वाकाटक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

वाकाटक हे प्राचीन भारतातील एक बलाढ्य आणि समृद्ध साम्राज्य होते. वाकाटक हे विष्णू वृद्धी गोत्राचे ब्राह्मण होते. इ.स. २५० ते सुमारे ५०० या काळात त्यांनी विदर्भ आणि त्या लगतच्या परिसरावर राज्य केले[१]. या काळात त्यांची सत्ता साधारणपणे, दक्षिणोत्तर नर्मदानदीपासून तुंगभद्रानदीपर्यंत आणि पूर्व-पश्चिम, अरबी समुद्रापासून बंगालच्या उपसागरापर्यंत होती. या राजवंशच्या कार्यकाळात त्यांतील राजांनी संस्कृत आणि प्राकृत कवींना उदार आश्रय दिलेला दिसतो. होणाऱ्या वाङ्मयनिर्मितीत वैदर्भी आणि वच्छोमी पद्धतींना प्राध्यान्य दिलेले आढळते. या राजांच्या मांडलिकांनी आणि अमात्यांनी शिल्पकलेच्या निर्मितीलाही उत्तेजन दिल्याचे आढळते. याची साक्ष अजिंठा व गुलवाडा येथील टेकड्यांवरील लेणी देतात[२]. या लेणांतील शिल्पांची गणना प्राचीनकाळातील उत्कृष्ट कलाकृतींमध्ये केली जाते. त्यामुळेच, ′इसवीसनाच्या तिसऱ्या शतकापासून सहाव्या शतकापर्यंत दक्षिणेत जे राजवंश झाले त्यांमध्ये वाकाटक राजवंश हा श्रेष्ठ असून त्याच्या कामगिरीने अखिल दक्षिण भारताच्या संस्कृतीवर फार मोठा परिणाम झाला आहे.’ असे एका फ्रेंच इतिहासकाराचे उद्गार आहेत [३].

वाकाटक राजवंशाविषयीच्या संशोधनाची सुरुवात[संपादन]

सदर राजवंशाचे नावही एकोणीसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत कोणास ज्ञात नव्हते. इ.स.१८३६ मध्ये सापडलेल्या द्वितीय प्रवरसेनाच्या सिवनी ताम्रपटाने ते पहिल्यांदा उजेडात झाले. पुराणात या राजवंशातील विंध्यशक्ती या राजाचे नाव आढऴते. मात्र अशुद्ध पाठ आणि त्यांचा चुकीचा अन्वयार्थ यामुळे तो यवन वा ग्रीक वंशांतील होता असे समजले जात असे, अशी माहिती महामहोपाध्याय वा.वि. मिराशी आपल्या वाकाटक नृपतीवरच्या ग्रंथात नोंदवितात. वाकाटक घराण्याची वंशावळ अजंठा लेणींतील सोळाव्या क्रमांकाच्या लेणींत असणाऱ्या कोरीव लेखात दिलेली आढळते. ही वंशावळ अगदी सुरवातीपासून म्हणजे विंध्यशक्तीपासून शेवटच्या हरिषेणापर्यंत दिलेली आहे. मात्र सदर कोरीव लेखाच्या वाचनानतंरही इ.स. १८६२ मध्ये डॉ. भाऊ दाजी लाड यांनी लिहिलेल्या लेखात वाकाटक हे यवन वा ग्रीक वंशांतील असून त्यांनी वैदिक यज्ञांना आणि बौद्ध धर्माला उत्तेजन दिले असे म्हटले आहे[४]. वाकाटकांचे अधिकांश लेख हे पेटिकाशीर्षक लिपीत असल्याचे दिसून येते. त्यांच्या साऱ्याच लेखातील काळाचे उल्लेख संबंधित राज्यांच्या राज्यारंभानुसार दिलेले असल्याने त्याच्या काळाविषयी निश्चित विधान करणे अवघड होते. अशावेळी काळनिश्चितीसाठी अक्षरवाटिकेचा अभ्यास करण्याची रीत असते. त्यानुसार डॉ. बुव्हर यांच्या मते इ. स. पाचवे शतक हा वाकाटकांचा काळ येतो, तर डॉ. फ्लिट आणि डॉ. कीलहॉर्न यांच्या मते तो आठवे शतक असा आहे. इ. स. १९१२ साली पुण्यातील एका तांबटाच्या घरी वाकाटक राणी प्रभावती गुप्ते यांचा ताम्रपट सापडला.

राजवंशाची स्थापना[संपादन]

अजिंठ्याच्या कोरीव लेखात वाकाटकांचा उल्लेख 'द्विज' असा आलेला आढळतो तसेच त्याचे गोत्र 'विष्णुवृद्ध' असल्याचा उल्लेख पुढे उजेडात आलेल्या ताम्रपटातून आढळतो, अशी नोंदही महामोहोपाध्याय वा.वि. मिराशी यांनीआपल्या वाकाटकांवरील ग्रंथात करतात.

वाकाटकांच्या शाखा[संपादन]

शाखा[संपादन]

प्रमुख राजे[संपादन]

साम्राज्याचा ऱ्हास[संपादन]

वाकाटकांवरील लेखन[संपादन]

भारतीय-उत्कीर्ण-लेखसंग्रह[संपादन]

भारतीय-उत्कीर्ण-लेखसंग्रह ( कॉर्पस इन्स्क्रिप्शनम् इंडिकॅरम) या नावाची प्राचीन भारतीय कोरीव लेखांविषयीची एक योजना स्वांतत्र्यपूर्व भारतातील पुराभिलेख विभागाने सुरू केली होती. ह्या योजनेअंतर्गत भारतीय उपखंडात सापडणाऱ्या उत्कीर्ण लेखांचे त्या त्या राजवंशांनुसार एकत्रीकरण करून त्या उत्कीर्ण लेखांचा ठसा, त्यांचे लिप्यंतर आणि इंग्रजी अनुवाद अशा आकृतीबंधात प्रसिद्ध करायचे होते. त्यानुसार भारतातील विविध पुराभिलेख विद्वानांकडे राजवंशानुसार त्याचे दायित्व देण्यात आले. यातील वाकाटक राजवंशाच्या कोरीव लेखांचे काम महामहोपाध्याय वा.वि. मिराशी यांनी आपल्याकडे घेतले. ह्या प्रकल्पाद्वारे प्रकाशित होणारे साहित्य इंग्रजी भाषेतून असणार होते. महामहोपाध्याय वा. वि. मिराशी यांनी मोठ्या परिश्रमपूर्वक हे काम पूर्ण केले. भारतीय पुरातत्त्व खात्याच्या संकेतस्थळावरील प्रकाशनांच्या यादीनुसार हा ग्रंथ इ. स. १९६३ साली प्रकाशित झाला. या ग्रंथाचे नाव ‘इन्क्रिप्शन्स ऑफ वाकाटकाज’असे आहे[५]. हे काम पूर्ण झाल्यावर महामहोपाध्याय वा.वि. मिराशी यांनी आपला झालेला हा अभ्यास, ५ ते ९ मार्च १९५६ या काळात नागपूर विद्यापीठातर्फे आयोजित झालेल्या महादेव हरि वाठोडेकर व्याख्यानमालेत चार पुष्पांच्या रूपांत मांडला. पुढे ही व्याख्याने नागपूर विश्वविद्यालयाच्या रजिस्टारने पुस्तकरूपात प्रसिद्ध केली. त्या पुस्तकाचे नाव ‘वाकाटक नृपति आणि त्यांचा काळ’ असे आहे[६].

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ मिराशी, वा. वि. "वाकाटक नृपति आणि त्यांचा काळ": १. Cite journal requires |journal= (सहाय्य)
  2. ^ मिराशी, वा. वि. "वाकाटक नृपति आणि त्यांचा काळ": १. Cite journal requires |journal= (सहाय्य)
  3. ^ मिराशी, वा. वि. "वाकाटक नृपति आणि त्यांचा काळ": २. Cite journal requires |journal= (सहाय्य)
  4. ^ मिराशी, वा. वि. "वाकाटक नृपति आणि त्यांचा काळ": २. Cite journal requires |journal= (सहाय्य)
  5. ^ "प्राईज लिस्ट ऑफ पब्लिकेशन्स". आर्किऑलाॅजिकल सर्व्हे ऑफ इंडिया.
  6. ^ मिराशी, वा. वि. "वाकाटक नृपति आणि त्यांचा काळ": ३. Cite journal requires |journal= (सहाय्य)