कोजागरी पौर्णिमा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
कोजागरीचा चंद्र

आश्विन पौर्णिमा ही कोजागरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. ही शरद ऋतूतील आश्विन महिन्यात येते. कृषी संस्कृतीत ह्या दिवसाला विशेष महत्व आहे. [१]इंग्रजी महिन्याप्रमाणे कोजागरी पौर्णिमा बहुधा ऑक्टोबरमध्ये असते. कोजागरी हा शब्द मराठीत, अनेकजण ‘कोजागिरी’ असा उच्चारतात आणि लिहितात.

प्राचीनत्व[संपादन]

आश्विन पौर्णिमेस होणारा प्राचीन लोकोत्सवाला वात्स्यायनाने कौमुदीजागर व वामन पुराणाने दीपदानजागर म्हटले आहे. बौद्धकाळात हा उत्सव कशा प्रकारे साजरा होत असे, त्याचे वर्णन उन्मादयंती जातकावरून कळते. या दिवशी बळीराजाची पूजा करावी असे वामन पुराणात सांगितले आहे.[२]

खगोलशास्त्रदृष्ट्या महत्व[संपादन]

या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो. आश्विन महिन्यात मध्यरात्रीला असणाऱ्या पौर्णिमेलाच कोजागरी पौर्णिमा म्हणतात. तशी पौर्णिमा आली नाही तर दुसऱ्या दिवशीच्या पौर्णिमेला कोजागरी पौर्णिमा समजले जाते. ज्या दिवशी पौर्णिमा पूर्ण होत असेल त्या दिवशी नवान्न पौर्णिमा साजरी केली जाते.

धार्मिक महत्व[संपादन]

या दिवशी करायच्या व्रतात रात्री लक्ष्मीची व म्हशीवर बसलेल्या बळीराजा ची पूजा करतात. उपोषण, जन व जागरण या तीनही अंगांना या व्रतात सारखेच महत्त्व आहे. या रात्री मंदिरे, घरे, उद्याने, रस्ते इ. ठिकाणी दिवे लावतात (????). या रात्री जितके दिवे लावावे, तितके कल्प मानवाला सूर्यलोकात प्रतिष्ठा मिळते असे शास्त्र सांगते. या व्रतात रात्रीच्या पहिल्या प्रहरी लक्ष्मी व बळीराजा यांच्या प्रतिमांची पूजा करतात व मग त्या दोघांना पुष्पांजली समर्पित करतात. अशी पूजा झाल्यावर पोहे व नारळाचे पाणी देव-पितरांना समर्पून व आप्तेष्टांना देवून स्वत: सेवन करतात. चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवतात. दुस-या दिवशी प्रात:काळी बळीराजा-लक्ष्मीची पूजा करून व सर्वांना भोजन घालून पारणा करतात. अशी आख्यायिका सांगतात की उत्तररात्री साक्षात लक्ष्मीदेवी येऊन (संस्कृतमध्ये) 'को जागर्ति' (म्हणजे 'कोण जागत आहे') असे विचारते, म्हणून या दिवसाला 'कोजागरी पौर्णिमा' म्हणतात.

ब्रह्मपुराणत या व्रताची कृत्ये थोडी निराळी सांगितली आहेत. रस्ते झाडावेत. घरे सुशोभित करावीत. दिवसा उपवास करावा. गृहद्वाराजवळ अग्नी प्रज्वलित करून त्याची पूजा करावी. चंद्राची पूजा करून त्याला दूध व खिरीचा नैवेद्य दाखवावा. भार्येसह रुद्र, स्कंद, नंदीश्वर ज्यांच्याकडे गायी असतील त्यांनी सुरभी, मेंढे बाळगणार्‍यांनी वरुण, हत्ती बाळगणार्‍यांनी विनायक व घोडे बाळगणार्‍याण्नी रेवंत व निकुंभ या देवतांची पूजा करावी. या रात्री ज्येष्ठ अपत्याला औक्षण करण्याची प्रथाही प्रचलित असल्याचे दिसते.[३]

सांस्कृतिकदृष्ट्या महत्व[संपादन]

मसाला दूध नैवेद्य
पौर्णिमेचा चंद्र

या दिवशी दूध आटवून त्यात केशर, पिस्ते, बदाम, चारोळ्या (?), वेलदोडे, जायफळ, साखर वगैरे गोष्टी घालून, लक्ष्मीदेवीला नैवेद्य दाखविला जातो. दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू देतात आणि ते दूध मग प्राशन केले जाते. उत्तररात्रीपर्यंत जागरण केले जाते. या दिवशी प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ अपत्याला ओवाळून त्याची किंवा तिची 'आश्विनी' साजरी करतात. आश्विन महिन्यात पावसाळा संपून आकाश निरभ्र होते. अशावेळी इष्ट मित्रांसह चांदण्या रात्रीची मौज अनुभवता यावी, म्हणून हा उत्सव प्रचारात आला असावा.[४] कोजागरीच्या रात्री लोकांना चांदण्याचा आनंद मिळावा म्हणून अनेक शहरांतील म्युनिसिपालट्या रस्त्यावरचे दिवे लावत नाहीत.

प्रांतानुसार[संपादन]

कोजागरी पौर्णिमा गुजरातमध्ये रासगरबा खेळून 'शरद पुनम' नावाने साजरी केली जाते. बंगाली लोक याला लोख्खी पुजो म्हणतात व या दिवशी लक्ष्मीची पूजा करतात. मिथिलेमध्ये या रात्री कोजागरहा पूजा केली जाते. राजस्थानी स्त्रिया या दिवशी शुभ्र वस्त्र नेसून चांदीचे दागिने घालतात. धार्मिक वृत्तीचे राजपूत या रात्री चंद्राची पूजा करून शेतकऱ्यांना शर्करायुक्त दूध देतात. हरियाणामध्ये आश्विन पौर्णिमेला दुधाची खीर बनवून ती रात्री चांदण्यात ठेवतात व सकाळी खातात.[५]

हेही पहा[संपादन]

बाह्यदुवे[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
  1. Bansal, Sunita Pant (2005-06). Encyclopaedia of India (en मजकूर). Smriti Books. आय.एस.बी.एन. 9788187967712. 
  2. भारतीय संस्कृती कोश खंड दुसरा
  3. भारतीय संस्कृती कोश खंड दुसरा
  4. भारतीय संस्कृती कोश खंड दुसरा
  5. हरित हरियाणा