लक्ष्मी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लक्ष्मी
Ravi Varma-Lakshmi.jpg
राजा रविवर्मा यांनी चितारलेले लक्ष्मीचे चित्र

ऐश्वर्य, समृद्धी - इत्यादींची अधिपती देवता

मराठी लक्ष्मी
संस्कृत लक्ष्मीः
कन्नड ಲಕ್ಷ್ಮಿ
तमिळ திருமகள்
निवासस्थान वैकुंठ, क्षीरसागर
लोक देवलोक
वाहन कमळ
पती विष्णु
अन्य नावे/ नामांतरे पद्मा, कमला, पद्मप्रिया, पद्मानना, पद्माक्षी, इंदिरा, रमा, चंचला, श्री
मंत्र श्री महालक्ष्मै नमः
नामोल्लेख महाभारत
तीर्थक्षेत्रे कोल्हापूर

लक्ष्मी ही हिंदू देवमंडळातील ऐश्वर्य, समृद्धी, सौंदर्य यांची अधिष्ठात्री देवी आहे. पौराणिक आख्यायिकेनुसार समुद्रमंथनातून तिची उत्पत्ती झाली. ती विष्णूची पत्नी असून विष्णूच्या रामावतारात सीता म्हणून, कृष्णावतारात रुक्मिणी म्हणून अवतार घेऊन विवाह केला. लक्ष्मी ची आद्र्रा व हिरण्मयी ही अजून नावे आहेत. भारतात कलश हे समृद्धीचे आणि पर्यायाने लक्ष्मीचेच प्रतीक समजले जाते. लक्ष्मीच्या परिवारामध्ये अदिति-निर्ऋति. पृथिवी, शची, राका, सिनीवाली, कुहू, सरमा तसेच यात देवसखा (कुबेर), कीर्ति आणि मणि (म्हणजे यक्ष मणिभद्र) यांचा समावेश आहे. चिक्लीत आणि कर्दम हे तिचे पुत्र होत. बिल्व वृक्ष हा लक्ष्मीचा वृक्ष आहे. लक्ष्मीच्या उपासनेत वेदकाळापासून आजपर्यंत खंड पडलेला दिसत नाही.

ऐतिहासीक[संपादन]

वेदातील श्रीसूक्त यात लक्ष्मीचा उल्लेख आहे. श्रीसूक्त यावर शौनकऋषी लिखित बृहत्देवता या ग्रंथामध्ये या सूक्तावर टीका आहे. सूक्तकारांची इच्छा लक्ष्मीच्या आश्रयाने अलक्ष्मीचा नाश व्हावा अशी आहे (ऋचा ५). मार्कण्डेय पुराणातील दुर्गासप्तशतीत भीमा या महालक्ष्मीच्या अवताराचे वर्णन आले आहे. खिलसूक्तात विष्णुपत्नीचा उल्लेख येतो. मौर्य-शुङग काळात लक्ष्मीची रुपे कोरली गेली. सांची येथे बौद्ध शिल्पात अभिषेक लक्ष्मी दिसून येते. दोन हातांत दोन कमळे घेऊन उभ्या असलेल्या लक्ष्मीवर दोन बाजूला उभे असलेले हत्ती कुंभातून अभिषेक करीत असल्याचे दाखविले दिसते. दुसऱ्या शिल्पात कमळावर लक्ष्मी उभी असून तिच्या दोन्ही हातांत कमळे आहेत असे कोरीवकाम दिसून येते. या शिल्पात् हत्ती हे मेघाचे प्रतीक असून लक्ष्मीने हातात धरलेली कमळे व ती उभी असलेले कमळ ही सर्व सर्जनाची प्रतीके आहेत असे मानले जाते. पितळखोरे लेणे येथे ही लक्ष्मीचे शिल्प आढळते. कुषाण आणि गुप्तकाळात लक्ष्मीचे ठसे असलेली नाणी दिसून येतात.

लक्ष्मीची नावे[संपादन]

 • सुवर्णा
 • हरिणी
 • हिरण्यावर्णा
 • आदित्यवर्णा
 • पद्मवर्णा
 • पिङगला
 • प्रभासा
 • यशसा
 • ज्वलन्ती
 • पद्मिनी
 • पुष्करिणी
 • हेममालिनी
 • हिरण्यरजतस्र्रजा
 • अश्वपूर्वा
 • रथमध्या
 • हस्तिनादप्रबोधिनी
 • गंधद्वारा
 • नित्यपुष्टा
 • करीषिणी
 • चन्द्रालक्ष्मी