Jump to content

हरितालिका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हरितालिका हे हिंदू धर्मातील महिलांसाठी आणि कुमारिकांसाठी सांगितलेले एक धार्मिक व्रत आहे.[१][२] 'हरिता' म्हणजे 'जिला नेले ती' आणि 'लिका' म्हणजे 'सखी'. पार्वतीला शिवप्राप्तीसाठी सखी तपश्चर्येला घेऊन गेली म्हणून पार्वतीला 'हरितालिका' असे म्हणतात. हरितालिका कथा ही भविष्य पुराणातील हरगौरीसंवादात आली आहे.[३]

शिवा भूत्वा शिवां यजेत् |

या भावनेने हरितालिकेची पूजा करावी.[४]

हरितालिका मूर्ती

कथा,आख्यायिका[संपादन]

पूर्वकाली पर्वतराजाची कन्यापार्वती ही उपवर झाली व नारदाच्या सल्ल्याने तिच्या पित्याने तिचा विवाह विष्णूशी करण्याचा बेत केला. परंतु पार्वतीच्या मनात शंकराला वरण्याचे असलाने तिने आपल्या सखीकडून पित्यास निरोप पाठविला की, ‘तुम्ही मला विष्णूच्या पदरी बांधल्यास मी प्राणत्याग करीन’. इतक्यावरच ती थांबली नाही तर आपल्या सखीच्या मदतीने ती घरातून पळून गेली व शिवाचा लाभ व्हावा म्हणून एका अरण्यात जाऊन शिवलिंगाची पूजा आरंभली.त्या दिवशी भाद्रपद मासातील तृतीया होती व हस्त नक्षत्र होते.पार्वतीने शिवलिंगाची पूजा केली आणि दिवसभर कडकडीत उपवास करून जागरण केले.तिच्या तपाने शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी पार्वतीच्या विनंतीला मान देऊन पत्नी म्हणून तिचा स्वीकार केला अशी आख्यायिका आहे.[१]

व्रतामागील आशय[संपादन]

शिवपार्वती किंवा उमा महेश्वर ही जगताची माता-पिता म्हणून ओळखले जातात.स्त्रीतत्त्व आणि पुरुष तत्त्व यांच्या मेळणीतून विश्वाची निर्मिती झाली आहे म्हणून आपण या तत्त्वांचे पूजन करतो.आदिशक्तीच्या पूजनातून तेचे प्रकटन आपल्यात व्हावे म्हणून प्रार्थना करायची.[४]

पूजाविधी[संपादन]

वाळूचे शिवलिंग करून त्याची पूजा करतात किंवा सखी आणि पार्वती यांची शिवलिंगासहित मूर्ती आणून त्यांचीही पूजा करण्याची पद्धती प्रचलित आहे.[५] संकल्प,सोळा उपचार पूजन,सौभाग्यलेणी अर्पण, नैवेद्य,आरती व कथावाचन असे या पूजेचे सामान्यत: स्वरूप असते.व्रतराज या ग्रंथामध्ये या व्रताचे वर्णन आढळते.[६] महिला रात्री जागरण करतात, खेळ खेळतात आणि देवीची आराधना करतात.[७] दुस-या दिवशी रुईच्या पानाला तूप लावून ते चाटता आणि नंतर महिला आपला उपवास सोडतात.[४][८]

हरितालिका पूजा

प्रांतानुसार[संपादन]

हरितालिका हे व्रत भारतभरात केले जाते. पार्वतीसारखाच आपल्यालाही चांगला नवरा मिळावा म्हणून दक्षिण भारतात अनेक ब्राह्मण कुमारिका हे व्रत करतात. हे व्रत भाद्रपद शुद्ध तृतीयेला केले जाते. या दिवशी उपास करून गौरी आणि तिची सखी यांच्या मातीच्या मूर्तींची पूजा केली जाते. गुजराथमध्ये किंवा बंगालमध्ये हरितालिका नसते. तमिळनाडूमध्ये माघ शुद्ध द्वितीयेपासून तीन दिवस गौरी उत्सव चालतो. तेथे कुमारिका आभि सौभाग्यवती स्त्रियाही हे व्रत करतात. महाराष्ट्रामध्ये अनेक विवाहित स्त्रियां आणि विधवा स्त्रियांही हे व्रत करतात. उत्तर भारतात[९] महिला हे व्रत करतात तसेच काशी प्रांतातही हे व्रत केले जाते.[१०] महाराष्ट्रात सिंधुदुर्ग किनारपट्टी, गोवा राज्यातही हे व्रत केले जाते.[११] भारताच्या बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, राजस्थान या प्रांतातही हे व्रत महिला करतात.[१२]

हे सुद्धा पहा[संपादन]

भाद्रपद

संदर्भ[संपादन]

 1. ^ a b Kaushik, Jai Narain (2002). Hamare Teej-Tyohar Aur Mele (हिंदी भाषेत). Star Publications. ISBN 9788185244679.
 2. ^ Sinha, Mridula (101-01-01). Patnim Manormam Dehi... (हिंदी भाषेत). Prabhat Prakashan. ISBN 9789353225049. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
 3. ^ "Hartalika Vrat Katha in Marathi: हरतालीका व्रताची कहाणी". Maharashtra Times. 2023-09-18 रोजी पाहिले.
 4. ^ a b c ज्ञान प्रबोधिनी संस्कार माला (२०१५). हरितालिका पूजा. पुणे: ज्ञान प्रबोधिनी संस्कृत संस्कृती संशोधिका.
 5. ^ Sharma, Rajesh. Vrat Parva Aur Tyohar (हिंदी भाषेत). Diamond Pocket Books (P) Ltd. ISBN 9788171829354.
 6. ^ भारतीय संस्कृती कोश खंड दहावा
 7. ^ "Hartalika 2021 हरितालिका तृतीया : 'असे' करा व्रत; जाणून घ्या आरती आणि कथा". Maharashtra Times. 2021-09-08 रोजी पाहिले.
 8. ^ Bāpaṭaśāstrī, Kr̥ Ma (1983). Svayampurohita: Vedokta āṇi Purāṇokta. Gajendra Viṭṭhala Raghuvaṃśī.
 9. ^ Uttara Pradeśa (हिंदी भाषेत). Sūcanā evam Jana Samparka Vibhāga, Uttara Pradeśa. 1988-02. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
 10. ^ Miśrā, Sīmā (2010). Kāśī meṃ Śiva-pūjā (हिंदी भाषेत). Kiśora Vidyā Niketana.
 11. ^ "अनन्यसाधारण महत्त्व असलेलं 'हरितालिके'चं व्रत का करतात?". २९. ८. २०१९. ३०. ८. २०१९ रोजी पाहिले. |access-date=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
 12. ^ "Hartalika Teej 2020 Vrat Vidhi in Marathi हरितालिका तृतीया : 'असे' करा व्रत; जाणून घ्या मुहूर्त, कहाणी व आरती". Maharashtra Times. 2021-09-08 रोजी पाहिले.