Jump to content

दौलताबाद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दौलताबाद

दौलताबाद किल्ला
दौलताबादचे ठिकाण दाखविणारा नकाशा
दौलताबादचे ठिकाण दाखविणारा नकाशा
दौलताबाद
नाव दौलताबाद
उंची २९७५ फूट
प्रकार
चढाईची श्रेणी
ठिकाण छत्रपती संभाजीनगर जिल्हा, महाराष्ट्र
जवळचे गाव दौलताबाद
डोंगररांग छत्रपती संभाजीनगर
सध्याची अवस्था व्यवस्थित
स्थापना


दौलताबाद हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील छ्त्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक गाव असून येथे देवगिरीचे यादव यांचा ऐतिहासिक किल्ला आहे.

इतिहास

[संपादन]

१२वे शतक

[संपादन]

बदामीचे चालुक्य, कल्याणीचे चालुक्य, मौर्य, शुंग, सातवाहन, हल (हाला), शक क्षत्रप, सातकर्णी, वाकाटक, नल, विंध्यसेना, प्रवरसेना, राष्ट्रकूट यांच्यानंतर बाराव्या शतकाच्या शेवटच्या २५ वर्षात देवगिरीच्या यादवांचा उदय खान्देश परिसरात झाला. पहिल्या सेऊनचंद्राच्या सेऊनदेशात (आताचा खान्देशात) नाशिक ते देवगिरीचाही समावेश होता. कृष्णा नदीच्या उत्तरेकडे वर्चस्व प्रस्थापित करणाऱ्या या यादव वंशातील पाचवा भिल्लमा या राजपुत्राने देवगिरी शहराची स्थापना करून पुढे तेथून राज्य चालवले.

पुढे सिंघण्णा व त्यानंतर त्याचा नातू कृष्ण यांनी राज्य वाढवले. या कृष्णाचा भाऊ महादेव याची अचूक (जन्म?)तारीख २९ ऑगस्ट १२६१ अशी असल्याचे निश्चित झाले आहे. त्याने उत्तर कोकणाचा प्रदेश आपल्या राज्यास जोडण्यात यश प्राप्त केले आणि गादी आपला मुलगा आमण्णाकडे सोपविली. पण कृष्णाचा मुलगा रामचंद्राने बंड करून गादी स्वतःकडे घेतली आणि विदर्भ आणि इतरत्रही विजय प्राप्त केले. मात्र, १२९६ मध्ये झालेल्या अल्लाउद्दीन खिलजीच्या आकस्मिक हल्ल्यास रामचंद्र तोंड देऊ शकला नाही .

इ.स. १३२७ ते इ.स. १३९७

[संपादन]

इ.स. १३२७ मध्ये अल्लाउद्दीन खिलजी या उत्तरेतील सुल्तानाने दख्खन प्रांतात क्रूर आक्रमण करून हिंदूंना लक्ष्य केले. देवगिरीच्या यदवांनी मोठा कठिण लढा दिला. अनेक लढाया यादव जिंकले. यादवांच्या लढाऊ बाण्यामुळे अल्लाउद्दीन खिलजीला ही मोहीम सोडून द्यावी लागली. तरीही किल्ला सोडला आणि क्रूर मुस्लिम आक्रमकांनी महाराष्ट्राची संपत्ती लुटली. सेनापती मलीक कफूर याने अल्ला‍उद्दीनचे काम पुढे चालू ठेवले आणि इ.स. १३१० मध्ये यादवांची सत्ता लयाला गेली.

इ.स.१३१० ते इ.स.१३४७

[संपादन]

अल्ला‍उद्दीनचे अनुकरण मुहम्मद बिन तुघलक (इ.स. १३२४-१३५०) या दिल्लीच्या सुलतानाने करून आपली सत्ता वाढविण्यासाठी दक्षिणेतील मदुरेपर्यंत आक्रमणे केली. १३२६ मध्ये मुहम्मद बिन तुघलक या दिल्लीच्या सुलतानाने आपली राजधानी देवगिरीवर आणली व देवगिरीचे नाव दौलताबाद केले. दिल्लीहून आपली राजधानी दौलताबादेस आणण्याचा त्याचा प्रयत्न असफल झाला. ही राजधानी परत दिल्लीला न्यावी लागली. राजधानीचे शहर म्हणून देवगिरीला एक वेगळी ओळख देण्याचा प्रयत्न मोहम्मद तुघलकाच्या काळामध्ये झाला. मुहम्मद बिन तुघलक परत गेल्यावर किल्ल्याचे नाव पूर्ववतपणे देवगिरी झाले. देवगिरी किल्ल्यावर पंचधातूंनी बनवलेला एक तोफ आहे. तोफ किल्ल्यावर बनवली आहे. त्या तोफेमध्ये एक शहर उद्ध्वस्त करण्याची शक्ती आहे. या तोफेवरील कोरलेली माहिती ही पर्शियन भाषेत व लिपीत आहे.

इ.स. १३४७ ते इ.स.१५००

[संपादन]

तुघलकांची सत्ता क्षीण झाल्यावर अल्ला‍उद्दीन हसन बहामनी याच्या अधिपत्याखाली दक्षिणेत इ.स. १३४७ साली बहामनी घराण्याची स्थापना झाली. ते राज्य सुमारे १५० वर्षे टिकले. देवगिरी अथवा दौलताबाद ही बहामनींची काही काळ राजधानी होती. सोळाव्या शतकात बहामनी राज्याचे गोवळकोंड्याची कुतुबशाही, अहमदनगरची निजामशाही, वऱ्हाडची/विदर्भाची/एलिचपूरची इमादशाही, विजापूरची आदिलशाही आणि बिदरची बरीदशाही अशा पाच स्वतंत्र राज्यांत विभाजन झाले. आपली सत्ता टिकविण्याकरिता या दख्खनी सुलतानांना प्रशासनासाठी स्थानिक मराठी लोकांचे मोठ्या प्रमाणावर साहाय्य घ्यावे लागले. सनदी सेवा, लष्करी चाकरी आणि राजनैतिक व्यवहार यासाठी प्रामुख्याने त्यांना मराठी माणसांचीच नेमणूक करावी लागली. सतराव्या शतकाच्या अंतापर्यंत या पाचही शाह्या मोगल साम्राज्यांत विलीन झाल्या. १७ व्या शतकाचा अखेरीस औरंगजेबाने येथे वास्तव्य केले होते.

राष्ट्रीय संरक्षित स्मारक

[संपादन]

देवगिरी किल्ल्याला २८ नोव्हेंबर, इ.स. १९५१ रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले.[]

महाराष्ट्राचे आश्चर्य

[संपादन]

महाराष्ट्राच्या ७ आश्चर्यांपैकी देवगिरीचा किल्ला हे एक आश्चर्य ठरले आहे. महाराष्ट्रातील अद्भुत आणि देखण्या सात आश्चर्यांची जून २०१३ मध्ये घोषणा करण्यात आली. शांती-सद्भावनेचे प्रतीक ग्लोबल पॅगोडा, मुंबईच्या मध्य रेल्वेचं मुख्यालय सीएसटी स्टेशन, मध्ययुगीन काळातील एक अभेद्य किल्ला देवगिरीचा किल्ला, पश्चिम घाटातील कास पठार, स्वराज्याची पहिली राजधानी राजगड किल्ला, बुलडाण्यातील लोणार सरोवर, छत्रपती संभाजीनगर मधील अजिंठा लेणी ही महाराष्ट्राची सात आश्चर्ये आहेत. जगभरातून मिळालेल्या २२ लाख मतांच्या आधारावर महाराष्ट्रातील सात आश्चर्य निवडली गेली आहेत. हा पर्यटनासाठी अतिशय प्रसिद्ध किल्ला आहे. जागतिक स्तरावर जशी सात आश्चर्ये निवडली गेली, त्याच धर्तीवर ‘एबीपी माझा’ ने महाराष्ट्रातूनही सेव्हन वंडर्स ऑफ महाराष्ट्रा कार्यक्रमाच्या माध्यमातून सात आश्चर्य निवडली. डॉ. जगदीश पाटील, डॉ. अरुण टीकेकर, राजीव खांडेकर, श्री. अरविंद जामखेडकर, डॉ. निशीगंधा वाड, श्री. विकास दिलावरी, श्री. व्ही. रंगनाथन या सात ज्युरीने निवडलेल्या १४ आश्चर्यांपैकी सात वंडर्सची निवड करण्यात आली.[]

विशेष म्हणजे त्या गडावरील मेंढातोफ आहे. ती तोफ अतिशय अद्भुत आहे, त्या तोफेचे खासियत म्हणजे तो तोफ एक माऱ्यात एखादा गड किंवा किल्ला उद्ध्वस्त करण्याची क्षमता त्या मध्ये आहे. ती तोफ पंच धात़ूंनी निर्माण केली आहे.

छायाचित्रे

[संपादन]

वर्णन आणि इतिहास

[संपादन]

महाराष्ट्रात जगप्रसिद्ध अजिंठा-वेरूळ लेण्यांव्यतिरिक्त अभिमान बाळगावा अशा अनेक वास्तू आहेत.यादवांची राजधानी असलेला देवगिरीचा दुर्ग म्हणजेच दौलताबादचा किल्ला हा त्यापैकीच एक आहे. रामदेवराय यादवांपासून निझामशाहीपर्यंत अनेक राजांचे कर्तृत्त्व पाहिलेला हा किल्ला छत्रपती संभाजीनगरची शान आहे. छत्रपती संभाजीनगर पासून सुमारे १५ किलोमीटरवर असलेल्या या किल्ल्याचे मूळ नाव देवगिरी असे आहे. देवगिरी हा किल्ला एका 200 मीटर उंच दगडाच्या टेकडीवर वसलेला आहे. देवगिरी या नावामागेही एक दंतकथा आहे.

एकदा शंकर-पार्वती सारिपाट खेळत होते. त्यात शंकर पराभूत झाले आणि रागारागाने वेरूळच्या अरण्यात निघून गेले. पार्वती भिल्लिणीच्या वेशात म्हैसमाळच्या डोंगरात राहू लागली. या भिल्लिणीवर शंकर अनुरक्त झाले आणि त्यांनी देवांना वेरूळ परिसरात येण्यास मनाई केली आणि जवळच असलेल्या ज्या डोंगरावर देव राहू लागले तो देवगिरीचा डोंगर होय. या डोंगरावर बांधलेला किल्ला म्हणून यास देवगिरीचा किल्ला म्हणतात.

राष्ट्रकूट राज्यातील श्रीवल्लभ याने इ.स. ७५६ ते ७७२ या काळात हा किल्ला उभारला. भारताच्या इतर कोणत्याही राज्यात दिसणार नाही असा हा किल्ला दक्षिणेच्या प्रवेशद्वारीच उभा असल्यामुळे दक्षिणेच्या इतिहासात त्याला फार महत्त्व होते. किल्ल्याचा डोंगर ६०० फूट उंचीचा असून त्याच्या भोवती ५० फूट रुंदीचा खोल पाण्याने भरलेला खंदक आहे. खंदकाच्या तळापासून १५० ते २०० फूट उंचीचा कडा इतका तासून काढलेला आहे की सापालाही वर चढून जाता येणे शक्य नाही.

महाद्वारातून प्रवेश केल्याबरोबर उजव्या बाजूस ‘चांदमिनार’ नावाचा मनोरा दिसतो. २१ व्या शतकात मुस्लिम राज्यकर्त्यांनी उभारलेल्या या मनोऱ्याची उंची २१० फूट असून बुंध्याचा परीघ ७० फूट आहे. याला एकूण चार मजले आहेत. याच भागात ‘किल्ले शिकन’ नावाची एक तोफ ठेवलेली आहे. ही तोफ पंचधातूंची आहे. या तोफेला ‘मेंढा तोफ’ असेही म्हणतात. जवळच एक १८० स्तंभाचे हेमाडपंती मंदिर आहे. १९५० मध्ये लोकांनी स्वयंस्फूर्तीने येथे भारतमातेची मूर्ती स्थापन केली. या मंदिरासमोरच हत्ती हौद नावाचा १५० फूट लांब, १०० फूट रुंद आणि २३ फूट खोल असा विस्तीर्ण जलाशय आहे.

राजा रामदेव धान्य व दारूगोळा ठेवत असलेला काळाकोट पाहण्यासारखा आहे. याच धान्य गोदामामध्ये फितुरी झाली होती. तेथे धान्याऐवजी मिठाची पोती रचली गेली आणि भुकेल्यापोटी मराठी फौजेचा पराभव झाला. तसेच अल्लाउद्दीन खिलजीने दक्षिणेतील पहिले पाऊल देवगिरी किल्ल्यावरच टाकले. यादव साम्राज्याची राजधानी असलेला हा किल्ला इ.स. १३१८ मध्ये हरपाळदेवाला ठार मारून अल्लाउद्दीन खिलजीने ताब्यात घेतला. या किल्ल्याने खिलजी, तुघलक, बहामनी, मुगल, निझाम, मराठा या घराण्यांचे स्वामित्त्व स्वीकारले होते. महंमद तुघलकाने तर इ.स. १३२७ मध्ये आपली राजधानी दिल्लीहून देवगिरीला आणली. त्यानंतर देवगिरीला दौलताबाद हे नाव दिले. १९५० मध्ये निझामाचे राज्य खालसा केल्यानंतर देवगिरीला स्वातंत्र्याचा प्रकाश लाभला. शिवलिंगाच्या आकाराचा हा गड म्हणजे स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. १५०० वर्णांच्या सुखद व दुःखद घटनांनी न्हालेला, शेकडो पिढय़ांच्या हृदयांचे स्पंदन अनुभवलेला देवगिरीचा हा दुर्ग आपल्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरेचा साक्षीदार आहे. अनंत प्रगट-अप्रगट तत्थ्यांचा संग्रह आपल्या उराशी बाळगून असलेला हा दुर्ग देशाची अनमोल संपत्ती आहे. त्याचे संरक्षण करण्याची जबाबदारी आपली आहे, हे विसरून चालणार नाही.

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "नोटिफिकेशन ऑफ सेंट्रली प्रोटेक्टेड मॉन्युमेन्ट्स इन इंडिया" (PDF) (इंग्रजी भाषेत). 2016-03-04 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. २२ जुलै, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ "महाराष्ट्रातील सात वंडर्सची घोषणा". एबीपी माझा. 2018-01-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-03-24 रोजी पाहिले.