अष्टांगिक मार्ग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ships wheel with eight spokes represents the Noble Eightfold Path
धम्मचक्रातील आठ आरे हे अष्टांगिक मार्ग दर्शवतात.

अष्टांगिक मार्ग (पाली: अरियो अठ्ठ्ंगिको मग्ग) हा गौतम बुद्धांनी सांगितलेला काम, क्रोध, द्वेष, इ. दोष दूर करून जीवन निर्मळ करण्याचा सदाचाराचा मार्ग आहे. यासं मध्यम मार्ग सुद्धा म्हणतात.

बौद्ध धर्माच्या शिकवणुकीत अष्टांगिक मार्गाला फार महत्त्व आहे. अष्टांगिक मार्गाचा परिपूर्ण अवलंब केला तर मनुष्य निर्वाण प्राप्त करू शकतो. निर्वाण म्हणजे मृत्यू नव्हे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ही कल्पना समजावून देताना म्हटले आहे की, निर्वाण म्हणजे धर्ममार्गावर वाटचाल करता येईल इतका पुरेसा ताबा आपल्या प्रवृत्तींवर असणे. निब्बाण (निर्वाण) म्हणजे निर्दोष जीवन. काम, क्रोध, द्वेष वगैरे दोष आपले जीवन दूषित करून सोडतात. हे दूर करून जीवन निर्मळ करण्याचा मध्यम मार्ग म्हणजे अष्टांगिक मार्ग. हा मार्ग मनुष्याला पाहायला शिकवतो, जाणायला शिकवतो, ज्ञान देतो. त्यामुळे चित्ताला शांती लाभू शकते. मनुष्याच्या दैनंदिन जीवनात मनुष्य जितके या मार्गाने वाटचाल करतील तितके जीवन अधिक आनंदी होत जाईल.

अष्टांगिक मार्ग

१) सम्यक् दृष्टी :- निसर्ग नियमाविरुद्ध कोणतीही गोष्ट होऊ शकते ही गोष्ट न मानणे.

२) सम्यक् संकल्प :- म्हणजे योग्य निर्धार, विचार.

३) सम्यक् वाचा :- करुणायुक्त व सत्यपूर्ण वाचा (बोल) ठेवण्याचा प्रयत्न करणे.

४) सम्यक् कर्मान्त :- उत्तम कर्म म्हणजे योग्य कृत्ये करणे.

५) सम्यक् आजीविका :- वाईट मार्गाने आपली उपजीविका न करता ती सन्मार्गानेच करणे.

६) सम्यक् व्यायाम :- वाईट विचार निर्माण झाल्यास त्याचा त्वरित नाश करणे.

७) सम्यक् स्मृती :- तात्त्विक गोष्टींचे स्मरण करून चित्तास (मनाला) जागृत ठेवणे.

८) सम्यक् समाधी :- कोणत्याही वाईट विकारांना स्पर्श होऊ न देता दुष्ट प्रवृत्तींपासून मन अलग ठेवून चित्त प्रसन्न आणि शांत ठेवणे

सम्यक दृष्टी[संपादन]

अष्टांगामध्ये पहिले सूत्र आहे- सम्यक दृष्टी. सम्यक दृष्टी म्हणजे जे आहे, जसे आहे तसे पाहणे. एखाद्या व्यक्तीविषयी मनात राग असेल किंवा काही पूर्वग्रह असतील तर ती व्यक्ती जे काही करेल त्यात आपल्याला दोषच दिसू लागतात. कधी कधी मन विषादाने भरून गेले असले की भव्य आकाश, तेजस्वी नक्षत्रे, सुगंधाची आणि सौंदर्याची बरसात करणारी फुले यांच्या दर्शनाने आनंद होत नाही. मूळ वस्तू जशी आहे तशी न बघता विकारग्रस्त मनाने बघितली की तिच्या बाबतीतील आपले आकलन दूषित होते. म्हणून माणूस, वस्तू, निसर्ग सगळ्यांकडे शांत, समतोल, पूर्वग्रहविरहित दृष्टीने बघावे. म्हणजे बघणारा आणि बघितले जाणारे यांच्यात योग्य संबंध प्रस्थापित होतात.

सम्यक संकल्प[संपादन]

दुसरे सूत्र आहे सम्यक संकल्प. आपला संकल्प, आपले ध्येय हे फार आवाक्याबाहेरचे नको तसेच फार साधे, अगदी सहजसाध्य, कुवतीपेक्षा पुष्कळ कमी असेही नको. आपल्या नेहमीच्या जगण्यात, विशेषतः आजच्या काळात तर सम्यक संकल्प फार महत्त्वाचा ठरतो. आपल्या मुलांसाठी अवास्तव अपेक्षा बाळगणारे पालक मुलांसमोर न झेपणारे ध्येय ठेवतात. त्या ध्येयाकडे वाटचाल करताना मुले आणि पालक दोघेही दुःखी होतात. ध्येय साध्य झाले नाही की आत्मविश्वास ओसरू लागतो. ताण येतो. आपण पालकांच्या अपेक्षा पुऱ्या करू शकलो नाही याचे दुःख होते. अशा वेळी आत्यंतिक निराशेने मुलांनी आत्महत्या केल्याचीही उदाहरणे आहेत. याखेरीज संकल्पामध्ये दुराग्रह असू शकतो. खोटी प्रतिष्ठा आणि अहंकारापायी अमुक एक करून दाखवीन आणि मगच विसावेन, या संकल्पामुळे आयुष्यातील मौल्यवान काळ फुकट जाऊ शकतो. मनापासून नको असलेली गोष्ट करणे म्हणजे मानसिक शक्तींचा अपव्यय असतो. दुसरीकडे आळशीपणा करून, आपल्याकडे असलेली शक्ती, ताकद, कौशल्य फुकट घालविणे हे सुद्धा दुःखदच म्हणावे लागेल. ही माणसे आपले आणि समाजाचे नुकसान करीत असतात. तेव्हा कुवतीनुसार समतोल ध्येय म्हणजे सम्यक संकल्प आवश्यक असतो

सम्यक वाणी[संपादन]

हे तिसरे सूत्र आहे, सम्यक वाणी. आपले बोलणे सत्य, सरळ आणि प्रिय असावे. खोटेपणा, ढोंग फसवणूक आपले अनेक तऱ्हांनी नुकसान करतात. आपल्या रोजच्या जगण्यात पुष्कळदा आपण आत काहीतरी दडवतो. एखाद्याबद्दल राग असताना बाहेर मात्र गोड गोड बोलतो. राग दडपल्यामुळे तो वेगळ्या प्रसंगी वेगळ्या मार्गाने बाहेर पडू शकतो. अशी माणसे अकारण हिंसक होऊ शकतात. विपरीत किंवा बदलून न सांगता जे आहे जसं आहे तसं सांगायला हवे . राजाचे हेर किंवा मंत्री खोटे आणि गोड बोलू लागले तर राज्याचा विनाश ओढवेल. स्तुतीही नव्हे आणि निंदाही नव्हे. साधेपणी अहिंसात्मक तऱ्हेने सत्य सांगणे. गरज नसताना वृथा न बोलणे या सर्व बाबी सम्यक वाणीत समाविष्ट होतात.[१]

सम्यक कर्मांत[संपादन]

चौथं सूत्र आहे सम्यक कर्मांत. योग्य ते आणि योग्य तेवढं कर्म करणं म्हणजे सम्यक कर्मांत. यात आत्महत्या, चोरी, हिंसा, परस्त्रीविषयी लोभ, अशी सारी कर्मे निषिद्ध आहेत. दुसरीकडे कितीही मिळाले तरी, ‘अजून हवे’ ची लालसा न सुटणे, त्यासाठी जिवाच्या आकांताने कर्म करीत राहणे हे सुद्धा वर्ज्य असावे. सगळे ज्ञानी लोक याचा उद्घोष करतात. या संदर्भातील टॉलस्टॉयची कथा प्रसिद्ध आहे. एका माणसाला सांगितले गेले की, सकाळपासून संध्याकाळपर्यंत तू जिथपर्यंत धावत जाशील तेवढी जमीन तुझी होईल. सूर्यास्तापर्यंत खूप अंतर पार करायला हवे म्हणून तो लोभामुळे जोराने धावत राहिला. सूर्यास्त झाल्यावर तो थांबला आणि अतिश्रमाने मृत्यू पावला. त्याला पुरण्यास साडेतीन हात जमीन पुरेशी झाली. आपल्याला योग्य असे साध्य ठरविल्यावर त्या दिशेने शांतपणे कर्म करत राहणे, म्हणजे सम्यक कर्मांत.

सम्यक उपजीविका[संपादन]

सम्यक उपजीविका हे पाचवे सूत्र आहे. आपली उपजीविका ही आपल्या आवडीनुसार असावी. परंतु त्यापासून इतरांना त्रास, दुःख, कष्ट, कोणतीही इजा होता कामा नये. उपजीविका सन्मार्गाने करावी. चोरी, फसवाफसवी, पाप, हिंसा करून उपजीविका करू नये. आपण जितक्या खोटय़ा गोष्टी करून आणि इतरांना त्रास देऊन उपजीविका करतो तितके आपण अपराधी, भीतिग्रस्त, संतापी असतो. समाधानी, शांत जीवनापासून वंचित राहतो. चंबळच्या डाकूंना सुद्धा ही गोष्ट अनुभवाला आली म्हणून त्यांनी खून, दरोडे, मारामाऱ्या, लुटालूट सोडून विनोबांपुढे शस्त्रे ठेवीत शरणागती पत्करली व शेतीसारखी कष्टाची पण शांत, समाधानी उपजीविका पत्करली.

सम्यक व्यायाम[संपादन]

सम्यक व्यायाम हे सहावे सूत्र आहे. वाईट विचार मनात उत्पन्न होऊ नये म्हणून प्रयत्न करणे. उदा. दुसऱ्याचे धन हडप करावे असा विचार मनात नसतो, पण तशी संधी समोर आली तर मोह होऊ शकतो. अशा प्रसंगीही वाईट विचार न करण्याचे वळण मनाला लावायला हवे. वाईट विचारांनी फक्त विध्वंस घडतो. त्यामुळे एकतर मनाला टोचणी लागते किंवा अधिक विध्वंसाची आग भडकते. चांगली कृत्ये करणे, मनात सुविचार उत्पन्न होतील असा प्रयत्न करणे, सुविचार मनात नीट रुजविणे, ते पूर्णत्वाला नेऊन जीवनात त्यांचा अंतर्भाव करणे या मानसिक प्रयत्नांना सम्यक व्यायाम म्हणतात.

सम्यक स्मृती[संपादन]

सम्यक स्मृती हे सातवे सूत्र आहे. व्यर्थ ते विसरणे आणि सार्थ ते स्मरणात ठेवणे दैनंदिन जीवनात घडावयास हवे. पण उलटच घडते. वाईट गोष्टींच्या स्मृती पक्क्या होतात. कोणी आपल्याकरता काय केले हे लक्षात राहात नाही. उलट काय केले नाही तेवढे मात्र लक्षात राहते. दैनंदिन जीवनात हे दुःखाला कारणीभूत ठरते. आपल्या शरीरमनातील सुखदुःखादींचे साक्षित्वाने अवलोकन करीत त्यांचे स्वरूप समजावून घेणे, त्याबाबतीत मन सावध, जागृत व संतुलित असणे म्हणजे सम्यक स्मृती.

सम्यक समाधी[संपादन]

सम्यक समाधी हा अंतिम टप्पा आहे. दैनंदिन जीवनात त्याचा अवलंब करणे कठीण आहे. दुःख आणि षड्रिपूंच्या पलीकडे जात अंतिम सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी सात्त्विक मार्गाने जगता जगता हळूहळू मनाची तयारी होऊन ‘हर्ष खेद ते मावळले’ अशी स्थिती आली की मन विशुद्ध आनंदाने भरून जाते. अंतर्यामीच्या या स्थितीला सम्यक समाधी म्हणता येईल.

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]