संस्कृती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्रस्तावना[संपादन]

संस्कृती (Resign) या संस्कृत शब्दाचा अर्थ 'चांगले करणे' असा होतो. धर्मासह समग्र अंतर्बाह्य जीवनाच्या उन्नत अवस्थेसाठी संस्कृती हा शब्द वापरला जातो. प्रकृती म्हणजे निसर्ग, विकृती म्हणजे निसर्गात होणारा विकार आणि संस्कृती म्हणजे प्रकृतीत विकार होऊ नये म्हणून त्यावर करायचा संस्कार.[१]

गोबुस्तान, अझरबैजान येथील इ.स.पू. १०,००० सनाच्या काळातील, तत्कालीन संस्कृतीच्या खुणा सांगणारी पाषाणांवरील चित्रे

संस्कृती ही विविध अर्थच्छटा असणारी संकल्पना आहे. हा शब्द सहसा खालीलपैकी एखादा अर्थ ध्वनित करण्यासाठी योजला जातो :

  • कलाशास्त्रे यांतील उच्च अभिरुची - अर्थात 'अभिजात संस्कृती'
  • एखाद्या संस्थेच्या / संघटनेच्या किंवा एखाद्या समूहाच्या प्रवृत्ती, मूल्ये, ध्येये, प्रथा-प्रघात इत्यादी सामायिक बाबी
  • मानवी ज्ञान, समजुती, वर्तणुक इत्यादींचा एकत्रित परिपाक

आशय[संपादन]

मनुष्य व त्याच्या भोवतीचे विश्व मिळून निसर्ग बनतो. या निसर्गामध्ये जीवनाच्या उत्कर्षाला अनुकूल असे बदल करून म्हणजेच निसर्गावर काही संस्कार करून मनुष्य आपली जीवनयात्रा चालवितो. तो केवळ बाह्य विश्वातील पदार्थांवर संस्कार करतो असे नव्हे, तर स्वतःचा देह, मन आणि बुद्धी यांच्यावरही संस्कार करून स्वतःत बदल घडवून आणतो. संस्कृती या शब्दात हे दोन्ही प्रकारचे बदल अभिप्रेत आहेत.[२]

संस्कृतीची रूपे[संपादन]

संस्कृतीची दोन रूपे असतात, एक डोळ्याला जाणवणारे व दुसरे ज्ञानेंद्रियांद्वारे जाणवणारे. याविषयी इरावती कर्वे यांनी नोंदविले आहे- "व्यक्ती या घरे,कपडे इ.स्थूल वस्तूंचा उपभोग घेत असतात. हे संस्कृतीचे बाह्य रूप. संस्कृतीचे दुसरे रूप म्हणजे माणसाने सामाजिक जीवन जगण्यासाठी ठरवून घेतलेली रीत होय. योग्य-अयोग्य ,पाप-पुण्य, इत्यादी.संकल्पना तसेच कौटुंबिक नाती, वागणूक इत्यादी.गोष्टी या परंपरागत असतात. या गोष्टी माणूस एकटा निर्माण करीत नाही, तो समूहाने त्या करत असतो.<ref>भारतीय संस्कृती कोश खंड नववा

वाचन संस्कृती[संपादन]

बदलता वाचनव्यवहार :-

टी.व्ही, रेडिओ ,इंटरनेट, फेसबुक, व्हॉट्‌सॲप, ट्विटर यांसारख्या आधुनिक प्रसारमाध्यमाच्या उपलब्धतेचा साहित्यव्यवहार आणि वाचनसंस्कृतीवर जाणवण्याइतपत परिणाम झाल्याचे दिसते. आधुनिक वाचकवर्ग या प्रसारमाध्यमाच्या विळख्यात सापडल्याने वाचन संस्कृतीवर काय चांगले वाईट परिणाम झाले हे बघणे गरजेचे आहे. सध्या वाचनव्यवहार लोप पावत चालला आहे, लोक वाचत नाहीत. मराठी पुस्तकांना पहिल्यासारखा वाचक मिळत नाही . असा काहीसा ओरडा साहित्य व्यवहारात होताना दिसतो आहे. आधुनिक प्रसारमाध्यमांच्या प्रभावांमुळे पुस्तकांचा वाचक वर्ग दुरावला आहे. ओरडा विचारवंत, प्रकाशक, लेखक, पत्रकार मंडळींनी जो केला आहे. त्या ओरडण्यात कितपथ तथ्य आहे हे बघणे महत्त्वाचे आहे.

पूर्वीचा काळ असा होता की, पुस्तकाचे वाचन करणे, संग्रह करणे हे वैचारिक श्रीमंतीचे एक लक्षण समजले जाई. पुस्तकाचे आदान प्रदान केले जाई .कोणी कोणती पुस्तके वाचली, त्यांतून काय मिळाले, याविषयी आपसात चर्चा-वादविवाद व्हायचे. चांगल्या कथा‍- कादंबऱ्या या वाचताना वाचक एका भावनिक स्थितीत हरवला जायचा. काव्य, कथा, नाट्य, प्रवासवर्णन, ललित, वैचारिक गद्य यांच्या वाचनाने रसिक वाचक आणखी समृद्ध होत जायचा. विविध ग्रंथप्रकाशने, नियतकालिके, मासिके, वृत्तपत्राच्या रविवारच्या अंकातील साहित्यिक पुरवण्या यांवर वाचकांच्या अक्षरशः उड्या पडायच्या. एखाद्या चांगल्या पुस्तकाच्या सर्व आवृत्या रांगा लावून हातोहात खपल्या जायच्या असा तो वैभवाचा काळ.बघता बघता हा वाचनसंस्कृतीच्या वैभवाचा काळ लोप पावला .टी.व्ही, रेडिओ, इंटरनेट, डीव्हीडी, व्हीसीडी प्लेअर, सोशल मेडिया, फ़ेसबुक, व्हॉट्‌सॲप, ट्विटर, इन्स्टाग्रॅम यांसारख्या आधुनिक करमणुकीच्या प्रसारमाध्यमांच्या वाढत्या प्रभावामुळे वाचक पुस्तके वाचेनासा झाला. रांगा लाऊन विकली जाणारी पुस्तके सवलत देऊनही विकली जात नसल्याच्या प्रकाशकांच्या ओरडण्यात तथ्य असल्याचे दिसते.

आधुनिक प्रसारमाध्यमांच्या प्रभावामुळे वाचक ग्रंथ वाचनापासून दुरावत का गेला? वाचन संस्कृतीचा लोप का झाला? या विधानांची चर्चा करताना वर उल्लेखलेल्या आधुनिक प्रसारमाध्यमांचा प्रभाव तर परिकणामकारक आहेच पण याशिवाय आणखीही काही कारणे आहेत. पूर्वी करमणुकीच्या साधनांचा अभाव असल्यामूळे लोक फावल्या वेळेत ग्रंथवाचनाकडे वळत. मात्र सध्या करमणुकीच्या साधनाचा विकास झाला आहे. टी.व्ही. चॅनेल्सच्या वाढत्या संख्येमुळे लोकांना घरबसल्या जगाच्या कान्याकोपर्‍%यातली कोणत्याही विषयाची माहिती अत्यंत थोडक्या वेळात आणि परिणामकारक रीतीने मिळू लागली आहे. इंटरनेटवर ‘गुगल’सारख्या सर्च इंजिनद्वारे घरबसल्या कोणत्याही विषयावरील माहिती काही सेकंदात मिळते. .आणि बघता बघता सारा समाज गुगलमय होत चालला आहे. तेव्हा तो ग्रंथालयात जाऊन पुस्तकांची शोधाशोध करीलच कशासाठी? हाताचे सोडून पळत्याच्या पाठीमागे धावण्याची समाजाची वृत्ती कधीच नसते. कमी वेळेत, कमी खर्चात आणि कमी श्रमात एखादी गोष्ट मिळत असेल तर ती आजच्या फास्ट जगात कुणालाच नको असते. या सर्व गोष्टींच्या परिणामांमुळे वाचक वर्ग कमी होत चालला आहे. फेसबुक, व्हॉट्‌स‍ॲप ट्विटरर या प्रसार माध्यमांवर लोकांचा जास्त वेळ जात असल्याने वाचक वर्ग कमी होत चालला आहे.

वाचन संस्कृतीचा लोप होत आहे, असे म्हणताना लेखक-प्रकाशकांचीही काही नैतिक जबाबदारी असतेच. काळ बदलत चालला आहे. काळाच्या बदलत्या प्रवाहाबरोबर लेखक-प्रकाशकांनीही बदलायला हवे.सध्या इंटरनेट सारख्या माध्यमांचा चांगल्या प्रकारे वापर करून वाचन संस्कृती वाढवता येईल. इंटरनेट आदी गोष्टी हे वाचन संस्कृतीवर आक्रमण न मानता ती वाचन व्यवहाराला लाभलेली देणगी आहे या भावनेने तिचा वापर करून घेता येऊ शकेल. कारण ह्या आधुनिक प्रसार माध्यमाद्वारे गद्य-पद्य स्वरूपातील साहित्य, चित्रे, अनुदिनी(ब्लॉग) प्रसिद्ध करता येईती.या दृष्टीने ही माध्यमे उपयुक्त ठरतील. मराठीत ई-साहित्य प्रतिष्ठान या संस्थेने पीडीएफ स्वरूपात मराठी पुस्तके विनामूल्य त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहेत. ती पुस्तके आपण डाऊनलोड करून आपल्या मोबाईलवर वाचू शकतो. पुस्तकांचा संग्रहही करू शकतो. इंटरनेट हे माध्यम पुस्तक प्रकाशनापेक्षा स्वस्त, जलद आणि प्रभावी माध्यम आहे. इंटरनेटवर प्रसिद्ध केलेले साहित्य काही मिनिटात जगभरच्या वाचकांना उपलब्ध होऊ शकते. त्यावर चर्चा ,विचार, परिसंवाद करणे सहज शक्य होते. व्हॉट्‌स‍ॲपसारख्या प्रसारमाध्यमाद्वारे आपण पीडीएफ स्वरूपातील पुस्तकांचे आदान प्रधान करू शकतो. ही प्रक्रिया फार जलद गतीने करता येते.

हिंदू संस्कृतीचे अन्य विषय[संपादन]

हिंदू संस्कृतीच्या संदर्भात विविध संकल्पना मानल्या आहेत.-

१. ऋणकल्पना- ही भारतीय समाजशास्त्रीय महत्त्वाचे संकल्पना असून आश्रम व्यवस्थेशी या संकल्पनेची सांगड घातलेली दिसून येते.

२. आश्रम-मानवी आयुष्याचे चार भाग कल्पून त्या प्रत्येक भागाला आश्रम असे नाव दिले आहे.ब्रह्मचर्य, गृहस्थ ,वानप्रस्थ आणि संन्यास असे हे चार आश्रम आहेत.

३. पुरुषार्थ- धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चार पुरुषार्थ मानले असून नीतीशास्त्राच्या दृष्टीने याला विशेष महत्त्वव आहे.

४. चातुर्वर्ण्य-ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे चार वर्ण मानले गेले आहेत .

५. प्रतीक संकल्पना- स्वस्तिक, कमळ, कलश ,यज्ञ अशी विविध प्रतीके ही भारतीय संस्कृतीचे महत्त्वाचे घटक आहेत.

बाह्य दुवे[संपादन]

संस्कृतीची अंगे[संपादन]

१. भूमी
२. भारतीय जन
३. भाषा व साहित्य
ही भारतीय संस्कृतीची तीन प्रमुख अंगे आहेत.

  1. ^ भारतीय संस्कृती कोश खंड नववा
  2. ^ भारतीय संस्कृती कोश खंड नववा