दिवाळी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(नरकचतुर्दशी या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
दिवाळी
दिवाळीतील पणत्यांची आरास

दिवाळी किंवा दीपावली हा एक प्रमुख हिंदू सण आहे. [१]हा दीपोत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. [२]या सणाला घरात व घराबाहेर तेलाचे लहान दिवे लावले जातात. उंच जागी आकाशदिवा (आकाशकंदिल) लावला जातो. घराबाहेर रांगोळी काढून सुशोभन केले जाते.[३] पावसाळा संपून नवीन पिके हाती आल्यानंतर शरद ऋतूच्या ऐन मध्यभागी, आश्विनकार्तिक या महिन्यांच्या संधिकालात हा सण येतो. आश्विन वद्य द्वादशी ते कार्तिक शुद्ध द्वितीया हे सहा दिवस या सणाचे असतात.[४] हा सण साधारणपणे ऑक्टोबर - नोव्हेंबर दरम्यान येत असतो. [५]या सणाला भारतात बव्हंश ठिकाणी सुटी असते.

प्राचीनत्व

उपलब्ध पुराव्यांनुसार दिवाळी हा सण किमान तीन हजार वर्षे जुना आहे.[६] या सणाचा उगम फार प्राचीन काळी, आर्यांचे वास्तव्य उत्तर ध्रुव प्रदेशात होते, त्या काळातच झाला असा समज आहे. तथापि वैदिक काळात आश्विन महिन्यात शरद ऋतूचे औचित्य साधून आश्वयुजी किंवा आग्रयण यासारखे यज्ञ केले जात असत, ज्यांचा समावेश सात पाकयज्ञांमध्ये होतो. परंतु या धार्मिक आचारात दिवाळीचे प्राचीन संदर्भ सापडतात, असे नेमके म्हणता येतेच असे नाही, असे मत बी. के. गुप्ते यांनी आपल्या फोकलोअर ऑफ दिवाली या पुस्तकात मांडले आहे.[७]

काही लोकांची अशी श्रद्धा आहे की चौदा वर्षांचा वनवास संपवून रामचंद्र सीतेसह अयोध्येला परत आला, तो याच दिवसात.[३]पण त्यावेळी त्याचे स्वरूप आजच्यापेक्षा खूपच भिन्न होते. प्राचीन काळी हा यक्षांचा उत्सव मानला जायचा. अंधार दूर करुन प्रकाशाचे अस्तित्व निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जातो. याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो. पावसाळ्यातील समृद्धीच्या, आनंद उत्सवाचा, कृतज्ञतेचा हा सोहळा मानला जातो. या दिवसांत सायंकाळी दारात रांगोळ्या काढून पणत्या लावतात, घरांच्या दारात आकाशदिवे लावले जातात. महाराष्ट्रात व इतर ठिकाणी लहान मुले या काळात मातीचा किल्ला तयार करतात. त्यावर मातीची खेळणी मांडतात. धान्य पेरतात. यामागची परंपरा कशी व केव्हा सुरू झाली याची नोंद नाही.

दिवाळी किल्ले प्रतिकृती

दीपावलीची विविध नावे

दीपावलीचे मूळचे नाव यक्षरात्री असे होते हे हेमचंद्राने नोंदवले आहे, तसेच वात्स्यायनाच्या कामसूत्रातही हेच नाव नोंदलेले आहे. नीलमत पुराणया ग्रंथात या सणास "दीपमाला" असे म्हटले आहे. कनोजाचा राजा हर्षवर्धन याने नागानंद नाटकात या सणाला "दीपप्रतिपदुत्सव" असे नाव दिले आहे. ज्योतिषरत्नमाला या ग्रंथात "दिवाळी" हा शब्द वापरला आहे.[८] भविष्योत्तर पुराणात दिवाळीला "दीपालिका" म्हटले आहे, तसेच काल्विवेक या ग्रंथात तिचा उल्लेख "सुखरात्रि" असा येतो. व्रतप्रकाश नावाच्या ग्रंथात "सुख सुप्तिका" म्हणून दिवाळी ओळखली जाते.[३]

दीपावली रांगोळी

दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचे महत्त्व विशेष आहे ते याप्रमाणे-

वसुबारस

वसुबारस पूजा

[आश्विन कृष्ण द्वादशी]]स, म्हणजेच गोवत्सद्वादशीस, वसुबारस हा सण साजरा केला जातो. वसुबारस ह्याचा अर्थ-वसु म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. भारताची संस्कृती कृषिप्रधान असल्याने या दिवसाचे महत्त्व विशेष आहे. या दिवशी संध्याकाळी गाईची पाडसासह पूजा करतात. [९]घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे.[१०] [११]ज्यांच्याकडे घरी गुरे, वासरे आहेत त्यांच्याकडे ह्या दिवशी पुरणाचा स्वयंपाक करतात. घरातील सवाष्ण बायका गाईच्या पायावर पाणी घालतात. नंतर हळद-कुंकू, फुले, अक्षता वाहून फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात. निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गाईला खाऊ घालतात. ह्या दिवसापासून अंगणात रांगोळी काढण्यास सुरुवात होते. पुष्कळ स्त्रियांचा या दिवशी उपवास असतो. ह्या दिवशी गहू, मूग खात नाहीत. स्त्रिया बाजरीची भाकरीगवारीच्या शेंगांची भाजी खाऊन उपवास सोडतात. आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा असते.

दिवाळीतील पणत्यांची आरास

धनत्रयोदशी

आश्विन कृष्ण त्रयोदशीस धनत्रयोदशी हा सण साजरा केला जातो. [११]धनत्रयोदशी या सणामागे एक मनोवेधक कथा आहे. कथित भविष्यवाणीप्रमाणे हेमा राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो. आपल्या पुत्राने जीवनाची सर्व सुखे उपभोगावीत म्हणून राजा व राणी त्याचे लग्न करतात. लग्नानंतर चौथा दिवस हा तो मृत्युमुखी पडण्याचा दिवस असतो. या रात्री त्याची पत्‍नी त्यास झोपू देत नाही. त्याच्या अवतीभवती सोन्या-चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. महालाचे प्रवेशद्वारही असेच सोन्या-चांदीने भरून रोखले जाते. सर्व महालात मोठमोठ्या दिव्यांनी लखलखीत प्रकाश केला जातो. वेगवेगळी गाणी व गोष्टी सांगून पत्‍नी त्याला जागे ठेवते. जेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत सर्परूपात प्रवेश करण्याचा प्रयत्‍न करतो तेव्हा त्याचे डोळे सोन्या-चांदीने दिपतात. या कारणास्तव, यम आपल्या जगात (यमलोकात) परततो. अशा प्रकारे राजकुमाराचे प्राण वाचतात अशी आख्यायिका आहे. म्हणूनच या दिवसास यमदीपदान असेही म्हणतात. या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात. त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करतात. याने अपमृत्यू टळतो असा समज आहे.

धनत्रयोदशीबद्दल अजून एक दंतकथा आहे. ती म्हणजे जेव्हा असुरांबरोबर इंद्रदेव यांनी महर्षि दुर्वास यांच्या शाप निवारणाकरिता समुद्र मंथन केले, तेव्हा त्यातून देवी लक्ष्मी प्रगट झाली.तसेच समुद्र मंथनातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला. म्हणून धन्वंतरीचीही या दिवशी पूजा केली जाते. धन्वंतरी हा वैद्यराज असून त्याच्या हातातील कमंडलू अमृताने भरलेला असतो असे म्हटले आहे. [१२]

आयुर्वेदाच्या दृष्टीने हा दिवस धन्वंतरी जयंतीचा आहे. वैद्य मंडळी या दिवशी धन्वंतरीची (देवांचा वैद्य) पूजा करतात. लोकांस प्रसाद म्हणून कडुनिंबाच्या पानांचे बारीक केलेले तुकडे व साखर असे लोकांना देतात. (याला तेलुगूमध्ये गुडोदकम् म्हणतात.) यात मोठा अर्थ आहे. धन्वंतरी हा अमृतत्व देणारा आहे, हे त्यातून प्रतीत होते. कडुनिंबाची पाच-सहा पाने जर रोज खाल्ली तर व्याधी होण्याचा संभव नाही, असे काहीजणांची समजूत आहे. कडुनिंबाचे एवढे महत्त्व आहे, म्हणून या दिवशी तोच धन्वंतरीचा प्रसाद म्हणून देण्यात येतो.

या दिवशी वस्त्रालंकार खरेदी करणे शुभ मानतात. उपवास करून घरातले द्रव्य व अलंकार पेटीतून काढून ते साफसूफ करतात. कुबेर,विष्णू -लक्ष्मी, योगिनी, गणेश, नाग आणि द्रव्यनिधी यांची पूजा करून पायसाचा नैवेद्य दाखवितात.[१३]

हा दिवस भारतात राष्ट्रीय आयुर्वेद दिवस म्हणूनही साजरा होतो.

जैनधर्मीय या दिवसाला 'धन्य तेरस' वा 'ध्यान तेरस' म्हणतात. भगवान महावीर या दिवशी ३ऱ्या व ४थ्या ध्यानात जाण्यासाठी योगनिद्रेत गेले होते. तीन दिवसाच्या योगनिद्रेनंतर त्यांना दिवाळीच्या दिवशी निर्वाणप्राप्ती झाली. तेव्हापासून हा दिवस धन्य तेरस या नावाने प्रसिद्ध झाला.[१४]

नरक चतुर्दशी

दीपोत्सव पुणे

आख्यायिका -

नरक चतुर्दशी या सणाशी संबंधित नरकासुरवधाची आख्यायिका प्रचलित आहे. या दिवशी कृष्णाने नरकासुराचा वध करून प्रजेला त्याच्या जुलुमी राजवटीतून सोडवले. नरकासुराने तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले व अवध्यत्वाचा - म्हणजेच कुणाकडूनही वध होणार नाही - असा वर मागून घेतला. त्या वराच्या योगाने त्याने अनेक राजांना हरवून त्यांच्या कन्या व त्या राज्यांतील स्त्रियांचे अपहरण केले. नरकासुराने अश्या एकूण १६,१०० स्त्रियांना पळवून नेले व मणिपर्वतावर एक नगर वसवून त्यात त्यांना बंदी बनवून ठेवले. त्याने अगणित संपत्ती लुटली व अश्याच हावेपोटी त्याने देवमाता अदितीची कुंडले व वरुणाचे विशाल छ्त्रही बळकावले. त्याला मिळालेल्या वरामुळे तो देव, गंधर्वमानवांना तापदायक झाला होता. अनेक गिरिदुर्गांनी वेढलेले प्राग्ज्योतिषपूर हे नगर त्याची राजधानी होती. ही राजधानी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या खंदकांनी, अग्नी, पाणी इत्यादींनी वेढलेली होती. या दुर्जय राजधानीवर कृष्णाने गरुडावर स्वार होऊन चाल केली. कृष्णाने नरकासुराच्या देहाचे दोन तुकडे करत त्याचा वध केला. नरकासुरवधाने देवादिकांना, तसेच प्रजेला आनंद झाला. नरकासुराच्या बंदिवासातील कुमारिकांना त्यांचे स्वजन स्वीकारणार नाहीत, हे जाणून कृष्णाने या १६,१०० कन्यांसोबत विवाह केला व त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली. कृष्णाच्या पराक्रमाचे स्मरण म्हणून आश्विन कृष्ण चतुर्दशीस नरक चतुर्दशी हा सण साजरा केला जातो.[१५] [११]नरकचतुर्दशीच्या दिवशी अलक्ष्मीचे पहाटे मर्दन करून आपल्यातील नरकरूपी पापवासनांचा नायनाट व अहंकाराचे उच्चाटन करायचे आहे. तेव्हाच आत्म्यावरील अहंचा पडदा दूर होऊन आत्मज्योत प्रकाशित होईल असा यामागील संकेत आहे. या दिवशी अभ्यंगस्नानाचे महत्त्व असते. सकाळी लवकर उठून, संपूर्ण शरीरास तेलाचे मर्दन करून, सुवासिक उटणे लावून, सूर्योदयापूर्वी केलेले स्नान म्हणजे अभ्यंगस्नान.[१६] या दिवशी पहाटे यमासाठी नरकात, म्हणजे आधुनिक परिभाषेत घरातील आदल्या दिवशी घासून पुसून स्वच्छ केलेल्या स्वच्छतागृहात पणती लावण्याची प्रथा आहे.

वर्षक्रियाकौमुदी, धर्मसिंधु इ. ग्रंथांमध्ये सांगितले आहे की आश्विन कृष्ण चतुर्दशी आणि अमावास्येला संध्याकाळी लोकांनी आपल्या हातात मशाली घेऊन त्या आपल्या दिवंगत पूर्वजांसाठी दाखवाव्यात आणि प्रार्थना करावी.[१७]

नरक चतुर्दशीच्या पहाटेपासून फटाके उडवायला सुरुवात होते, तिचा शेवट भाऊबीजेच्या रात्री होतो. त्यानंतर घरात उरलेले फटाके तुळशीच्या लग्नादिवशी उडवून संपवतात.

लक्ष्मीपूजन

लक्ष्मीपूजनासाठी लक्ष्मी मूर्ती विक्री

आश्विन अमावास्या|आश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन हा सण साजरा केला जातो.या दिवशी प्रदोषकाळी (संध्याकाळी) लक्ष्मीचे पूजन केले जाते.[१८]लक्ष्मी ही फार चंचल असते असा समज आहे.त्यामुळे, शक्यतोवर हिंदू शास्त्राप्रमाणे लक्ष्मीपूजन हे, लक्ष्मी स्थिर रहावी म्हणून, स्थिर लग्नावर करतात. त्याने लक्ष्मी स्थिर राहते असा समज आहे. अनेक घरांत श्रीसूक्तपठणही केले जाते. व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष (विक्रमसंवत्) लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते. या दिवशी सर्व अभ्यंग स्नान करतात. पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात. त्यावर वाटी किंवा तबक ठेवतात. त्यात सोन्याचे दागिने, चांदीचा रुपया, दागिने ठेवून त्यांची पूजा करतात. हा दिवस व्यापारी लोक फार उत्साहात साजरा करतात.

या दिवशी लोक स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवी केरसुणी विकत घेतात. तिलाच लक्ष्मी मानून तिच्यावर पाणी घालून हळद-कुंकू वाहून घरात वापरण्यास सुरुवात करतात.

प्राचीन काळी या रात्री कुबेरपूजन करण्याची रीत होती. कुबेर हा देवांचा खजिनदार आणि धनसंपत्तीचा स्वामी मानला जातो. दीपप्रज्वलन करून यक्ष आणि त्यांचा अधिपती कुबेराला निमंत्रित करून त्याची पूजा करणे हा मूळचा सांस्कृतिक कार्यक्रम होता. परंतु गुप्तकाळात वैष्णव पंथाला राजाश्रय मिळाल्याने आधी कुबेराबरोबरच लक्ष्मीचीही पूजा होऊ लागली. भारतात, विविध ठिकाणी झालेल्या उत्खननात कुशाण काळातील अनेक मूर्ती सापडल्या आहेत. त्यांमध्ये कुबेर आणि लक्ष्मी एकत्र दर्शविले आहेत. काही मूर्तींमध्ये कुबेर त्याची पत्‍नी इरितीसह दाखविला आहे. यावरून असे दिसते की प्राचीन काळी कुबेर आणि त्यांची पत्‍नी इरिती यांची पूजा केली जात असावी. कालांतराने इरितीचे स्थान लक्ष्मीने घेतले आणि पुढे कुबेराच्या जागी गणपतीला प्रतिस्थापित केले गेले.

अलक्ष्मी म्हणून ज्या देवतेला मध्यरात्री हाकलून देण्याची प्रथा आहे, तीच खरी या सणाची इष्ट देवता असल्याचेही म्हटले जाते. तिला ज्येष्ठा, षष्टी वा सटवी, निर्ऋती या नावांनीही ओळखतात. निर्ऋती ही सिंधू-संस्कृतीतील मातृदेवता समजली जाते. तिला ब्राह्मणी संस्कृतीने अलक्ष्मी म्हणून तिरस्कारले असले तरी ती राक्षसांची लक्ष्मी आहे असे देव मानत असल्याचे उल्लेख दुर्गासप्तशतीमध्ये आहेत.

लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने 'आर्थिक व्यवहारातील सचोटी व नीती ' आणि 'अर्थप्राप्तीच्या साधनांविषयी कृतज्ञता' अशी दोन महत्त्वाची मूल्ये मनात रुजतात, ही या पूजेची विशेषता आहे. भगवान महावीर मोक्षाला गेल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी महावीरांचे प्रमुख शिष्य गौतम गणधर यांना केवल ज्ञान प्राप्त झाले म्हणूनच दिवाळीच्या संध्याकाळी लक्ष्मीपूजन केले जाते ते संपत्तीरूपी लक्ष्मी मिळवण्यासाठी नव्हे, तर मोक्ष-लक्ष्मी किंवा आत्मकल्याणरूपी लक्ष्मी मिळवण्यासाठी. गणधर त्यांचा दिव्य-ध्वनी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवितात. दिवाळीसाठी पूर्वी जमिनीवर आणि राजस्थानातील प्रथेप्रमाणे तांदळाच्या ओल्या पिठाची रांगोळी काढतात. त्याला 'मांडणे' असे म्हणतात. त्यावर पाट मांडून लक्ष्मीपूजन किंवा ओवाळणे आदी विधी केले जातात.

लक्ष्मीपूजन

बलिप्रतिपदा

कार्तिक शुद्ध प्रतिपदेस बलिप्रतिपदा हा सण साजरा केला जातो.हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून ही ओळखतात,[१९] या दिवशी बळी राजाचे रांगोळीने चित्र काढतात व त्याची पूजा करतात आणि 'इडा पीडा टळो व बळीचे राज्य येवो' असे म्हणतात.[२०]साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त म्हणून या दिवसाला विशेष महत्त्व आहे. शेतकरी पहाटे स्नान करून डोक्यावर घोंगडी घेतात व एका मडक्यात कणकेचा पेटता दिवा घेऊन शेतात जातात व ते मडके शेताच्या बांधावर खड्डा करून पुरतात. काही ठिकाणी बळीची अश्वारूढ प्रतिमा करून तिची पूजा केली जाते.शेणाचा बळीराजा करण्याची प्रथाही अस्तित्वात आहे. या शेणाला "शुभा" असे म्हणतात. असा हा लोककल्याणकारी राजा बळी, त्याच्या पूजनाचा दिवस. या दिवशी विक्रम संवत सुरू होतो. पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी लोक दिवाळीतील पाडवा ही नववर्षाची सुरुवात मानतात. लक्ष्मीप्राप्तीसाठी नव्या वह्यांचे पूजन करून व्यापारी लोक वर्षाचा प्रारंभ करतात. व्यापारी लोकांच्या जमा-खर्चाच्या कीर्द-खतावणीच्या नवीन वह्या ह्या दिवशी सुरू होतोत. नवीन वह्या सुरू करण्यापूर्वी वह्यांना हळद-कुंकू, गंध, फूल, अक्षता वाहून पूजा करतात. व्यापारी या दिवशी मुहूर्ताने व्यवहार सुद्धा करतात. घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्‍नी पतीला औक्षण करते व पती पत्‍नीला ओवाळणी घालतो. नवविवाहित दांपत्याची पहिली दिवाळी पत्‍नीच्या माहेरी साजरी करतात. ह्यालाच "दिवाळसण" म्हणतात. त्यानिमित्त यादिवशी जावयास आहेर करतात. दक्षिण भारतात या दिवशी बलीची प्रतिमा तयार करून ती गोठ्यात ठेवतात व तिची पूजा करतात. गायी - बैलांना रंग लावून रंग लावून व माळा लावून सजवतात. पाताणे प्रभू (पाठारे प्रभू) लोकांत बळीची अश्वारूढ प्रतिमा उंच जागी उभी करून तिच्या भोवती एकवीस दिवे मांडण्याचीही चाल आहे.[२१]

बलीची पूजा

गोवर्धन पूजा

मथुरेकडील लोक बलिप्रतिपदेच्या दिवशी सकाळी गोवर्धन पर्वताची पूजा करतात. ते ज्यांना शक्य नसेल ते गोवर्धनाची प्रतिकृती करून त्याची पूजा करतात. अन्नकूट म्हणजे वास्तवात गोवर्धनाची पूजा होय. प्राचीन काळी हा उत्सव इंद्राप्रीत्यर्थ होत असे. पण वैष्णव संप्रदाय बलवान झाल्यावर इंद्रपूजेचे रूपांतर गोवर्धनपूजेत झाले.[२२] विविध प्रकारची पक्वान्ने आणि खाद्य पदार्थ तयार करून ते कृष्णाच्या मूर्तीच्या पुढे मांडणे व कृष्णाला त्याचा नैवेद्य दाखविणे याला अन्नकूट म्हणतात.[२३]

गोवर्धन पूजा

भाऊबीज

कार्तिक शुद्ध द्वितीयेस भाऊबीज हा सण साजरा केला जातो.या दिवशी यम आपली बहीण यमी हिच्या घरी जेवायला गेला म्हणून या दिवसाला "यमद्वितीया" असे नाव मिळाले असे मानले जाते.{१} बंधु-भगिनींचा प्रेमसंवर्धनाचा हा दिवस आहे. या दिवशी बहिणीच्या घरी भाऊ गोडधोड भोजन करतो आणि सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीस व नंतर भावाला ओवाळते. भाऊ मग ओवाळणीच्या ताटात 'ओवाळणी' देऊन बहिणीचा सत्कार करतो.[२४]भावा-बहिणीच्या नात्याचा एक तरी सण प्रत्येक समाजात असतोच.

भाऊबीजेच्या दिवशी चित्रगुप्ताची पूजा होते. हा दिवस कायस्थ समाजाचे लोक चित्रगुप्ताची जयंती म्हणून साजरा करतात.[२५]

भारतातील विविध समाजांची दिवाळी

 • जैन समाज : आश्विन अमावास्येला जैनांचे २४वे तीर्थंकर भगवान महावीर मोक्षाला गेले. त्या दिवशी महावीरांना जलाभिषेक करून त्यांची पूजा करतात, दिवे उजळतात आणि त्यांना 'निर्वाण लाडूं'चा भोग चढवतात. आणि नंतर फटाक्यांची आतशबाजी करतात.
 • आंध्रातील तेलुगू समाज : ही मंडळी नरक चतुर्दशीलाच दिवाळी म्हणतात. त्या दिवशी कागदाचा किंबा बांबूचा नरकासुराचा पुतळा करून त्याचे दहन करतात, मग दिवे लावतात व लक्ष्मीपूजन करतात.
 • बंगाली समाज : दिवाळीच्या दिवशी बंगाली लोक कालीबाड्यांत जाऊन कालीची पूजा करतात. रात्री जागरण करून भजने म्हणतात. दीपावलीच्या रात्री घरोघर व मंदिरांत दिवे लावतात. त्यांचे लक्ष्मीपूजन पंधरा दिवस आधी, म्हणजे शरद पैर्णिमेलाच झालेले असते.
 • बौद्ध समाज : गौतम बुद्ध दिवाळीच्या दिवसांतच तप करून परत आले होते. त्याच दिवशी बुद्धांचा प्रिय सहकारी अरहंत मुगलयान हा निर्वाणाला गेला. त्याची आठवण काढून बौद्ध मंडळी गौतम बुद्धाला प्रणाम करून दिवे लावतात.
 • तमिळनाडूतीत मद्रासी लोक : प्रत्येक घरातून स्त्री-पुरुष एकेक जळती पणती देवळात नेऊन ठेवतात, आणि तेथेच बसून रात्रभर भजन करतात.
 • महाराष्ट्रातील मराठी समाज : लक्ष्मी पूजन सोडले तर मराठी लोकांच्या दिवाळी कुठलाही धार्मिक विधी नाही. खाणे-पिणे सणांचा आनंद लुटणे, मित्र-मैत्रिणींच्या, आप्तांच्या भेटी घेणे, एकमेकांच्या घरी फराळाला जाणे, त्यांना आपल्या घरी बोलावणे, रात्री फटाक्यांची आतशबाजी करणे ही यांची दिवाळी. ती रमा एकादशीपासून (आश्विन कृष्ण एकादशीपासून) सुरू होते. त्या रात्री फक्त तुळशीपुढे तेल-वात घालून उजळवलेली पणती ठेवतात. दुसरा दिवस वसू बारस. या दिवसापासून रोज भरपूर पणत्या लावून विजेच्या दिव्यांची रोषणाई करतात. घराबाहेर रांगोळी काढतात. आकाशकंदील लावतात. घरात गवारीची भाजी आणि बाजरीच्या भाकरीचा बेत असतो. तिसरा दिवस धन त्रयोदशी. ज्या बायकांनी आधीपासूनच दिवाळीचा फराळ, म्हणजे लाडू, करंज्या, शंकरपाळी, कडबोळी, शेव-चकली-चिवडा करायला सुरुवात केली नसेल तर ती करून काम लवकरात लवकर संपवतात. ज्या घरात फार माणसे असतील त्या घरातील स्त्रिया या दिवशी 'बायकांची न्हाणी' उरकून घेतात. चौथा दिवस - नरक चतुर्दशी. अगदी पहाटे उठून आधल्या दिवशी स्वच्छ केलेल्या संडासात पणती ठेवतात. पहाटेच घराबाहेर पणत्या ठेवतात आणि रोषणाई करतात. घरातील लोकांचे, विशेषत: पुरुषांचे, सूर्योदयापूर्वीच तेल उटणे लावून अभ्यंगस्नान होते. लोक आंघोळ करत असताना फुलबाज्या लावतात आणि फटाके फोडतात. नंतर सर्वजण फोडणीचे किंवा दडपे पोहे खातात. दिवाळीचा फराळ खाणे येता जाता चालूच असते. शेजारा-पाजाऱ्यांना फराळाची ताटे पाठवतात. त्यांच्याकडूनही ताटे येतात. ज्यांच्या घरात काही अशुभ घडल्याने दिवाळी नसते त्यांना आवर्जून फराळाचे जिन्नस आणि मुलांसाठी फटाके पाठवतात. पुढचा दिवस लक्ष्मीपूजनाचा. या दिवशी संध्याकाळी लक्ष्मीची साग्रसंगीत पूजा होते. ही पूजा घरातला कर्ता पुरुष करतो. लक्ष्मीच्या मूर्तीशेजारी, काही दागिने आणि बंदे रुपये ठेवतात. त्यांचीही पूजा होते. प्रसादासाठी लाह्या-बत्तासे-डाळिंबाचे दाणे एकत्र करून एका तबकात ठेवलेले असतात. घरात या दिवसासाठी मुद्दाम केलेले अनरसेही ठेवतात. पूजेनंतर प्रसाद वाटतात व खातात. पुढचा दिवस दिवाळीच्या पाडव्याचा. जेवणाचा बेत श्रीखंडपुरी, उकडलेल्या बटाट्याची सुकी भाजी. या दिवशी स्त्रिया नवरा, दीर, सासरे आदींना ओवाळतात. नंतरचा दिवस भाऊबीजेचा. यासाठी भाऊ बहिणींच्या घरी जाऊन फराळ करतात किंवा जेवतात आणि ओवाळून घेतात. घराबाहेर पणत्या लावायचा आणि फटाके उडवण्याचा हा दिवाळीतला शेवटचा दिवस. कार्तिक शुद्ध एकादशीच्या दिवसापासून पौर्णिमेपर्यंत पुन्हा एकदा छोट्या प्रमाणात रोषणाई करून घरातले उरलेसुरले फटाके फोडून संपवतात. दिवाळीत बनवलेले व न संपलेले फराळाचे जिन्नस पुढच्या दिवसांत खाऊन संपवतात.

दिवाळी अंक : महारा़्ष्ट्राचे वाङ्मयीन भूषण म्हणजे मराठी दिवाळी अंक. दरवर्षी सुमारे ८०० दिवाळी अंक प्रसिद्ध होतात. मराठी माणसे किमान एक दिवाळी अंक विकत घेतात आणि इतर अनेक अंक लोकांकडून किंवा वाचनालयातून आणतात व वाचतात.

दिवाळीच्या दिवसांत मुले किल्ले करतात. आकाशदिवा बनवतात. किल्ल्यांची तिकीट लावून प्रदर्शने भरतात. रांगोळीची प्रदर्शनेही असतात. शहरातील अजून शिल्लक असलेल्या हौदांच्या पाण्यावर काही कलावंत तरंगती रांगोळी काढतात. लोक हौसेने या रांगोळया पाहण्यासाठी रांगा लावून तिकिटे काढतात.

 • केरळमधील मल्याळी समाज : दिवाळीच्या दिवशी अय्यप्पा देवाची पूजा करतात. घरांभोवती आणि मंदिरांत रांगोळी काढून दिवे लावतात. दक्षिण भारतीय मिष्टान्ने बनवून लोकांना केळीच्या पानांमधून प्रसाद वाटतात.
 • पंजाबातील शीख समाज : शीखांच्या ६व्या गुरूंना जहांगीर बादशहाने कैद करून ठेवले, त्यांची आश्विन अमावास्येला सुटका झाली. म्हणून शीख तो दिवस 'दाता बंदी छोड दिवस' म्हणून साजरा करतात.
 • सिंधी समाज : पूर्वी सिंधू नदीच्या काठी दिवे लावायची सिंधी परंपरा होती. आता घरात गणेशाची आणि लक्षमीची पूजा करून घराच्या दरवाज्यांत दिवे लावतात.

स्थानिक उत्सव /सांस्कृतिक कार्यक्रम

दिवाळीच्या सणासाठी स्थानिक पातळीवर विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले जातात. उदा. वसुबारस या दिवशी सवत्स धेनूच्या पूजेचे आयोजन चौकाचौकांत केले जाते.[२६] दिवाळीच्या फटाक्यांची आतषबाजी मोकळ्या मैदानात योजली जाते. फराळ वाटप, कला अभिव्यक्ती असे कार्यक्रमही योजले जातात.दिवाळीचे औचित्य साधून विविध शहरांमध्ये दिवाळी पहाट, पाडवा पहाट यासारखे संगीत, नृत्य, वादन अशा विविध कलांचा आस्वाद घेण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन होते.[२७][२८] तसेच काही ठिकाणी वसुबारस, नरकचतुर्दशी अशा निमित्ताने सामूहिक दीपोत्सव कार्यक्रम केले जातात, ज्यामध्ये नागरीकही सहभागी होतात.

महाराष्ट्रातील लोकसंस्कृती

मराठवाड्यातील किंबहुना महाराष्ट्रातील दिवाळी शेतीभातीशी जोडलेली आहे.

१. दिन दिन दिवाळी, गायी म्हशी ओवाळी, गायी म्हशी कोणाच्या, लक्ष्मणाच्या ... ||
२. दिवाळी दिवाळी आन्घुलीची जल्दी करा
आज मारील नरकासुरा,किसन देव
३. गाई म्हशीने भरले वाडे
दह्या दुधानं भरले डेरे, बळीचं राज्य येवो.
अशा ओव्यातून वा गाण्यातून दिवाळीचे प्रतिबिंब दिसते.[२९]

किल्ल्याच्या प्रतिकृती

दिवाळीत केलेला किल्ला

दिवाळीत मुलांनी किल्ला तयार करणे हे महाराष्ट्राचे वैशिष्ट्य सांगता येते. महाराष्ट्रात दिवाळीच्या सुट्टीत मुले आणि मुली आपल्या घराच्या परिसरात डोंगरी किल्लयांच्या प्रतिकृती तयार करतात.[३०] दगड, माती, विटा असे साहित्य वापरून ही प्रतिकृती तयार केली जाते. ऐतिहासिक वारसा मुलांपर्यंत पोहोचवावा यासाठी ही पद्धत सुरु झाली असावी असे मानले जाते. महाराष्ट्रातील विविध सामाजिक संस्था किल्ला तयार करण्याच्या स्पर्धाही आयोजित करून मुलांना प्रोत्साहन देतात.[३१]

संतांची दिवाळी

मी अविवेकाची काजळी।

फेडोनी विवेक दीप उजळी॥

ते योगिया पाहे दिवाळी॥

निरंतर॥ -- संत ज्ञानेश्वर  [३२]

१) साधू संत येती घरा। तोची दिवाळी दसरा॥

२) दसरा-दिवाळी तोची आम्हा सण। सखे संतजन भेटतील॥

३) तुका म्हणे त्यांच्या घरची उष्टावळी। मज ते दिवाळी दसरा सण॥ -- संत तुकाराम [३३] 


आनंदाची दिवाळी।

घरी बोलवा वनमाळी॥

घालीते मी रांगोळी।

गोविंद गोविंद॥ -- संत जनाबाई  

सण दिवाळीचा आला।

नामा राऊळाशी गेला॥

हाती धरोनी देवाशी।

चला आमुच्या घराशी॥ -- संत नामदेव  

अन्य कवींची दिवाळी

 • आयी अब की साल दिवाली, मुंह पर अपने खून मले (हिंदी चित्रपटगीत, चित्रपट - हकीकत, गायिका - लता मंगेशकर. संगीतकार - मदन मोहन, कवी - कैफी आझमी)
 • आयी दिवाली, आयी, कैसे उजाले लायी (हिंदी चित्रपट - खजांची-१९५८, गायिका - आशा भोसले, संगीतकार - मदनमोहन, गीतकार राजेंद्रकृष्ण)
 • आई दिवाली आई दिवाली, आई दिवाली आई दिवाली, दीपक संग नाचे पतंगा, मैं किसके संग नाचू बता जा (हिंदी चित्रपटगीत, चित्रपट - रतन, गीतकार - डी.एन. मधोक, संगीतकार - नौशाद, गायिका - जोहराबाई अंबालेवाली)
 • आली दिपवाळी, गड्यांनो आली दिपवाळी, लाडू करंज्या शंकरपाळी खाऊ कडबोळी. नळे चंद्रज्योती, फटाके फुलबाज्या वाती... (चौथ्या इयत्तेच्या जुन्या पाठ्यपुस्तकातली कविता)
 • आली दिवाळी मंगलदायी, आनंद झाला घरोघरी (चित्रपट ?, गायिका - लता मंगेशकर, गीतकार व कवी - दत्ता डावजेकर)
 • आली माझ्या घरी ही दिवाळी (चित्रपट - अष्टविनायक, गायिका अनुराधा पौडवाल, संगीतकार - अनिल-अरुण, कवी - शांताराम नांदगावकर, शांता शेळके)
 • ओवाळिते मी लाडक्या भाऊराया, .... दिवाळीची शोभा या उजेडात न्हाली, कळस होऊनी भाऊबीज आली (चित्रपटगीत, चित्रपट - ओवाळिते भाऊराया, कवी - जगदीश खेबूडकर, संगीतकार - प्रभाकर जोग, गायिका - कु. शुभांगी आणि आशा भोसले, राग - भैरवी)
 • घर घर में दिवाली है मेरे घर मे अंधेरा (हिंदी चित्रपट - किस्मत-१९४३, गायिका - अमीरबाई कर्नाटकी, संगीत - अनिल विश्वास)
 • दिवाली की रात पिया घर आनेवाला हैं (हिंदी चित्रपटगीत, चित्रपट - अमर कहानी, गायिका - सुरैया
 • दिवाळी दिवाळी आली, हासत नाचत खेळत आली (चित्रपट - माणूस, गायिका - शांता हुबळीकर, संगीतकार - मास्टर कृष्णराव, कवी - अनंत काणेकर?)
 • दिवाळी येणार, अंगण सजणार, आनंद फुलणार, घरोघरी (चित्रपट - माझा मुलगा-१९७६, गायिका - अनुराधा पौडवाल, कवी आणि संगीतकार - यशवंत देव)
 • दिव्या दिव्यांचा सण हा आला, बहुमौजेचा, गड्यांनो, आनंद लुटू या चला (कवयित्री : मृण्मयी लिमये)
 • दीप जलाओ, दीप जलाओ, आज दीवाली रे (संगीतकार - खय्याम)
 • दीप जलेंगे दीप दिवाली आई हो (हिंदी चित्रपटगीत, चित्रपट - पैसा, गायिका गीता दत्त, संगीतकार - राम गांगुली, कवी - लालचंद बिस्मिल)
 • भाऊबीज बघ उद्या सकाळी, तेल लावू मज न्हावू घालू, अंगा माझ्या येइल वास, घम घम घम, ताई घम घम घम (जुन्या पाठ्यपुस्तकातली कविता)[ संदर्भ हवा ]
 • भाऊबीजेला आला माझा भाऊ घरी (भावगीत, गायिका - लता मंगेशकर, कवी आणी संगीतकार - दत्ता डावजेकर)
 • लाखों तारे आसमान में, एक मगर ढूंढे न मिला, देख की दुनिया की दीवाली, दिल मेरा चुपचाप जला (हिंदी चित्रपटगीत, चित्रपट - हरियाली और रास्ता, गायक - मुकेशलता मंगेशकर, गीतकार शैलेंद्र, संगीतकार - शंकर जयकिशन)
 • लाविते मी निरांजन तुळशीच्या पायापाशी, भाग्य घेउनिया आली, आज धनत्रयोदशी (नाट्यगीत, नाटक - वाहतो ही दुर्वांची जुडी; गायिका - माणिक वर्मा, कवी आणि संगीतकार - बाळ कोल्हटकर, राग - पिलू
 • सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, ओवाळिते भाऊराया, वेड्या बहिणीची ही वेडी माया (मराठी चित्रपट - भाऊबीज, गायिका - आशा भोसले, संगीतकार वसंत मोहिते, कवी संजीव)
दिवाळीसाठी पणत्या

मेळघाट

मेळघाटातील दिवाळी ही लक्ष्मीपूजनापासून सुरू होते आणि पुढील दहा दिवस हा सण साजरा होतो. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी गाई व म्हशींना जंगलातील नदीवर नेऊन आंघोळ घातली जाते. त्यानंतर नदीवरच कुलदैवताची पूजा केली जाते. घरी परतल्यानंतर सायंकाळी गोठ्यात शिरण्याआधी गाईंच्या पायावर पाणी घातले जाते. यथासांग पूजा केली जाते. लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी बलिप्रतिपदेला दुभत्या जनावरांची विशेष पूजा केली जाते. त्यांना गोडधोड खाऊ घातले जाते. गवळी समाजाच्या दिवाळीत हा दिवस सर्वांत महत्त्वाचा मानला जातो. यादिवशी घरातील सर्वजण नवीन कपडे परिधान करतात. अंगावर घोंगडी घेऊन गाई-म्हशींची पूजा करण्याचीही प्रथा आहे. घरातील सर्व सदस्य या दिवशी गुराख्याच्या पाया पडतात. त्यानंतर गाई, म्हशींचेही पाय धरले जातात. घरातील मायलेकी या गुरांची पूजा करतात. सारे सदस्य गोधनाकडून आशीर्वाद घेतात. पुढील प्रत्येक दिवशी गाई-म्हशींना दूध किंवा दुग्धपदार्थांनी आंघोळ घातली जाते. पुढील सात दिवस हा उत्सव सुरू असतो. गुराख्याला या दिवशी मोठा मान असतो. त्याला गाई, म्हशींचा मालक नवे कपडे देतो. यंदाही लक्ष्मीपूजन आणि बलिप्रतिपदेचा हा आनंद मेळघाट परिसरात अनुभवास आला. काळाच्या ओघात गावेही आधुनिक होत आहेत. मात्र गावकऱ्यांनी परंपरा तितक्याच निष्ठेने जपल्या आहेत. परंपरा या जगण्याचा आधार असतात, असा ग्रामस्थांचा ठाम समज. हाच समज गवळीबांधवांनी पारंपरिक उत्सवप्रियतेतून जपला आहे.[३४]

अन्य प्रांतांतील दिवाळी

महाराष्ट्राच्या उत्तरेकडील प्रांतांत पौर्णिमेनंतरच्या दिवसापासून पुढचा महिना सुरू होतो, त्यामुळे जेव्हा महाराष्ट्रात, कर्नाटकात आणि आंध्र प्रदेशात आश्विन महिन्याचा कृष्ण पक्ष चालू असतो, तेव्हा या प्रांतांत तो कार्तिक महिन्याचा कृष्ण पक्ष असतो.

राजस्थान

राजस्थानी लोक दिवाळीचा संबंध राम वनवासातून परत आला, त्या मंगल घटनेशी जोडतात. काही ठिकाणी लंकादहनाचा देखावा उभा करून त्यातून शोभेची दारू उडवतात. मांजरीला लक्ष्मी मानून तिचे कौतुक करतात. तिने कितीही त्रास दिला तरी तिला मारत नाहीत. दिवाळीतल्या चतुर्दशीला रूपचौदस म्हणतात. त्या दिवशी ब्राह्मण व वैश्य स्त्रिया सूर्योदयापूर्वी स्नान करून विशेष शृंगार करतात. संध्याकाळी मुली मस्तकावर 'घुड्ल्या' घेऊन घरोघर फिरतात. घुडल्या म्हणजे सच्छिद्र घडा असतो व त्यात दिवा लावलेला असतो. अमावास्येला लक्ष्मीपूजन फार थाटाने करतात.प्रतिपदेला खेंखरा म्हणतात. त्या दिवशी गोवर्धन पूजा व अन्नकूट करतात. याच्या दुसर्‍या दिवशी राजदरबारी व घरोघरी दौतीची व लेखणीची पूजा होते.[३५]

पंजाब

पंजाबातील लोक रामराज्याभिषेकाच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिवाळीची दीपोत्सव करतात. तिथले शीख लोक अमृतसरच्या सुवर्ण मंदिराच्या स्थापनेचा स्मृतीदिन म्हणून हा सण पाळतात.[३६]

गुरुद्वारातील पूजन

हरियाणा

दिव्यांची आरास करतात, मुलांचे दारुकाम असते. लक्ष्मीपूजन हा दिवाळीतील मुख्य कार्यक्रम असतो.

उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेशमधील डोंगराळ भागातले लोक दिवाळीच्या दिवशी गायींची पूजा करतात व रात्री गावाच्या सीमेवर जाऊन मशालींच्या प्रकाशात नाचतात. काही लोक कुबेराची पूजा करतात, तर काही लोक देवीची पूजा करून तूपभात व साखर खातात.

नेपाळ

नेपाळमधील लक्ष्मीपूजन

नेपाळमध्ये दिवाळीच्या दिवसात द्यूतक्रीडेला विशेष महत्त्व आहे. नेपाळी लोक लक्ष्मीपूजन तर करतातच, पण शिवाय कुत्रे, गायी, बैल यांचीही पूजा करतात.[३७]

गोवा

गोव्यातील दिवाळी सामुदायिक आतिथ्याची असते. शेजारी पाजारी एकत्र जमून प्रत्येकाकडे जातात आणि दूधगुळाच्या पोह्यांचा फराळ करतात.

दक्षिण भारत

दक्षिण भारतात या दिवशी सूर्योदयापूर्वी केलेले स्नान गंगास्नानाइतके पवित्र मानले जाते. तमिळनाडूमध्येही काही लोक नरकचतुर्दशीला सूर्योदयापूर्वी दोनदा स्नान करतात. आंध्र प्रदेशातील लोक घरासमोर एक मचाण बांधून त्यावर पणत्या लावतात व स्त्रिया त्याच्यावर बसून रात्रभर लक्ष्मीच्या स्वागताची गाणी गातात. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रेड्यांच्या टकरी लावतात. आश्विनी अमावास्येला केलेले पितृतर्पण विशेष फलप्रद मानतात.[३८]

तमिलनाडू मधील दीपावली नैवेद्य
दक्षिण भारतातील सजवलेले मंदिर

अन्य धर्मीयांची दिवाळी

जैन धर्म

हिंदूंमधील दिवाळी सणाला जसा पौराणिक कथांचा आधार आहे तसाच जैन पुराणांतदेखील याचा उल्लेख आहे. इसवी सन पूर्व ५९९ या साली २४वे जैन र्तीथकर वर्धमान महावीर यांचे आश्विन महिन्यातील अमावास्येच्या पहाटे चार वाजता बिहार राज्यातील पावापुरी येथे निर्वाण झाले, त्यांनी मोक्ष मिळवला त्या आनंदाप्रीत्यर्थ पहाटेच्या अंधारात असंख्य दिवे उजळून दीपावली साजरी करण्याची प्रथा जैन धर्मीयांत सुरू झाली. या दिवाळीला 'निर्वाण महोत्सव' असेही म्हणतात.[३९]

निर्वाण लाडू

या दिवशी सर्व जैन धर्मीय लोक पहाटे चार वाजता जैनमंदिरांत जाऊन 'निर्वाण लाडू' चढवतात. हा लाडू जुन्या काळातील पायलीच्या आकाराचा, मोठ्ठा असतो. त्यावर आणखी एक छोटा लाडू ठेवतात. काही ठिकाणी तो बुंदीचा किंवा तिळाचा बनवतात. एका ताटात हा लाडू, साळीच्या लाह्या, आवळे, विड्याची पाने, तांदूळ, झेंडूची फुले आदी ठेवतात. या वेळेस महावीरांंपूर्वी झालेल्या आणि मोक्षाला गेलेल्या तेवीस तीर्थंकरांचा आणि कोट्यवधी जैन साधूंपकी काही प्रमुख साधूंचा उल्लेख असलेले 'निर्वाणकांड' हे स्तुति-स्तोत्र म्हणून, जयजयकार करत हा लाडू चढवला जातो. समाजाच्या वतीने मुख्य लाडू चढवला जात असताना प्रत्येक जण आपल्या हातातील एका ताटलीत एक छोटा लाडू घेऊन चढवत असतो. जैन धर्मातील सर्वच पुरुष आणि बहुतेक स्त्रियाही याच पद्धतीने पहाटे 'निर्वाणलाडू' चढवतात.

अशा प्रकारे जैन समाज सणा-उत्सवाच्या वेळीही आपलीच परंपरा जपण्याचा आणि खाद्यसंस्कृती टिकवण्याचा प्रयत्‍न करतात. मात्र, सुशिक्षित जैन मंडळी जीवितहिंसा टाळून पर्यावरण रक्षणालाही हातभार लागावा म्हणून सार्वजनिक ठिकाणी नाहीच, पण घरीही फटाके वाजवत नाहीत.

सिंधी

सिंधी लोक दिवाळीच्या रात्री गावाबाहेर मशाली लावून नृत्य करतात. नंतर तलावाच्या काठी माती आणून ते एक चबुतरा करतात व त्यावर कात्री वृक्षाची फांदी लावून तिची पूजा करतात.[४०]

अन्य समाजांतील प्रथा

पण काही विशिष्ट समाजातील (उदा. बघेरवाल) स्त्रियांसाठी दिवा देणे ही वेगळी प्रथा असते. (हा मारवाडी भाषेतील दिवो दिखानोचा अपभ्रंश असावा). देवासमोरील वेदीवर ओल्या कुंकवाचे स्वस्तिक आणि पद्म काढून त्यावर रव्याच्या आठ पातळसर पुर्‍या (साळ्या) ठेवतात. त्यांतील चार पुर्‍यांवर प्रथम गूळ घालून केलेली जाडसर लहान दशमी (गुण्या) ठेवतात. त्यावर सुत्तरफेणी (सूत्रफेणी), मग फेनला आणि त्यावर तिळाचा लाडू ठेवतात. उरलेल्या चार पुर्‍यांवर एखादे मोठे फळ, बहुतेक सीताफळ ठेवतात. याच्या चारही बाजूंना पाच विड्याची पाने ठेवून त्यावर आवळे, तांदूळ, साळीच्या लाह्या, झेंडूची फुले इत्यादी ठेवतात. नंतर या सर्वांवर प्रत्येकी एक-एक कणकेचा दिवा लावतात. यांतील आठ पुर्‍या हे अष्टकर्माचे प्रतीक, सुत्तरफेणीमध्ये बारीक बारीक अशी अनेक सूत्रे असतात म्हणून ते ८४ लक्ष योनींचे प्रतीक, तीळ हे एक दलीय अखंड धान्य शिवाय स्निग्धतेचें भांडार. फळ हे मोक्षरूपी फळाचे प्रतीक, असे हे सर्व पदार्थ प्रतीकरूपी आहेत. पूर्वी आणि आताही काही ठिकाणी रोजचा स्वयंपाक करताना किंवा सणावाराला तसेच नवीन फळ खाण्यापूर्वी प्रथम देवाला वाहण्याची पद्धत आहे. त्यानुसार दिवाळीच्या फराळातील करंजी धनत्रयोदशीला, चतुर्दशीला लाडू, अमावास्या आणि पाडवा हे मुख्य दिवस म्हणून फेणी-फेनल्याचा मान आणि भाऊबीजेला सांजोरी असे पदार्थ प्रथम देवाला आणि मग स्वतः खायला घेतात शिवाय या दिवसांतच सीताफळ, आवळे, झेंडूची फुले इत्यादी येत असतात, म्हणून तीही देवाला अर्पण करण्याचा प्रघात पडला असेल.

फटाके

दिवाळीच्या आनंदाप्रीत्यर्थ शोभेचे दारूकाम केले जाते.[४१]

फटाके

लहान थोर सर्वजण फटाके उडविण्याचा आनंद घेतात. तथापि फटाके उडविल्यामुळे होणारे अपघात लक्षात घेवून संभाव्य सूचना दिल्या जातात तसेच हवेचे प्रदूषण टाळण्यासाठी आवाहन ही केले जाते.[४२][४३]

जागतिक स्वरूप

या सणाला आता जागतिक स्वरूप येत चालले आहे. जगभरातले भारतीय आपापल्या शहरात दिवाळी साजरी करतात. अमेरिका येथे न्यू जर्सी भागात भारतासारखी दुकाने सजवलेली आढळतात. लंडन शहरातही दिवाळी साजरी केली जाते. दिवाळी हा प्रामुख्याने हिंदू, तसेच दक्षिण आशियाआग्नेय आशियातील अन्य धर्मीय समाजांत काही प्रमाणात साजरा केला जाणारा उत्सव आहे.

भारत[४४], गयाना, त्रिनिदाद व टोबॅगो, फिजी, मलेशिया, म्यानमार, मॉरिशस, श्रीलंका, सिंगापूर[४५]सुरिनाम या देशांमध्ये दिवाळीनिमित्त सार्वजनिक सुट्टी असते.[४६]

भारतीय ध्वज मेलबर्न येथे दिवाळी निमित्त लावला जातो.

ऑस्ट्रेलिया मध्ये मेलबर्न येथे सरकारी खर्चाने दिवाळीचा कार्यक्रम साजरा केला जातो. इ.स.२०१० मध्ये सरकारने एक लाख डॉलर या कार्यक्रमाला दिले होते. यामध्ये शहराच्या प्रमुख फेडरेशन चौकात भारतीय संस्कृतीवर आधारीत अनेक कार्यक्रम सादर होतात. त्या नंतर फटाक्यांच्या आतषबाजीचा कार्यक्रम होतो.

दिवाळी अंक

मुख्य पान: दिवाळी अंक

दिवाळीनिमित्त प्रतिवर्षी मराठी तसेच अन्य भाषिक साहित्य क्षेत्रात दिवाळी अंक प्रकाशित केले जातात. यातील विशेष औचित्यपूर्ण अंकांना पारितोषिकही दिले जाते.


हे ही पहा

लक्ष्मीपूजन

वसुबारस

नरक चतुर्दशी

भाऊबीज

आकाशकंदील

चित्रदालन

संदर्भ

 1. ^ Primary Essays and Proverbs (en मजकूर). Sura Books. आय.एस.बी.एन. 9788172542306. 
 2. ^ Preszler, June (2007). Diwali: Hindu Festival of Lights (en मजकूर). Capstone. आय.एस.बी.एन. 9780736863957. 
 3. a b c भारतीय संस्कृती कोश खंड चौथा
 4. ^ Sharma, S. P.; Gupta, Seema (2006). Fairs and Festivals of India (en मजकूर). Pustak Mahal. आय.एस.बी.एन. 9788122309515. 
 5. ^ Balasubramanian, Lalitha (2017-08-30). Temples in Maharashtra: A Travel Guide (en मजकूर). Notion Press. आय.एस.बी.एन. 9781947697881. 
 6. ^ जोशी, महादेवशास्त्री. भारतीय संस्कृती कोष खंड चौथा (१९७३). 
 7. ^ डॉ. काणे पांडुरंग वामन, धर्मशास्त्र का इतिहास (१९७३)
 8. ^ भारतीय संस्कृती कोश खंड चौथा
 9. ^ Claus, Peter J.; Diamond, Sarah; Mills, Margaret Ann (2003). South Asian Folklore: An Encyclopedia : Afghanistan, Bangladesh, India, Nepal, Pakistan, Sri Lanka (en मजकूर). Taylor & Francis. आय.एस.बी.एन. 9780415939195. 
 10. ^ Vāgha, Nirmalā Ha (1991). Amola ṭhevā, Hindū saṇa va sãskāra (mr मजकूर). Morayā Prakāśana. 
 11. a b c Festivals of India (en मजकूर). Vedic Quest. 
 12. ^ Pai-Dhuangat. "Lord Dhanvantari". 
 13. ^ भारतीय संस्कृती कोश खंड चौथा
 14. ^ Singh, Rina (2016-09-27). Diwali (en मजकूर). Orca Book Publishers. आय.एस.बी.एन. 9781459810099. 
 15. ^ डॉ.काणे पांडुरंग वामन,धर्मशास्त्र का इतिहास, चतुर्थ भाग,१९७३
 16. ^ "अभ्यंगस्नान, ‘दिवाळी पहाट’अन् फराळाचा आस्वाद". ७. ११. २०१९. २३. १०. २०१९ रोजी पाहिले. 
 17. ^ धर्मशास्त्राचा इतिहास, चौथा भाग, १९७३ (लेखक - डॉ. पां.वा. काणे)
 18. ^ Murray, Julie (2014-01-01). Diwali (en मजकूर). ABDO Publishing Company. आय.एस.बी.एन. 9781629680675. 
 19. ^ Sharma, Usha (2008-01-01). Festivals In Indian Society (2 Vols. Set) (en मजकूर). Mittal Publications. आय.एस.बी.एन. 9788183241137. 
 20. ^ Devare, Aparna (2013-04-03). History and the Making of a Modern Hindu Self (en मजकूर). Routledge. आय.एस.बी.एन. 9781136197086. 
 21. ^ भारतीय संस्कृती कोश, खंड चौथा
 22. ^ Mukundananda, Swami (2015-01-04). Festivals of India (en मजकूर). Jagadguru Kripaluji Yog. 
 23. ^ भारतीय संस्कृती कोश खंड पहिला
 24. ^ Patterson, Rachel; Roberts, Tracey (2016-06-24). Arc Of The Goddess (en मजकूर). John Hunt Publishing. आय.एस.बी.एन. 9781785353192. 
 25. ^ Vishal, Anoothi (2016-09-25). Mrs LC's Table: Stories about Kayasth Food and Culture (en मजकूर). Hachette India. आय.एस.बी.एन. 9789350095928. 
 26. ^ ठोंबरे, दया (८. ११. २०१५). "गोपूजनाने झगमगत्या दीपोत्सवाचा प्रारंभ". २३. १०. २०१९ रोजी पाहिले. 
 27. ^ "https://www.esakal.com/pune/sakal-diwali-pahat-event-sakal-225512". १८. १०. २०१९. २३. १०. २०१९ रोजी पाहिले. 
 28. ^ "‘दिवाळी पहाट’चे बदलते सूर". ३०. १०. २०१६. २३. १०. २०१९ रोजी पाहिले. 
 29. ^ भूमी आणि स्त्री (२००२) (लेखिका -डॉ.लोहिया शैला)
 30. ^ "लहानांच्या विश्वातला व मोठ्यांच्या आठवणीतला…दिवाळीचा किल्ला !". २३. १०. २०१९. २३. १०. २०१९ रोजी पाहिले. 
 31. ^ "दिवाळीत किल्ले का बांधतात?". ३०. १०. २०१६. २३. १०. २०१९ रोजी पाहिले. 
 32. ^ Kanitkar, Madhav (2008-07-01). Dainandin Dnyaneshwari (mr मजकूर). Diamond Publications. आय.एस.बी.एन. 9788184830989. 
 33. ^ सोन्नर, शामसुंदर (३०.१०.२०१३). "संत साहित्यातील दिवाळी". 
 34. ^ धुंदी, शैलेश (३०.१०.२०१६). "महाराष्ट्र टाईम्स , मेळघाट जपतेय वेगळेपण". 
 35. ^ Chib, Sukhdev Singh (1979). Rajasthan (en मजकूर). Light & Life Publishers. 
 36. ^ Moga, Parminder Singh Grover; Singh, Davinderjit (2011-05-20). Discover Punjab: Attractions of Punjab (en मजकूर). Parminder Singh Grover. 
 37. ^ Vansittart, Eden (1896). Notes on Nepal (en मजकूर). Asian Educational Services. आय.एस.बी.एन. 9788120607743. 
 38. ^ Mittal, J. P. (2006). History Of Ancient India (a New Version) : From 7300 Bb To 4250 Bc, (en मजकूर). Atlantic Publishers & Dist. आय.एस.बी.एन. 9788126906154. 
 39. ^ MD, Laxmi Jain, Tarla Dalal, Manoj Jain. Jain Food: Compassionate and Healthy Cooking, - Vegetarian Cook Book: A Guide to Compassionate, Healt (en मजकूर). MJain.net. आय.एस.बी.एन. 9780977317806. 
 40. ^ भारतीय संस्कृती कोश खंड चौथा
 41. ^ Bansal, Sunita Pant (2005-06). Encyclopaedia of India (en मजकूर). Smriti Books. आय.एस.बी.एन. 9788187967712. 
 42. ^ "फटाके उडवताय? सावधान!". २४. १०. २०१९. २४. १०. २०१९ रोजी पाहिले. 
 43. ^ "सावधान ! फटाके उडवाल तर जेलमधे जाल". २३. १०. २०१९. २४. १०. २०१९ रोजी पाहिले. 
 44. ^ "भारतीय केंद्रशासनाची सार्वजनिक सुट्ट्यांची वार्षिक दिनदर्शिका" (इंग्लिश मजकूर). २५ ऑक्टोबर, इ.स. २०११ रोजी पाहिले. 
 45. ^ "दीपावली" (इंग्लिश मजकूर). युअरसिंगापूर.कॉम. २५ ऑक्टोबर, इ.स. २०११ रोजी पाहिले. 
 46. ^ World Encyclopaedia of Interfaith Studies: World religions (en मजकूर). Jnanada Prakashan. 2009. आय.एस.बी.एन. 9788171392803. 


बाह्यदुवे