवशक आहे. मन ताब्यात असेल तरच तो दुराचारापासून वाचू शकतो व सदाचरणाकडे वळू शकतो. ह्यासाठी समाधी महत्त्वाची. आपल्या मनाला वश करण्यासाठी बुद्धाने सार्वत्रिक उपाय सांगितला. येणाऱ्या – जाणाऱ्या सहज स्वाभाविक श्वासाची जाणीव ठेवत राहा. मन जसे भटकेल, तसे त्याला श्वासाच्या जाणीवेवर घेऊन या. यालाच समाधी असे म्हणतात.

  1.  प्रज्ञा :

सहज स्वाभाविक श्वासाची सम्यक समाधी पुष्ट होऊ लागते तेव्हा नासिकेच्या द्वाराच्या आसपास कोणतीना कोणती संवेदना मिळू लागते. नंतर ती साऱ्या शरीरात पसरते. ह्यामुळे सत्याची जी जाणीव होते ती कोणा इतरांची देणगी नसते, स्वतःच्या आपल्या पुरुषार्थाची देणगी असते. म्हणूनच हे परोक्ष ज्ञान नाही. प्रत्यक्ष ज्ञान आहे. म्हणूनच यास प्रज्ञा असे म्हणतात.[२३]

वृद्धिकारक सात वधर्मतत्त्वे खालीलप्रमाणे

[संपादन]
  1. जोपर्यंत वज्जी (Vajji) अखंडपणे एकत्र जमत राहतील, विशाल संख्येने ऐक्य राखतील, तोपर्यंत त्यांची भरभराट होईल, ऱ्हास होणार नाही.
  2. जोपर्यंत ते एकत्र जमत राहतील, एकजुटीने बैठकीतून उठतील, आणि एकजुटीने वज्जींच्या प्रजेच्या प्रती त्यांची असलेली सर्व कर्तव्ये पूर्ण करतील, तोपर्यंत त्यांची भरभराट होईल, ऱ्हास होणार नाही.
  3. जोपर्यंत ते कायदा म्हणून न ठरविलेल्या गोष्टींना कायदा म्हणून अमलात आणणार नाहीत, कायदा म्हणून ठरविण्यात आलेल्या गोष्टी मोडणार नाहीत, आणि पूर्व परंपरेने ठरविलेल्या कायद्याप्रमाणे वागतील, तोपर्यंत त्यांची भरभराट होईल, ऱ्हास होणार नाही.
  4. जोपर्यंत वडिलधाऱ्या लोकांचा ते मान राखतील आणि त्यांचा सल्ला ते नेहमी ऐकतील, तोपर्यंत त्यांची भरभराट होईल, ऱ्हास होणार नाही.
  5. जोपर्यंत ते गावात असलेल्या किंवा गावाबाहेरच्या चैत्यांचा गौरव करतील व सर्व धर्म कर्तव्ये पार पाडतील, तोपर्यंत त्यांची भरभराट होईल, ऱ्हास होणार नाही.
  6. जोपर्यंत ते अर्हन्तांचे रक्षण करतील, त्यांच्या राज्यात अर्हंत सुखात राहतील, तोपर्यंत त्यांची भरभराट होईल, ऱ्हास होणार नाही.

दहा पारमिता

[संपादन]
मुख्य लेख: पारमिता

दहा पारमिता ह्या शील मार्ग आहेत..

  1. शील : शील म्हणजे नीतिमत्ता, वाईट गोष्टी न करण्याकडे असलेला मनाचा कल.
  2. दान : स्वार्थाची किंवा परतफेडीची अपेक्षा न करता दुसऱ्याच्या भल्यासाठी स्वतःची मालमत्ता, रक्त, देह अर्पण करणे.
  3. उपेक्षा : निरपेक्षतेने सतत प्रयत्‍न करीत राहणे.
  4. नैष्काम्य : ऐहिक सुखाचा त्याग करणे.
  5. वीर्य : हाती घेतलेले काम यत्किंचितही माघार न घेता अंगी असलेल्या सर्व सामर्थ्यानिशी पूर्ण करणे.
  6. शांती : शांति म्हणजे क्षमाशीलता, द्वेषाने द्वेषाला उत्तर न देणे.
  7. सत्य : सत्य म्हणजे खरे, माणसाने कधीही खोटे बोलता कामा नये.
  8. अधिष्ठान : ध्येय गाठण्याचा दृढ निश्चय.
  9. करुणा : मानवासकट सर्व प्राणिमात्रांविषयी प्रेमपूर्ण दयाशीलता.
  10. मैत्री : मैत्री म्हणजे सर्व प्राणी, मित्र, शत्रू याविषयीच नव्हे तर सर्व जीवनमात्रांविषयी बंधुभाव बाळगणे.[२४]

पंचशील

[संपादन]
मुख्य लेख: पंचशील
  1. मी जीव हिंसेपासून अलिप्त रहाण्याची शपथ घेतो.
  2. मी चोरी करण्यापासून अलिप्त रहाण्याची शपथ घेतो.
  3. मी कामवासनेच्या अनाचारापासून अलिप्त रहाण्याची शपथ घेतो.
  4. मी खोटे बोलण्यापासून अलिप्त रहाण्याची शपथ घेतो.
  5. मी मद्य, मादक गोष्टी तसेच इतर मोहांत पाडणाऱ्या सर्व मादक वस्तूंच्या सेवनापासून अलिप्त रहाण्याची शपथ घेतो.

आनंदी,परिपूर्ण व आदर्श जगणे अंगिकारले की कीर्तीचा सुगंध सहज वाऱ्याच्या दिशेच्या उलटही जाऊ शकतो हे त्रिकालाबाधित सत्य आहे..

१.प्राणीमात्रांची हिंसा न करण्याची सवय बाणविणे. कायेने वा वाचेने. अगदी मनाविरुद्ध वा अपशब्दांनीही कुणी दुखावले जाणार नाही याची जाणीवपूर्वक खबरदारी घेणे ही आपली गरज आहे.

२.चोरी न करणे एखाद्याच्या मालकीची वस्तु त्याने दिल्याशिवाय घेणे, बळकावणे, डोळा ठेवणे व त्यावर अंमल करणे ही चोरी असून तिच्यापासून कटाक्षाने दूर रहाणे ही गरज आहे.

३.चारित्र्य-शीलाची जपणूक करणे निष्कलंक चारित्र्य हा स्त्री व पुरुष दोघांचाही अनमोल दागिना आहे..शीलवंतांना मान-सन्मान असतो, एवढेच नव्हे तर त्यांचेच समाजात नैतिक वजन असते..सत्शील वर्तनाने मोल प्राप्त होते.

४.खोटे न बोलणे खरे बोलणे. खरे सत्य शोधणे. सत्याधारित वागणे इ बाबी दुर्मिळ होत चालल्यामुळेच सत्य-वचनाचे मोल अबाधित आहे. खरे बोलतानाही ठेंगण्याला 'तू ठेंगणा आहेस.' वा 'तू काळा वा काटकुळा आहेस.' असे बोलून वाचिक हिंसा न करता सुयोग्य शब्दांचा वापर करण्याची कला अवगत करणे हे एक कसब आहे.

५.मादक पदार्थ वर्ज्य ठेवणे.. उत्तेजित करणाऱ्या बाबी घेण्याने शारीरिक, मानसिक व सामाजिक हानी होत असेल तर नशिल्या वा वाईट गणल्या गेलेल्या बाबींना थारा देणे हे अहितकारक ठरेल.

ही आहेत सम्यक संबुद्धांनी दिलेली पाच शिले पंचशील.[२५]

या बौद्ध तत्त्वांचा, शिकवणुकीचा जीवनात अंगिकार केला तर मनुष्य जिवंत असेपर्यंत नक्कीच दुःखमुक्त होऊन आदर्श जीवन जगू शकतो, अशी बौद्ध धर्माची शिकवण आहे.

बुद्ध आणि त्यांच्या धम्माचा समाज जीवनावरील प्रभाव

[संपादन]
  • बौद्ध तत्त्वज्ञानाचा हिंदू धर्मावरील प्रभाव

बौद्ध धर्मातील अहिंसा, सर्व प्राणिमात्रांविषयी प्रेमसहानुभूती इत्यादी विचारांनी हिंदू धर्मावर प्रभाव टाकला. त्यामुळेच वैदिक धर्मीयांना पुढे अहिंसा तत्त्वाच्या आवश्यकतेवर भर द्यावा असे वाटले.

  • वैचारिक स्वातंत्र्य

वैचारिक स्वातंत्र्य हे बौद्ध धर्मात खोलवर रुजलेले असून, त्याचा हिंदूंच्या, कोणत्याही प्रकारची शंका उपस्थित न करता, वैदिक परंपरांचे पालन करण्याच्या पारंपरिक विचारपद्धतीवर परिणाम झाला.

  • सद्गुणांचा विकास

बौद्ध धर्माने अहिंसा, सत्य, अस्तेय, इंद्रिय संयममादक पदार्थाचे सेवन करू नये ह्या पाच शील तत्त्वे (पंचशील तत्त्वे) पालन करण्याचा उपदेशच केला नाही तर ती शिकविली आहेत व त्यामुळे सद्गुणांचा विकास होण्याला हातभार लागला आहे.

  • समता तत्त्वाचा प्रभाव

तथागत गौतम बुद्धांनी जात, संप्रदाय, वर्णसामाजिक दर्जा ह्या कोणत्याही बाबींचा विचार न करता सर्व व्यक्तींमध्ये समता प्रस्थापित करण्याविषयी धर्मोपदेश केला. त्याचा जातिव्यवस्थेवर आधारलेल्या पारंपरिक हिंदू समाजरचनेवर प्रभाव पडला.

  • वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास

विज्ञानवादी बौद्ध धर्माने लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन बिंबविण्यासाठी साहाय्य केले आहे. या धर्माची मूलतत्त्वे व तत्त्वज्ञान ही विज्ञानधिष्ठित असल्याने, त्याच्या शिकवणीतून लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टी येण्यास हातभार लागला आहे. २० व्या शतकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरअल्बर्ट आईन्स्टाईनसारख्या अनेक विचारवंतांनी बौद्ध धर्मच खरा विज्ञानवादी धर्म असल्याचे सांगतलेले आहे.

  • नैतिक सिद्धान्ताचा प्रभाव

करुणा (दयाबुद्धी), प्रामाणिकपणा, प्रेम, परोपकार, अहिंसा, क्षमाशिलता, शीलसंवर्धन, यांसारख्या नैतिक बाबींवर बौद्ध धर्मात भर देण्यात आला. याचा वैदिक हिंदू धर्माच्या नियतिवादावर परिणाम झाला. यामुळेच बौद्ध धर्म हा हिंदू धर्माहून अगदी भिन्न असलेला स्वतंत्र व प्रभावशाली धर्म ठरला.

  • बौद्ध धर्माचे कलेतील योगदान

वास्तुविद्या, लेण्यांचे आणि विहारांचे खोदकाम आदी क्षेत्रांत बौद्ध धर्माचे योगदान खूप मोठे आहे. त्या काळी विहारे, स्तूप, मंदिरे, लेणी (गुफा) -खोदकाम यांसारख्या वास्तुविद्या क्षेत्रांतील निर्मितीचा स्फोट झाला होता. त्यामुळे इतर धर्मीयांच्या कला क्षेत्रातील निर्मितीलाही चालना मिळाली. बौद्ध धर्माने लोकांना वास्तुविद्या विकासासाठी प्रोत्साहित केले आहे. सुंदर विहारे, मंदिरे, स्तंभ, स्तूपे यांसारख्या बांधकामांना वाव देऊन, हा विकास साध्य केला आहे. आज जगातील पहिले सर्वाधिक सुंदर असलेले धार्मिक प्रार्थनास्थळ थायलंड मधील पांढऱ्या रंगाचा एक अप्रतिम बुद्ध विहार आहे.

  • स्थानिक भाषेतील साहित्यविषयक योगदान

बुद्ध, बौद्ध भिक्खू आणि बौद्ध धर्मप्रचारकांनी धार्मिक विचार हे लोकांच्या नेहमीच्या भाषेत (पाली) मांडल्यामुळे बौद्ध धर्माचा प्रसार जलद गतीने झाला. त्या काळी प्रचलित असलेल्या पालीसारख्या प्राकृत भाषेचा मोठा विकास झाला. बौद्ध धर्माने पाली भाषा व तिच्या धर्मग्रंथ व अन्य धार्मिक पुस्तकांच्या लिखाणाच्या माध्यमातून साहित्य विकासाला हातभार लावला आहे.

  • शिक्षणास प्रोत्साहन

बौद्ध धर्माने शिक्षण प्रसारास प्रोत्साहन दिले. बौद्ध विहारबौद्ध मठ यांनी शिक्षण प्रसाराची केंद्रे म्हणून कार्य केले. बौद्ध भिक्खू हे मोठे विद्वान होते. बौद्ध धर्मास ज्या भारतीय सम्राटांनी व राजांनी पाठिंबा दिला त्यांनीही शिक्षणास प्रोत्साहन दिले. तक्षशिलानालंदा या विद्यापीठांनी प्राचीन काळात खूप नाव कमावले होते. नालंदा हे बौद्ध विद्यापीठ म्हणूनच ओळखले जाई. बौद्ध धर्माने स्त्रीशिक्षणाचा व कनिष्ठ जातींच्या शिक्षणाचा देखील पुरस्कार केला.

  • भारतीय संस्कृतीचा परदेशात प्रसार

बौद्ध धर्माने परदेशात जेथे जेथे पाय रोवले तेथे तेथे भारतीय बौद्ध संस्कृतीचे घटक प्रसारित होण्यास हातभार लागला. श्रीलंका, चीन, जपान, थायलंड, म्यानमार, भूतान, कोरिया, व्हिएतनाम, लाओस, कंबोडिया, सिंगापूर, मंगोलिया, तैवान, हाँगकाँग इत्यादी देशांत बौद्ध धर्म हा प्रमुख धर्म असून आज जगातील जवळजवळ २०० पेक्षा अधिक देशांत बौद्ध धर्माचे अनुयायी आहेत. बौद्ध धर्माने भारतीय तसेच विदेशी समाजाला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

  • आर्थिक विकासाला प्रोत्साहन

बौद्ध धर्माने भारत देशाच्या आर्थिक विकासाला चालना दिली आहे. बौद्ध धर्मीय चक्रवर्ती सम्राट अशोक महान यांचे साम्राज्य जगातील सर्वात संपन्न व शक्तिशाली होते. त्यांच्या साम्राज्याचा बौद्ध धर्म हा राजधर्म होता. जगाच्या एकूण अर्थव्यस्थेत सर्वाधिक म्हणजेच ३४% वाटा हा सम्राट अशोकाच्या साम्राज्याचा होता.

बुद्ध संस्कृती

[संपादन]

भारतीय संस्कृती ही बुद्ध प्रभावित संस्कृती आहे. ही संस्कृती नेपाळ, श्रीलंका, जपान, तिबेट, थायलंड, म्यानमार, चीन, कोरिया आदी देशात पसरली. तेथे गौतम बुद्धांचे अनेक विहारे व पुतळे निर्माण केले गेले. तथागत बुद्ध यांच्या सिंह मुद्रा, ध्यानस्थ मुद्रा, पद्मपाणी मुद्रा, आशीर्वाद मुद्रा, भूमिस्पर्श मुद्रा, उभी मुद्रा, अभय मुद्रा इत्यादी मुद्रा प्रसिद्ध आहेत. पुणे येथे त्यासंबंधी एक 'आर्य नागार्जुन' संग्रहालयही आहे. ते पुण्यातील बुद्ध संस्कृती आणि संशोधन संस्थेतर्फे चालविले जाते.

बौद्ध साहित्य

[संपादन]
मुख्य लेख: बौद्ध साहित्य
गौतम बुद्धांच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार जेथे झाला ते गंगा नदीचे खोरे ह्याच भागात गौतम बुद्धांनी आपले प्रारंभिक भ्रमण केले होते.

गौतम बुद्ध यांच्या महितीचा मुख्य स्रोत म्हणजे बौद्ध वाङ्मय होय. बुद्ध व त्यांचे शिष्य प्रत्येक वर्षी चार महिने त्यांच्या शिकवणुकीची उजळणी करत. बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर लगेचच आणि त्यानंतर एका शतकानंतर, अनुयायांनी एक पहिली बौद्ध धम्म परिषद (धम्मसंसद) बोलावून या ज्ञान संकलनाचे काम सुरू केले. कांही नियम पाळीत, हे साधू बुद्ध-जीवन व शिकवण याची प्रमाणित आवृत्ती सिद्ध करीत गेले. बुद्ध विचारांची त्यांनी विविध विभागांत विभागणी केली आणि प्रत्येक विभाग एका एका साधूकडे जतनासाठी वाटून दिला. इथपासून, ऐतिहासिक ठेवा पिढ्यान्‌पिढ्या पुढे चालत राहिला.[२६] उपलब्ध पुराव्यानुसार, दुसऱ्या संसदेदरम्यान हा ठेवा लिखित स्वरूपात उतरवला गेला. तरीही, बुद्धांची शिकवण लेखी रूपात येण्यासाठी बुद्ध महापरिनिर्वाणानंतर तीन ते चार शतके जावी लागली.

भारतीय विचारसरणीनुसार, सनावळ्या किंवा तारखा यांना विशेष महत्त्व न देता, तत्त्वज्ञानास केंद्रस्थान दिले जाते. यालाच अनुसरून, गौतम बुद्धांच्या जीवनातील महत्त्वाच्या तारखांच्या नोंदीऐवजी त्याच्या शिकवणुकीला अधिक विशद करण्यात आले. या नोंदींमध्ये तत्कालीन भारतीय समाजजीवनाचे व चालीरितींचे चित्रण आढळते.

पुस्तके

[संपादन]

गौतम बुद्ध आणि बौद्ध धर्म यांविषयी अनेक पुस्तके विविध भाषांत आहेत. त्यांपैकी काही खालीलप्रमाणे:

पाली
मराठी
  • कथा गौतम बुद्धाची (रमेश पतंगे)
  • गौतम बुद्ध चरित्र (लेखक कृष्णराव अर्जुन केळूसकर, १८९८)
  • गौतम बुद्धांच्या गोष्टी (प्रभाकर चौधरी)
  • खुद्दकपाठो (संपादक - ना.के. भागवत, १९३७)
  • जातककथा प्रथमार्ध, १ ते ३३९ (लेखक - चिं.वि. जोशी, पुनर्लेखन - संध्या काणे))
  • जातक कथा (प्रा. झुंबरलाल कांबळे)
  • जातक कथा (बालसाहित्य, रमेश मुधोळकर)
  • जातकसंग्रह (लेखक - ना.वि. तुंगार)
  • जातकांतील निवडक गोष्टी (लेखक - चिं.वि. जोशी)
  • तेरा भिक्षुणी रत्‍ने (ना.के. भागवत, १९२३)
  • दीघनिकाय (लेखक - चितामण वैजनाथ राजवाडे, १९१८)
  • धम्मचिकित्सा (लेखक राजाराम नारायण पाटकर, १९३२)
  • धम्मपद (लेखक - कुंदर बलवंत दिवाण, १९४१)
  • बुद्ध परंपरा आणि बोधिवृक्ष (हेमा साने) : या पुस्तकाचे परीक्षण येथे आहे.
  • बुद्ध संप्रदाय आणि शिकवण (लेखक - चिं.वि. जोशी, १९६३)
  • बौद्ध संघाचा परिचय (लेखक - धर्मानंद कोसंबी, १९२६)
  • बौद्ध-संस्कार पाठ (लेखक - वि.रा. रणपिसे, १९६१)
  • भगवान गौतम बुद्ध (लेखक - साने गुरुजी, १९४४
  • भगवान बुद्ध (लेखक - सरश्री)
  • भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म (लेखक - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  • भगवान बुद्धासाठी (लेखक - श.द. देव. १९४७)
  • प्रेरक जातक कथा (बालसाहित्य, डॉ. निर्मला सारडा)
  • मनोरंजक जातक कथा (बालसाहित्य, डॉ. निर्मला सारडा)
  • रोचक जातक कथा (बालसाहित्य, डॉ. निर्मला सारडा)
  • लघुपाठ (लेखक - धर्मानंद कोसंबी, १९१७)
  • शाक्यमुनी गौतम (लेखक - चिं.वि. जोशी)
  • शिक्षाप्रद जातक कथा (बालसाहित्य, डॉ. निर्मला सारडा)
  • समाधिमार्ग (लेखक - धर्मानंद कोसंबी १९२५)
  • सुत्तनिपात (पाली ग्रंथ व मराठी भाषांतर, मराठी भाषांतरकार - धर्मानंद कोसंबी, १९५५)

बुद्धांवरील मराठी पुस्तके

[संपादन]
इंग्रजी
  • दि बुद्ध अँड हिज धम्म (इंग्रजी, लेखक - डॉ. बाबासाहेब आंबेडकर)

चित्रदालन

[संपादन]

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ https://vishwakosh.marathi.gov.in/29473/
  2. ^ https://vishwakosh.marathi.gov.in/29473/
  3. ^ "बुद्ध". मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती. 2019-07-04. 2021-05-17 रोजी पाहिले.
  4. ^ Centre, UNESCO World Heritage. "Lumbini, the Birthplace of the Lord Buddha". UNESCO World Heritage Centre (इंग्रजी भाषेत). 2021-05-17 रोजी पाहिले.
  5. ^ a b Mathur, S. N. Gautam Buddha (The Spiritual Light Of Asia) (इंग्रजी भाषेत). Diamond Pocket Books (P) Ltd. ISBN 9788189182700.
  6. ^ a b Kelen, Betty (2014-06-10). Gautama Buddha: In Life and Legend (इंग्रजी भाषेत). Open Road Media. ISBN 9781497633513.
  7. ^ a b Hirakawa, Akira (1993). A History of Indian Buddhism: From Śākyamuni to Early Mahāyāna (इंग्रजी भाषेत). Motilal Banarsidass Publ. ISBN 9788120809550.
  8. ^ "r/sgiwhistleblowers - On downplaying the number of Buddhists worldwide". reddit.
  9. ^ "Nigerian Clerics: Kicking God, Kissing The Dog By Ayo Opadokun". Sahara Reporters. 22 फेब्रु, 2013. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  10. ^ "List of Religious Populations | List Religious Populations". www.liquisearch.com. 2021-05-17 रोजी पाहिले.
  11. ^ Kelen, Betty (2014-06-10). Gautama Buddha: In Life and Legend (इंग्रजी भाषेत). Open Road Media. ISBN 9781497633513. line feed character in |title= at position 29 (सहाय्य)
  12. ^ a b c Nyanamoli, Bhikkhu (1992). The Life of the Buddha: According to the Pali Canon (इंग्रजी भाषेत). Buddhist Publication Society. ISBN 9789552400636.
  13. ^ Surrey, Janet; Shem, Samuel (2015-06-30). The Buddha's Wife: The Path of Awakening Together (इंग्रजी भाषेत). Simon and Schuster. ISBN 9781582704180.
  14. ^ a b Nirupama, Dr (2012-05-11). GAUTAMA BUDDHA (इंग्रजी भाषेत). Sapna Book House (P) Ltd. ISBN 9788128017698.
  15. ^ Tiwari, Arun K. The Life and Times of Gautam Buddha (इंग्रजी भाषेत). Prabhat Prakashan. ISBN 9788184304084.
  16. ^ Mukundananda, Swami (2014-12-31). Saints of India (इंग्रजी भाषेत). Jagadguru Kripaluji Yog.
  17. ^ Vyanjana (1992). Theravāda Buddhist Ethics with Special Reference to Visuddhimagga (इंग्रजी भाषेत). Punthi Pustak. ISBN 9788185094533.
  18. ^ Sharma, Udit (2016-11-25). Teachings and Philosophy of Buddha (इंग्रजी भाषेत). Diamond Pocket Books Pvt Ltd. ISBN 9789352615032.
  19. ^ "कुशीनगर". विकिपीडिया. 2019-08-21.
  20. ^ Younger, Paul. Religion in India.
  21. ^ Dwivedi, Bhanwar Lal (1994). Evolution of educational thought in India (इंग्रजी भाषेत). Northern Book Centre. ISBN 9788172110598.
  22. ^ Bodhi, Bhikkhu (2010-12-01). The Noble Eightfold Path: The Way to the End of Suffering (इंग्रजी भाषेत). Buddhist Publication Society. ISBN 9789552401169.
  23. ^ Hanh, Thich Nhat (2015-07-22). The Heart of the Buddha's Teaching: Transforming Suffering into Peace, Joy, and Liberation (इंग्रजी भाषेत). Potter/TenSpeed/Harmony. ISBN 9781101905739.
  24. ^ Gaur, Anita. Main Buddha Bol Raha Hoon (हिंदी भाषेत). Prabhat Prakashan. ISBN 9789350484494.
  25. ^ Carus, Paul (2012). The Gospel of Buddha (इंग्रजी भाषेत). Jazzybee Verlag. ISBN 9783849622527.
  26. ^ Davids, T. W. Rhys (2005-12-01). Buddhism: Its History and Literature (इंग्रजी भाषेत). Cosimo, Inc. ISBN 9781596055988.
  27. ^ "Bhagwan Buddha by Sirshree - Book Buy online at Akshardhara". Akshardhara.[permanent dead link]

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: