कृष्ण जन्माष्टमी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(गोकुळाष्टमी या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
बाळ कृष्ण
कृष्ण बलराम

जन्माष्टमी म्हणजे गोकुळ अष्टमी, कृष्ण जन्माचा दिवस.[१] श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे.[२]

भारताच्या विविध प्रांतात[संपादन]

हा उत्सव भारतात सर्वत्र होतो. गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका,जगन्नाथ पुरी या ठिकाणी तो मोठ्या प्रमाणावर होतो. [३] ओरिसामध्ये दहीहंडी जत्रा किंवा दहीभंगा जत्रा या दिवशी साजरी केली जाते.[४] गोकुळ अष्टमीच्या दिवशी उपवास करण्याची प्रथा आहे.[५]गुजराथमध्ये 'सातम' म्हणजे सप्तमीच्या दिवशी पैसे लावून किंवा तसेच दिवसभर पत्ते खेळतात. रात्री बारा वाजता पत्ते बंद करून कृष्णजन्माचा उत्सव सुरू करतात.

रासलीला चित्र

मध्य प्रदेशात [६]आणि उत्तरी भारताच्या बऱ्याचशा भागात पौर्णिमान्त महिना असलेले पंचांग वापरात असल्याने या दिवशी त्यांची भाद्रपद कृष्ण अष्टमी येते. या दिवशी कित्येकांच्या घरी गोकुळ-वृंदावनाचा देखावा तयार करून जन्मोत्सव साजरा करतात. वैष्णव लोक तर हा दिवस विशेष भक्तीने पाळतात.वृंदावन येथे या दिवशी दोलोत्सव असतो.[७] याच दिवशी कृष्णाच्या आयुष्यातील महत्त्वाची संकल्पना रासलीलाचे सादरीकरण केले जाते.[३]

व्रत[संपादन]

मुख्य लेख: व्रत

अष्टमीच्या दिवशी एकभुक्त राहून पांढऱ्या तिळाचा कल्क अंगाला लावून स्नान करतात. व्रताचा संकल्प करून देवघर लता पल्लवानी सुशोभित करतात. त्या स्थानी देवकीचे सूतिकागृह स्थापन करतात. मंचकावर देवकी आणि कृष्ण यांच्या मूर्तीची स्थापना करतात. दुसऱ्या बाजूला यशोदा आणि तिची नवजात कन्या,वसुदेव, नंद, यांच्या मूर्ती बसवितात. सप्तमीच्या मध्यरात्री शुचिर्भूत होऊन संकल्प करतात व सपरिवार श्रीकृष्णाची षोडशोपचार पूजा करतात. रात्रौ कथा, पुराण, नृत्य,गीत इ. कार्यक्रमांनी जागरण करतात.[८] अष्टमीच्या दिवशी उपवास करतात व देवालाही फराळाच्या जिन्नसांचा नैवेद्य दाखवितात. नवमीच्या दिवशी पंचोपचार[९] करून उत्तरपूजा करून महानैवेद्य समर्पण करतात.[७] पू जा झाल्यानंतरचे कृत्य अग्नी पुराणात सांगितले आहे. ते असे-' याप्रमाणे पूजा करून पुरुषसूक्ताने, विष्णूसूक्ताने व इतर स्तोत्रांनी स्तवन करावे.वाद्यांचा घोष, गीतांचे मंगल स्वर, पुराण-इतिहासातील निरनिराळ्या सत्कथा ऐकत ती रात्र घालवावी. गोकुळातील कृष्णजन्माच्या लीला श्रवण केल्यानंतर वैष्णवांनी परस्परांवर दही इ.चे सिंचन करावे. कारण 'गोपाळांनी दही, दूध, तूप, उदक, यांनी परस्परांवर सिंचन व लेपन केले'असे भागवतामध्ये वचन आहे, त्यावरून असा विधी प्राप्त होतो.[१०] कृष्णाला लोणी आणि साखर एकत्र करून त्याचा प्रसाद दिला जातो.

गोपाळकाला/दहीहंडी[संपादन]

मुख्य लेख: गोपाळकाला

उत्सवासाठी तयार केल्या जाणाऱ्या विशिष्ट प्रसादास गोपालकाला असे म्हणतात. कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. महाराष्ट्रात विशेषत: कोकणात या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दहीकाला होतो व त्याचे सेवन करून उपवास सोडला जातो. गोविंदा आला रे आला । गोकुळात आनंद झाला ॥ असे गाणे गात अनके लहानथोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात. कित्येक ठिकाणी गोपाळकाला करून कृष्ण चरित्रातील सोंगे आणण्याचाही प्रघात आहे. या दिवशी महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत, उंच मडक्यात दही-दुधाने भरलेला हंडा ठेवून तेथपर्यंत मानवी मनोऱ्यावरून पोहचून तो हंडा फोडण्याचा ‘गोविंदा’ हा साहसी खेळ होतो.[११] हा महाराष्ट्रातील एक वैष्णव नृत्योत्सव आहे. श्रीकृष्णाने व्रज मंडळात गाई चारताना आपण व आपले सवंगडी या सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र करून त्या खाद्य पदार्थांचा काला केला व सर्वांसह त्याचे भक्षण केले अशी कथा आहे. या कथेला अनुसरून गोकुळाष्टमीच्या दिवशी काला करण्याची व दहीहंडी फोडण्याची प्रथा आहे.[११]

गोपाल म्हणजे गायीचे पालन करणाऱ्या कृष्णाच्या या जन्मोत्सवाच्या निमित्ताने काल्याचा प्रसाद केला जातो.[१२] काला म्हणजे एकत्र मिळविणे.[१३]
पोहे, ज्वारीच्या लाह्या, धानाच्या लाह्या, लिंबूआंब्याचे लोणचे, दही, ताक, चण्याची भिजविलेली डाळ, साखर, फळांच्या फोडी इत्यादी घालून केलेला एक खाद्यपदार्थ.[१४] हा कृष्णास फार प्रिय होता असे मानले जाते. श्रीकृष्ण व त्याचे सवंगडी मिळून यमुनेच्या तीरावर हा तयार करीत असत व वाटून खात असत असे मानले जाते. [७] गोमंतकात याच काल्याला गवळणकाला म्हणतात. हा काला तिथल्या कलावंतिणी करतात. त्यात एका मुलीला कृष्णाचे सोंग देऊन कृष्णलीलेची गाणी म्हणतात. शेवटी कृष्णाकडून दहीहंडी फोडवितात. हा गवळण काला दशावतारी खेळानंतर किंवा देवस्थानाचा रथोत्सव झाल्यानंतर होतो.[७]

बलराम जयंती[संपादन]

जन्माष्टमीच्या आधी, म्हणजे श्रावण वद्य षष्ठीला बलराम जयंती असते.[१५]

चित्रदालन[संपादन]


संदर्भ[संपादन]

 1. ^ Varadpande, Manohar Laxman (1982). Krishna Theatre in India (en मजकूर). Abhinav Publications. आय.एस.बी.एन. 9788170171515. 
 2. ^ Sharma, Aruna (2011-06). The Heartland of Divinity: Fairs and Festivals of Madhya Pradesh (en मजकूर). SCB Distributors. आय.एस.बी.एन. 9788183282222. 
 3. a b Growse, F. S. Mathura-Brindaban-The Mystical Land Of Lord Krishna (en मजकूर). Diamond Pocket Books (P) Ltd. आय.एस.बी.एन. 9788171824434. 
 4. ^ "Google Books". books.google.co.in. 2018-08-03 रोजी पाहिले. 
 5. ^ Deśiṇgakara, Viṭhṭhala Śrīnivāsa (1977). Vrata-śiromaṇī (mr मजकूर). Śā.Vi. Deśiṅgakara. 
 6. ^ (India), Madhya Pradesh (1994). Madhya Pradesh: District Gazetteers (en मजकूर). Government Central Press. 
 7. a b c d जोशी, होडारकर, महादेवशास्त्री, पद्मजा (२०००). भारतीय संस्कृती कोश खंड २. भारतीय संस्कृतीकोश मंडळ प् प्रकाशन. 
 8. ^ Deśiṇgakara, Viṭhṭhala Śrīnivāsa (1977). Vrata-śiromaṇī (mr मजकूर). Śā.Vi. Deśiṅgakara. 
 9. ^ Dwivedi, Dr Bhojraj. Sanatan Pooja Vidhi (en मजकूर). Diamond Pocket Books (P) Ltd. आय.एस.बी.एन. 9788128814167. 
 10. ^ उपाध्ये, काशिनाथ. धर्मसिंधु. 
 11. a b "दहीहंडीचा सण आणि कायद्याची चौकट...". २२.८. २०१९. २२.८. २०१९ रोजी पाहिले. 
 12. ^ "गोविंदा आला रे आला…". ५. ८. २०१६. २२. ८. २०१९ रोजी पाहिले. 
 13. ^ Dandekar, Vaidya Suyog (2013-09-01). Ruchkar Tarihi Pathyakar Pakkruti (mr मजकूर). Sukrut Prakashan, Pune. आय.एस.बी.एन. 9788190974691. 
 14. ^ "Gopalkala - Marathi Recipe". २२. ८. २०१९ रोजी पाहिले. 
 15. ^ मिश्रा, आरती (२१. ८. २०१९). "हल षष्ठी 2019: संतान की लंबी उम्र की कामना से करें व्रत, शाम के समय इस विधि से करें पूजन, पढ़ें व्रत कथा...". २१. ८. २०१९ रोजी पाहिले.