अभ्यंगस्नान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

अभ्यंगस्नान नरकचतुर्दशी व इतर सणांच्या दिवशी पहाटे उठून सूर्योदयापूर्वी केले जाते. अभ्यंगस्नान करताना व्यक्तीला प्रथम कुंकवाचा टिळा लावण्यात येतो. व्यक्तीच्या अंगाला शरीराच्या वरच्या भागाकडून खालच्या भागाकडे तेल लावण्यात येते. नंतर तेल आणि उटणे यांचे मिश्रण एकत्रित करून अंगाला लावण्यात येते. मग व्यक्तीला ओवाळण्यात येते. त्यानंतर तिने दोन तांबे उष्ण पाणी अंगावर घेतल्यावर तिच्यावरून आघाडा किंवा टाकळा यांची फांदी मंत्र म्हणत तीनदा फिरवतात.

या दिवशी अभ्यंगस्नानाचे महत्त्व असते. सकाळी लौकर उठून, संपूर्ण शरीरास तेलाचे मर्दन करून, सुवासिक उटणे लावून, सूर्योदयापूर्वी केलेले स्नान म्हणजे अभ्यंगस्नान.

ग्रांथिक संदर्भ[संपादन]

वाग्भट याने रचलेल्या अष्टांगहृदय या ग्रंथात दिलेला श्लोक असा आहे:
अभ्यंगमाचरेतन्नित्यं स जराश्रमवातहा |
दृष्टिप्रसाद्पुष्ट्यायुः स्वप्नसुत्वकत्व दार्ढ्‌यंकृत् ||[ संदर्भ हवा ]

अर्थ:(थंडीच्या दिवसांत) रोज केलेले अभ्यंगस्नान हे जरा (वृद्धत्व), श्रम आणि वात (वातदोष) यांचा नाश करते. ते दृष्टी चांगली करणारे, त्वचेला कांती देणारे तसेच शरीर दृढ करणारे आहे.

रोज असे तेल लावून स्नान करणे शक्य नसल्यास किमान डोक्यास तरी तेल लावून स्नान करावे.

चरकसंहितेत चरकांनी सांगितल्याप्रमाणे:
मूर्धोSभ्यंगात् कर्णयोःशीतमायु, कर्णाभ्यंगात्‌ पादयोरेवमेव |
पादाभ्यंगान्नेत्ररोगान् हरेश्च, नेत्राभ्यंगाद् दन्तरोगाश्च नश्येत् | [ संदर्भ हवा ]

अर्थात : डोक्यास तेल लावून मर्दनाने कानविकार दूर होतात. कानाचेभोवती, पाळीस मर्दन तसेच कानात तेल टाकण्याने पायांना त्याचा फायदा मिळतो. डोळ्यात गायीचे तूप टाकल्याने आणि डोळ्यास तेलाने (हळुवार) मर्दन केल्याने दातांचे रोग नष्ट होतात. (बदामाचे तेल, तिळाचे तेल इत्यादी.) (मोहरी, करडई इत्यादींपासून बनवलेली तीव्र तेले वापरू नयेत.)

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्यदुवे[संपादन]