विपस्सना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विपस्सना (संस्कृत: विपश्यना) (शब्दश: अर्थ - दृष्टी) ही अध्यात्मातल्या श्रमण मार्गातील एक साधनापद्धती आहे. विपस्सनेला मानवाच्या कल्याणाचा मार्ग म्हणतात. भगवान बुद्ध हे महान मनोवैज्ञानिक आणि त्यांनी ही विपस्सना विधि शोधून काढलेली आहे. त्यांनी संशोधीत केलेल्या सत्य आणि प्रज्ञेचा प्रत्यक्ष अनुभव या अभ्यासानेच घेतलेला आहे. म्हणूनच त्यांनी आपल्या शिकवणुकीत ध्यानावरच विशेष भर दिला आहे.

विपस्सना ही ध्यानविधी अगदी सोपी आणि साधी आणि तितकीच अवघड असून अद्वितीय आहे. ती एक निखळ सुख आणि मन:शांती मिळवून देणारी तर्कसंगत अशी साधना आहे. या साधनेच्या अभ्यासाने स्वत:च्या शरीर व मनात खोलवर दडलेल्या समस्यांची उकल होऊन, त्या दूर होण्यास मदत होते. आपल्यामधील सुप्त शक्तींचा विकास होतो. त्या शक्तीचा उपयोग स्वत:च्या व इतरांच्या कल्याणासाठी करता येतो. या साधनेद्वारे केवळ शारीरिक समस्या दूर होतात, असे नाही तर जीवनात मोठा क्रांतीकारी मानसिक बदल सुद्धा घडून येतो.

ही कल्याणकारी विद्या भारतातून जगात पसरली. गुरु-शिष्य परंपरेच्या माध्यमातून ही विद्या म्यानमारात मागील दोन हजारांवर वर्षांपासून परम परिशुद्ध स्वरूपात जतन करण्यात आली. सत्यनारायन गोयंका गुरुजी यांनी ही विधी म्यानमारमधून भारत देशात आणून नाशिक जवळील इगतपुरी येथे व देशातील आणि जगातील इतर अनेक ठिकाणी दहा दिवसाच्या शिबिरातून प्रशिक्षित आचार्यांच्या माध्यमातून शिकवली जात आहे. ही साधना सर्वांसाठी कल्याणाचे कारण बनत आहे.

पहिला अध्याय[संपादन]

विपश्यना शिबिरात पहिला अभ्यास आनापानसतीचा (श्वासा चे निरीक्षण) व दुसरा विपश्यना (स्वत:च्या शरीरातील प्रत्येक पेशीत उमटणार्‍या संवेदनाचे निरीक्षण) आणि तिसरी मंगल मैत्री (विश्वातल्या सर्व प्राण्यांप्रति मंगल भाव करणे) शिकवले जाते.


  • आनापानसती विपश्यनाचा प्रारंभीक भाग आहे. ही एक प्राथमिक क्रिया आहे. म्हणून या शिबिरात सुरुवातीला आनापानसती शिकवून मनाच्या एकाग्रतेचा अभ्यास आणि सराव केल्या जाते. हा अभ्यास विपश्यना साधनेची पूर्वतयारीच असते. आन म्हणजे अश्वास, अपान म्हणजे प्रश्वास व सती म्हणजे सजगता. म्हणजेच येणार्‍या व जाणार्‍या श्वासावर लक्ष ठेवणे. म्हणजेच या अभ्यासात शरीरात नाकावाटे सहज आणि स्वाभविक येणारा तसेच बाहेर पडणारा श्वासावर लक्ष केंद्रित केल्या जाते. आपले मन जागृत ठेवले जाते.

विपश्यनाला पाली भाषेत विपस्सना म्हटले जाते. त्यात वि आणि पस्सना असे दोन शब्द आहेत. वि म्हणजे विशेष रुपाने आणि पस्सना म्हणजे जाणणे, पाहणे किवा अनुभूती घेणे. म्हणजेच जग जसे आहे तसे पाहणे. जगाची वास्तवता समजून घेणे. सर्व बाबींना त्यांच्या मुळ गुण-धर्म-स्वभावात पाहाणे (सत्यदर्शन) म्हणजे विपश्यना. या विधीत आपल्या स्वत:च्या शरीरात उत्पन्न होणार्‍या सर्वसामान्य, नैसर्गिक संवेदनाचे पद्धतशीर व नि:पक्षपातीपणे निरीक्षण केल्या जाते. कारण संवेदनाच्या आधारेच आपल्याला प्रत्यक्ष सत्याची अनुभूती होते. विपश्यना करतांना शरीर आणि मनाचे संपूर्ण सत्य अनुभवाच्या पातळीवर समजून घेतल्या जाते. विपश्यनामुळे मनाच्या खोल गाभ्यात बदलांची प्रक्रिया सुरु होते. कोणत्याही समस्येचे मूळ आपल्या मनात असल्याने तिच्याशी मानसिक स्तरावरच सामना केला पाहिजे. म्हणून विपश्यनेच्या माध्यमातून मनावर संस्कार करण्याचा अभ्यास विपश्यना शिबिरात शिकविले जातात. हा अभ्यास अत्यंत गांभिर्याने, नैसर्गिक वातावरणात आचार्याच्या मार्गदर्शनात भारतात आणि परदेशात वैज्ञानीक पद्धतीने शिकविल्या जाते.

मन हे सतत भरकटत असते. चवताळलेला हत्ती काहीही नुकसान करू शकतो, पण त्याला जर काबूत ठेवले तर तो चांगल्या कामात उपयोगी पडू शकतो. तसेच मनाचे आहे. मनाला काबूत ठेवण्यासाठी विपश्यना हे एक चांगले साधन आहे. आपले चित्त, मन एखाद्या गोष्टीवर अथवा कार्यावर एकाग्र करणे, त्या कार्याप्रती पूर्णपणे जागृत राहणे व ते कार्य सर्वशक्तीनिशी पार पाडणे हे *आनापानसतीचा, विपश्यनाचा आणि मंगल मैत्री* चा अभ्यास करणारे चांगल्या रीतीने करू शकतात.

ह्या अभ्यासाने आपले जीवन किती अनित्य आहे, क्षणभंगुर आहे. या गोष्टीची अनुभूती च्या स्तरावर जाणीव होत असते. म्हणून या ध्यानात एकाग्रता, जागरूकता व प्रज्ञा या गोष्टींचा लाभ होतो.

सत्याच्या अनुभूतीचा एकमेव मार्ग म्हणजे स्वत :च्या अंतर्मनाचे आपण स्वत:च केलेले निरीक्षण होय. म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलेला हा मार्ग आत्मनिरीक्षणाचा, स्वत:ला शास्त्रीय पद्धतीने तपासण्याचा मार्ग आहे. त्यामुळे आपल्या स्वत:च्या स्वभावाचे ज्ञान करून आपल्यामधील दोष, विकार नष्ट करता येतात. अंतर्मनातील अंधकार दूर करता येते. निसर्गाचे नियम अनुभवातून समजून घेता येते.

विपश्यना या विषयावरची पुस्तके[संपादन]

  • बुद्धाची विपश्यना (लेखक - लक्ष्मण गायकवाड)
  • विपश्यना : काय सत्य काय असत्य? (लेखक- एस.डी. पवार) :- ‘विपश्‍यना - काय सत्य, काय असत्य?’ या पुस्तकात विपश्‍यनेच्या मर्यादा लेखक एस. डी. भवार यांनी स्पष्ट केल्या आहेत. विपश्‍यना हा बुद्ध धम्माचा भाग असल्याचं अनेक जण सांगतात. मात्र, हा दावा विविध उदाहरणे देत भवार खोडून काढतात. सत्यनारायण गोयंका विपश्‍यनेबद्दल काय सांगतात, ते सांगून, भवार यांनी त्यांच्याही मताचा प्रतिवाद केला आहे.
  • विपश्यना म्हणजे काय,गैरसमज व शंकांचे निरसन (लेखक : अनिल वैद्य,माजी न्यायाधीश)

ह्या पुस्तकात विपश्यनेविषयी पसरलेले गैरसमज लेखकाने खोडले आहे.