Jump to content

बलिप्रतिपदा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


दिवाळीत येणारी तिथी कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दीपावलीचा तिसरा दिवस असतो. हिंदुधर्मीयांचा हा एक मोठा सण आहे. या दिवसाला दिवाळी किंवा दीपावली पाडवा असे म्हणतात. या दिवशी विष्णूने वामन बटूचे रूप घेऊन उदार बळीराजाला जमिनीत म्हणजे पाताळात गाडले. बळीला पाताळाचे राज्य देऊन विष्णूने त्याच्या राज्याच्या द्वारपालाचे काम स्वीकारले अशी अख्याईका आहे.[]

बलिप्रतिपदेतला बळिराजा हा शेतकरी राजा होता. त्याला तिन पावले जमिन दान स्वरूपात मागून विष्णूच्या वामन अवताराने मारले. हा राजा जनतेची काळजी घेत होता म्हणून त्याचं राज्य अजूनही यावं यासाठी ग्रामीण भागात अजूनही स्त्रिया भावाला ओवाळताना म्हणतात "इडा पीडा टळो, बळीचे राज्य येवो" अशी म्हण रूढ आहे.

याच दिवशी मध्य आणि उत्तर भारतात नवीन विक्रम संवत् सुरू होतो. इसवी सनाच्या आकड्यामध्ये ५७ (किंवा ५८) मिळवले की या संवत्सराचा अनुक्रमांक मिळतो. शलिवाहन शकाच्या आकड्यामध्ये १३५ (किंवा १३६) मिळवले कीही संवत्सराचा अंक मिळतो. महाराष्ट्रात या दिवशी स्त्रिया पतीला व माहेरच्या आणि सासरच्या इतर पुरुषांना ओवाळतात.

घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्नी पतीला औक्षण करते व पती पत्नीला ओवाळणी घालतो. नवविवाहित दांपत्याची पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी करतात. ह्यालाच दिवाळसण म्हणतात. त्यानिमित्त यादिवशी जावयास आहेर करतात.

उत्तर भारतात या दिवशी गोवर्धन पूजा असते. श्रीकृष्णाच्या किंवा विष्णूच्या देवळात ही पूजा होते. या दिवशी देवाला अनेक पक्वान्नांचा आणि मिठायांचा डोंगर अर्पण केला जातो. म्हणून या सणाला अन्नकूट असेही म्हणतात.

दिवाळीतला पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त आहे. आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी हा दिवस नव्या वर्षाची सुरुवात मानतात. लक्ष्मीपूजन करून व्यापारी लोक वर्षाचा प्रारंभ करतात. त्यांच्या जमा-खर्चाच्या कीर्द खतावणीच्या नवीन वह्या ह्या दिवशी सुरू होतोत. नवीन वह्या सुरू करण्यापूर्वी वह्यांना हळद-कुंकू, गंध, फूल, अक्षता इत्यादी वाहून त्यांची पूजा होते.

बाह्यदुवे

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "दिवाळी ची संपूर्ण माहिती शास्त्र आधारे". https://dindarshika.com. 2021-11-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-11-04 रोजी पाहिले. External link in |website= (सहाय्य)