डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार हा महाराष्ट्र शासनाद्वारे राज्यातील ग्रंथालयांसाठी दिला जाणारा एक ग्रंथालयीन पुरस्कार आहे. महाराष्ट्रातील शासनमान्यताप्राप्त सार्वजनिक ग्रंथालयाच्या सेवा कार्यामध्ये गुणात्मक वृद्धी व्हावी व त्याद्वारे ग्रंथालय चळवळीला चालना मिळावी यासाठी १९८४-८५ पासून राज्यातील अ, ब, क आणि ड वर्गामधील प्रत्येकी एका ग्रंथालयास याप्रमाणे एकूण चार ग्रंथालयांना पुरस्कार देण्याची नाविन्यपूर्ण योजना शासनातर्फे सुरू करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महनीय व्यक्तिमत्त्वाचे ग्रंथांवरील प्रेम लक्षात घेऊन या पुरस्काराला त्याचे नाव ठेवण्यात आले.[१]
१९८६-८७ पासून या योजनेचा विस्तार करून शहरी व ग्रामीण अशा दोन विभागांतून एकूण आठ ग्रंथालयांना पुरस्कार देण्यात येत आहेत. महाराष्ट्र राज्यातील अ, ब, क, ड वर्गातील शहरी व ग्रामीण विभागातील शासनमान्यताप्राप्त सार्वजनिक ग्रंथालयांना या पुरस्कारासाठी अर्ज करता येतो. महानगरपालिका व नगर परिषद हद्दीतील ग्रंथालयांचा शहरी विभागात व ग्रामपंचायत स्तरावरील ग्रंथालयांचा ग्रामीण विभागात समावेश केला जातो. शासनमान्यताप्राप्त सार्वजनिक ग्रंथालयांना विहित नमुन्यामध्ये संबंधित विभागाच्या साहाय्यक ग्रंथालय संचालक यांच्यामार्फत विहित मुदतीच्या आत अर्ज सादर करावा येतो. या पुरस्कार निवड समितीत अध्यक्ष म्हणून प्रधान सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग असतात. तसेच सदस्य म्हणून अध्यक्ष,राज्य ग्रंथालय संघ आणि ग्रंथालय संचालक, पदसिद्ध सदस्य यांचा समावेश आहे. ग्रंथालयाची निवड करण्यासाठी शासनाने निकष ठरवून दिलेले आहेत. या निषषानुसार गुणांकन करून समितीने अर्ज विचारासाठी ठेवण्यात येतात. समिती गुणानुक्रमे ग्रंथालयाची निवड करते.[२]
पुरस्काराचे स्वरूप
[संपादन]डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिनी (आंबेडकर जयंती) दि. १४ एप्रिल रोजी पुरस्कार घोषित करून समारंभपूर्वक रोख रक्कम, सन्मानपत्र व स्मृतिचिन्हे प्रदान करण्यात येतात. ग्रंथालयास देण्यात आलेल्या पुरस्काराच्या रकमेपैकी ५० टक्के रक्कम ग्रंथसंग्रह विकासासाठी खर्च करणे आवश्यक असते.[३]
ग्रंथालयाचा वर्ग | शहरी विभाग | ग्रामीण विभाग |
---|---|---|
अ | ₹ ५०,००० | ₹ ५०,००० |
ब | ₹ ३०,००० | ₹ ३०,००० |
क | ₹ २०,००० | ₹ २०,००० |
ड | ₹ १०,००० | ₹ १०,००० |
हे सुद्धा पहा
[संपादन]- पुरस्कार
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे दिले जाणारे पुरस्कार
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी
संदर्भ
[संपादन]- ^ सार्वजनिक वाचनालयांसाठी विविध योजना, संकलन - बी.आर. काळे, संदर्भ प्रकाशन - औरंगाबाद, पृष्ठ क्रमांक ७२-७३
- ^ सार्वजनिक वाचनालयांसाठी विविध योजना, संकलन - बी.आर. काळे, संदर्भ प्रकाशन - औरंगाबाद, पृष्ठ क्रमांक ७२
- ^ सार्वजनिक वाचनालयांसाठी विविध योजना, संकलन - बी.आर. काळे, संदर्भ प्रकाशन - औरंगाबाद, पृष्ठ क्रमांक ७३