महाशिवरात्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
महाशिवरात्रीच्या दिवशी हे घोंगलाचे फूल शिवाला वाहण्याची विदर्भात पद्धत आहे.
काटेधोत्र्याचे फळ - महाशिवरात्रीच्या दिवशी हे फळ शिवाला वाहतात.

प्रत्येक महिन्यातल्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीला शिवरात्री असते. असे असले तरी, माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी हिंदू समाजात महाशिवरात्र म्हणून पाळली जाते. या दिवशी शैव पंथीयांबरोबरच सामान्य जनही उपवास करतात, भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी उपवास संपवतात. उत्तर भारतात हाच दिवस फाल्गुन महिन्यात गणला जातो, तर इंग्रजी महिन्याप्रमाणे हा दिवस बहुधा फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात येतो.

महाशिवरात्र' हे कल्याणकारी शिवाचे आराधना पर्व असल्याने महाशिवरात्रीला मोठे महत्त्व आहे. पृथ्वीची निर्मिती झाली तेव्हा याच तिथीला मध्यरात्री भगवान शिवशंकराने रौद्ररूप धारण केले होते. यामुळे या रात्रीला महाशिवरात्र अथवा कालरात्री असेही म्हटले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य याच महिन्यात उत्तरायणाचा प्रवास प्रारंभ करतो. या महिन्यात होणारे ऋतूचे परिवर्तनही शुभ मानले जाते. म्हणून या महिन्यात येणारी महाशिवरात्र भोलेनाथाची आवडती तिथी आहे.

महाशिवरात्री व्रताला सकाळीच प्रारंभ होत असतो. या दिवशी तमाम जनता शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावर दूध अर्पण करतात. काही महिला घरातल्या घरात ओल्या मातीचे शिवलिंग तयार करून त्याची पूजा करतात.

महाशिवरात्रीला जागरणाचे खूप महत्त्व आहे. हे व्रत नैमित्तिक व काम्य म्हणजे इच्छा पूर्ण करणारे आहे असे मानले जाते. शिवरात्रीच्या रात्री चार पूजा करावयाच्या असा संकेत आहे, त्यांना ‘यामपूजा’ असे म्हणतात.

या द‍िनी भोलेनाथ व पार्वती यांचा विवाह झाला होता. यामुळे महिला रात्री जागरण करून भोलेनाथाची वरात काढतात. हे व्रत दीड दिवसाचे असते. त्यामुळे त्याची दुसऱ्या दिवशी सकाळी समाप्‍ती होतो. दुसऱ्या दिवशी महिला ब्राह्मण भोजन घालत व्रताचा समारोप करत.

महाशिवरात्रीचे व्रत कुमारिका देखील करतात. शिवरात्रीचे व्रत केल्याने कुमारिकांच्या विवाहातील अडचणी दूर होतात असे मानले जाते. शिवशंकराच्या कृपेने मनाप्रमाणे वर प्राप्‍त होतो, अशी श्रद्धा आहे.

भारतात अनेल शिवमंदिरे असून शिवरात्रीला ठिकठिकाणी अशा मंदिरांत यात्रा भरतात.

अन्य कोणतेही उपास न पाळाणारे हिंदू पुरुष आश्विनी आणि कार्तिकी या दोन एकादश्यांना आणि महाशिवरात्रीला उपवास करतात.

महाशिवरात्रीच्या दिवशी भरणाऱ्या महाराष्ट्रातील यात्रा[संपादन]

 • श्री अगस्ती मंदिर, ता: अकोले, जिल्हा : अहमदनगर
 • आरमोरी तालुक्याच्या मुख्यालयाजवळच्या पहाडीवरील महादेवगड मंदिर येथे
 • शिवणी-डोंगरगावजवळील चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रह्मपुरी तालुक्‍याच्या आवळगाव येथील सुप्रसिद्ध गुरुबाबा देवस्थान परिसरातील यात्रा
 • आष्टीनजीकच्या चपराळा येथील हनुमान मंदिर प्रशांतधाम परिसरातील यात्रा
 • औंढा नागनाथ येथील यात्रा
 • कोल्हापूरपासून १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या कणेरी येथील यात्रा
 • सांगली जिल्हा कवठे महांकाळ येथे
 • देवगडजवळचे कुणकेश्वरची यात्रा
 • सातारा जिल्ह्यातील लिंब गोवे येथील कोटेश्‍वर मंदिराच्या परिसरात
 • खडकेश्वर, (औरंगाबाद)
 • गडचांदूर (चंद्रपूर जिल्हा)
 • गडचिरोली जिल्ह्यातल्या कुरखेडा तालुक्यातील अरततोंडी येथील मंदिर परिसरातील यात्रा
 • गडचिरोली जिल्ह्यातल्या कुरखेडा तालुक्‍यातील खोब्रामेंढा येथील मंदिर परिसरातील यात्रा
 • औरंगाबादपासून ३५ किलोमीटरवर असलेल्या वेरूळ लेण्यांच्या जवळचे गरुडेश्वर मंदिर येथे.
 • घारापुरी लेण्यांजवळ (मुंबई) येथील यात्रा
 • घृष्णेश्वर, दौलताबाद-मराठवाडा
 • ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा रेल्वे स्टेशनानजीकचे गंगा गोरजेश्वर देवस्थान परिसरातील यात्रा
 • राजापूर शहरानजीक असलेल्या मौजे धोपेश्वर गावातील धूतपापेश्वर देवस्थानाच्या परिसरात
 • परळी वैजनाथ, बीड जिल्हा
 • पालघर जिल्ह्यातल्या वाडा तालुक्यातील आंबिस्ते गावात असलेल्या नागनाथ मंदिर परिसरात. हे गाव वाडा तालुक्यातील खनिवलीपासून दोन कि.मी.अंतरावर आहे.
 • बनेश्वर (पुणे जिल्ह्यातील नसरापूर) येथे.
 • वैरागडचे भंडारेश्‍वर मंदिर परिसरातील यात्रा
 • भीमाशंकरची यात्रा
 • चामोर्शी तालुक्‍यातील मार्कंडादेव येथील मार्कंडेश्‍वर मंदिर परिसरातील यात्रा

बाह्यदुवे[संपादन]