Jump to content

मंगळसूत्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मंगळसूत्र हे दक्षिण भारतातील हिंदू, उत्तर भारतातील व नेपाळ येथील स्त्रियांचे गळ्यात घालण्याचे आभूषण आहे. यात थोडेतरी सोने असते आणि ते काळ्या पोतीत ओवले जाते.काही अलंकार केवळ सुवासिनीनीच वापराचे असतात. त्यांना सौभाग्याअलंकार असे म्हणतात. यात मंगळसूत्र हा अलंकार महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तसेच केरळ व उत्तर भारत या प्रदेशांत प्रचारात आहे. दक्षिणेत असाच प्रकारचा ताळी किंवा ताली नावाचा असतो.[] लग्नाचे वेळी हा दागिना नवरा मुलगा वधूच्या गळ्यात घालतो, आणि त्यानंतर पत्‍नी झालेली ती वधू आयुष्यभर ते गळ्यात ठेवते. मंगळसूत्र घालणाऱ्या स्त्रिया बहुधा सवाष्ण असतात. मंगळसूत्र हा फक्त दागिना नसून भारतीय स्त्रीसाठी ते तिचे स्त्रीधन असते. ते तिच्या सौभाग्याचे प्रतिक मानले जाते. म्हणून पूर्वीच्या काळी बहुतेकदा विधवा महिला मंगळसूत्र विधवा झाल्यावर घालत नसत.मंगळसूत्रालाच गाठले असा शब्द ग्रामीण भागात रूढ आहे. गाठले, डोरले, गुंठण, गंठण असेही शब्द या अलंकारासाठी ग्रामीण समाजात रूढ आहेत.[]

मंगळसूत्र हा महाराष्ट्र आणि कर्नाटक या प्रदेशांतील सुवासिनींचा सौभाग्य अलंकार समजला जातो. अगदी साधे मंगळसूत्र म्हणजे दोऱ्यात ओवलेली काचेच्या काळ्या मण्यांची दोन पदरी माळ होय. माळेच्या मध्यभागी बहुधा सोन्याचे चार गोल मणी व सोन्याच्या दोन लहान वाट्या बसविलेल्या असतात. गळ्यात मंगळसूत्र बांधण्याचा विधी वैदिक विवाह पद्धतीच्या विवाहात नसतो/नव्हता. महाराष्ट्रातील ही पद्धत अलीकडल्या काळातील असून, ती दक्षिणेतून वर आली असावी. तमिळनाडूकेरळ या प्रदेशात सर्व जातींजमातींत ताळी नावाचा एक सौभाग्य अलंकार वधूच्या गळ्यात बांधण्याचा प्रघात आहे. त्यावरून मंगळसूत्र बांधण्याची प्रथा सुरू झाली असावी.[]

मङ्गल्य तन्तुनानेन भर्तृजीवन हेतुना |कण्ठे बध्नामि सुभगे सा जीव शरदां शतम् |

सूत्रं माङ्गल्य संयुक्तं कण्ठे बध्नामि ते प्रिये | सौभाग्य प्रीति सौहार्द द्योतकं सुमनोहरम|| असे श्लोक म्हणून वधूच्या गळ्यात मंगळसूत्र बांधले जाते.

मंगळसूत्रे आता वैविध्यपूर्ण प्रकारांत उपलब्ध आहेत.

चित्रदालन

[संपादन]
  1. ^ भारतीय संस्कृती कोश खंड पहिला
  2. ^ "सोने आणि दागिने विशेषांक : स्त्रियांचे दुर्मीळ अलंकार". लोकसत्ता. 2014-10-03. 2018-03-20 रोजी पाहिले.
  3. ^ भारतीय संस्कृती कोश खंड सहावा