श्रावण पौर्णिमा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(राखी पौर्णिमा या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

श्रावण पौर्णिमा ही श्रावण महिन्याच्या शुद्ध पक्षातील पंधरावी तिथी आहे.


श्रावणी[संपादन]

या दिवशी जानवे बदलण्याची प्राचीन वैदिक परंपरा आहे. या हिंदू परंपरेत श्रावणी हा धार्मिक संस्कारविधी सांगितलेला आहे. [१]आजही वैदिक धर्म पाळणाऱ्या बऱ्याच घरांमध्ये श्रावणी पौर्णिमा ही तिथी यज्ञोपवीत बदलण्याची तिथी म्हणून पाळली जाते.[२] या विधीला श्रावणी म्हणतात.[३] बौद्ध धर्मीयांसाठी सुद्धा हा सण वेगळ्या कारणासाठी महत्त्वाचा आहे. जानवी बदलण्यासाठी श्रावणी पौर्णिमेखेरीज व्यक्तीच्या पोटजातीनुसार अन्य काही दिवसही सांगितले गेले आहेत. गुरुकुलातील विद्यार्थ्यांना शिकविण्याचा पहिला दिवस किंवा ज्याचे शिक्षण पूर्ण झाले आहे अशा विद्यार्थ्यांच्या समावर्तन संस्काराचा दिवस म्हणून श्रावण पौर्णिमा महत्वाची मानली जाते असे. [२]

ही पौर्णिमा पोवती पौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते. कारण त्या दिवशी सुताची पोवती करून ती विष्णू, शिव, सूर्य इ. देवतांना अर्पण करतात. यानंतर ही पोवती घरातील स्त्री-पुरुष धारण करतात.[४] श्रावणीच्या विधीनंतर एखादी गोष्ट पुन्हा नव्याने सुरू केली जाते. एखाद्या श्रावण महिन्यात जर लागोपाठच्या दोन दिवशी पौर्णिमा असतील तर पहिल्या दिवशी नारळी पौर्णिमा आणि दुसऱ्या दिवशी राखी पौर्णिमा असते. तैत्तरीय हिरण्यकेशी श्रावणी दुसऱ्या पौर्णिमेला असते.

रक्षाबंधन सणासाठी राखी विक्री

बौद्ध धर्म[संपादन]

श्रावणी पौर्णिमा हा बौद्ध धर्मियांचा एक सण आहे. बौद्ध भिक्खूंचा आषाढी पौर्णिमेपासून वर्षावास असतो. तीन महिन्यांच्या काळात भिक्खू एका जागी निवास करून धम्माचा अभ्यास व ध्यान साधनेचे चिंतन नमन करीत असतात. तसेच तेथील लोकांना बुद्ध वंदना शिकवून सत्धम्माचा उपदेश करीत असतात. या दिवशी बौद्ध भिक्खू लोकांना धम्माचे नियम व परंपरा यांचे मार्गदर्शन करून सद्वर्तनी बनविण्याचा प्रयत्न करीत असतात.

नारळी पौर्णिमा[संपादन]

श्रावण पौर्णिमेचा दिवस हा भारताच्या समुद्रकिनारी राहणारे प्रांत नारळी पौर्णिमा म्हणून साजरा करतात. समुद्र हे वरुणाचे स्थान समजले जाते. वरुण हा पश्चिमेचा दिक्पाल आहे. त्याला या दिवशी श्रीफळ अर्पण करून त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची हिंदू प्रथा आहे.[५] समुद्राशी एकरूप झालेल्या आणि जीवनात अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या कोळी समाजाकडून[४] नारळी पौर्णिमेला समुद्राची पूजा केली जाते.[६] मासेमारीसाठी सागरसंचार करणाऱ्यांनी वर्षाकालीन क्षुब्ध सागरावर जाणे थांबवलेले असते. हा काळ माश्यांच्या प्रजनन काळाचा म्हणून या काळात मासेमारी करत नाहीत. श्रावण पौर्णिमेस सागराला श्रीफळ अर्पण करून सागरपूजन झाहिंकी त्यानंतर समुद्रात होड्या घेऊन मासेमारी सुरु होते. वर्षानुवर्षे हा नियम कटाक्षाने पाळत आला आहे.[७]

रक्षाबंधन[संपादन]

रक्षाबन्धन

श्रावण पौर्णिमेच्या दिवशी बहुधा राखी पौर्णिमाही असते. त्यादिवशी बहिणी भावाला राखी बांधतात आणि ओवाळतात. या विधीला रक्षाबंधन म्हणतात. हा मूळ उत्तरी भारतातला सण आता उर्वरित भारतातही पाळला जातो. या दिवसाची आख्यायिका प्रसिद्ध आहे. देव आणि दानव यांच्यातील युद्ध सुरु होते. देवांचा पराभव होणार असे दिसत असताना देवराज इंद्राची पत्नी इंद्राणी हिने आपल्या पतीच्या मनगटाला एक संरक्षक धागा बांधला आणि दुस-या दिवशी देवांचा विजय झाला. त्या दिवसापासून ही प्रथा सुरु झाली असे मानले जाते. मात्र काळाच्या ओघात आता बहिण भावाला राखी बांधते असा संकेत रूढ झाला आहे.[२][१]

पौर्णिमेला येणारे हिंदू सण आणि उत्सव[संपादन]

भुजरिया[संपादन]

राखी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजे भाद्रपद वद्य प्रतिपदेला, मध्य प्रदेशातील गावांमध्ये भुजरिया नावाचा सण साजरा होतो. या सणादरम्यान लहानांपासून मोठ्यांपर्यंत बहुतेक व्यक्ती भुजलियांची देवाणघेवाण करताना दिसतात. या दिवशी देशात समृद्धी आणि शांती रहावी अशी कामना केली जाते. गावातील लोकांमधील जातिभेद दूर होऊन सदभाव नांदावा यासाठी हा सण उत्साहात साजरा होतो. भुजरिया पर्वाच्या दिवशी विविध संस्था भुजरिया संमेलन भरवतात.

भुजरिया सणाच्या निमित्ताने घरात राखून ठेवलेल्या गव्हाच्या बियाणांची गुणवत्ता तपासली जाते. या सणाच्या दिवसाआधी, म्हणजे श्रावण शुक्ल नवमीला एका बांबू आणि मोहाच्या पानांनी बनलेल्या टोपलीत माती भरून तीत कोठारात बिजाणे म्हणून जपून ठेवलेल्या गव्हाचे थोडे दाणे पेरतात. भुजरियाच्या दिवशी टोपलीत उगवलेली कोवळी रोपे उपटून ती तलावावर किंवा नंतर त्यांची पूजा करून त्यांची मिरवणूक काढतात. नंतर गावकरी त्या रोपांची आपआपसात देवाणघेवाण करून त्यांची गुणवत्ता तपासतात. या सणाच्या दिवशी तलावांवर जत्रेचे वातावरण असते.

गव्हाच्या या कोवळ्या रोपांना भुजलिया किंवा कजलिया म्हणतात. काही पंचांगांत या सणाचे नाव कजलिया पर्व असे दिलेले आढळते.

पोळा[संपादन]

श्रावण महिन्यातील अमावास्येला "पोळा"सण साजरा केला जातो. महाराष्ट्रातील शेतकरी वर्गात हा सण प्रामुख्याने साजरा केला जातो. या दिवशी घरातील बैलांना अंघोळ घालून सजविले जाते. त्यांना गोडाचे जेवण दिले जाते. या दिवशी बैलांकडून शेतातील कामे करवून घेत नाहीत.[८] भारताच्या काही भागात हा दिवस श्रावण पौर्णिमेला साजरा करतात. गोठ्यातील भिंती अनैतिक जमिनी शेणाने सारवतात. तांदळाच्या पिठीने त्यावर रांगोळी काढली जाते.[१]

हे ही पहा[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.


  1. a b c Mohapatra, J. (2013-12-24). Wellness in Indian Festivals & Rituals: Since the Supreme Divine Is Manifested in All the Gods, Worship of Any God Is Quite Legitimate. (en मजकूर). Partridge Publishing. आय.एस.बी.एन. 9781482816891. 
  2. a b c Festivals of India (en मजकूर). Prabhat Prakashan. आय.एस.बी.एन. 9788187100423. 
  3. ^ जोशी, महादेव शास्त्री (मार्च २०१०). भारतीय संस्कृती कोश खंड नववा. पुणे: भारतीय संस्कृतिकोश मंडळ. 
  4. a b Bhargava, S. C. Bhatt, Gopal K. (2006). Land and People of Indian States and Union Territories: In 36 Volumes. Maharashtra (en मजकूर). Gyan Publishing House. आय.एस.बी.एन. 9788178353722. 
  5. ^ Desingakara, Viththala Srinivasa (1977). Vrata-śiromaṇi (mr मजकूर). Sha. Vi. Desingakara. 
  6. ^ Lall, R. Manohar (2004). Among the Hindus: A Study of Hindu Festivals (en मजकूर). Asian Educational Services. आय.एस.बी.एन. 9788120618220. 
  7. ^ Sonak, Sangeeta M. (2013-10-01). Khazan Ecosystems of Goa: Building on Indigenous Solutions to Cope with Global Environmental Change (en मजकूर). Springer Science & Business Media. आय.एस.बी.एन. 9789400772021. 
  8. ^ Cendavaṇakara, Sadānanda (1966). Bhāratīya saṇa āṇi utsava (mr मजकूर). Nirṇaya Sāgara Buka Prakāśana.