डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
डॉ. बाबासाहेब आंबेडकर:
महामानवाची गौरवगाथा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
उपशीर्षक महामानवाची गौरवगाथा
दूरचित्रवाहिनी स्टार प्रवाह
भाषा मराठी
प्रकार ऐतिहासिक
देश भारत
निर्माता नितीन वैद्य
दिग्दर्शक गणेश रासने
निर्मिती संस्था दशमी क्रिएशन
लेखक पटकथाकार: अपर्णा पाडगांवकर
पटकथा लेखिका: शिल्पा कांबळे
कलाकार सागर देशमुख
शिवानी रांगोळे
शीर्षकगीत/संगीत माहिती
शीर्षकगीत भीमराया माझा भीमराया...
शीर्षकगीत गायक आदर्श शिंदे
प्रसारण माहिती
पहिला भाग १८ मे २०१९
अंतिम भाग १७ ऑक्टोबर २०२०
एकूण भाग ३४३
निर्मिती माहिती
कार्यकारी निर्माता अपर्णा पाडगांवकर
कालावधी २२ मिनिटे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा ही १८ मे २०१९ पासून स्टार प्रवाह दूरचित्रवाणी वाहिनीवर प्रक्षेपित झालेली एक मराठी मालिका आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित या मालिकेचे टीझर १५ फेब्रुवारी २०१९ रोजी प्रदर्शित करण्यात आले होते. बराच कालावधी हा कार्यक्रम रात्री ९ वाजता सोमवार ते शनिवार प्रसारित केला जात होता, मात्र नंतर रात्री १०:३० वाजता प्रसारित केला गेला. या मालिकेत अभिनेता सागर देशमुख यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रमुख भूमिका साकारली आहे. सिने-दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी डॉ. आंबेडकरांच्या भूमिकेसाठी सागर देशमुख यांची निवड केली असून विशाल पाठारे यांनी त्यांचे मेकअप डिझाईन केले आहे.[१][२] ही मालिका महाराष्ट्रासह देशात इतरत्र ठिकाणी सुद्धा प्रसिद्ध आहे. युरोप आणि अमेरिकेसारख्या विदेशांमध्येही ही मालिका पाहिली गेली.[३]

निर्मिती[संपादन]

या मालिकेची दशमी क्रिएशन निर्मिती संस्था असून, दिग्दर्शन गणेश रासने यांनी केले. १८ मे २०१९ रोजी बुद्ध जयंतीचे औचित्य साधून या मालिकेचा पहिला भाग प्रक्षेपित केला गेला. मालिकेतून बाबासाहेबांचे बालपणापासून ते महापरिनिर्वाणापर्यंतचे संपूर्ण जीवनचरित्र रेखाटले गेले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, पत्रकारिता, कायदे अशा विविध क्षेत्रांतील कार्यांचा आढावा मालिकेतून घेतला गेला आहे. ही मालिका इतिहासकार व चरित्रकार चांगदेव भवानराव खैरमोडे यांच्या "डॉ. भीमराव रामजी आंबेडकर" (भाग १ ते १२) या चरित्रग्रंथावर आधारित आहे, तथापि या मालिकेसाठी मराठी, हिंदी, इंग्रजी आदी भाषांमधील ८०० पेक्षा अधिक ग्रंथ-पुस्तकांचा धांडोळा घेतलेला आहे.[४][५][६]

आंबेडकरांवरील मालिका तयार करण्याचा निर्णय घेण्यात मोठा वाटा असणारे स्टार प्रवाह वाहिनीचे प्रोग्रामिंग हेड आणि सिने-दिग्दर्शक सतीश राजवाडे यांचे असे मत आहे की, "एक स्टोरी टेलर म्हणून मला वैयक्तिकरीत्या असे वाटते की, ज्या एका व्यक्तीच्या कृतज्ञतेपायी दादरच्या चैत्यभूमी व नागपूरच्या दीक्षाभूमी यांसारख्या ठिकाणी देशभरातून लाखो लोक येतात. आमच्या भाकरीवर, आमच्या जगण्यावर केवळ बाबासाहेबांचा अधिकार आहे, असे लोक म्हणतात, तेव्हा त्या व्यक्तीचे सामर्थ्य किती मोठे असेल विचार करा. आजही कुणा सामान्याला विचारले, तर संविधान लिहिणारा माणूस या पलीकडे कित्येकांना बाबासाहेबांबद्दल फारशी माहिती नाही. त्यांचा संघर्ष, त्यांच्या आयुष्यातले चढउतार, त्यांचा त्याग आणि त्यांचे संपूर्ण देशासाठी असलेले कार्य, एवढे उत्तुंग आहे की, त्यांचा जीवनपट सर्वांपर्यंत पोहचवायलाच हवा, असा आमचा ध्यास आहे. त्याच ध्यासापायी, हे सर्व चालू आहे. बाबासाहेब सर्वांना कळावेत, हीच आमची प्रामाणिक इच्छा आहे."

तसेच दशमी क्रिएशनच्या प्रतिनिधी म्हणून अपर्णा पाडगावकर म्हणाल्या की, "बाबासाहेब म्हटले की केवळ आरक्षण देणारे, असा गैरसमज समाजात आहे. त्यांना केवळ मागासवर्गीयांचा कैवारी म्हटले जाते, हे आपले अज्ञान आहे. गरोदर स्त्रीला तीन महिन्यांची अधिकृत सुटी, कामगारांना आठ तासांची शिफ्ट, द्विभार्या प्रतिबंधक कायदा अशा विविध स्त्री हक्काच्या, कामगार हक्काच्या निर्णयांत त्याचे मोठे योगदान होते, हे जोवर सर्वांपर्यंत पोहोचत नाही, तोवर परिस्थिती बदलणे अवघड आहे. एक स्त्री म्हणून माझ्यावर त्यांचे खूप थोर उपकार आहेत, असे मी मानते. याच उपकरांतून उतराई होण्याचा हा छोटासा प्रयत्न."[७]

या मालिकेबद्दल सतीश राजवाडे सांगतात की, "हा विषय करायचाच होता. कारण केवळ त्या व्यथा, जाणीवा आणि संघर्ष लोकांपर्यंत पोहोचवायचा नव्हता तर त्या संघर्षांतून महामानव कसा घडतो हे जगासमोर आणायचे होते. या संकल्पनेला तीन तासांचा चित्रपट न्याय देऊ शकत नाही हे लक्षात आल्यामुळे मालिका हे प्रभावी माध्यम निवडले. हल्ली मुलांचे वाचन कमी झाले आहे, परंतु दृकश्राव्य माध्यमातून बाबासाहेब त्यांच्यासमोर आले तर ते त्यांना जास्त आवडेल. मालिकेच्या माध्यमातून घराघरांत बाबासाहेब पोहोचावेत, असा उद्देश होता. त्यांच्या आयुष्यातील राजकीय घडामोडी जगाला माहिती असतील, पण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी बालपणी जो संघर्ष करावा लागला, जे हाल सोसावे लागले ते मात्र पडद्याआड आहेत. आणि तेच दाखवण्यासाठी मालिकेचे कथानक बालपणापासून सुरू होते. सत्य कथा सांगणे हा एकमेव स्वच्छ उद्देश यामागे आहे. प्रत्येक प्रसंगाला बाबासाहेब तोंड देत राहिले, परंतु ते मागे फिरले अशी एकही घटना त्यांच्या आयुष्यात सापडणार नाही. आणि ही जिद्द, चिकाटी त्या काळात बाळगणाऱ्या या सामान्य माणसाच्या जाणिवा निश्चितच असामान्य होत्या. म्हणून ही कथा नसून शिकण्याची प्रक्रिया आहे. कौटुंबिक नाट्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी वेगळा आणि ज्ञान देणारा विषय लोकांपुढे मांडता आला याचा आनंद अधिक आहे."

शीर्षकगीत[संपादन]

‘क्रांतिसूर्य तू शिल्पकार तू भारताचा
बोधिसत्त्व मूकनायका
मोडल्या रुढी त्या परंपरा दिव्यतेजा
तूच सकल न्यायदायका
जीवन तुझे आम्हास प्रेरणा
दाही दिशा तुझीच गर्जना
भीमराया माझा भीमराया
आला उद्धाराया माझा भीमराया
भारताचा पाया माझा भीमराया
भीमराया माझा भीमराया'

वरीलप्रमाणे या मालिकेच्या शीर्षकगीताचे शब्द असून त्याची रचना वा लेखन गायक आदर्श शिंदे आणि उत्कर्ष शिंदे या दोघा बंधूंनी केले आहे, तर गायन केवळ आदर्श शिंदेंनी केले आहे. आदर्श आणि उत्कर्ष यांनी या शीर्षकगीताचे बराच अभ्यास आणि वाचन करून शब्द लिहिले आहे. या दोघांनी पहिल्यांदाच एखाद्या मालिकेचे शीर्षकगीत लिहिले आहे.[८][९]

कलाकार[संपादन]

हिंदीमध्ये प्रदर्शित[संपादन]

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२९व्या जयंती निमित्त १४ एप्रिल ते १५ मे २०२० पासून ही मालिका हिंदी भाषेत दर सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजता स्टार भारत या वाहिनीवर प्रदर्शित होत आहे.[१५]

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

 1. ^ "सागर देशमुख पुलंनंतर साकारणार बाबासाहेब". महाराष्ट्र टाइम्स. 2019-04-02 रोजी पाहिले.
 2. ^ "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील मालिकेत 'हा' अभिनेता मुख्य भूमिकेत". एबीपी माझा. 2019-03-28 रोजी पाहिले.
 3. ^ "'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' मालिकेची प्रसिद्धी सातासमुद्रापार". लोकमत. 27 जुलै 2019.
 4. ^ "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट उलगडणार छोट्या पडद्यावर". लोकमत. 2019-02-19 रोजी पाहिले.
 5. ^ "डॉ बाबासाहेब आंबेडकर: छोट्या पडद्यावर उलगडणार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनपट". महाराष्ट्र टाइम्स. 2019-02-19 रोजी पाहिले.
 6. ^ "A new show based on the life of Babasaheb Bhimrao Ambedkar to go on-air soon - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2019-02-19 रोजी पाहिले.
 7. ^ "'भीमराव' अंडरग्राऊंड इन 'हिंदु'स्थानी मोहल्ला!". दिव्य मराठी. 2019-05-09 रोजी पाहिले.
 8. ^ "'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' मालिकेचं दमदार शीर्षकगीत". लोकसत्ता. 2019-05-09 रोजी पाहिले.
 9. ^ "'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' मालिकेचं दमदार शीर्षकगीत, आदर्श-उत्कर्षची लेखणी आणि भारदस्त आवाजाची जादू". एबीपी माझा. 2019-05-09 रोजी पाहिले.
 10. ^ "मालिकेत डाॅ. आंबेडकरांचं बालपण साकारणारा अभिनेता आहे कोण?". न्यूज१८ लोकमत. 2019-06-27 रोजी पाहिले.
 11. ^ "'ही' अभिनेत्री साकारणार रमाबाई आंबेडकरांची भूमिका". लोकसत्ता. 2019-06-27 रोजी पाहिले.
 12. ^ "अभिनेत्री शिवानी रांगोळे साकारणार रमाबाई आंबेडकरांची भूमिका". महाराष्ट्र टाइम्स. 2019-06-27 रोजी पाहिले.
 13. ^ "ही बालकलाकार साकारणार छोट्या रमाबाईंची भूमिका". लोकसत्ता. 18 जुलै 2019.
 14. ^ "'डाॅ. बाबासाहेब आंबेडकर' मालिकेत 'ही' अभिनेत्री साकारतेय छोट्या रमाबाई". न्यूज१८ लोकमत.
 15. ^ "मराठीतील प्रसिद्ध मालिका 'डॉ.बाबासाहेब आंबेडकर-महामानवाची गौरवगाथा' आजपासून हिंदीमध्ये प्रदर्शित | eSakal". सकाळ. Archived from the original on 2020-09-27. 2020-04-14 रोजी पाहिले.

बाह्य दुवे[संपादन]