महिषासुर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

महिषासूर हा एक असूर (राक्षस) होता. हा मदोन्मत्त, उर्मट, उद्धट व कामांध होता. त्याचे वडिलांचे नांव रंभ असे होते. ते असुरांचे राजा होते. त्यांनी पाण्यात राहणाऱ्या म्हशीवर प्रेम केले आणि त्यातून महिषासुराची उत्पत्ती झाली असे म्हणतात. त्यामुळे महिषासूर हा हवे तेंव्हा म्हैस अथवा मानवाचे रूप घेऊ शकत असे. संस्कृत शब्द महिष याचा अर्थ म्हैस असा होतो.[ संदर्भ हवा ]

त्याने ब्रम्हदेवाची भक्ती केली व त्यांचेपासून वर प्राप्त केला की, कोणीही देव अथवा दानव त्याला मारू शकणार नाही. या वरामुळे तो उन्मत्त झाला व देवांना त्रास देऊ लागला. त्याने इंद्रपद बळकावले. त्यामुळे देवांनी दुर्गेची निर्मिती केली जे पार्वतीचे एक रूप समजल्या जाते.

त्याचे निर्दालन देवी दुर्गेने केले म्हणून देवीस महिषासुरमर्दिनी असेही म्हणतात. महिषासुरापाशी मोठे सैन्य होते व त्याने देवीशी युद्ध करण्यापूर्वी आपले चिक्षुर, बाष्कल व चामर हे सेनापती देवीशी युद्ध करण्यास पाठविले. त्यात या सर्वांचा देवीने पराभव व वध केला. त्यानंतर, महिषासुराने अनेकानेक रूपे धारण करून देवीशी महायुद्ध आरंभले. हे युद्ध नऊ दिवस चालले. अंतिमतः देवीने त्याचा युद्धात शिरच्छेद केला अशी माहिती सप्तशती या ग्रंथात येते.