Jump to content

कृष्णराव अर्जुन केळूसकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कृ.अ. केळूसकर (जन्म : केळूस, वेंगुर्ले तालुका, महाराष्ट्र, २० ऑगस्ट, इ.स. १८६०; - मुंबई, १४ ऑक्टोबर, इ.स. १९३४) हे एक मराठीतील चरित्रलेखक, भाषांतरकार, वक्ते, विचारवंत, सुधारक आणि सामाजिक कार्यकर्ते व ब्राह्मणेतर चळवळीचे आधारस्तंभ होते.

शिक्षण

[संपादन]

गरीब मराठा समाजात जन्मलेले केळूसकर मॅट्रिक झाले आणि शिक्षकाची नोकरी करू लागले. विद्यार्थिदशेत आणि नोकरी करीत असताना केळूसकरांनी विविध विषयांवर सूक्ष्म आणि चौफेर वाचन केले. त्यांतून ते निरीश्वरवादी व नीतिवादी बनले.

वाङ्‌मयसेवेची सुरुवात

[संपादन]

केळूसकरांना नोकरी मिळवून देणारे ज्यू सद्‌गृहस्थ हाईम किहीमकर यांच्या प्रेरणेने कृष्णराव लेखन करू लागले. किहीमकरांसाठी केळूसकरांनी बायबलच्या ’जुन्या करारा’च्या इंग्रजी पुस्तकाचे मराठी भाषांतर केले. पुढे हाईमसाहेबांनी सुरू केलेले ’इस्राएल’ नावाचे साप्ताहिक केळूसकरांनी चालविले. त्या साप्ताहिकातून ते लंडनमधून निघणाऱ्या ’ज्युइश क्रॉनिकल’ नावाच्या नियतकालिकातील मजकुराचे मराठी भाषांतर प्रसिद्ध करीत व प्रसंगी स्वतंत्र लेखही लिहीत. याच काळात रावबहादुर नारायण मेघाजी लोखंडे या ब्राह्मणेतर नेत्याने चालविलेल्या ’दीनबंधु’ वृत्तपत्रातूनही केळूसकर लिहू लागले. त्या पत्रात ब्राह्मणशाही विरुद्ध केळूसकरांनी केलेल्या भाषणांचे वृत्तान्तही छापून येत. त्यामुळे केळूसकरांची बरीच प्रसिद्धी झाली.

प्रार्थना समाजाचे एक कार्यकर्ते मोरो विठ्ठल वाळवेकर यांच्या ’सुबोधपत्रिका’ व ’सुबोधप्रकाश’ या नियतकालिकांतूनही केळूसकरांनी लिखाण केले.

केळूसकरांचे सर्वात मोठे काम म्हणजे त्यांनी त्यांनी इ.स. १९०७ साली लिहिलेला ’क्षत्रियकुलवतंस छत्रपति शिवाजी महाराज यांचे चरित्र’ हा ग्रंथ. मराठीमधील समग्र व साधार असलेले छ्त्रपती शिवाजी महाराजांचे हे पहिले चरित्र. या पुस्तकाची गुजराती, हिंदी आदी भाषांत भाषांतरे झाली; इंग्रजीतील भाषांतर प्रा. नीलकंठ ताकारनाव यांनी The Life of Shivaji Maharaj' या नावाने प्रसिद्ध केले. व या अमूल्य ग्रंथाच्या प्रसिद्धीसाठी इंदूरचे श्रीमंत सवाई तुकोजीराव होळकर महाराजांनी या इंग्रजी ग्रंथाच्या ४००० प्रती घेऊन जगातील सर्व प्रमुख इंग्रजी ग्रंथालयांना मोफत वाटल्या.ही एक इतिहास अभ्यासकांसाठी दुर्मिळ गोष्ट आहे.

केळूसकरांनी लिहिलेली चरित्रे

[संपादन]

केळूसकरांनी लिहिलेली अन्य पुस्तके

[संपादन]
  • मूळ संस्कृतमध्ये असलेल्या एकूण ७ उपनिषदांचे शांकरभाष्याला धरून केलेले मराठी भाषांतर (बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड यांच्या विनंतीवरून केलेले काम)
  • टोम पेनच्या ’राइट्स ऑफ मॅन’चे मराठी भाषांतर
  • नीति बोध माला (४ भाग, मुलांसाठी कथारूपात नीतिशिक्षण देणारी पुस्तके) ही चारही पुस्तके केळूसकरांनी सयाजीरावांना अर्पण केली.
  • फ्रान्सच्या जुन्या इतिहासाचे भाषांतर (बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड यांच्या विनंतीवरून केलेले काम)
  • श्रीमद्भगवद्गीता : सान्वयपदबोध सार्थ आणि सटीक (१९०२). या ग्रंथाची दुसरी आवृत्ती दामोदर सावळाराम यंदे यांनी काढली (१९३०)
  • सेनेका व एपिक्टेटस यांची बोधवचने (बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड यांच्या विनंतीवरून केलेले काम)

केळूसकरांची वृत्तपत्रीय कारकीर्द

[संपादन]
  • ’आध्यात्मिक ज्ञानरत्‍नावली’ मासिकाचे संपादन
  • ’इस्राएल’ मासिकाचे संपादन व मासिकात लेखन
  • जगद्‌वृत्त या साप्ताहिकाचे संपादन (१९०७). या साप्ताहिकात केळूसकरांनी अर्थकारण, नीतिशास्त्र व समाजसुधारणा आदी विषयांवर लेखन केले.
  • दीनबंधु, सुबोधपत्रिका व सुबोधप्रकाश या वृत्तपत्रांत लेखन
  • नीतिप्रसारक सभेच्या ’नित्युपदेशक’ या मासिकात लेखन

केळूसकरांना मिळालेले सन्मान

[संपादन]