रांगोळी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दीपोत्सव आणि रांगोळी
रांगोळी

रांगोळी भारताची प्राचीन सांस्कृतिक परंपरा आणि लोक-कला आहे. वेगवेगळ्या प्रदेशांत रांगोळीचे नाव आणि तिची शैली यात भिन्नता असू शकते पण या मागे निहित भावना आणि संस्कृतीमध्ये पर्याप्त समानता आहे. रांगोळीची ही विशेषता तिला विविधता देते आणि तिच्या विभिन्न आयामांनाही प्रदर्शित करते. रांगोळीला सामान्यतः सण, व्रत, पूजा, उत्सव विवाह इत्यादी शुभ कार्यांत सुका आणि प्राकृतिक रंगांपासून बनवले जाते. यामध्ये साधारण भूमितीय आकार असू शकतो किंवा देवी देवतांच्या आकृत्या. याचे प्रयोजन सजावट आणि सुमंगल आहे.घरातील स्त्रिया पहाटे रांगोळी काढतात.

संस्कृत भाषेत रांगोळीला रंगवल्ली म्हटले जाते. सौंदर्याचा साक्षात्कार व मंगलाची सिद्धी हे रांगोळीची उद्देश मानले जातात. रांगोळी म्हणजे रंगांच्या सहाय्याने रेखाटलेल्या ओळींपासून तयार झालेली आकृती. भारतीय संस्कृतीमध्ये रांगोळीला बरेच महत्व आहे. मराठी विश्वकोशातील लेखक सुधीर बोराटे यांच्या मतानुसार सण, उत्सव, मंगलसमारंभ, पूजा, कुलाचार, कुलधर्म, संस्कारविधी, व्रतवैकल्ये यांच्याशी सामान्यपणे ही कला निगडित आहे.[१] भारतीय संस्कृती कोशानुसार रांगोळी काढणे ही एक कला आहे आणि तिचा उगम धर्माच्या अनुबंधानेच झाला आहे.[२]

प्राचीनत्व[संपादन]

रांगोळीचा उल्लेख रामायण, महाभारत तसेच वेदांसोबत अनेक ग्रंथांमध्येही आढळतो. माधुरी बापट यांच्या मतानुसार वेदकालात मंडल अथवा चक्र असे शब्द आढळतात.[३] सुमारे एक हजार वर्षांपूर्वी वात्सायनाने लिहिलेल्या कामसूत्र या ग्रंथामध्ये स्त्रियांना अवगत असाव्या अशा चौसष्ट कलांमध्ये रांगोळी या कलेचा सामावेश होतो. डॉ. माधव देशपांडे यांच्या मतानुसार त्या सुमारास रंगावली शब्दाचा प्रथम वापर दिसून येतो.[३] इसवी सनाच्या तिस-या शतकात धान्याचा उपयोग करून रांगोळी काढीत.सरस्वतीच्या मंदिरात तसेच कामदेव व शिवलिंग यांच्या पूजेसाठी विविधरंगी फ़ुलांनीही आकृतिबंधात्मक रांगोळी काढत.वरांग चरित या ग्रंथात (सातवे शतक) पंचरंगी चूर्ण ,धान्ये व फुले यांनी रांगोळीचे चित्रविचित्र आकृतिबंध तयार करीत असल्याचे उल्लेख सांगितले आहे.नलचम्पू ग्रंथात (दहावे शतक) उत्सवप्रसंगी घरापुढे रांगोळी काढीत असल्याचे उल्लेख आहेत. गद्यचिंतामणी ,देशीनाममाला,मानसोल्लास या ग्रंथातही रांगोळीचे संदर्भ सापडतात.[४] "भारतीय रांगोळी" या पुस्तकाच्या लेखिका माधुरी बापट यांच्या मतानुसार अशा प्रकारची कला वस्तुत: आदीम असून तिबेटी लोकातील सँड आर्ट नावाने तसेच आफ्रीकेत आणि नेटीव्ह आमेरीकन लोकातही अशा स्वरुपाची कला दिसून येते.[३] मराठी विश्वकोशातील सुधीर बोराटे यांच्या लेखानुसार, नलचंपूमध्ये (इ. स. दहावे शतक) उत्सवप्रसंगी घरापुढे रांगोळी काढीत असल्याचा उल्लेख आहे. गद्यचिंतामणी (अकरावे शतक) या ग्रंथात भोजनसमारंभात मंगलचूर्णरेखा काढीत, असा उल्लेख आढळतो. हेमचंद्राच्या (अकरा-बारावे शतक) देशीनाममाला या ग्रंथात तांदळाच्या पिठाने रांगोळी काढीत असल्याचा निर्देश आहे. मानसोल्लासात (बारावे शतक) सोमेश्वराने धुलिचित्र या नावाने व श्रीकुमार याने शिल्परत्नात धूलिचित्र किंवा क्षणिकचित्र या नावाने रांगोळीचा निर्देश केला आहे.[१]

उद्देश व प्रतीके[संपादन]

सौंदर्याचा साक्षात्कार व मंगलाची सिद्धी हे रांगोळीचे दोन उद्देश होत.रांगोळीच्या ज्या आकृत्या काढतात त्या प्रतीकात्मक असतात. स्वस्तिक, सूर्य, चंद्र, तारे, चक्र, चक्रव्यूह, त्रिशूळ, वज्र, कलश अशा प्रतीकांचा समावेश असतो.[५] सरळ रेषेपेक्षा वक्र रेषा ही सौंदर्याची विशेष अनुभूती घडविते.रांगोळीचे त्रिदल हे त्रिभुवन,तीन देव,तीन अवस्था आणि त्रिकाळ यांचे म्हणजेच पर्यायाने त्रिधा विभक्त अशा विश्वतत्वाचे प्रतीक असते.शंख,स्वस्तिक,चंद्र,सूर्य ही आणखी प्रतीके होत.साखळी ही नागयुग्माचे,अष्टदल हे अष्टदिशातत्मक विश्वाचे, कमल हे लक्ष्मीचे व प्रजननशक्तीचे प्रतीक असून वैष्णव उपासनेत त्याला विशेष महत्व आहे.याशिवाय एकलिंगतोभद्र,अष्टलिंगतोभद्र,सर्वतोभद्र अशाही रांगोळ्या धर्मकृत्यात काढल्या जातात.प्रतीकांच्या रचना म्हणजे एक प्रकारची सांकेतिक भाषाच असते.प्रत्येक प्रतिकात फार मोठा अर्थ भरलेला असतो.[६]

महत्त्व[संपादन]

प्रत्येक दिवसाला किंवा सणाला वेगवेगळ्या आकाराची रांगोळी काढण्याची प्रथा पूर्वीपासूनच चालत आलेली आहे.चैत्र महिन्यात काढले जाणारे चैत्रांगण ही एक विशेष रांगोळी आहे. पारशी धर्मात रांगोळी ही अशुभ निवारक व शुभप्रद मानली गेली आहे. देवघर, अंगण, उंबरठा तसेच तुळशी जवळ रांगोळी काढली जाते. साधारणता रांगोळीमध्ये स्वस्तिक, गोपद्म, शंख, चक्र, गदा, कमळाचे फुल, बिल्वपत्र, लक्ष्मीची पाऊले, सुर्य देवेतेचे प्रतिक, श्री, कासव इ. मांगल्यसुचक व पवित्र रांगोळ्या काढल्या जातात.एखाद्या व्यक्तीला ओवाळताना ती व्यक्ती बसलेल्या पाटाभोवती आणि पुढेही रांगोळी काढतात.दिवाळीच्या सणात दारापुढे किंवा अंगणात विविध प्रकारच्या रांगोळ्या काढून त्या विविध रंगांनी भरतात.सारवलेल्या जमिनीवर रांगोळीच्या चार रेषा काढल्या जातात.गोपद्मव्रतामधे चातुर्मासात रांंगोळीने गायीची पावले काढणे अशासारखे आचारही परंंपरेने केले जातात.

साहित्य[संपादन]

रांगोळीसाठी रंगीत तांदूळ, कोरडे पीठ, रंगीत वाळू, फुलांच्या पाकळ्या, हळद, कुंकू, गुलाल, यांचाही वापर केला जातो. तबकात पाण्यावर तेलाचा तरंग देऊन त्यावर वरील साहित्य वापरूनही रांगोळी काढली जाते.सध्याच्या काळात शहरांमध्ये गेरूच्या सहाय्याने अगोदर अंगण रंगवून किंवा फरशी बसवली असेल तर त्यावर बाजारात मिळणाऱ्या छापे किंवा कोन यांच्या सहाय्याने रांगोळ्या काढल्या जातात. बाजारात अनेक प्रकाराचे छाप उपलब्ध आहेत.

रांगोळी भुकटी तयार करण्याची पद्धत[संपादन]

डोलोमाइट प्रकारातील एक दगड

डोलोमाइट नावाचा एक प्रकारचा दगड प्रथम भट्टीत भाजून मग त्यास बारीक कुटून व त्यास वस्त्रगाळ करून वा चाळून काढतात.ती बनते रांगोळी.त्यास वेगवेगळ्या प्रकारचे रंग देऊन रंगीत रांगोळी तयार करतात.संगमरवराच्या फॅक्टरीतून ते कापत असताना जी भुकटी तयार होते, ती पण रांगोळी म्हणुन आजकाल वापरतात.

प्रकार[संपादन]

रांगोळीचे आकृतीप्रधान आणि वल्लरीप्रधान असे दोन भेद मानले जातात. आकृतीप्रधान प्रकारात रेषा, वर्तुळ यांचा समावेश असतो तर वल्लरीप्रधान मध्ये वेळी, पाने, फुले यांचे आकार असतात.ठिपक्यांची रांगोळी हा आणखी एक प्रकार.प्रथम भूमीवर मोजून काही ठिपके देतात व ते उभ्या आडव्या रेषांनी जोडून त्यातून मोर,कासव,कमल,वेल इ.आकृती निर्माण करतात. सध्याच्या काळात अनेक धार्मिक, सामाजिक व पर्यावरण विषयकही रांगोळ्या काढल्या जातात. पूर्वी सकाळी सडासंमार्जन केल्यावर अंगणात रांगोळी काढली जायची.

प्रांतानुसार रांगोळी नावे आणि परंपरा[संपादन]

रांगोळी राजस्थानात ‘मांडणा’ ‘सौराष्ट्रात’ ‘सथ्या’, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात ‘चौकपूरना’ किंवा ‘सोनारख्ना’, आंध्र प्रदेशात ‘मुग्गू’, बिहारमध्ये ‘अरिपण’ अथवा ‘अयपन’, तमिळनाडूमध्ये ‘कोलम’, केरळात ‘पुविडल’, ओरिसात ‘झुंटी’, बंगालमध्ये ‘अलिपना’ आणि गुजरातमध्ये ‘साथिया’, कर्नाटकात ‘रंगोली’ व महाराष्ट्रात ‘रांगोळी’ या नावांनी ओळखली जाते.[१]

अलिपना हा एक बंगालचा खास रांगोळीचा प्रकार आहे.त्या रांगोळीत जी चित्रे काढतात त्यावरून तिथल्या लोकांच्या चालीरिती,धार्मिक श्रद्धा, सामाजिक इतिहास,आणि कलात्मक जीवन यांच्यावर प्रकाश पडतो.लग्न मंडपातील अलिपना न्हावीण काढते. कलश आणि देवता यांच्या स्थापनेच्या वेळी त्यांच्या खाली अलिपना रेखाटणे आवश्यक असते.विशिष्ट व्रतांच्या विशिष्ट अलिपना असतात. ताराव्रताची अलिपना तिकडे सर्वात लोकप्रिय आहे.या अलिपनेत वरच्या बाजूला चंद्र,सूर्य, मध्यभागी सोळा तारका,शिवलिंगे आणि पार्वती ,ब्रह्मांड आणि खाली भक्ताचे आसन म्हणून पृथ्वी अशी चित्ररचना असते.माघमंडळ व्रताच्या अलिपनेत विविध रंग वापरतात.भाताची रोपे,धान्य कोठार ,घुबड,कुंकवाची डबी ,नांगर ,विळा,सूर्य,मापटे ही चित्रे वेगवेगळ्या प्रसंगी रेखाटली जाते.मासा मात्र प्रत्येक अलिपनेत असतो कारण तो समृद्धीचे प्रतीक आहे.[७]भारतातील खेडेगावात रांगोळी काढण्या आगोदर ती जागा शेणानी सारून घेतली जाते .


बंगाल येथील अल्पना

साहित्यातील रांगोळी[संपादन]

इ. स. १२७८च्या आसपास पंडित म्हाइंभट सराळेकर रचित लीळाचरित्रात, लीळा २०८ : देमती तुरंगम आरोहणी मध्ये ".... तेथ बाइसाचे भाचे दाएनाएकू होते : तेयापूढें सांघीतलें : मग तेंही सडासंमार्जन करवीलें : चौक रंगमाळीका भरवीलीया : गुढी उभविली : उपाहाराची आइति करविली : आपण घोडें घेउनि साउमे आले :... " असा उल्लेख येतो. खगोलशास्त्र अभ्यासक दा.कृ. सोमण यांच्या मतानुसार यातील '"'रंगमाळीका" हा उल्लेख रांगोळी बद्दल असू शकतो.[८] संत जनाबाई यांच्या 'विठोबा चला मंदिरांत' या अभंगात ' रांगोळी घातली गुलालाची ', असा उल्लेख येतो.[९]

संत एकनाथांच्या गाथेत पुढील प्रमाणे आंगणात काढल्या जाणाऱ्या रांगोळ्यांचे वर्णन येते.

 
रामकृष्ण आले ऐकोनी । उताविळ झाल्या गौळणी ।
रांगोळ्या नानापरी आंगणीं । घालिताती सप्रेमें ॥७८॥
-संत एकनाथ गाथा[१०]

कवि केशवसूत (कृष्णाजी केशव दामले- इ.स. १८८६ ते इस १९०५) यांनी त्यांच्या रांगोळी घालतांना पाहून(विकिस्रोतप्रकल्प दुवा) या कवितेत, मंगल प्रहरी रांगोळी घालणाऱ्या स्त्रीयांचे भावपूर्ण वर्णन केले आहे.

होते अंगण गोमयें सकलही संमार्जिले सुंदर
बालाके आपली प्रभा वितरली नेत्रोत्सवा त्यावर

तीची जी भगिनी अशी शुभमुखी दारी अहा पातली;
रांगोळी मग त्या स्थळी निजकरे घालावया लागली.

आधी ते लिहिले तिने रविशशी, नक्षत्रमाला तदा,
मध्ये स्वस्तिक रेखिले मग तिने आरेखिले गोष्पदा;
पद्मे, बिल्वदले, फुले, तुळसही, चक्रादिके आयुधे,
देवांची लिहिली न ते वगळिले जे चिन्ह लोकी सुधे.
....उर्वरीत कविता वाचन दुवा: रांगोळी घालतांना पाहून (विकिस्रोत बंधूप्रकल्प दुवा)

केशवसूतांच्या रांगोळी घालतांना पाहून कवितेचे समिक्षण करताना प्राध्यापक रामचंद्र श्रीपाद जोग म्हणतात, "दररोज दरवाजापुढे सडासंमार्जन करणाऱ्या हजारो युवतींच्या मनात आणि त्यांनी काढलेल्या रांगोळ्या पाहणाऱ्या तितक्याच व्यक्तींच्या मनात स्वच्छता व सौंदर्यदर्शन या पलिकडे रांगोळ्या पाहून आणखी काही विचार येत नसेल."[११] प्राध्यापक जोग पुढे टिका करताना म्हणतात," त्यात कविने एवढाच आशय न पाहता आणखी काही गंभीर आशय न पाहीला तर तो कवी कसचा ? रांगोळ्यात चंद्र, सूर्य स्वस्तिक, गोष्पदे, चक्रे, कमळे, इत्यादी आकृती येतात. सर्वसाधारण सामान्य स्त्रीला काढता याव्यात अशा त्या आकृती आहेत. त्यांना काही थोडा धार्मिक अर्थ प्रथम असेल. नाही असे नाही. पण आज तो बहुश: विस्मृत झाला आहे. आता सारवलेली जागा मोकळी चांगली दिसत नाही, म्हणून त्यातली एकता काढून टाकण्याकरिता, काढलेल्या आकृती यापेक्षा रांगोळीला विशेष अर्थ नाही." [११]त्यांच्या या टिकेचा विष्णू सखाराम खांडेकरांनी त्यांच्या रेषा आणि रंग या संग्रहात, 'विनोदी लेखक म्हणून जोगांचा काही महाराष्ट्रीय लौकीक नाही. तो असता तर ही टिका हा त्यांच्या विनोदाचा एक प्रकार आहे असे समजून समाधान करून घेतले असते' अशा शब्दात परामर्ष घेतात.[११] विष्णू सखाराम खांडेकरांनी जोगांच्या या टिकेबद्दल पुढे म्हणतात, 'रांगोळीच्या दर्शनाने अंतर्मनातले उदात्तत्व जागृत होण्या इतके किंवा सुंदर कल्पना सुचण्या इतके त्यांचे (जोगांचे) व्यक्तित्व विकसीत झाले असते तर त्यांनी केशवसुतांसारखी काव्येच लिहीली असती.' खांडेकर पुढे म्हणतात, दारात घातलेली रांगोळीपाहून ज्या कल्पना सामान्य माणसांच्या मनात येत नाहीत, त्या केशवसूतांना सुचल्या, हा कबी या नात्याने जोग त्यांचा गुन्हा समजतात की काय ? आता रांगोळी विषयी विशेष धार्मिक कल्पना लोकांच्या मनात राहील्या नाहीत, अर्थात केशवसूतांनी हि कविता जेव्हा लिहिली तेव्हा रांगोळी पवित्र समजली जात असे त्यामुळे जोग सुचवतात तसे केशवसूतांना रांगोळीत दिसलेले दिव्यत्व, सौंदर्य आणि पावित्र्य नैसर्गीक आहे' अशी खांडेकर मांडणी करतात.[११]

चित्रदालन[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ व नोंदी[संपादन]

१. भारतीय संस्कृती कोश खंड सातवा

२. भारतीय संस्कृती कोश खंड सातवा

 1. १.० १.१ १.२ बोराटे, सुधीर ((पुस्तक ज्या वर्षी छापले गेले ते वर्ष)). [[मराठी विश्वकोश]] (मराठी भाषा मजकूर) (ऑनलाईन आवृत्ती.). महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ. आय.एस.बी.एन. (पुस्तकाचा ८-आकडी आय. एस. बी. एन. क्रमांक उदा.-11111111) Check |isbn= value (सहाय्य). २६ रोजी पाहिले.  Unknown parameter |अन्य= ignored (सहाय्य); Unknown parameter |अ‍ॅक्सेसवर्ष= ignored (सहाय्य); Unknown parameter |अ‍ॅक्सेसमहिना= ignored (सहाय्य); Wikilink embedded in URL title (सहाय्य)
 2. भारतीय संस्कृती कोश खंड सातवा
 3. ३.० ३.१ ३.२ बापट, माधुरी ((पुस्तक ज्या वर्षी छापले गेले ते वर्ष)). भारतीय रांगोळी (मराठी भाषा मजकूर). पद्मगंधा प्रकाशन. pp. १५२. आय.एस.बी.एन. 9789382161158. २६ रोजी पाहिले.  Unknown parameter |अन्य= ignored (सहाय्य); Unknown parameter |अ‍ॅक्सेसवर्ष= ignored (सहाय्य); Unknown parameter |अ‍ॅक्सेसमहिना= ignored (सहाय्य)
 4. भारतीय संस्कृती कोश खंड सातवा
 5. तडवळकर, डॉ. नयना ((पुस्तक ज्या वर्षी छापले गेले ते वर्ष)). रांगोळी (मराठी भाषा मजकूर). राजेंद्र प्रकाशन. pp. १५६. आय.एस.बी.एन. 9789384631062. २६ रोजी पाहिले.  Unknown parameter |अन्य= ignored (सहाय्य); Unknown parameter |अ‍ॅक्सेसवर्ष= ignored (सहाय्य); Unknown parameter |अ‍ॅक्सेसमहिना= ignored (सहाय्य)
 6. भारतीय संस्कृती कोश खंड सातवा
 7. जोशी महादेवशास्त्री ,भारत दर्शन -२ (बंगाल),१९८९
 8. http://www.loksatta.com/daily/20070319/raj05.htm
 9. http://www.transliteral.org/pages/z71227205910/view लोकसत्ता १९ मार्च २००७
 10. http://www.transliteral.org/pages/z100202034319/view
 11. ११.० ११.१ ११.२ ११.३ खांडेकर, विष्णू सखाराम ((पुस्तक ज्या वर्षी छापले गेले ते वर्ष)). रेषा आणि रंग (केशवसूत) (मराठी भाषा मजकूर). मेहता पब्लिशिंग हाऊस. २६ रोजी पाहिले.  Unknown parameter |अन्य= ignored (सहाय्य); Unknown parameter |अ‍ॅक्सेसवर्ष= ignored (सहाय्य); Unknown parameter |अ‍ॅक्सेसमहिना= ignored (सहाय्य)