Jump to content

बौद्धधम्म प्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


जागतिक बौद्ध परिषदेमध्ये नेपाळच्या सम्राटासमवेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर, काठमांडू, नेपाळ, २० नोव्हेंबर १९५६
दीक्षाभूमी येथे बाबासाहेब व माईसाहेब आंबेडकर, १४ ऑक्टोबर १९५६

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे बौद्ध धर्माचे थोर उपासक, बौद्धधर्म प्रवर्तक व महान बोधीसत्त्व होते. तसेच ते बौद्ध धर्माचे तत्त्वज्ञ, विद्वान, लेखक व पुनरूत्थानक होते. एकेकाळी भारतातून लूप्त झालेला बौद्ध धर्म डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुन्हा पुनर्जीवीत केला. भारतीय बौद्धांपैकी चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्यानंतर डॉ. आंबेडकरांनीच भारतीय बौद्ध धर्मासाठी सर्वाधिक कार्य केलेले आहे. यामुळेच अनेक विचारवंत आधुनिक काळातील भगवान बुद्ध (मैत्रेय) आणि आधुनिक काळातील सम्राट अशोक असा करतात.

पार्श्वभूमी

[संपादन]
Dr. Babasaheb Ambedkar as a Bhikkhu (Buddhist monk) after the demise of his first wife Ramabai, 1935

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मनात बौद्ध धर्माची बीजं हळूहळू व बालपणापासून रुजत गेली. शेवटी त्यांनी कोट्यवधी अनुयायांसह केलेला बौद्ध धर्माचा स्वीकार ही क्रांतिकारक घटना होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी नाशिकजवळील येवला येथे धर्मातराची घोषणा केली. त्या वेळेस आपण कोणत्या धर्माचा स्वीकार करणार हे त्यांनी घोषित केले नव्हते. ३० व ३१ मे १९३६ रोजी मुंबई इलाखा महार परिषद मुंबई येथे घेण्यात आली. या परिषदेत धर्मातराच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

डॉ. आंबेडकरांच्या बालपणापासून त्यांचेवर झालेल्या मानसिक व बौद्धिक विकासाची वाटचालीतूनच भगवान बुद्धांशी त्यांची बालपणीच मैत्री झाली होती. दादासाहेब केळुसकरांनी १८९८ साली प्रसिद्ध केलेले मराठीतील ‘भगवान बुद्धाचे चरित्र’ बाबासाहेबांना मॅट्रिक झाल्याबद्दल त्यांच्या सत्कार समारंभात अर्पण केले. चर्नीरोडच्या बागेत केळुसकर गुरू भीमराव या शिष्याला बुद्धाच्या कथा सांगत असावेत. १९१२ साली बी.ए. होईपर्यंत डॉ. बाबासाहेबांनी मुंबईतील सर्व ग्रंथालये पालथी घालून मॅक्समुलर, हॉगसन यांची गौतम बुद्धावरील पुस्तके, सर एडविन अर्नाल्ड यांचे ‘लाइट ऑफ एशिया’ हे बुद्धाचे काव्यमय चरित्र यांचे सूक्ष्म वाचन केले. पी. लक्ष्मी नरसु यांचे ‘इसेन्स ऑफ बुद्धिझम’ हे पुस्तक १९०७ साली प्रसिद्ध झाले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हे पुस्तक १९४८ साली पुन्हा प्रसिद्ध करताना म्हटले की, ‘‘हा ग्रंथ आजपर्यंत प्रसिद्ध झालेल्या सर्व ग्रंथांत सर्वोत्कृष्ट आहे.’’ कोलंबिया विद्यापीठाला सादर केलेल्या एम.ए.च्या शोधनिबंधाचा विषय एन्शट इंडियन कॉमर्स होता. त्या निबंधात प्राचीन भारताच्या समृद्धीचे स्पष्टीकरण करताना त्यांनी बौद्ध धर्म ग्रंथांचे आधार सादर केले होते. बट्राँड रसेल यांच्या सामाजिक पुनर्घटनेची मूलतत्त्वे या पुस्तकांचे परीक्षण करताना डॉ. आंबेडकरांनी म्हटले हाते की, ‘‘प्रत्येक माणसाला स्पर्धा आवश्यक आहे. अडथळे, अडचणी पार करून विजय मिळविल्यामुळे त्याच्या अंतर्गत प्रवृत्ती-शक्ती कार्यप्रवण होतात. त्यातून त्याला आपण विकास करीत असल्याची जाणीव होत राहते.’’ हे विवेचन बौद्ध तत्त्वज्ञानाशी पूर्णतः सुसंगत आहे असे आढळून येते. १९२० ते १९२३ या आपल्या इंग्लंडमधील शिक्षणाच्या निमित्ताने झालेल्या वास्तव्यात चर्चेचा विषय असलेली तत्कालीन बौद्ध ग्रंथांची इंग्रजी भाषांतरे डॉ. बाबासाहेबांनी काळजीपूर्वक अभ्यासली. १९२७ साली चवदार तळ्याच्या सत्याग्रहानंतर डॉ. आंबेडकरांनी महाड शहराजवळील बौद्ध लेणी पाहिली. तेथे बौद्धकालीन बांधलेली जी आसने होती त्यावर बसण्यास त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना मनाई केलेली होती. या आसनांवर तत्कालीन बौद्ध भिक्खू बसलेले होते. ‘आपण त्यावर बसून त्यांचे पावित्र्य नष्ट करू नये’ असे त्यांनी सहकाऱ्यांना बजावले. बुद्ध धर्माबद्दल त्यांचा आदर या घटनेतून प्रतिबिंबित होतो. १९३३ साली गोलमेज परिषदेच्या निमित्ताने इंग्लंडमध्ये असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘मुस्लिम आणि अन्य अल्पसंख्य वर्गाशी जवळचे संबंध प्रस्थापित केले असले तरी इस्लाम धर्म स्वीकारण्याचा माझा विचार तर नाहीच, परंतु बुद्ध धर्माच्या स्वीकारासंबंधी मी विचार करीत आहे’ असे मनोगत त्यांनी व्यक्त केले होते.

इ.स. १९३४च्या सुमारास तयार केलेल्या मुंबईतील दादर येथील आपल्या निवासस्थानास डॉ. बाबासाहेबांनी बुद्धाच्या धर्मप्रसारासाठी निकटचा संबंध असलेल्या बिंबीसार राजाच्या राजधानीचे नाव ‘राजगृह’ हे दिले.

इ.स. १९३५ च्यापूर्वी हिंदू पुढाऱ्यांशी झालेल्या भेटीगाठीत हिंदू संस्कृतीचे नुकसान होईल असा धर्म मी स्वीकारणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली होती. ३० मे १९३६ रोजी जातपात मोडक मंडळाकरिता केलेल्या भाषणात ‘अस्पृश्यांनी बुद्धवचन लक्षात घेतल्यास त्यांना मुक्तीचा मार्ग सापडेल’ असे प्रतिपादन केले. म्हणजेच बुद्ध धर्म स्वीकारण्याचा विचार इ.स. १९३६ पूर्वीच निश्चित झाला असल्याचे दिसून येते. २ मे १९५० रोजी दिल्लीच्या बुद्ध विहारात वैशाखी पौर्णिमेनिमित्त भाषण करताना व पत्रकारांशी बोलताना त्यांनी बौद्ध धर्म घेण्याचा आपला विचार आहे असे सूचित केले होते. एप्रिल-मे १९५० च्या महाबोधीमध्ये ‘बुद्ध आणि त्यांच्या धर्माचे भवितव्य’ या लेखात डॉ. बाबासाहेब म्हणाले, ‘‘जग जर कोणता धर्म स्वीकारू शकेल तर तो बौद्ध धर्म होय’’. रॉयल एशियाटिक सोसायटीतील एका भाषणात त्यांनी ‘मला माझ्या बालपणापासून बौद्ध धर्माची आवड आहे’ असे सांगितले. जुलै १९५१मध्ये डॉ. बाबासाहेबांनी ‘बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया’ची स्थापना केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला गेले त्या वेळेस त्यांच्याबरोबर अन्य पुस्तकांबरोबर भगवान बुद्धावरील बरीचशी पुस्तके होती व ‘मी ही पुस्तके वारंवार वाचीत असे’ असे त्यानी नंतर नमूद करून ठेवले आहे.

धर्मातर घोषणेनंतर दोन महिन्यांनी ८ डिसेंबर १९३५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईतील फोरास रोडजवळील ढोर चाळ (जयराम भाई स्ट्रीट) येथे धर्मातराच्या संदर्भात केलेल्या भाषणाने हिंदू समाजाचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिलेले अनंत हरी गद्रे प्रभावित होऊन म्हणाले की ‘‘दहा हजार श्रोतृसमुदायासमोर डॉ. आंबेडकरांचे हे भाषण ऐकण्याची संधी लाभली हे आम्ही आपले भाग्य समजतो.’’ गद्रे धर्मातराचे विरोधक असूनही म्हणतात, ‘‘हिंदू समाजाला आपले दोष समजून घ्यायचे असतील तर त्याने डॉ. बाबासाहेबांच्या भाषणाचे मनन केले पाहिजे. बाबासाहेबांच्या भाषणातून अस्पृश्यांनी हिंदू धर्माचा त्याग करावा असे वारंवार सांगितले जात असले तरी त्यांनी कोणता विशिष्ट धर्म स्वीकारावा हे ते सांगत नसत. बाबासाहेबांनी धर्मातराच्या सर्व भाषणांतून [[ख्रिस्ती] किंवा मुसलमान धर्माची उदाहरणे घेतली असली तरी येशू ख्रिस्त किंवा महम्मद पैगंबर यांचा आदर्श ठेवा असा उपदेश केलेला दिसून येत नाही.’’ ‘कुणीही एकट्याने धर्मांतर करू नये, जे करायचे ते सर्व मिळून करू’ असा सबुरीचा सल्ला त्यांनी १९२७-२८ च्या दरम्यान मुसलमान होऊ इच्छिणाऱ्या अस्पृश्यांना दिला.

इ.स. १९३७ साली ज्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या त्यापूर्वी डॉ. बाबासाहेबांनी स्वतंत्र मजूर पक्ष नावाचा राजकीय पक्ष स्थापन केला. तथापि पक्षाच्या जाहीरनाम्यात धर्मांतरितांना कोणत्याही विशेष सवलती त्यांनी जाहीर केल्या नाहीत. मतदारांना केलेल्या आवाहनात ‘धर्मांतराचा प्रश्न वेगळा असून विधान मंडळात निवडून जाण्याशी त्याचा काहीच संबंध नसल्याचे’ स्पष्ट केले. राजकारण करीत असताना धार्मिक प्रश्न त्यांनी कधी आड आणले नाहीत. आणि धार्मिक प्रश्नांना राजकारणाचा स्पर्श होऊ दिला नाही.

इ.स. १९४७चे सत्तांतरण होण्यापूर्वी इ.स. १९४२ पासूनच्या वाटाघाटी सुरू होत्या. त्यात ‘आम्ही ख्रिस्ती धर्म स्वीकारतो, आम्हाला सत्तेत वाटा द्या’ असे त्यांनी म्हटले नाही. धर्मांतराचा वापर करून अस्पृश्य समाजाला सत्ता व संपत्तीत वाटा मिळवून देणे शक्य असूनही डॉ. बाबासाहेबांनी ते टाळले. त्यांनी भारत देश व हिंदू समाज यांच्याशी बेइमानी न करता, राजकारणात आपल्या नीतिमूल्य, तत्त्वांचा व्यापार केला नाही.

बार्शी (जिल्हा सोलापूर) येथे मुंबई प्रांतिक बहिष्कृत परिषदेत मे १९२४ मध्ये ‘अस्पृश्यतेवर उपाय- देशांतर, नामांतर की धर्मांतर’ या विषयावर विवेचन करताना बाबासाहेब म्हणाले की, ‘कोणत्याही धर्माकडे आपण तात्त्विक तसेच व्यावहारिकदृष्ट्याही पाहिले पाहिजे. तात्त्विकदृष्ट्या हिंदुधर्म कोणत्याही धर्मास हार जाणार नाही असे माझे मत आहे. नव्हे कोणत्याही धर्माहून तो श्रेष्ठच गणला जाईल. ‘सर्वाभूती एक आत्मा’ या मूलतत्त्वाप्रमाणे समाज घटना न झाल्याने हिंदू समाजाचे व्यावहारिक स्वरूप किळसवाणे झाले आहे. ज्या धर्मात माणसाला माणुसकी नाही तो धर्म काय कामाचा? आपण धर्मत्याग केला तर जे हिंदू लोक आपला तिरस्कार करतात तेच आपल्याला मान देतील. आपण आज आहोत तसे बहिष्कृत असण्याऐवजी एका मोठ्या समाजाचे अंग होऊन काळ न लागता आपली आपण उन्नती करून घेऊ.’

धर्मांतराची घोषणा

[संपादन]
धर्मांतराची घोषणा करताना बाबासाहेब आंबेडकर, येवला, नाशिक, १३ ऑक्टोबर १९३५

१३ ऑक्टोबर १९३५ रोजी येवला येथे झालेल्या मुंबई इलाखा अस्पृश्य परिषदेपुढे बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, ‘‘अस्पृश्यांनी हिंदू धर्माचा त्याग केल्यानंतर कोणता धर्म स्वीकारायचा हे प्रत्येकाच्या मर्जीवर अवलंबून आहे. फक्त समानतेचे हक्क मिळतील असाच धर्म त्यांनी स्वीकारावा.’’ ते पुढे म्हणाले, ‘‘दुर्दैवाने ‘अस्पृश्य हिंदू’ असा डाग घेऊन मी जन्माला आलो, पण ती गोष्ट माझ्या स्वाधीन नव्हती. तथापि हा नीच दर्जा झुगारून देऊन ही स्थिती सुधारणे मला शक्य आहे आणि ते मी करणारच. मी तुम्हाला स्पस्ष्टपणे सांगतो की हिंदू म्हणवून घेत मी मरणार नाही.’’

मोहनदास गांधींच्या भूमिकेला उत्तर देताना बाबासाहेब म्हणतात, ‘‘मनुष्यमात्राला धर्म आवश्यक आहे, हे गांधींचे म्हणणे मला मान्य आहे. परंतु एखादा धर्म एखाद्या व्यक्तीला तिच्या खऱ्या धर्माविषयीच्या कल्पनेला अनुसरून स्वतःच्या व्यक्तिविकासाला व कल्याणाला स्फूर्तिप्रद होणारा व आपल्या वागणुकीचे ज्या नियमांनी नियमन करणे तिला श्रेयस्कर वाटते, त्या नियमांचा अंतर्भाव करणारा असा नसेल तर तो केवळ आपल्या बापजाद्यांचा धर्म म्हणूनच तिने त्याला चिकटून राहिले पाहिजे हा मात्र त्यांचा दंडक मुळीच कबूल नाही. धर्मांतर करण्याचा माझा निश्चय हा झालाच आहे. बहुजन समाज माझ्या पावलावर पाऊल ठेवून येईल की नाही याची मला पर्वा नाही. तो प्रश्न त्यांचा आहे. त्यांना त्यात हित वाटत असेल तर ते माझे अनुकरण करतीलच.’’ त्याचबरोबर डॉ. आंबेडकरांनी सावधानतेचा इशारा देऊन स्पष्ट केले की ‘‘थोडे थोडे फुटून परधर्मात जाल तर तुमचे नुकसान होईल. सात कोटींनी गटाने धर्मांतर केले पाहिजे. तुम्ही सर्व आलात तरच मला तुमचे काही हित करता येईल. त्यासाठी वेळ हा लागणारच आणि तेवढा वेळ मी थांबणार आहे.’’ डॉ. आंबेडकरांनी स्पष्टपणे सांगितले की, ‘‘हिंदू धर्म हा मुळी धर्मच राहिलेला नाही.’’

धर्मांतरासंबंधी तर्कनिष्ठ, वस्तुनिष्ठ विवेचन करताना बाबासाहेब म्हणाले की, ‘‘धर्मांतरांच्या विषयावर जसा सामाजिक दृष्टीने किंवा धार्मिक दृष्टीने विचार केला पाहिजे तसाच तात्त्विकदृष्ट्याही विचार केला पाहिजे. अस्पृश्यता ही नैमित्तिक नसून नित्याची बाब झाली आहे असे अनेक दैनंदिन घटनांवरून दिसून येते. मनुष्यमात्राला तीन प्रकारचे सामर्थ्य आवश्यक असते. एक मनुष्यबळ, दुसरे द्रव्यबल व तिसरे मानसिक बल. सामर्थ्य असल्याशिवाय जुलमाला प्रतिकार करता येणार नाही. प्रतिकाराला आवश्यक असलेले सामर्थ्य कोणत्याही अन्य धर्मात तुम्ही सामील झाल्याशिवाय तुम्हाला मिळू शकत नाही. म्हणून धर्मांतर करून अन्य समाजात अंतर्भूत झाल्याशिवाय तुम्हाला त्या समाजाचे सामर्थ्य प्राप्त होणार नाही.’’

धर्मांतराची आध्यात्मिक कारणे विशद करताना बाबासाहेब म्हणतात,

‘‘व्यक्तीचा विकास हेच धर्माचे खरे ध्येय आहे असे मी समजतो. हिंदू धर्मात व्यक्तीला प्राधान्य नसल्याकारणाने तो धर्म मला मान्य होऊ शकत नाही. व्यक्तीच्या विकासाकरिता सहानुभूती, समता आणि स्वातंत्र्य या तीन गोष्टींची आवश्यकता असते. हिंदू धर्मात या तिन्हीपैकी एकही बाब उपलब्ध नाही...’’ ‘‘मनुष्यमात्राला जसे शरीर आहे तसेच मनही आहे. जितकी शारीरिक स्वातंत्र्याची आवश्यकता आहे, तितकीच मानसिक स्वातंत्र्याचीही आवश्यकता आहे. मानसिक स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे. ज्याचे मन स्वतंत्र नाही तो मोकळा असून गुलाम आहे.’’

धर्मांतर

[संपादन]
बौद्ध धम्माची दिक्षा ग्रहण करताना बाबासाहेब आंबेडकर व इतर
धम्म दिक्षेप्रसंगी भाषण करताना बाबासाहेब आंबेडकर

‘‘अस्पृश्यातील जातिभेद व अस्पृश्यता नाहीशी करावयाची असेल तर धर्मांतर करणे हा एकमेव रामबाण उपाय आहे. हिंदू समाजातील सुधारणा करणे हे आता आमचे ध्येय नाही, हे आमचे आता कार्य नाही. आमचे स्वातंत्र्य मिळविणे हे आमचे ध्येय आहे. हिंदू धर्मात राहून समता मिळवणे केवळ अशक्य असल्याने धर्मांतर करून समता मिळविण्याचा साधा सोपा मार्ग अवलंबिता येणे शक्य आहे. धर्मांतराचा मार्ग पळपुटेपणाचा किंवा भेकडपणाचा नसून तो एक शहाणपणाचा मार्ग आहे.’’ जातिभेद सर्वांकडे आहे त्यामुळे जातिभेदाला त्रासून धर्मांतर करण्यात अर्थ नाही असा युक्तिवाद करणाऱ्यांना बाबासाहेब उत्तर देतात ते असे- ‘‘जातिभेद सर्वत्रच आहेत असे जरी कबूल केले तरी हिंदू धर्मातच राहा असा निष्कर्ष त्यापासून निघू शकत नाही. जातिभेद ही गोष्ट जर अनिष्ट असेल तर ज्या समाजात गेले असता जातिभेदाची तीव्रता विशेष नाही किंवा जेथे जातिभेद लवकर सहज व सुलभतेने मोडता येतील त्या समाजात जा, हा खरा तर्कशुद्ध सिद्धांत आहे, असे मानावे लागेल.’’

धर्मांतराची आवश्यकता विशद करताना बाबासाहेब म्हणतात,

‘‘जितकी स्वराज्याची आवश्यकता हिंदुस्थानला आहे तितकीच धर्मांतराची आवश्यकता अस्पृश्यांना आहे. स्वराज्याचे महत्त्व जितके देशाला आहे तितकेच धर्मांतरांचे महत्त्व अस्पृश्यांना आहे. धर्मांतर आणि स्वराज्य या दोन्हींचा अंतिम हेतू म्हणजे स्वातंत्र्यप्राप्ती आणि स्वातंत्र्य. ज्या धर्मांतरापासून स्वतंत्र जीवन प्राप्त होऊ शकते ते धर्मांतर निरर्थक आहे असे कोणालाही म्हणता येणार नाही..’’ ‘‘धर्मांतर हे राजकीय हक्कांना विरोधक नसून राजकीय हक्कांचे संवर्धन करण्याचा तो एक मार्ग आहे.’’

आपले धर्मांतराविषयीचे ठाम मत विविध अंगांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सोदाहरण पटवून दिले. ते म्हणतात,

‘‘माणूस धर्माकरिता नाही. धर्म माणसांकरिता आहे. माणुसकी प्राप्त करून घ्यावयाची असेल तर धर्मांतर करा. संघटन करावयाचे असेल तर धर्मांतर करा. समता, स्वातंत्र्य प्राप्त करून घ्यायचे असेल तर धर्मांतर करा. जो धर्म अशिक्षितांना अशिक्षित राहा, निर्धनांना निर्धन राहा अशी शिकवण देतो तो धर्म नसून ती शिक्षा आहे.’’

नागपूर येथे १४ ऑक्टोबर १९५६ रोजी आपल्या ५ लक्ष अनुयायांसोबत हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माची दीक्षा घेतल्यानंतर १५ ऑक्टोबर १९५६ रोजी परत ३ लक्ष अनुयायांना दीक्षा व त्यावेळी केलेल्या ऐतिहासिक भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर शहर निवडण्याचे कारण सांगताना म्हटले की, ‘आर्याचे भयंकर शत्रू असलेल्या नाग लोकांनी भारतात बौद्ध प्रसार केला. आर्य लोकांचा अत्याचार सहन करणाऱ्या नाग लोकांना गौतम बुद्धांच्या रूपाने महापुरुष भेटला. नागांच्या वस्तीमध्ये वाहणारी ‘नाग’ नदी आहे. म्हणून त्या शहरास नागपूर म्हणजे नागाचे गाव असे म्हणतात. हे स्थळ निवडण्याचे हे मुख्य कारण आहे.’’ ‘मनुस्मृती’मध्ये चातुर्वण्य सांगितले आहे. हिंदू धर्मामध्ये समता नाही. हिंदू धर्माच्या विचित्र वर्णव्यवस्थेने सुधारणा होणे शक्य नाही. उत्कर्ष हा फक्त बौद्ध धर्मातच होऊ शकेल. बौद्ध धर्मात ७५ टक्के ब्राह्मण भिक्खू होते. सागरात गेल्यावर जशा सर्व नद्या एकजीव व समान होतात त्याप्रमाणे बौद्ध संघात आले म्हणजे आपली जात जाते व सर्वजण समान असतात, असे समतेने सांगणारा एकच महापुरुष म्हणजे भगवान बुद्ध होय,’’

डॉ. बाबासाहेब पुढे म्हणाले की.. ‘‘या देशामध्ये दोन हजार वर्षे बौद्ध धर्म होता. खरे म्हणजे यापूर्वीच आम्ही बौद्ध धर्मात का गेलो नाही याचीच आम्हाला खंत वाटते. भगवान बुद्धांनी सांगितलेली तत्त्वे अजरामर आहेत. कालानुरूप बदल करण्याची सोय त्यात आहे. एवढी उदारता कोणत्याही धर्मात नाही.’

‘देव व आत्मा यांना बौद्ध धर्मात जागा नाही. दुःखाने पिडलेल्या गरीब माणसांना मुक्त करणे हे बौद्ध धर्माचे मुख्य कार्य आहे.’’

तब्बल दोन तास चाललेल्या आपल्या प्रभावी, अर्थपूर्ण भाषणाचा समारोप करताना डॉ. बाबासाहेबांनी उपस्थितांना बजावले की, ‘‘तुमची जबाबदारी मोठी आहे. तुमच्याबद्दल इतर लोकांना आदर वाटेल, मान-सन्मान वाटेल अशी तुम्ही कृती केली पाहिजे. बौद्ध धर्माच्या दृष्टीने भारताची भूमी सध्या शून्यवत आहे. म्हणून आपण उत्तम रीतीने धर्म पाळण्याचा निर्धार केला पाहिजे. हे आपल्याला साधले तर आपण आपल्याबरोबर देशाचा, इतकेच नव्हे तर जगाचाही उद्धार करू शकू.’’ बौद्धधम्म प्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३ ऑक्टोबर १९३५ रोजी सुरू झालेल्या ‘धम्म’ प्रवासाची सांगता १४ ऑक्टोबर १९५६ रोजी धम्म दीक्षेने झाली.

हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]