संकल्प भूमी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दिल्लीतील डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारकातील संकल्प भूमीचे दृष्य, ज्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर वडाच्या झाडाखाली बसलेले आहेत, आणि संकल्प करीत आहेत.

संकल्प भूमी हे गुजरात राज्यातील वडोदरा (बडोदा) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित असलेले एक स्मारक व ऐतिहासिक स्थळ आहे. या स्थळाला दरवर्षी लक्षावधी लोक भेटी देत असतात.[१] २३ सप्टेंबर १९१७ रोजी आंबेडकरांनी सयाजी बागेमध्ये आपल्या तत्कालीन दबलेल्या-पिचलेल्या अस्पृश्य समाजाला जातीयतेतून बाहेर काढण्यासाठी आपले जीवन समर्पित करण्याचा संकल्प केला होता.[२][३] आंबेडकरांनी संकल्प केलेल्या सयाजी बागेतील त्या जागेला १४ एप्रिल २००६ रोजी "संकल्प भूमी" असे नाव देण्यात आले. गुजरात सरकारद्वारे तेथे आंबेडकरांचे एक भव्य स्मारक निर्माण करण्यात येणार आहे.[४]

संकल्प भूमी हे गुजरात मधील एक प्रमुख बौद्ध व अनुसूचित जातींचे तीर्थस्थळ म्हणून विकसित झाले असून येथे लोक बौद्ध धम्माची दीक्षा घेण्यासाठी येत असतात.[५][६]

इतिहास[संपादन]

सयाजी महाराजांच्या वडोदरा संस्थानाकडून मिळालेल्या शिष्यवृत्तीमुळे इ.स. १९१३ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात शिक्षणासाठी जाऊ शकले होते. या दोघांमधील करार असा होता की, आंबेडकरांना शिष्यवृत्तीच्या बदल्यात वडोदरा संस्थानामध्ये काही काळ काम करावे लागणार. या कराराअंतर्गत, सप्टेंबर १९१७ मध्ये आंबेडकर आपल्या थोरल्या भावासह वडोदरा येथे पोहोचले. त्यांना रेल्वे स्थानकावरून आणण्याचा आदेश सयाजीरावांनी दिला होता, परंतु एका अस्पृश्याला आणण्यासाठी कुणीही तयार झाले नाही, त्यामुळे आंबेडकरांना स्वतःच व्यवस्था करून पोहोचावे लागले. त्यांना आपल्या जेवणाची व राहण्याची व्यवस्था स्वतः करावी लागणार होती, त्यासाठी ते जागा शोधत होते, परंतु त्यांच्या वडोदऱ्यात पोहोचण्यापूर्वीच बॉम्बेवरून एक महार युवक वडोदरा संस्थानात नौकरीसाठी येत असल्याची बातमी पसरली होती. त्यामुळे त्यांच्या "अस्पृश्य" जातीची माहिती झाल्यामुळे कोणीही हिंदू आणि अहिंदू लोक त्यांना जेवण व राहण्यासाठी जागा देण्यासाठी तयार झाले नाही. शेवटी, त्यांना नाव बदलून व अधिकचे भाडे देऊन एका पारसी धर्मशाळेत राहण्यासाठी जागा मिळाली.[२][३]

सयाजीराव गायकवाड यांना आंबेडकरांना अर्थमंत्री बनवण्याची इच्छा होती पण अनुभव नसल्यामुळे आंबेडकरांनी संस्थानाच्या सचिव पदाचा स्वीकार केला. सचिवालयात आंबेडकरांना अस्पृश्य असल्यामुळे खूप अपमानित व्हावे लागले, त्यांनी तेथील पाणी सुद्धा पिण्यासाठी मिळत नव्हते. कर्मचारी-चपराशी हे दुरूनच आंबेडकरांकडे फाईल्स फेकत असत, त्यांच्या येण्याच्या व जाण्याच्या पूर्वी फरशीवर पसरलेल्या चटया हटवल्या जात होत्या, अशाप्रकारच्या अमानवीय व्यवहारांच्या नंतरही ते आपले अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करण्यासाठी धडपड करीत राहिले. परंतु जेव्हा तेथे रिकाम्या वेळेत दुसरा किंवा अन्य कोणी हजर नसेल, तेव्हाच आंबेडकरांना अभ्यासासाठी ग्रंथालयात जाण्याची परवानगी मिळे. तेथे जातीयता अधिकच तीव्र असल्याने, त्यांना असेच वाईट व्यवहार सहन करावे लागले.[२][३]

यानंतर आंबेडकर राहत असलेल्या ठिकाणी एक घटना घडली, पारशांना आणि हिंदूंना कळले की पारशांच्या हाॅटेलमध्ये रहाणारी व्यक्ती ही अस्पृश्य (अनुसूचित जाती) आहे. रात्रीच्या वेळी तेव्हा क्रोधित झालेल्या पारसी व हिंदू लोकांचा समूह लाठ्या-काठ्या घेऊन हॉटेलच्या बाहेर जमला आणि हॉटेलमधून आंबेडकरांना बाहेर काढण्यासाठीची मागणी करू लागला. त्यांनी आंबेडकरांनी विचारले की, तू कोण आहेस? त्यावर आंबेडकर म्हणाले, मी एक हिंदू आहे. त्या लोकांपैकी एक जण म्हणाला की, मला माहिती आहे की तू एक अस्पृश्य आहेस, आणि तू आमचे अथितिगृह बाटवले (अपवित्र केले) आहे! तू येथून आत्ताच चालता हो! आंबेडकर म्हणाले की, आत्ता रात्रीची वेळ आहे, त्यामुळे मी सकाळी येथून निघून जाईन. मला केवळ आठ तासांची अधिक सवलत मला द्यावी, अशा प्रकारची विनंती आंबेडकरांनी त्या लोकांना केली. परंतु त्या लोकांनी त्यांचे काहीही न ऐकता त्यांचे सामान बाहेर फेकून दिले. अखेरीस आंबेडकरांना अपमानित होऊन रात्रीच्या वेळीच ते हॉटेल सोडून जावे लागले. त्यांना राहण्यासाठी इतर कोणी हिंदू किंवा मुसलमान आदींनी सुद्धा जागा दिली नाही. त्यांना रात्री राहण्यासाठी कोणतीही जागा नव्हती. त्यामुळे त्यांनी त्या रात्री जवळच्या एका उद्यानामधील (सध्या सजायी उद्यान) एक वडाच्या झाडाखाली दुःखी मनाने रात्र काढली. पण ही रात्र डॉ. आंबेडकरांच्या आयुष्यातील एक सर्वात महत्त्वाची रात्र होती. त्यांनी असा विचार केला की जेव्हा माझ्यासारख्या परदेशातून शिकून आलेल्या विद्वान व्यक्तीसोबत हिंदू अशा प्रकारे वागतात, तर ते माझ्या (अस्पृश्य) समाजातील अशिक्षित आणि गरीब लोकांशी कसे वागत असतील? तेव्हा त्यांनी त्या झाडाखाली संकल्प केला की "मी माझे संपूर्ण आयुष्य या वंचित आणि उपेक्षित समाजाच्या लोकांच्या जीवनात सुधारणा करण्यासाठी व्यतीत करेन; त्यांना त्यांचे मानवी हक्क मिळवून देईन." आंबेडकर आठ तास या उद्यानात होते व दुसऱ्या दिवशी सकाळी परत मुंबईला निघून गेले.[२][३]

वडोदराच्या ज्या सयाजी पार्कमध्ये बाबासाहेबांनी हा संकल्प केला होता, त्या जागेच्या ठिकाणी १४ एप्रिल २००६ रोजी एक चौथरा बांधून त्याचे "संकल्प भूमी" असे नामकरण केले गेले. दरवर्षी येथे देशभरातून लक्षावधी आंबेडकरवादी लोक एकत्र येऊन आंबेडकरांच्या त्या संकल्पाने पुनर्उच्चारण करून आंबेडकरांना अभिवादन करीत असतात. गुजरात सरकारने येथे आंबेडकरांचे एक भव्य स्मारक उभारण्याचे कार्य हाती घेतले आहे.[७][८][९][२][३]

संरचना[संपादन]

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Dalits organise rally in Vadodara to pay tribute to Ambedkar's resolve". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2019-04-23 रोजी पाहिले.
  2. ^ a b c d e "संकल्प भूमि के 100 साल होने पर वडोदरा जाएंगी मायावती! | दलित दस्तक" (इंग्रजी भाषेत). 2019-04-23 रोजी पाहिले.
  3. ^ a b c d e "भीमराव अम्बेडकर की संकल्प भूमि |". jansangharsh.in. Archived from the original on 2019-04-22. 2019-04-23 रोजी पाहिले.
  4. ^ "Sankalp Bhoomi to become Ambedkar Smarak - Times of India". The Times of India. 2019-04-23 रोजी पाहिले.
  5. ^ "30 dalits embrace Buddhism at Sankalp Bhoomi in city - Times of India". The Times of India. 2019-04-23 रोजी पाहिले.
  6. ^ "गुजरात में 300 से ज्यादा दलितों ने बौद्ध धर्म अपनाया, बाबा साहेब अंबेडकर ने भी इसी दिन ली थी दीक्षा - News State". https://www.newsstate.com (हिंदी भाषेत). 2019-04-23 रोजी पाहिले. External link in |संकेतस्थळ= (सहाय्य)
  7. ^ "Like other great men, PM Modi took pledge from Gujarat, says CM Vijay Rupani". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2019-04-23 रोजी पाहिले.
  8. ^ "Historic Sanklap Bhoomi tree gives away - Times of India". The Times of India. 2019-04-23 रोजी पाहिले.
  9. ^ "International buddhist meet in Vadodara - Times of India". The Times of India. 2019-04-23 रोजी पाहिले.