झेंडू 'मुळस्थान:-भारतकुळ:- रोझाइंडीका'ही एक शोभेची फुले देणारी औषधी वनस्पती आहे. झेंडूची फुले बहुउपयोगी आहेत. ह्या फुलझाडाची लागवड संपूर्ण भारतात होते. झेंडूचे झाड सुमारे अर्धा ते एक मीटर उंच असते. झेंडूमध्ये पिवळा झेंडू आणि नारिंगी झेंडू हे दोन मुख्य प्रकार आहेत. झेंडूच्या काही जाती मेक्सिकोतून भारतात आल्या आहेत.
मराठी -मखमल किंवा झेंडू; इंग्रजी -मारीगोल्ड; गुजराती -गुलहिरो किंवा मखमला; हिंदी -गेंदा, गुतोरा, कालगा, मखमली; संस्कृत स्थूलपुष्प,संदू, झंडु; शास्त्रीय नाव -Tagetes erecta
आफ्रिकन झेंडू - या प्रकारातील झेंडूची झुडपे उंच वाढतात. झुडूप काटक असते. पावसाळी हंगामात झुडपे १०० सें.मी. ते १५० सें.मी.पर्यंत उंच वाढतात. फुलांचा रंग पिवळा, फिकट पिवळा, नारंगी असतो.या प्रकारात कंकर जॅक, अलास्का, ऑरेंज ट्रेझन्ट, आफ्रिकन डबल मिक्स आणि भारतीय पुसा नारंगी गेंदा, पुसा बसंती गेंदा.या उपजाती आहेत.
फ्रेंच झेंडू - या प्रकारातील झेंडूची झुडपे उंचीला कमी असतात व झुडपासारखी वाढतात. झुडपाची उंची ३० ते ४० सें.मी. असते. फुलांचा आकार लहान-मध्यम असून, अनेक रंगांची फुले असतात. या प्रकारातील जाती कुंडीत, बागेत, रस्त्याच्या दुतर्फा तसेच फुलांचा गालिचा तयार करण्यासाठी, हिरवळीच्या कडा सुशोभीकरणासाठी लावतात. स्प्रे, लेमन ड्रॉप्स, फ्रेंच डबल मिक्स आणि भारतीय पुसा अर्पिता ह्या उपजाती आहेत. संकरित झेंडूच्या पिटाइट, जिप्सी, रेड हेड, इंका ऑरेंज आणि इंका यलो ह्या जाती आहेत.
या फुलझाडाची लागवड भारतभर केली जाते. दसऱ्याच्या दिवशी झेंडूच्या फुलांच्या माळा, दरवाज्याला आणि वाहनांना घालण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे. नवरात्रामधल्या सातव्या दिवशी देवीला झेंडूच्या फुलांच्या माळा घालतात.
झेंडूची फुले चवीला तिखट, कडू आणि तुरट असतात. ती अपस्मार आकडीत उपयोगी आहेत. झेंडूची पाने मुळव्याध, मूत्रपिंडाची दुखणी आणि स्नायूंच्या दुखण्यावर गुणकारी आहेत. फुलांचा रस कानदुखी असल्यास कानात टाकतात. पाने केसतूट आणि कानपुळीत लावण्यासाठी वापरतात.