Jump to content

आशा भोसले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आशा भोसले
जन्म आशालता दीनानाथ मंगेशकर
८ सप्टेंबर, १९३३ (1933-09-08)
सांगली, मुंबई प्रांत, ब्रिटिश भारत
मृत्यू १२ एप्रिल, २०२६ (वय ९२)
मुंबई
निवासस्थान प्रभुकुंज अपार्टमेंट, पेडर रोड, दक्षिण मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
पेशा गायक मराठी, हिंदी, गुजराती
कारकिर्दीचा काळ १९४३ पासून
धर्म हिंदु
जोडीदार गणपत राव भोसले, दुसरा विवाह-राहुल देव बर्मन
अपत्ये हेमंत, वर्षा, आनंद
वडील दीनानाथ मंगेशकर
आई शुद्धमती मंगेशकर
नातेवाईक लता मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर
पुरस्कार पद्मविभूषण(२००८), ग्रॅमी पुरस्कार(१९९७), दादासाहेब फाळके पुरस्कार(२०००), महाराष्ट्र भूषण पुरस्कार (२०२१)
संकेतस्थळ
http://www.asha-bhonsle.com/

आशालता गणपत भोसले (८ सप्टेंबर, १९३३ - १२ एप्रिल २०२६) या लोकप्रिय मराठी गायिका होत्या. मराठीसह हिंदी, गुजराती आणि अनेक भाषांतील चित्रपटांत त्यांनी पार्श्वगायन केले आहे.

सुरांच्या साहाय्याने केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील व जगभरातील लोकमनावर अधिराज्य गाजवणारा एक आवाज. त्या गळ्याला गाता येत नाही असे कुठलेच गाणे नाही; तो आवाज चैतन्य निर्माण करू शकत नाही अशी कुठलीच मैफिल नाही: त्या गळ्याला त्याज्य आहे असा कुठलाच संगीत-प्रकार नाही असे म्हणले जाते. [ संदर्भ हवा ]

बालपण

[संपादन]

आशा भोसले यांचा जन्म मंगेशकर कुटुंबातला असून त्यांना मास्टर दीनानाथांचा गाण्याचा वारसा मिळाला. ते कलाकार आणि गायक होते. लता मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर आदी भावंडांचे मार्गदर्शन व त्यांची साथ या सगळ्यांतून आशाताईंचा गळा घडत गेला. दीनानाथ मंगेशकरांचे वडील कऱ्हाडे ब्राह्मण आणि आई देवदासी होत्या. अशा अपत्यांना आता गोमंतक मराठा म्हणतात.

कारकीर्द

[संपादन]

आशा भोसले यांनी चित्रपट गायनाची सुरुवात माझा बाळ या चित्रपटातून केली. १९५० च्या सुमारास त्यांनी हिंदी चित्रपटांतही अनेक गाणी गायली खरी, पण ते चित्रपट विशेष गाजले नाहीत. त्या काळात हिंदी चित्रपटसंगीतावर लता मंगेशकर, शमशाद बेगम, गीता दत्त अशा गायिका राज्य करत होत्या. त्यामुळे आशाताईंना संधी मिळणे अवघड होते. या गायिकांच्या राज्यात राहून, गाऊन, आपले वेगळे अस्तित्त्व निर्माण करण्याचे, स्वतःला सिद्ध करण्याचे फार मोठे आव्हान आशाताईंपुढे होते. या दरम्यान त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अडचणी, मुलांची जबाबदारी, प्रतिकूल परिस्थिती या सगळ्या विपरीत घटकांशी सामना करत करत आशाताईंनी ते आव्हान स्वीकारले आणि ते स्वबळावर, आत्मविश्वासाने यशस्वीपणे पेलून दाखवले.

इ.स. १९५७- इ.स. १९५८ हे वर्ष आशा भोसले यांचेच होते. सचिन देव बर्मन यांच्याकडे गाण्याची संधी त्यांना मिळाली. त्या संधीचे त्यांनी सोने केले. कालाबाजार, लाजवंती, नौ दो ग्यारह, चलती का नाम गाडी, सुजाता हे आणि असे असंख्य चित्रपट त्यांनी आपल्या आवाजाने अजरामर केले. पुढची पाच दशके आशाताईंनी गाजवली. अनेक संगीतकारांबरोबर काम केले. अनेक कवींच्या काव्यरचनांना सुरांचे कोंदण दिले. एवढेच नाही तर आपल्या गाण्यांबरोबर त्या चित्रपटांना, त्यांतल्या अभिनेत्रींनादेखील अजरामर केले.

ओ. पी. नय्यर आणि आशाताई एक अफलातून जोडी होती. इ.स. १९६०च्या सुमारास नय्यर यांचे संगीत असणारे ‘ऑखोसे जो उतरी है दिलमे’ (फिर वही दिल लाया हूॅं ) हे गाणे; इ.स. १९६५चे जाइये आप कहॉं (मेरे सनम); इ.स. १९६८ मधील वो हसीन दर्द देदो (हम साया); चैन से हमको कभी - अशी अनेक प्रसिद्ध गाणी त्यांनी गायली.

राहुल देव बर्मन यांच्याबरोबर काम करताना पिया तू अब तो आजा हे इ.स. १९७१चे कारवॉं चित्रपटातील गीत, इ.स. १९७१ चेच फिल्मफेर पुरस्कार विजेते ‘दम मारो दम’; ‘जाने जा’ हे इ.स. १९७२चे जवानी दिवानीतले गाणे, ही गाणी आशा भोसलेंच्या आवाजाचा नवा बाज दाखवून गेली. इ.स. १९८१चा ‘उमराव जान’ हा चित्रपट आशाताईंमधली गझल गायिका रसिकांसमोर घेऊन आला. आशाताईंचा आवाज, खय्याम यांचे संगीत आणि दिल चीज क्या है, इन ऑंखोंकी मस्तीसारखी शब्दरचना हे सगळेच जमून आले. ‘दिल चीज क्या है’ या गीताला इ.स. १९८१चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. पुढे ‘इजाजत’ चित्रपटातल्या ‘मेरा कुछ सामान’ या त्यांच्या गाण्यालाही इ.स. १९८६चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

हिंदीबरोबर आशा भोसलेंची मराठी गाण्यांची कारकीर्द बहरतच होती. सुधीर फडके, हेमंत कुमार, लता मंगेशकर, सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल अशा गायक-गायिकांबरोबरची गाणी मराठी रसिकमनात घर करून राहिली आहेत. बा. भ. बोरकर, आरती प्रभू, ग. दि. माडगुळकर, शांता शेळके, सुरेश भट, सुधीर मोघे यांच्या कवितांबरोबर सौमित्रसारख्या नव्या दमाच्या कवींच्या कविताही आशाताईंच्याच आवाजात रसिकांपुढे आल्या. सर्व कवींच्या शब्दांना आशाताईंनी सुरेल न्याय दिला. तरुण आहे रात्र अजुनी, जिवलगा राहिले रे दूर, ही वाट दूर जाते, फुलले रे क्षण माझे, झिनी झिनी वाजे, गेले द्यायचे राहूनी, गंध फुलांचा गेला सांगून, आज कुणीतरी यावे, एका तळ्यात होती - अशा लोकप्रिय गीतांची यादी प्रचंड आहे. जसे की, ‘रेशमाच्या रेघांनी’तला लावणीचा ठसका, ‘सैनिक हो तुमच्यासाठी’तला कृतज्ञता भाव, ‘केव्हा तरी पहाटे’तली हुरहुर, ‘जे वेड मजला लागले’ इत्यादी.

त्यांनी ज्यांच्यासाठी गाणी गायली ते संगीतकार, ते गीतकार, त्या अभिनेत्री आणि आशा भोसलेंचा आवाज - या सर्वांच्या परस्परसंबंधांचे संख्यात्मक व गुणात्मकदृष्ट्या वर्णन करणे हे एक अशक्यप्राय काम आहे. त्याचबरोबर आशाताईंनी गायलेली चित्रपटगीते (मराठी, हिंदी व अन्य भाषांतील), भावगीते, गझल, भजने-भक्तिगीते इत्यादी गाण्यांची व संबंधित चित्रपटांची केवळ यादी करायची ठरवली, तरी ते एक आव्हानात्मक काम आहे.

हिंदी चित्रपट गीतांचा विचार करता आशा भोसले यांनी एस.डी.बर्मन यांच्यापासून ते ए.आर. रहमानपर्यंतच्या विविध कालखंडांतील, अनेक प्रकारच्या संगीतकारांबरोबर काम केले आहे. मराठीतही दत्ता डावजेकर-श्रीनिवास खळे यांच्यापासून ते श्रीधर फडके यांच्यापर्यंत असंख्य संगीतकारांच्या रचनांना त्यांनी सुरेल साज चढवला आहे. मधुबाला-मीनाकुमारीपासून ते अलीकडच्या तब्बू-उर्मिला मातोंडकर-ऐश्वर्या रायपर्यंतच्या अभिनेत्रींना त्यांनी आपला आवाज दिला आहे. त्यांनी मोहम्मद रफी, किशोर कुमारसुधीर फडके यांच्याबरोबरचा काळ तर गाजवला आहेच, तसेच त्या आज हृषीकेश रानडे सारख्या तरुण गायकाबरोबरही गात आहेत. आशाताई आजपर्यंत सुमारे ९०० चित्रपटांशी गायिका म्हणून जोडल्या गेल्या आहेत. तसेच त्यांनी १४ भाषांमध्ये १२०००हून अधिक गाणी गायली आहेत.

नाच रे मोरा, आईए मेहेरबाँ, दिव्य स्वातंत्र्य रवी (नाट्यगीत), तनहा तनहा यहाँ पे जीना, जिवलगा राहिले रे दूर घर माझे, रंग दे मुझे रंग दे, सांज ये गोकुळी, जानम समझा करो, मागे उभा मंगेश... ही ‘रेंज’च अफाट आहे, हा आवाकाच अविश्वसनीय आहे. उपशास्त्रीय संगीत, मराठी भावगीते, मराठी-हिंदी चित्रपट गीत्गे, नाट्यगीते, गझली, लावण्या, डिस्को-रॉक-पॉप गाणी, अन्य भाषांतील गाणी - अशा सर्वच प्रकारच्या संगीतामध्ये आशाताई तेवढ्याच ताकदीने गायल्या आहे.

कॅनडा, इंग्लंड, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, स्वीडन आदि अनेक देशांत झालेले कार्यक्रम, परकीय संगीतकारांबरोबर केलेले काम, ‘राहुल ॲंन्ड आय’ सारखा अल्बम, लेस्ली लुईबरोबरचे काम असे अनेक नवनवे प्रयोग आशाताई आजही करतात. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू ब्रेट ली, अभिनेता संजय दत्त यांच्याबरोबर गाण्याचा प्रयोग केला. ‘आशा अँड फ्रेन्ड्‌स’ या अल्बमचा हा प्रयोग कमालीचा यशस्वी ठरला आहे.

मृत्यू

[संपादन]

११ एप्रिल २०२६ रोजी, थकवा आणि फुफ्फुसाच्या संसर्गामुळे भोसले यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची नात जनाई भोसले हिने सोशल मीडियाद्वारे हे उघड केले आणि उपचारादरम्यान अधिक चौकशा किंवा चर्चा न करण्याची विनंती केली.[] दुसऱ्या दिवशी अनेक अंतर्गत अवयव निकामी झाल्यामुळे ('मल्टिपल ऑर्गन फेल्युअर) वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.[][][][]

पुरस्कार

[संपादन]

दो राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, अनेक फिल्मफेअर पुरस्कार, मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार, महाराष्ट्र सरकारचे १५ पेक्षा जास्त पुरस्कार आणि नुकताच इ.स. २००८ मध्ये मिळालेला पद्मविभूषण पुरस्कार - हे महत्त्वाचे पुरस्कार भोसलेंना बहाल करण्यात आले आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार दादासाहेब फाळके पुरस्कार हा २०००-०१ मध्ये देण्यात आला. भारत-पाकिस्तान असोसिएशनचा ‘नाईटिंगेल ऑफ एशिया’ हा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे. तसेच ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान टोनी ब्लेअर यांच्या हस्ते, बी.बी.सी.आकाशवाणीच्या वतीने जीवनगौरव पुरस्कारही त्यांना देण्यात आला.

पुरस्कार प्राप्त नामांकने
फिल्मफेर पुरस्कार २०
ग्रॅमी पुरस्कार
बंगाली फिल्म जर्नलिस्ट्स' असोसिएशन पुरस्कार
महाराष्ट्र राज्य फिल्म पुरस्कार १८ १८
आयफा
स्क्रीन अवॉर्ड्स
झी सिने पुरस्कार
मिर्ची म्युझिक

फिल्मफेअर पुरस्कार

[संपादन]

आशा भोसले यांनी १८ नामांकनांपैकी सात फिल्मफेर सर्वोत्तम महिला पार्श्वगायक पुरस्कार जिंकले आहेत. त्यांनी त्यांचे पहिले दोन पुरस्कार १९६७ आणि १९६८ मध्ये जिंकले, जेव्हा त्यांची मोठी बहीण लता मंगेशकर अजूनही पुरस्कार स्वीकारत असत (लता मंगेशकर यांनी १९६९ नंतर नवीन प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी पुरस्काराच्या नामांकनांसाठी आपला विचार केला जाऊ नये अशी विनंती केली होती.) १९७९ मध्ये पुरस्कार मिळाल्यानंतर, आशा भोसले यांनीही आपल्या बहिणीचे अनुकरण केले आणि यापुढे नामांकनांसाठी त्यांच्या नावाचा विचार केला जाऊ नये अशी विनंती केली. असे असूनही, त्या आजपर्यंत या पुरस्काराच्या सर्वाधिक वेळा विजेत्या आहेत, ज्यामध्ये अलका याज्ञिक यांच्याशी त्यांची बरोबरी आहे. त्यांना नंतर 'रंगीला' चित्रपटासाठी विशेष पुरस्कार आणि २००१ मध्ये जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला.[]

वर्ष श्रेणी गाणे/नामांकन निकाल
१९६७ सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका गरिबाें की सुनो– दस लाख विजयी
१९६९ सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका परदे में रहने दो – शिकार विजयी
१९७२ सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका जिंदगी एक सफर है सुहाना – अंदाज नामांकन
१९७२ सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पिया तू अब तो आजा विजयी
१९७३ सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका दम मारो दम विजयी
१९७४ सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका जब अंधेरा होता है - राजा रानी नामांकन
१९७४ सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका हंगामा हो गया - अनहोनी नामांकन
१९७४ सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका होने लगी है रात जवान – नैना विजयी
१९७५ सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका अच्छे समय पर तुम - बिदाई नामांकन
१९७५ सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका ये हवस है तू क्या जाने – हवस नामांकन
१९७५ सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका चोरी चोरी सोला सिंगार - मनोरंजन नामांकन
१९७५ सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका चैन से हमको कभी – प्राण जाए पर वचन ना जाए विजयी
१९७६ सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका कल के अपने – अमानुष नामांकन
१९७६ सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका सपना मेरा टूट गया - खेल खेल में नामांकन
१९७७ सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका आय लव्ह यू – बारूद नामांकन
१९७८ सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका लायी कहाँ है जिंदगी – टैक्सी टैक्सी नामांकन
१९७९ सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका ओ साथी रे - मुकद्दर का सिकंदर नामांकन
१९७९ सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका ये मेरा दिल - डॉन विजयी
१९९६ फिल्म फेर विशेष पुरस्कार रंगीला विजयी
२००१ फिल्म फेर लाइफ टाइम अवार्ड विजयी

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

[संपादन]

बेंगॉल फिल्म जर्नलिस्ट्स असोसिएशन (BFJA) पुरस्कार

[संपादन]
वर्ष श्रेणी चित्रपट निकाल
१९६६ बीएफजेए (BFJA) सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार (हिंदी) वक्त विजयी
१९६७ बीएफजेए (BFJA) सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार (हिंदी) तीसरी कसम विजयी
१९७१ बीएफजेए (BFJA) सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार (बंगाली) मेघ कालो विजयी
१९८७ बीएफजेए (BFJA) सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार (हिंदी) एक पल विजयी

महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार

[संपादन]

आशा भोसले या मराठी चित्रपटसृष्टीतील महान पार्श्वगायिका होत्या. त्यांनी सर्वाधिक गाणी मराठी भाषेत गायली आहेत. त्यांना तब्बल १८ वेळा "महाराष्ट्र राज्य चित्रपट सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार" देऊन सन्मानित करण्यात आले आहे, जो एक विक्रम आहे.

इतर पुरस्कार

[संपादन]
राष्ट्रपती श्रीमती प्रतिभा देवीसिंह पाटील ५ मे २००८ रोजी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवन येथे आयोजित एका समारंभात प्रसिद्ध पार्श्वगायिका डॉ. (श्रीमती) आशा भोसले यांना 'पद्मविभूषण' प्रदान करताना
  • १९८७ : नाईटिंगेल ऑफ एशिया
  • १९८९ : मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार
  • १९९७ : लिगसी विथ उस्ताद अली अकबर खान साठी ग्रॅमी पुरस्कार नामांकन
  • १९९७ : जानम समझा करो साठी स्क्रीन व्हिडिओकॉन पुरस्कार
  • १९९७ : जानम समझा करो साठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा एमटीव्ही (MTV) पुरस्कार
  • १९९७ : जानम समझा करो साठी चॅनेल व्ही पुरस्कार
  • १९९९ : आंतरराष्ट्रीय संगीतातील योगदानासाठी स्क्रीन पुरस्कार[]
  • १९९९ : महाराष्ट्र सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार
  • २००० : दादासाहेब फाळके पुरस्कार
  • २००० : सिंगर ऑफ द मिलेनियम (दुबई)
  • २००० : कोल्हापुरी भूषण पुरस्कार
  • २००० : सांगली भूषण पुरस्कार
  • २००० : ओमेगा एक्सलन्स जीवनगौरव पुरस्कार
  • २००० : 'तक्षक' चित्रपटातील मुझे रंग दे साठी झी गोल्ड बॉलिवूड पुरस्कार
  • २००१ : कमबख्त इश्क साठी एमटीव्ही (MTV) पुरस्कार
  • २००१ : दयावती मोदी पुरस्कार
  • २००२ : झी सिने - हॉल ऑफ फेम पुरस्कार
  • २००२ : जीवनगौरव पुरस्कार
  • २००२ : राजर्षी शाहू पुरस्कार
  • २००२ : 'लगान' चित्रपटातील राधा कैसे ना जले साठी झी सिने पुरस्कार
  • २००२ : 'लगान' चित्रपटातील राधा कैसे ना जले साठी स्क्रीन व्हिडिओकॉन पुरस्कार
  • २००२ : 'लगान' चित्रपटातील राधा कैसे ना जले साठी सॅन्सुई मुव्ही पुरस्कार
  • २००२ : आयफा (IIFA) सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार
  • २००२ : स्टार स्क्रीन सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार
  • २००२ : बीबीसी (BBC) जीवनगौरव पुरस्कार (ब्रिटनचे पंतप्रधान टोनी ब्लेअर यांच्या हस्ते प्रदान)
  • २००३ : भारतीय संगीतातील उत्कृष्ट योगदानासाठी स्वरालय येसुदास पुरस्कार
  • २००४ : फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI) तर्फे 'लिव्हिंग लीजेंड' पुरस्कार
  • २००५ : एमटीव्ही इमीज, आज जाने की जिद ना करो साठी सर्वोत्कृष्ट महिला पॉप कलाकार
  • २००५ : संगीतातील सर्वात स्टायलिश व्यक्ती (मोस्ट स्टायलिश पीपल इन म्युझिक)
  • २००८ : पद्मविभूषण पुरस्कार
  • २०११ : आयफा (IIFA) जीवनगौरव पुरस्कार
  • २०१२ : १८ वा वार्षिक कलर्स स्क्रीन जीवनगौरव पुरस्कार
  • २०१२ : मिर्ची म्युझिक अवॉर्ड्स जीवनगौरव पुरस्कार
  • २०१३ : पंडित हृदयनाथ जीवनगौरव पुरस्कार
  • २०१४ : ग्लोबल इंडियन म्युझिक अकॅडमी अवॉर्ड्स (GiMA) तर्फे म्युझिक लिव्हिंग लीजेंड अवॉर्ड
  • २०१४ : दुबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (DIFF) मध्ये भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल जीवनगौरव पुरस्कार
  • २०१८ : यश चोप्रा मेमोरियल पुरस्कार
  • २०१८ : दीनानाथ मंगेशकर पुरस्कार
  • २०१८ : बंग विभूषण पुरस्कार (पश्चिम बंगालचा सर्वोच्च नागरी पुरस्कार)
  • २०२१ : महाराष्ट्र भूषण पुरस्कार

सन्मान

[संपादन]
  • अमरावती आणि जळगाव विद्यापीठाकडून साहित्यातील मानद डॉक्टरेट.
  • जोधपूर नॅशनल युनिव्हर्सिटीची पहिली 'डॉक्टर ऑफ लिटरेचर' (D.Litt.) पदवी आशा भोसले यांना मिळाली आहे.
  • आशा भोसले यांना 'फ्रेडी मर्क्युरी अवॉर्ड'ने देखील सन्मानित करण्यात आले आहे.
  • आशा भोसले यांना 'सूर सिंगर पुरस्कार' मिळाला आहे.
  • बर्मिंगहॅम फिल्म फेस्टिव्हलने नोव्हेंबर २००२ मध्ये त्यांना विशेष श्रद्धांजली वाहिली.
  • गेल्या ५० वर्षांतील पहिल्या २० संगीत आयकॉन्समध्ये आशा भोसले यांचा समावेश होता.
  • २०११ मध्ये, 'द एशियन अवॉर्ड्स'मध्ये 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स'ने अधिकृतपणे आशा भोसले यांची संगीत इतिहासातील सर्वाधिक गाणी रेकॉर्ड करणाऱ्या कलाकार म्हणून दखल घेतली. १९४३ पासून २० हून अधिक भारतीय भाषांमध्ये ११,००० हून अधिक सोलो, ड्युएट आणि कोरस गाणी रेकॉर्ड केल्याबद्दल त्यांना सेबॅस्टियन को यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. या कार्यक्रमात त्यांना जीवनगौरव पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले.
  • ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन मिळालेल्या आशा भोसले या पहिल्या भारतीय गायिका आहेत.

आशा भोसले पुरस्कार

[संपादन]

२००२सालापासून आशा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त, चित्रपट संगीतात लक्षणीय कामगिरी करणाऱ्या पार्श्वगायकास, अखिल भारतीय नाट्य परिषद (पिंपरी चिंचवड शाखा) आणि काही अन्य संस्थांच्या वतीने ’आशा भोसले पुरस्कार’ दिला जातो. एक लाख अकरा हजार रुपये रोख व एक स्मृती चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. २०१३सालापर्यंत हा पुरस्कार लता मंगेशकर, संगीतकार खय्याम, रवींद्र जैन, बप्पी लाहिरी, उषा मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर, लक्ष्मीकांत प्यारेलाल जोडीतले प्यारेलाल, कल्याणजी आनंदजीमधले आनंदजी, अन्नू मलिक, शंकर महादेवन, शिवकुमार शर्मा, सुरेश वाडकर, हरिहरन आणि सोनू निगम यांना मिळाला आहे.[][१०]

पुस्तके

[संपादन]

आशा भोसले यांच्या सांगीतिक आयुष्यावर अनेक पुस्तके आहेत त्यांपैकी काही ही :-

  • Asha Bhosale : A Musical Biography (इंग्रजी, राजू भारतन)

आशा भोसले यांच्यावरील लेख असलेली पुस्तके

[संपादन]
  • आशा भोसले : नक्षत्रांचे देणे (संपादक - वामन देशपांडे, मोरया प्रकाशन)
  • खय्याम (विश्वास नेरुरकर)
  • नामांकित (डाॅ. अनघा केसकर)
  • मंगेशकर - स्वरांचा कल्पवृक्ष (प्रभाकर तांबट)
  • सुरा मी वंदिले (कृष्णकुमार गावंड)

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. "Asha Bhosle hospitalised due to chest infection, says her granddaughter". Deccan Herald. 11 April 2026 रोजी पाहिले.
  2. "भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड". लोकमत. 12 April 2026. 12 April 2026 रोजी पाहिले.
  3. Farzeen, Sana (2026-04-12). "Asha Bhosle, playback icon, dies at 92 in Mumbai". India Today (इंग्रजी भाषेत). 12 April 2026 रोजी पाहिले.
  4. "Asha Bhosle: The sound of Bollywood dies aged 92". BBC. 12 April 2026 रोजी पाहिले.
  5. ""Asha Bhosle Died Due To Multiple Organ Failure": Breach Candy Hospital". NDTV. 12 April 2026 रोजी पाहिले.
  6. "Asha Bhosle Awards & Nominations List".
  7. "Asha Bhosle Awards & Nominations List".
  8. "Award Winners". Screen. 22 October 1999 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2 October 2019 रोजी पाहिले.
  9. "मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेचा 'आशा भोसले' पुरस्कार पार्श्वगायक शान यांना जाहीर". ईटीव्ही भारत. २०२६-०४-१३ रोजी पाहिले.
  10. "पिंपरी चिंचवड नाट्य परिषदेचा आशा भोसले पुरस्कार रूपकुमार राठोड यांना जाहीर Pune Marathi News". दैनिक लोकमत. २०२६-०४-१३ रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिक्वोट
विकिक्वोट
आशा भोसले हा शब्द/शब्दसमूह
विकिक्वोट, या मुक्त मराठी अवतरणकोशात पाहा.