यक्ष

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

यक्ष (स्त्रीलिंग -यक्षी किंवा यक्षिणी) ही हिंदू पुराणांतील अप्सरा, किन्नर, गंधर्व आणि विद्याधर यांजप्रमाणे, कनिष्ठ देवता असून काही ठिकाणी यक्षांचा वनचर असाही उल्लेख होतो. धन-संपत्तीचे रक्षण करण्यासाठी यक्षांची नेमणूक होत असे. हिंदू पुराणांनुसार वैश्रवण कुबेर हा यक्षाधिपती मानला जातो. अनेक देवळांवरील यक्षांच्या प्रतिमा पाहिल्या तर, ही मंडळी ढेरपोटी आणि आखूड पायाची असावीत, असा समज होतो. यक्ष ही एक अतिमानवी योनी असावी.

कुबेराने नेमून दिलेल्या कामात चूक केल्यामुळे एक वर्षाची शिक्षा भोगणारा एक यक्ष हा कालिदासाच्या मेघदूताचा नायक आहे.
पांडवांच्या अज्ञातवासाच्या काळात त्यांना एका तळ्याचे रक्षण करणारा एक यक्ष भेटतो. त्याने विचारलेल्या अवघड प्रश्नांची उत्तरे भीम अर्जुन, नकुल, सहदेव या चौघांना येत नाहीत. केवळ धर्म (युधिष्ठिर) त्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकतो. आजही सहजासहजी न सुटणाऱ्या अवघड प्रश्नाला यक्षप्रश्न म्हणतात.
पंचतंत्रातल्या एका गोष्टीत झाडावर बसलेल्या एका यक्षाला एका विणकराने स्वतःसाठी आणखी एक डोके आणि अधिकचे दोन हात मागितल्याची गोष्ट आहे.
महाभारतातल्या शिखंडी नावाच्या स्त्रीने स्थूणाकर्ण नावाच्या एका यक्षाला आपला स्त्रीपणा देऊन त्याचे पुरुष असणे थोड्या दिवसापुरते घेतले होते. हे जेव्हा यक्षराज कुबेराला समजले तेव्हा त्याने स्थूणाकर्णाला शिखंडीच्या मृत्यूपर्यंत तो स्त्रीच राहील असा शाप दिला.
पुराणातल्या एका कथेत ब्रह्मदेवाने यक्षाचे रूप घेऊन देवांचे गर्वहरण केले होते.
कुरुक्षेत्राच्या चारही बाजूंना अरंतुक, तरंतुक, मचकुक आणि रामहृद नावाचे यक्ष आहेत, असे महाभारतात सांगितले आहे.
तरंतुकारंतुकयो: यदंतरं रामहृदानांच मचकुकस्यच ।...महाभारत वनपर्व ८३.२०८; शल्यपर्व ५३.२४

रामायण-महाभारत, पुराणे आणि जैन-बौद्ध कथांत आलेल्या काही यक्षांची नावे[संपादन]

अरंतुक, आसारण, करतु, तरंतुक, ताक्ष्य, मचकुक, मणिभद्र (दशकुमारचरितात आलेले नाव), मानस, रथकृत, रामहृद, शतजित, श्रोतायक्ष, सत्यजित्‌, सुप्रतीक (याचे नाव कथासरित्सागरात आले आहे. कुबेराच्या शापाने याचे रूपांतर कारणभूति नावाच्या एका पिशाच्चात झाले होते), सुरूचि, स्थूणाकर्ण.

महाकवी दंडी याने लिहिलेल्या 'दशकुमारचरिता'त दिल्याप्रमाणे मणिभद्र नावाच्या यक्षाला तारावली नावाची मुलगी होती. तिच्या नवऱ्याचे नाव कामपाल.

यक्षिणी[संपादन]

‘उड्डामरेश्वरतन्त्र ’ हे तंत्रशास्त्रातील अत्यंत दुर्मीळ आणि गुप्त तंत्र आहे, साधक याचा उपयोग अतिशय निर्वाणीच्या क्षणी करतात. या तंत्रात यक्षिणींची संख्या ३६ असल्याचे सांगितले आहे.

या छत्तिसांमध्ये ८ प्रमुख यक्षिणी आहेत, त्या अशा :

१. अनुरागिणी २, कनकावती ३. कामेश्वरी ४. नटी ५. पद्मिनी ६. मनोहारिणी ७. रतिप्रिया ८. सुरसुंदरी

८ प्रमुख यक्षिणी धरून एकूण ३६ यक्षिणींची नावे[संपादन]

१. अनुरागिणी, कनकावती, कपालिनी, कलाकर्णी, कामेश्वरी, घंटा,
७. चंद्री, जनरंजिका, नखकेशी, नटी, पद्मिनी, प्रमोदा,
१३. भामिनी, भीषणी, मदना, मनोहरा, महाभया, महेंद्री,
१९. मालिनी, मेखला, रतिप्रिया, लक्ष्मी, वटयक्षिणी, वरयक्षिणी,
२५. विकला, विचित्रा, विभ्रमा, विशालाक्षी, शंखिणी, शतपत्रिका,
३१. शोभा, सुरसुंदरी, सुलोचना, स्मशाना, स्वर्णावती, हंसी (एकूण ३६),