Jump to content

धम्मचक्र प्रवर्तन दिन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
धम्मचक्र प्रवर्तन दिन
दीक्षाभूमी, नागपूर येथील धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा
अधिकृत नाव धम्मचक्र प्रवर्तन दिन
इतर नावे धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन
साजरा करणारे बौद्ध
प्रकार धार्मिक
उत्सव साजरा १ दिवस
सुरुवात अशोक विजयादशमी
दिनांक १४ ऑक्टोबर किंवा अशोक विजयादशमी रोजी
वारंवारता वार्षिक

धम्मचक्र प्रवर्तन दिन किंवा धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन हा भारतात साजरा केला जाणारा एक प्रमुख बौद्ध सण आहे. बौद्ध धर्मीयांद्वारे हा उत्सव दरवर्षी अशोक विजयादशमी आणि/किंवा १४ ऑक्टोबर रोजी दीक्षाभूमी, नागपूर येथे तसेच स्थानिक बौद्ध स्थळांवर साजरा केला जातो. महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागातील लक्षावधी बौद्ध अनुयायी धम्मचक्र प्रवर्तनदिनी नागपूरला येतात. ह्या उत्सवाची पार्श्वभूमी एक बौद्ध धर्मांतरण सोहळा आहे, अशोक विजयादशमीला १४ ऑक्टोबर १९५६ रोजी दीक्षाभूमी, नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांसोबत नवयान बौद्ध धर्मात प्रवेश केला आहे. भारतभूमीत जवळपास लुप्त झालेल्या बौद्ध धम्माचे चक्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी गतिमान करत "धम्मचक्र प्रवर्तन" केले; तेव्हापासून हा दिवस "धम्मचक्र प्रवर्तन दिन" म्हणून साजरा केला जातो. तथापि, या सणाला "धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन" असेही म्हणले जाते.[]

पार्श्वभूमी

[संपादन]

इ.स.पू. तिसऱ्या शतकात ज्या दिवशी सम्राट अशोकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती, तो दिवस बौद्ध इतिहासात "अशोक विजयादशमी" म्हणून साजरा केला जातो. अशोकाने केलेली ही मोठी धम्मक्रांती होती आणि त्यामुळे आंबेडकरांनी अशोक विजयादशमीच्या दिवशी धर्मांतर सोहळा करण्याचे ठरवले व १४ ऑक्टोबर इ.स. १९५६ रोजी नागपूरमध्ये आपल्या ५,००,००० अनुयायांसोबत बौद्ध धर्म स्वीकारला. ती धम्मभूमी सध्या दीक्षाभूमी नावाने ओळखली जाते.[] आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारून भारतातून लुप्त झालेल्या बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन केले.[][]

विविध ठिकाणी साजरीकरण

[संपादन]

दीक्षाभूमी, नागपूर

[संपादन]
दीक्षाभूमी नागपूर येथे ६३वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करताना बौद्ध नागरिक, ८ ऑक्टोबर २०१९

ऐतिहासिक पार्श्वभूमी असल्यामुळे धम्मचक्र प्रवर्तन दिन दीक्षाभूमी नागपूर येथे व्यापक प्रमाणात साजरा केला जातो, ज्यात देशभरातून आलेले लक्षावधी बौद्ध अनुयायी सहभागी होतात. तसेच राज्यातील व देशातील विविध राजकीय सुद्धा या सोहळ्याला येत असतात. विदेशांतील बौद्ध भिक्खू, उपासक व अन्य राजकीय व्यक्ती सुद्धा उत्सवात सहभागी होतात. २ ऑक्टोबर २००६ रोजी धम्मदीक्षेच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्याला देश-विदेशांतील १० लाखांपेक्षा अधिक अनुयायांची उपस्थिती होती. सन १९५७ पासून धम्मचक्र प्रवर्तनाच्या प्रत्येक वर्धापन दिनाला दोन दिवस आधीच बौद्ध अनुयायी दीक्षाभूमीला येत असतात. तथापि, महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्याची केंद्र निर्माण झालेली आहेत. दीक्षाभूमीत आलेले आंबेडकर अनुयायी नागपूर जिल्ह्यात बुद्धिस्ट सर्किटला सुद्धा भेटी देतात, ज्यात कामठीचे ड्रॅगन पॅलेस, बुद्धभूमी, नागलोक, चिचोलीचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती साहित्य संग्रहालय आदी विविध ठिकाणे समाविष्ट होतात.[][] धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने दीक्षाभूमीवर दरवर्षी हजारो लोक धर्मांतर करून बौद्ध बनतात.[][] सन २०१८ मध्ये ६२व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनी सुमारे ६२,००० तर सन २०१९ मध्ये ६३व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनी ६७,५४३ अनुयायांनी दीक्षाभूमी येथे बौद्ध धर्म स्वीकारला होता.[]

चंद्रपूर येथील दीक्षाभूमी हे सुद्धा एक ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले ठिकाण आहे. नागपूर येथे धर्मांतर केलेल्या १६ ऑक्टोबर १९५६ रोजी त्यांनी चंद्रपूर येथेही धर्मांतर सोहळा घडवून आणला, ज्यात सुमारे २ ते ३ लक्ष लोकांनी बौद्ध धम्म स्वीकारला होता. त्यामुळे दरवर्षी येथेही धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो, ज्यात देशभरातून आलेले लक्षावधी बौद्ध लोक सहभागी होतात.[]

औरंगाबाद

[संपादन]
औरंगाबाद लेणी परिसरात ६२व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करत असलेले बौद्ध उपासक-उपासिका, १८ ऑक्टोबर २०१८

औरंगाबाद शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा जवळ असलेल्या औरंगाबाद लेणी परिसरात धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा केला जातो. येथे शहरासह औरंगाबाद जिल्ह्यातील बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येने येत असतात. धम्म ध्वजारोहण, अन्नदान, रक्तदान, समुपदेशन, पुस्तक प्रदर्शन यासारखे विविध उपक्रम राबवले जातात. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बौद्ध लेणी परिसरात विविध कार्यक्रम सुद्धा घेण्यात येतात. सकाळी धम्म ध्वजारोहण कार्यक्रम होतो, त्यानंतर भिक्खुंच्या उपस्थितीत महापरित्राण पाठ आणि दुपारी भोजनदान करण्यात येते. देश-विदेशातील भिक्खू संघ धम्म प्रवचन देतात, २२ प्रतिज्ञांचे पठण घेतात. तसेच इच्छुक उपासकांना बौद्ध धम्माची दीक्षा देण्यात येते. शहरातील लोकप्रतिनिधी व अधिकारी अभिवादन कार्यक्रमाला उपस्थिती राहतात. बुद्धभीम गीतांचे कार्यक्रम सादर होतात. रक्तदान शिबिर राबवण्यात येतात. दिवसभरात लाखो धम्म उपासक-उपासिकांची अभिवादनासाठी गर्दी होते. 'डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो', नमो बुद्धाय, आणि 'जय भीम'चा जयघोष केला जातो. धम्मचक्र प्रवर्तनदिनानिमित्त विद्यापीठ आणि बौद्ध लेणी परिसरात पुस्तकांचे अनेक स्टॉल थाटण्यात येतात.[१०][११][१२]

अकोला

[संपादन]

सन १९८७ पासून अकोला जिल्ह्यात धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा सार्वजनिक पातळीवर सुरू आहे. या सोहळ्याचे नेतृत्व दरवर्षी प्रकाश आंबेडकर हे करत असतात. या दिवशी विशाल मिरवणूक, आखाडे, लेझीम पथके, आकर्षक देखावे, विविध झाक्या, हजारों बौद्धांचा सहभाग, भारतीय बौद्ध महासभेचे शिस्तबद्ध आयोजन, आणि जाहीर सभा असा दरवर्षीचा शिरस्ता असतो. अकोला क्रिकेट क्लब मैदानावर ९ ऑक्टोबर २०१९ रोजी ६३वा धम्म मेळावा आयोजित केला गेला होता.[१३]

नागपूरच्या धम्म सोहळ्याचा कार्यक्रम होऊन अनेक अनुयायी बुलढाणा, वाशीममराठवाडा भागात परत जाताना अकोला रेल्वे स्टेशनवर मुक्कामी असत, कारण त्याकाळी फार दळणवळणाची साधने नव्हती. या अनुयायांना राहण्याची सोय होईल या प्राथमिक उद्देशाने सन १९८६ साली पहिला धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम अशोक वाटिके समोरील मैदान पोस्ट ऑफीस मागे संपन्न झाला. नागपूर नंतर संपूर्ण महाराष्ट्रात साजरा होणारा हा भव्य सोहळा ठरला आहे. वसंत देसाई स्टेडीयम वर अनेक वर्षे हा कार्यक्रम झाला, मात्र आता मागील १० वर्षापेक्षा अधिक कालावधीपासून अकोला क्रिकेट क्लब मैदानावर हा सोहळा संपन्न होत आहे.[१३]

सोलापूर.

सन १९७५ पासून अशोक विजया दशमी, दसऱ्याच्या दिवशी सोलापूर शहरात मोठ्या उत्साहात धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा केला जातो. डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथून डॉ बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान बुद्ध यांच्या भव्य प्रतीमेसह मिरवणुका निघतात. साधारण १०० ते १५० सार्वजनिक मंडळे यात सहभागी होऊन लेझिम पथक, व मर्दानी खेळ साजरा करून मिरवणुकीची शोभा वाढवतात. सोलापूरच्या या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्यास सोलापूर शहर जिल्ह्यासह  महाराष्ट्रातील बरेच 

बौद्ध अनुयायी सहभागी होतात.

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Dr. Ambedkar documentary with Dr. Narendra jadhav seg9" – YouTube द्वारे.
  2. ^ "Dalits throng Nagpur on Dhammachakra Pravartan Din". The Hindu (इंग्रजी भाषेत). 2014-10-04. ISSN 0971-751X. 2018-05-09 रोजी पाहिले.
  3. ^ "Dhamma Chakra Pravartan Day Archives – Countercurrents". Countercurrents (इंग्रजी भाषेत). 2018-05-09 रोजी पाहिले.
  4. ^ "Devendra Fadnavis, Nitin Gadkari To Attend 60th Dhamma Chakra Day On October 11". एनडीटीव्ही (इंग्रजी भाषेत). 2018-05-09 रोजी पाहिले.
  5. ^ a b "दीक्षा घेणाऱ्यांची संख्या हजारोंनी वाढली; दीक्षाभूमीवरील गर्दी मात्र बरीच रोडावली". दिव्य मराठी.
  6. ^ "Devendra Fadnavis, Nitin Gadkari To Attend 60th Dhamma Chakra Day On October 11". एनडीटीव्ही (इंग्रजी भाषेत).
  7. ^ Hi (7 अक्तू॰ 2019). "55 हजार अनुयायियों ने ली बौद्ध धर्म की दीक्षा,दीक्षाभूमि पर जुटे बौद्ध अनुयायी". दैनिक भास्कर हिंदी. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  8. ^ Hi (18 ऑक्टो, 2018). "धम्म दीक्षा के लिए नागपुर के साथ दिल्ली-मुंबई और औरंगाबाद भी थे लिस्ट में". दैनिक भास्कर हिंदी. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  9. ^ "डॉ. आंबेडकरांनी बौद्ध धम्माचे पुनरुज्जीवन केले". लोकमत. 10 ऑक्टो, 2019. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  10. ^ "...मने शुद्ध जेथे, वसे बुद्ध तेथे!". महाराष्ट्र टाइम्स. 1 ऑक्टो, 2017. 2019-10-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-11-09 रोजी पाहिले. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  11. ^ "दहा देशांतील बौद्ध भिक्खू येणार". लोकमत. 25 सप्टें, 2017. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  12. ^ "Dhammachakra Pravartan Day | 63व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाची जय्यत तयारी | नागपूर". एबीपी माझा. 7 ऑक्टो, 2019. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  13. ^ a b "अकोला जिल्ह्यातील धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्याचा इतिहास". लोकमत. 9 ऑक्टो, 2019. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)

बाह्य दुवे

[संपादन]