मास्टर कृष्णराव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
मास्टर कृष्णराव
टोपणनावे मास्तर कृष्णराव / मास्तर कृष्णा / कृष्णा मास्तर
आयुष्य
जन्म जानेवारी २०, १८९८
जन्म स्थान आळंदी, पुणे, भारत
मृत्यू ऑक्टोबर २०, १९७४
मृत्यू स्थान पुणे, भारत
मृत्यूचे कारण वृद्धापकाळ
व्यक्तिगत माहिती
धर्म हिंदू
नागरिकत्व भारतीय
मूळ_गाव फुलंब्री, मराठवाडा
देश भारत ध्वज भारत
भाषा मराठी
पारिवारिक माहिती
आई मथुरा
वडील गणेशपंत
जोडीदार राधाबाई
अपत्ये माधव उर्फ राजा फुलंब्रीकर, वीणा चिटको, अनुपमा सुभेदार
संगीत साधना
गुरू पं. भास्करबुवा बखले
गायन प्रकार हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत
संगीत कारकीर्द
कार्य शास्त्रीय गायक, संगीत नट, संगीतकार
पेशा गायकी
कार्य संस्था पुणे भारत गायन समाज
विशेष कार्य अध्यक्ष व रागसंग्रहमाला लेखन
गौरव
विशेष उपाधी संगीतकलानिधि
गौरव साहित्य अकादमी रत्न सदस्यत्व, विष्णुदास भावे सुवर्णपदक, बालगंधर्व सुवर्णपदक
पुरस्कार पद्मभूषण

कृष्णाजी गणेश फुलंब्रीकर ऊर्फ मास्टर कृष्णराव ('मास्तर कृष्णराव' हे नाव अधिक प्रचलित) (जानेवारी २०, १८९८ - ऑक्टोबर २०, १९७४) हे हिंदुस्तानी संगीतपद्धतीतील गायक व मराठी संगीतनाटकांमधील गायक-अभिनेते होते. भास्करबुवा बखल्यांचे ते शिष्य होते.

पूर्वायुष्य[संपादन]

मास्तर कृष्णरावांचा जन्म पुणे जिल्ह्यात आळंदी येथे आजोळी झाला. त्यांचे कुटुंबीय देशस्थ यजुर्वेदी ब्राम्हण होते व कृष्णरावांचे वडील गणेशपंत हे वेदपठण करणारे ज्ञानी पंडित होते. त्यांच्या निधनानंतर, गरिबीच्या परिस्थितीत वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी कृष्णरावांनी नाट्यकला प्रवर्तक मंडळी या नाटक मंडळीत बाल गायकनटाचे काम सुरू केले. कृष्णरावांची तब्येत नाजूक होती. आवाजातील गोडी, लवचीकपणा यांमुळे त्यांना काम मिळाले होते. ते 'संत सखू' नाटकात विठोबाची भूमिका करत असत. ह्याच नाटक मंडळीत त्यांना नाटकातील गाण्यांसाठी सवाई गंधर्वांचे मार्गदर्शन लाभले. नाटकाच्या फिरत्या दौऱ्याने सवाई गंधर्वांना मास्टर कृष्णरावांना योग्य प्रकारे शास्त्रोक्त गायनाचे धडे देता येत नव्हते. संगीत शारदा नाटकात कृष्णरावांची भूमिका बघून व गायन ऐकून भास्करबुवा फार खूष होते इ.स. १९१० मध्ये मास्तर कृष्णरावांनी पं. भास्करबुवा बखले यांचे शिष्यत्व स्वीकारले स्वत: सवाईगंधर्वांनी मास्तरांना बुवांकडे सोपवले होते .

सांगीतिक कारकीर्द[संपादन]

आपल्या गुरूंच्या आग्रहास्तव मास्तर कृष्णरावांनी गंधर्व नाटक मंडळींत प्रवेश केला. ते बालगंधर्वांबरोबर मुख्य भूमिका करत असत. ह्या दरम्यान त्यांनी 'संगीत शारदा', 'संगीत सौभद्र', 'एकच प्याला' यांसारख्या अनेक संगीत नाटकांत काही पुरुष - (गायक नट) भूमिका आणि बऱ्याच स्त्री - (गायक नट) भूमिकाही केल्या.

गुरूंच्या निधनानंतर गंधर्व मंडळींच्या नाटकांसाठी संगीत रचना करण्याचे काम मास्तर कृष्णरावांकडे आले. 'सावित्री', 'मेनका', 'आशा-निराशा', 'अमृतसिद्धी', 'संगीत कान्होपात्रा' यांसारख्या नाटकांना संगीत देताना मास्तर कृष्णराव त्यातील प्रमुख अभिनेत्यांना संगीत तालीम देत असत. बालगंधर्वही त्यांना गुरुस्थानी मानायचे.

नंतरच्या काळात त्यांनी 'नाट्य निकेतन'साठी केलेल्या संगीत रचनांमुळे मराठी नाटकांमधील संगीताला एक वेगळी दिशा मिळाली. त्यांनी रचलेली 'कुलवधू', 'एक होता म्हातारा' यांमधील गाणी त्यांतील भाव, गेयता व शब्दसौंदर्यासाठी वाखाणली गेली.

मास्तर कृष्णरावांनी 'धर्मात्मा', 'वहाँ', 'गोपाळकृष्ण', 'माणूस', 'अमरज्योती', 'शेजारी' यांसारख्या चित्रपटांनाही संगीत दिले. त्यांनी संगीत दिलेल्या प्रभात कंपनी निर्मित या व इतर अनेक चित्रपटांतील गाणी खूप गाजली. त्यांनी एकूण १९ चित्रपटांना संगीत दिले. त्यात अत्रे फिल्म्सच्या गाजलेल्या 'वसंतसेना' चित्रपटाचा समावेश आहे तसेच माणिक चित्रसंस्थेच्या 'कीचकवध' चित्रपटाचा समावेश आहे. त्यांनी 'भक्तीचा मळा' व 'मेरी अमानत' चित्रपटांत भूमिकाही केल्या.

संगीत जलशांचे कार्यक्रम करण्यासाठी मास्तर कृष्णरावांनी इ.स. १९२२ ते इ.स. १९५२ दरम्यान भारतभर सातत्याने दौरे केले. त्यांच्या आवाजातील लवचीकता, माधुर्य व आकर्षकपणा यांचा प्रभाव जनमानसावर लगेच पडत असे. त्यांच्या कार्यक्रमांना सर्वसामान्यांबरोबरच रसिक, दर्दी श्रोत्यांची विशेष पसंती व उपस्थिती असे. ते दुर्मिळ आणि लोकप्रिय रागांबरोबरच ठुमरी, नाट्यगीत, भजन व चित्रपटगीतेही प्रभावीपणे सादर करत असत. तसेच नव्या शक्यता पडताळून पाहणे, नवे प्रयोग करणे ही त्यांची खासियत होती. त्यांनी रचलेले 'झिंजोटी' रागातील सामूहिकरीत्या गाता येण्यासारखे 'वंदे मातरम्' वाहवा मिळवून गेले. प्रसन्न, उठावदार व प्रभावी गायन शैलीने ते श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत असत. त्यांनी गायलेल्या गाण्यांची व राग संगीताची ७८ आर पी एम ध्वनिमुद्रणेही प्रकाशित केली गेली.

अखेरच्या कालावधीत त्यांनी बंदिशी व नाट्यगीतांच्या सुरावटींसह रचना असलेली १९ पुस्तके प्रकाशित केली. संगीत रागदारीवरील, गायन व वादन शिक्षणाबद्दलच्या पुस्तकाचे इ.स. १९४० ते इ.स. १९७१ या काळात लिहिलेले 'रागसंग्रह' नामक सात खंड त्यांत समाविष्ट आहेत.

वंदे मातरम हे गीत बॅन्डवर वाजवता येत नाही या सबबीखाली राष्ट्रगीत केले नाही याचे त्यांना फार वाईट वाटले. वंदे मातरमला अनेकानेक विविध चाली लावून, त्यांतल्या काही बॅन्डवर वाजवता येतात हे दाखवण्यासाठी त्यांनी पंडित नेहरूंची भेट घेऊन व त्यांच्यासमोर प्रात्यक्षिके देऊन त्यांना पटवून देण्याचा प्रयत्‍न केला. नेहरूंनी आधीच जन गण मन हे राष्ट्रगीत म्हणून निश्चित केले असल्याने मास्तर कृष्णरावांची सर्व मेहनत फुकट गेली. परंतु 'वंदे मातरम' ला पूर्णपणे न वगळता भारत सरकारतर्फे राष्ट्रीय गीत (National Song) म्हणून तरी अधिकृत दर्जा देण्यात आला. या घटनेनंतर मास्तर कृष्णरावांनी संगीतबद्ध केलेल्या वंदे मातरमची रेकॉर्ड विविध शाळा-महाविद्यालये, अनेक वैयक्तिक व सार्वजनिक संस्था वगैरे ठिकठिकाणी कित्येक वर्षे वाजवली जात असे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या खास विनंतीवरून मास्तर कृष्णरावांनी संपूर्ण बुद्ध वंदना सांगीतिक मीटरमध्ये बसवली व बाबासाहेबांनी त्याची ध्वनिमुद्रिका काढली.

पुणे येथे ऑक्टोबर २०, इ.स. १९७४ रोजी त्यांचे स्वतःच्या निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले.

वीणा चिटको या त्यांच्या कन्येने काही काळ संगीतकार म्हणून कारकीर्द गाजवली.

मधुसूदन कानेटकर, सरस्वती राणे, मोहन कर्वे, आर.एन. करकरे, राम मराठे, योगिनी जोगळेकर, सुहास दातार, सुधाकर जोशी, रवींद्र जोशी, वीणा चिटको हे मास्तर कृष्णरावांच्या शिष्यवर्गापैकी काही शिष्य होत.

सन्मान व पुरस्कार[संपादन]

  • 'संगीत कलानिधि' ही पदवी
  • पद्मभूषण पुरस्कार, भारत सरकार
  • संगीत नाटक अकादमी फेलोशिप
  • बालगंधर्व सुवर्ण पदक
  • विष्णुदास भावे सुवर्ण पदक
  • जालना गावी एका नाट्यगृहाला मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांचे नाव देण्यात आले आहे.
  • पुणे भारत गायन समाजातर्फे दरवर्षी मास्टर कृष्णराव यांचा जन्मदिन व पुण्यतिथी साजरी केली जाते.
  • मसापतर्फे दर विषम वर्षी एका संगीतविषयक समीक्षकास/ग्रंथकारास 'मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर स्मृति पुरस्कार' देण्यात येतो.
  • महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने 'मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर ग्रंथकार पुरस्कार २०१६' हा विशेष जाहीर केलेला पुरस्कार सरदार आबासाहेब मुजुमदार यांच्यावरील ’स्वरसंगत सरदार’ या ग्रंथास देण्यात आला.

बाह्य दुवे[संपादन]