ओणम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

[१][२]केरळ राज्याचे नवीन वर्ष ओणम या उत्सवाने सुरू होते. हा चिंगम(आश्विन) महिन्याच्या शुल्क पक्षात श्रवण नक्षत्र येईल त्या दिवशी साजरा करतात. १० दिवस चालणाऱ्या या उत्सवातील १० वा दिवस तिरूवोणम सगळ्यात धुमधडाक्याने साजरा केला जातो. श्रवणालाच तिरूवोणम असे म्हणतात. ओणम उत्सव मल्याळी भाषेत चिंगम (ऑगस्ट-सप्टेंबर) या महिन्यात दैत्यराज महाबली या प्रल्हादाच्या नातवाच्या न्यायीपणाची, पराक्रमाची आणि त्याच्याबद्दल असलेल्या प्रेमाची आठवण म्हणून साजरा केला जाणारा उत्सव आहे. यावेळी पारंपरिक नाचगाणी, खेळ, नाटके वगैरे कार्यक्रमांचे आयोजन संपूर्ण केरळ राज्यात केले जाते. ओणम उत्सव केरळातील सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा उत्सव असल्याने त्यावेळी नवीन कपड्यांची खरेदी केली जाते तसेच या दिवसात केवळ या उत्सवासाठीचे खास पारंपरिक पद्धतीचे अनेक खाद्यपदार्थही तयार केले जातात. केरळ राज्यातील सर्वच जाती-धर्माचे लोक हा उत्सव मोठ्या आनंदात साजरा करतात.[२]

आख्यायिका[संपादन]

महाबली राजाच्या दरबारात आलेला वामन

महाबली हा दैत्यांचा बलाढ्य राजा होता. त्याच्या पराक्रमामुळे स्वर्गातील देवांनाही परागंदा व्हावे लागले. तो दैत्य असूनही विष्णुचा भक्त होता. स्वर्गातून हद्दपार झालेल्या देवांनी कश्यप ऋषींची पत्नी अदितीकडे महाबलीची तक्रार केली. मग अदितीने विष्णुला त्यात हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले, विष्णूने ते मान्य केले. याच सुमारास महाबलीने एका मोठ्या मेजवानीचे आयोजन केले होते. त्या प्रसंगी येणाऱ्या प्रत्येक अतिथीची मनोकामना पूर्ण केली जाईल असे त्याने जाहीर केले होते. या मेजवानीला विष्णूने ब्राह्मण बटूच्या वामनाच्या रूपात तेथे हजेरी लावली आणि महाबलीकडे तीन पावले जमिनीची मागणी केली. वामनाची विनंती मान्य झाली. त्यानुसार वामनाने आपल्या दोन पावलात पृथ्वी आणि स्वर्ग पादाक्रांत केला. तिसरे पाऊल ठेवण्यासाठी वामनाने महाबलीकडे जागा मागितली. त्यावर महाबलीने तिसरे पाऊल आपल्या मस्तकावर ठेवण्यास वामनाला सांगितले. वामनाने लगेच तिसरे पाऊल महाबलीच्या मस्तकावर ठेवून त्याला पाताळात ढकलले.

वामनाचे त्रिविक्रम रुप

महाबलीची वचननिष्ठा पाहून वामनाने त्यास वर मागण्यास सांगितले. त्यानुसार महाबलीने वर्षातून एकदा आपल्या राज्यात येऊन प्रजेला भेटण्याचा वर वामनाला मागितला. तेव्हापासून महाबली राजा आपल्या प्रजेला भेटण्यास दरवर्षी येतो असे मानले जाते. [३]

महाबली राजाने आपल्या वचनासाठी आपले राज्यच काय पण आपले प्राणही वामनाला देण्यास मागेपुढे पाहिले नाही. त्याच्या अशा गुणांमुळेच तो लोकप्रिय राजा ठरला, घरोघरी त्याची पूजा होऊ लागली, त्याला देवत्व प्राप्त झाले. ओणमच्या दिवसात वामनाच्या मूर्तीसह महाबलीच्या मूर्तीचीही स्थापना घरोघरी केली जाते.

साहित्यात[संपादन]

या उत्सवावर मल्याळम भाषेत दोन काव्ये रचली गेली आहेत.

  • विलवतथ राघवन नंबियार रचित 'अरणमुलाविलासम'
  • पेरुंपरा वासुदेव भट्टाथिरी रचित 'उटत्रितथीचरितम'[१]
सुशोभित रथ

साजरा करण्याची पद्धत[संपादन]

या सणासाठी केरळात घरांना रंग देऊन दर्शनी भाग फुलांनी शृंगारतात.गृहिणी घरापुढचे अंगण सारवतात व त्यावर बहुरंगी रांगोळी काढतात.गावात व रानात हिंडून फुले गोळा करणे हे मुलांचे काम असते. दहा दिवसपर्यंत अशी पुष्पशोभा केल्यावर श्रवण नक्षत्राच्या मुख्य दिवशी वामनाची मृण्मय मूर्ती करून ता अंगणात बसवितात व त्याभोवती पुष्पशोभा करतात. प्रथम सर्व मिळून "आरप्पू" असा उद्घोष करतात.त्यानंतर वामनाची पूजा करतात.[४]उत्सवाच्या निमित्ताने केरळचे पारंपरिक नृत्य कथकली आणि पुलीकली किंवा काडुवकलीचे आयोजन ठिकठिकाणी केले जाते. ओनसद्या या पक्वान्नाशिवाय ओणमची सांगता होत नाही. तसेच तांदूळ आणि तांदळाचे विविध पदार्थ, डाळीची आमटी, पापड आणि तूप असा जेवणाचा बेत असतो. सांबार, [[ओलण], रसम, थोरन, अवियल, पचडी, विविध प्रकारची लोणची आणि मोरू (ताक) यांनाही फार महत्त्व आहे.

ओणमनिमित्त घरातील सुशोभन
केरळातील ओनम्‌ सणाचे सालंकृत भोजन

नौका स्पर्धा[संपादन]

केरळातील सर्पाकार नावांची स्पर्धा

पंपा नदीच्या किनारी आरन्मूळा (अलेप्पी) या गावी होणारा नौकाविहार केरळात विशेष प्रसिद्ध आहे.या स्पर्धांना "वंचीकळी" असे नाव आहे.

आख्यायिका

तीर्थयात्रेला गेलेला अर्जुन कन्याकुमारीहून इंद्रप्रस्थाला निघाला.त्याच्याजवळ कृष्णाची मूर्ती होती.तो पंपा नदीकाठी येतो.पंपा नदीला पूर आलेला असल्याने नौका बंद असतात. एक नाविक आपली नौका घेवून धाडसाने पुढे येतो आणि अर्जुनाला पैलतीरी नेतो.नदी पार झाल्यावर अर्जुनाने त्या तीरावर आपल्याकडील कृष्णाची म्हणजे पार्थ सारथीची मूर्ती स्थापन केली.कालांतराने तेथे मंदिर उभारले गेले.या घटनेच्या स्मरणार्थ प्रतिवार्षिक नौका उत्सव सुरु झाला असे मानले जाते.[५] ओणमच्या वेळी पारंपरिक सर्प नौका स्पर्धांचे आयोजन दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी केले जाते. या स्पर्धेच्या खास नौका फणसाच्या लाकडाच्याच बनविलेल्या असतात. त्या खूप लांब आणि निमुळत्या असतात, एकेका नौकेत शंभरावर लोकही असतात. त्यात नौका वल्हविणाऱ्यांसह मोठ्या आवाजात साद घालून उत्साह वाढविणारेही असतात.नौका वल्हवणारे नावाडी शुभ्र वस्त्रे आणि शुभ्र शिरोवेष्टन वापरतात.[६]

सामाजिक महत्व[संपादन]

या दिवशी घरातील नोकर माणसांना नवी वस्त्रे दिली जातात. खंडकर कुळे आपल्या धन्याला केली,काकडी इ.भेटवस्तू पाठवितात.या दिवशी चेंडूचा एक विशिष्ट खेळ खेळला जातो, त्याला "नाटन " असे नाव आहे.या दिवसात स्त्रिया व मुली रात्री एकत्र खेळ खेळतात त्याला "कैकोटीवकळी" म्हणतात.[७]

चित्रदालन[संपादन]

बाह्यदुवे[संपादन]

  1. a b भारतीय संस्कृती कोश खंड पहिला
  2. a b भारतीय संस्कृती कोश खंड पहिला
  3. ^ भारतीय संस्कृती कोश खंड पहिला
  4. ^ भारतीय संस्कृती कोश खंड पहिला,पृष्ठ ७८०
  5. ^ भारतीय संस्कृती कोश खंड पहिला,पृष्ठ ७८२
  6. ^ भारतीय संस्कृती कोश खंड पहिला
  7. ^ भारतीय संस्कृती कोश खंड पहिला