Jump to content

जव्हार संस्थान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जव्हार संस्थान
इ.स. १३४३इ.स. १९४८
ध्वज चिन्ह
राजधानी जव्हार
शासनप्रकार राजेशाही मुकणे राजघराणे
अधिकृत भाषा मराठी
धर्म हिंदु
क्षेत्रफळ ८०४.४५ चौरस किमी
लोकसंख्या ५०,५३८
    जय विलास पॅलेस, जव्हार
हनुमान पॉइंटपासून दिसणारा जय विलास पॅलेस
काळमांडवी धबधबा.

जव्हार संस्थान हे इसवी सन १३१६ पासून १० जून १९४८ पर्यंत अस्तित्वात होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हे संस्थान मुंबई इलाख्यात विलीन झाले[][] जव्हार संस्थान हे ठाणे क्षेत्रातील हे एकमेव संस्थान होते. जव्हार संस्थानचे राजघराणे हे महादेव कोळी समाजाचे होते, त्यामुळे बोलीभाषेत महादेव कोळ्यांचे साम्राज्य - जयहर असे पण म्हणले जाते. या संस्थानचे शेवटचे राजे यशवंतराव मार्तंडराव मुकणे हे होते.[][]

महाराणी प्रियंवदा मुकणे
महाराजा यशवंतराव मार्तंडराव मुकणे

इतिहास

[संपादन]

मुकणे गावातील जयदेवराव (जयबाजीराजे) हे आदिवासी महादेव कोळी समाजाचे राजे होते. जयबाजी जमीनदार/सामंत होते. त्यांच्या उत्कृष्ट संघटन कौशल्यामुळे, बुद्धिचातुर्याने आणि पराक्रमामुळे त्यांनी ३१ लहान किल्ले जिंकले. त्याच सोबत भूपतगड हा मोठा किल्लाही त्यांनी जिंकला. नंतर भूपतगडला जव्हार संस्थानची राजधानी करण्यात आले. अल्लाउद्दीन खिलजी, मुहंमद तुघलक या मोगलांच्या स्वारींनी देवगिरीच्या साम्राज्याची वाताहत केली.तेव्हाच जव्हार साम्राज्यची उभारणी झाली. इ.स. १३१६ मध्ये जव्हार संस्थानाला आकार येत होता. जयबा राजांना धुळबाराव आणि होळकरराव ही दोन अपत्ये होती. जयबा हे शिवशंकराचे भक्त होते. त्यांनी राज्याभिषेकानंतर पूर्वी कोळवण संबोधल्या जाणाऱ्या या प्रदेशाला आपल्या नावातला जय आणि शिवशंकराचे हर असे मिळून जयहर असे नामकरण केले. पुढे या जयहरापासून जव्हार असे नाव रूढ झाले.

[संदर्भ- महिकावती बखर,बॉम्बे प्रेसिडेंनशियल गॅझेट इत्यादी]

जव्हारच्या इतिहास मध्ये सर्वात पराक्रमी राजा म्हूणन धुळाबारावची ओळख आहे. मुबारक खिलजीने दिल्लीकडे जाताना जव्हारवर स्वारी करण्यास फौज पाठवली त्याचा धुळाबारावने पराभव केला. पुढे मुहमद्द तुघलक जेव्हा दक्खनेत आला तेव्हा त्याने जव्हारवर स्वारी केली. तुघलकच्या प्रचंड सैन्यासमोर धुलाबाराव यांचा ठिकाव लागला नाही. त्याने धुळाबारावास तुघालकाबादला कैदेत टाकले. पण धुळाबारावचे धाकटे बंधू होळकरराव यांनी तुघलकच्या अनेक प्रदेशावर स्वारी करून हैराण केले नंतर तुघालकने मांडलिकच्या अटीवर धुळाबारावची सुटका केली आणि त्यास त्याचे राज्य परत केले तसेच नऊ लाख उत्पन्नाचा स्वतंत्र मुलुख तोडून दिला. इ.स.6 जून 1343 मध्ये शहा हा किताब देऊन नेमशहा ही उपाधी दिली.यादिवसा पासून जव्हार राज्यात स्वतंत्र शक तयार करण्यात आला तो 1948 पर्यंत राज्यात कार्यरत होता त्यास 'जव्हार शक' असे म्हणत असे. आजचा इ.स.2017ला जव्हार शक 674 चालू आहे. इसवी सन 1341 ते 1758 सालापर्यंत जव्हारच्या राजाकडे दमण नदीपर्यंतचा, सह्याद्रीपर्यंतचा आणि भिंवडीपर्यंतचा भूप्रदेश ताब्यात होता. त्यावेळी राजाकडे साडेतीन लाख रुपयापर्यंत महसूल गोळा व्हायचा.

[संदर्भ- ठाणे गॅझेट आणि नाशिक गॅझेट, तुघलक तांब्रपट,केतकरकोष,कल्याणचा इतिहास(श्रीनिवास साठे),मराठीविश्वकोष,जव्हार दर्शन(दयानंद मुकणे)इत्यादी]

तुघलक नंतरच्या काळात जव्हार राज्य हे कधी विजननगर तर कधी बहमणी राज्याचे स्वामित्व पत्करायचे. यानंतर गुजरातचा सुलतान आणि अहमदशहा बहमणी यांच्या सीमा जव्हारपर्यंत पोहचल्या. गुजरातचा सुलतान मुहम्मदशहा आणि बहमणी सुलतान अल्लाउद्दीन अहमदशहा यांच्या युद्धाचे कारण जव्हार होते. माहीमच्या युद्धात जव्हार राज्याची खूप हानी झाली. पहिल्या वेळेस जव्हारचा राजा देवाबाराव हा बहमणी विरुद्ध होता. युद्धात पराभूत होऊन अल्लाउद्दीन बहमणीने त्याला बिदरला कैदेत टाकले. पुढं देवबाराव बाटवून टाकले (देवबारावचे मुहमद्दशहा केले गेले) आणि अल्लाउद्दीनच्या एका मुलीचे लग्न त्याच्याशी लावून दिले आणि नंतर राज्य परत केले. पुढं मुस्लिम वंशास विरोध होऊन होळकररावच्या आदिवासी वंशातील राजपुत्राची राज्यावर नेमणूक झाली.14 व्या शतकात प्रवासी इब्न बतुता याने देखील उत्तर कोकणात जव्हार आणि बागलाण ही दोन राज्ये असल्याची नोंद केली आहे.पुढे निजामशाहीच्या अस्तापर्यंत आणि अकबरच्या आगमनापर्यंत जव्हार राज्य स्वतंत्र होते.

[संदर्भ- फरिश्ता:गुलशने इब्राहिमी(अनुवाद कुंटे), मध्ययुगीन भारत(शरद कोलरकर), जव्हार दर्शन(दयानंद मुकणे), ठाणा गॅझेट]

अकबराने दक्षिण मोहीम सुरू केली. खान्देश-माळवा राज्यांनी अकबरचे मांडलिक स्वीकारले आता अकबरास निजामशाहीचे पारिपत्य करायचं होतं. अकबर पूर्वी गुजरातचा सुभेदार होते. त्यामुळे त्याला त्याभागाची परिपूर्ण माहिती होती. त्याने ठाणे भागातून निजामशाहीच्या विरुद्ध मोहीम सुरू केली. राजपूत्र मुराद, राजपूत्र दानीयाल आणि अब्दुल रहीम खान यांनी वाटेतील जव्हार, बागलाण,रामनगर आणि बनसा या राज्यावर स्वारी करून त्यास मांडलिक करवून घेतले.याकाळात राजा तोडरमल याने डहाणूच्या महालक्ष्मीस भेट दिली. राजपूत्र मुराद याची शहापूरास छावणी होती.मुस्लिम पुजारी (मिर्दे) यांनी आपल्या हक्काची मागणी राजपूत्र मुरादास केली. तेव्हा मुरादने जव्हारचा राजा नेमशहा दुसरे यांस हे प्रकरण सोडवण्यास सांगितलं. जहांगीरच्या काळात पुन्हा जव्हार स्वतंत्र झाले. पण यावेळीस पोर्तुगीज यांनी जव्हारचा अनेक भाग जिंकला त्यामुळे जव्हारची वाताहत झाली आणि नंतर रामनगरचा राजाने जव्हारवर स्वारी करून मांडलिक बनवले. पुढे नेमशहाचा पुत्र विक्रमशहा याने सैन्य उभारून पोर्तुगीज आणि रामनगरला पराभूत केले आणि स्वतंत्रची घोषणा केली.

[संदर्भ- मध्ययुगीन भारताचा इतिहास(मदन मार्डीकर), जव्हार दर्शन(दयानंद मुकणे),ऐतिहासिक कागदपत्रे]

मुंबईच्या उत्तरेला घाटमाथा आणि अरबी समुद्र यांमधील सपाटीवर जव्हारचे राज्य आहे. उत्तर आणि पूर्व या दिशाना जव्हारची हद्द बागलाण आणि नाशिक या मोगल जिल्ह्यांना भिडते आणि दक्षिणेला कोकण प्रदेशाबरोबर जव्हारमधून चौल या संपन्न बंदराकडे मार्ग आहे. दक्षिण आणि पश्चिम येथील काही भाग सोडल्यास जव्हारचा बहुतेक प्रदेश उंच, खडकाळ आणि जंगलांनी भरलेला आहे. संरक्षणाच्या दृष्टीने ही गोष्ट जव्हारच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. या सुमारास हे राज्य पोर्तुगीजांबरोबर लढण्यात गुंतले होते. येथील राजा श्रीपद हा मोगलांना खंडणी देत नसे किंवा त्यांचे सार्वभौमत्व मानीत नसे. त्यामुळे औरंगजेबाच्या सुचनेवरून शहाजहानने जव्हारवर स्वारी करण्यास परवानगी दिली. आपल्याला जव्हारचे राज्य जहागिर म्हणून दिल्यास ते आपण जिंकून घेऊ असे बिकानेरचा राजा रावकर्ण याने सांगितले. 3 ऑक्टोबर 1655 रोजी तो औरंगाबादेहून निघाला आणि पश्चिम घाटातून तो जव्हारच्या हद्दीजवळ पोहोचला. जव्हारचा प्रदेश डोंगराळ होता त्यामुळे तो जिंकणे खूप अवघड होते रावकर्णने विक्रमशहास आपल्या बाजूस वळवले आणि 5 जानेवारी 1656 रोजी श्रीपद याने शरणागती दिली. त्याने खंडणी देण्याचे व आपला मुलगा रावकर्ण याच्याबरोबर पाठविण्याचे कबूल केले. 20 जानेवारी 1656 रोजी ही मंडळी औरंगजेबाकडे परतली.विक्रमशहा याचे राज्य मोक्याचे होते. त्या राज्यात कोहेज,कुडाण,त्रंबक,मोखाडा ,माहुली(शहापूर), वाडा असे 6 परगणे होते. तसेच किनारपट्टीचा भाग देखील होता तसेच तवर(दमण जवळील), वझें (वासिंद) व दरिळें(उंबरगांवजवळील) हीं तीन शहरें त्यांच्या हातीं होतीं. तेव्हा जव्हारचे उत्पन्न 20 लक्ष पर्यंत होते.

[संदर्भ (वारिस, १०६ अ; आदाब, ३७ ब, ३९ ब, ४७ अ.)(औरंगजेबाने जव्हारच्या राज्यावर जी स्वारी केली त्याची हकीकत वरीलप्रमाणे आहे), औरंगजेबचा संक्षिप्त इतिहास (जदुनाथ सरकार अनुवाद)]

छत्रपती शिवाजी महाराज सुरतेच्या स्वारीच्यावेळी त्रंबकेश्वराचे दर्शन घेऊन पौष शुद्ध द्वितीया 1 डिसेंबर 1661ला जव्हारचे नरेश पहिले विक्रमशहा यांना भेटावयास आले.विक्रमशहा यांनी जव्हारच्या जवळच असलेल्या एका टेकडीवर मोठा शामियाना उभारला होता. येथे मोठा दरबार भरवण्यात आला होता. शिवाजी महाराज आणि विक्रमशहा यांच्यात तहाची आणि मैत्रीची बोलणी झाली. यानंतर स्वतः विक्रमशहा यांनी शिवाजी महाराज यांच्या जिरेटोपात मानचा तुरा रोवला होता. ते ठिकाण म्हणजे आजचे शिर्पामाळ होय.यानंतर विक्रमशहा यांनी शिवराय यांना सैन्य आणि साहित्य देऊन सुरतला जाण्याचे जवळच्या वाटाचे मार्गदर्शन केले पुढे स्वारी वरून परतताना राजांनी विक्रमशहा यांना काही सम्पत्ती दिली होती.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जव्हार भेटीने दिल्लीकर सत्ताधिकारी(औरंगजेब) आणि सरदार यांच्या भुवया उंच्यावल्या होत्या.सुरतेच्या स्वारी नंतर मोघल आणि जव्हारकर यांच्या संबंधामध्ये वितुष्टाता निर्माण झाली होती.

[संदर्भ- सभासद बखर,राजा शिवछत्रपती खंड, मराठा-पोर्तुगीज संबंध(देसाई),औरंगजेबचा संक्षिप्त इतिहास(जदुनाथ सरकार),मराठी सत्तेचा उदय(जयसिंहराव पवार),पोर्तुगीज पत्रे, ठाणे गॅझेट इत्यादी]

दुसऱ्या सुरत स्वारीवेळी राजा विक्रमशहा आणि शिवाजी महाराज यांचे पटले नाही.1670ला जव्हारच्या सीमेवरचा माहुली किल्ला शिवरायांनी जिंकल्याने आणखीनच वितुष्ठ निर्माण झाले.पोर्तुगीज-मराठा तहानुसार पोर्तुगीज यांनी जव्हारच्या विरुद्ध शिवाजीराजे यांकडे मदत मागितली. त्यानुसार मोरोपंत पिंगळे यांच्यानेतृत्वाखाली पहिली स्वारी केली आणि जव्हार वर सरदेशमुखी कर बसवला. दुसऱ्या स्वारीत मोरोपंत पिंगळे आणि युवराज संभाजीराजे जव्हारवर खंडणी बसवली आणि 18 लक्षचा खजिना हस्तगत केला. बेसावध असल्याने विक्रमशहा भूमिगत झाला आणि सैन्य जमावकरु लागला आणि मोघल मदतीची वाट बघत बसला. तोपर्यंत मराठे हे रामनगर जिंकून त्रंबककडे गेले. मात्र दिलेरखान आणि विक्रमशहाने सैन्य जमवल्याने मराठ्यांनी माघार घेतली. एक फौज कल्याणचा दिशेने परतताना विक्रमशहा आणि दिलेरखानच्या सैन्याचे युद्ध झाले. यात अनेक मराठे कामी आले आणि मराठ्यांची हानी झाली.1672 च्याच तिसऱ्या स्वारीत मराठ्यांनी संपूर्ण जव्हार काबीज केलं यावेळी विक्रमशहा जवळच्या लोकांबरोबर अनुक्रमे नाशिक आणि औरंगाबादला गेला. संभाजी महाराज यांच्या उत्तरकाळापर्यंत जव्हार मराठ्यांकडे होते. मराठ्यांच्या स्वातंत्र्यसंग्रामावेळी उत्तर कोकणवर मातरबखानाने विक्रमशहाचा पुत्र पतंगशहाच्या मदतीने वर्चस्व स्थापन केले.पतंगशहाने 1683 मध्ये गंभीरगड,1688 मध्ये सेगवागड,1689 मध्ये कोहेजगड आणि त्रंबकगड आणि 1693 मध्ये सिद्धगड मोघलांना जिंकून दिले. मोघलपत्रात जमीनदार पतंगशहा असा उल्लेख येतो. मातरबखानच्या साह्याने पतंगशहाने जव्हारवर वर्चस्व मिळवले. पतंगशहा मातरबखानच्या विश्वासातील आणि मोघलांचा प्रमुख सरदार झाला होता. पतंगशहास 1000 स्वार आणि 2000 जात अशी मनसब देण्यात आली तसेच भिवंडीचा प्रमुख म्हूणन नियुक्ती केली गेली. मातरबखान आणि पतंगशहाने वसई आणि दमणवर हल्ला करून खंडणी बसवली. पतंगशहाचा पुत्र कृष्णशहा याने परत एकदा 1699 मध्ये पट्टाकिल्ला जिंकून मातरबखानास दिला.मातारबखानाप्रमाणे कृष्णशहाने हमीदुद्दीनखानास साह्य केले. महीपतगड जिंकण्यामध्ये कृष्णशहा याचेदेखील सैन्य होते. कृष्णशहाची 2000 जात आणि 2000 स्वार अशी मनसब होती.

[संदर्भ - मोघल दरबारातील बातमीपत्रे(माधवराव सेतुपगडी),औरंगाजेबचा संक्षिप्त इतिहास(जदुनाथ सरकार),मराठी सत्तेचा उदय(जयसिंहराव पवार), छावा(शिवाजी सावंत), मराठ्यांची साधने इत्यादी]

इ. स.1717 मध्ये खंडेराव दाभाडे यांनी जव्हारकडे खंडणी मागितली तसेच गुजरात मध्ये सैन्य संचारसाठी जव्हारचे सहकार्य मिळवून घेतले आणि जव्हारशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले.त्यानंतर पिलाजी जाधव यांनी जव्हारकडे खंडणी मागितली आणि 1727 मध्ये जव्हारने बाजीराव पेशवे यांच्याशी तह करून मराठ्यांचे मांडलिकत्व स्वीकारले.वसईच्या युद्धात जव्हारकर यांनी खूप सहकार्य केले. चिमाजी आप्पा यांचा आदेशानुसार जव्हारचे राजे कृष्णशहा मुकणे तृतीय यांनी आपले सैन्य वसईच्या मोहिमेत सहभागी केले. कोहेजगडावरील तोफा तसेच शिधासामग्री देखील मराठ्यांना पाठवले. जव्हारकर यांच्या तर्फे सरदार भगवानराव यांनी वसईच्या युद्धात नेतृत्व केले आणि अशेरी,तांदूळवाडी,टकमक किल्ला जिंकून देण्यास मदत केली. नाना साहेब यांनी जव्हारवर खूप निर्बंध लादले. खंडणीच्या स्वरूपात मोठा भाग आणि अनेक जमिनी पेशव्यांना दिल्या. कोहेज,माहुली,अशेरी हे परगाणे पेशवे यांनी घेतले. जव्हारच्या सैन्यावर देखील निर्बंध लागले गेले.1750च्या त्रंबकगड मोहिमेत आणि रघुनाथरावच्या गुजरात आणि उत्तरेकडील मोहिमेत जव्हारचे राजे सहभागी होते.इ. स.1758 ते 1761 या काळात येथे पेशव्यांची सत्ता होती. पेशव्यांनी जव्हारवर सरदेशमुखी कर बसविला. जव्हारच्या राज्यात अनेकांनी बंड केले होते. जव्हारच्या राजांना हे बंड मोडता आले नाही, म्हणून पेशव्यांना दरवर्षी 1000 रु. नजराणा द्यावा लागत असे. यानंतरच्या काळात राजे गंगाधराव(पतंगशहा द्वितीय) यांच्या काळात जव्हारला पेशव्यांनी बंड मोडण्यास देशावर पाठीवले. रामनगर आणि बडोदा भागातील भिल्ल यांनी केलेल्या बंड मोडण्यासाठी जव्हारकर यांना पाठवले गेले. मध्य भारतातील धार आणि होळकर यांच्या सीमेवरील भागात भिलांनी दंगा केला होता तेव्हा देखील पाठवले होते. खान्देशमधील दंगे मोडून काढण्यास देखील जव्हारकर यांना पाठवण्यात आले होते.1794च्या खर्डाच्या लढाईत युवराज मालोजीराव यांनी सहभाग घेतला होता.मराठ्यांनी टकमक, तांदुळवाडी, काळदुर्ग हे किल्ले जिंकले, तेव्हा याकामी त्यांना जव्हारच्या राजांची मदत झाली (1782). पेशव्यांनी दुसरे पतंगशाह यांच्यावर 1000 रु. खंडणी बसवली (1782). दुसरे पतंगशाह 1798 मध्ये मृत्यू पावले. पेशव्यांच्या आज्ञेवरून पतंगशाह यांचा मुलगा विक्रमशाह तिसरे यांस गादीवर बसविले; परंतु पेशव्यांना त्यांनी 3000 रु. नजराणा देणे व त्र्यंबकच्या मामलेदाराच्या साहाय्याने राज्यकारभार केला जाईल, असे लेखी कबूल केले.1818 मध्ये तिसऱ्या मराठा-इंग्रज युद्धात कॅप्टन डिफीन्सनने उत्तर कोकण जिंकले. तेव्हा त्याने जव्हार जिंकले.विक्रमशाह तिसरे यांच्या मृत्यूनंतर (1821) त्यांचा मुलगा पतंगशाह तिसरे लहान असल्याने विक्रमशाहांच्या दोन्ही भावांत भांडणे सुरू झाली. यावेळी राणी सगुणाबाई यांनी इंग्रजांच्या मदतीने पतंगशाह तिसरे यांस गादीवर बसविले.

[संदर्भ-मराठ्यांचा इतिहास(शरद कोलारकर),महाराष्ट्रचा इतिहास(खोबरेकर),पेशवे घराण्याचा इतिहास(प्रमोद ओक), बालाजी बाजीराव रोजनिशी, माधवराव पेशवे रोजनीशी,जुनी कागदपत्र, केतकरकोष, जव्हार संस्थानाच्या ऐतिहासिक नोंदी इत्यादी]

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे जव्हार संस्थानचे दिवाण चिपळूणकर यांचे जावई होते. सावरकर आपल्या सासुरवाडीला चिपळूणकरांच्या वाड्यात 1901 ते 1908च्या दरम्यान राहत होते. सावरकरांना अटक झाल्यावर चिपळूणकरांना जव्हारचा वाडा सोडून परागंदा व्हावे लागले. जव्हारचे रहिवाशी विष्णू उर्फ अप्पा महादेव वैद्य यांनी रत्‍नागिरी येथे तर रेवजी पांडू चौधरी यांनी पुणे येथे राहून भारतीय स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला होता. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात खुद्द जव्हारमध्ये राहून ब्रिटिश राजवटीविरुद्ध कोणी आंदोलन केल्याचा इतिहास नाही. मुकणे राजघराणे नेहमी नेमस्त व तटस्थ राहत आले. त्यामुळे तुघलक, खिलजी, मोगल, पोर्तुगीज, मराठे ते इंग्रज राजवटीतही सुमारे सहाशे वर्षे त्यांचे राज्य टिकून राहिले. स्वातंत्र्यानंतर संस्थानिकांनी भारतीय संघराज्यात सामील व्हावे म्हणून जी आंदोलने झाली त्यात जव्हार संस्थानही होते. जव्हार संस्थानचे विलीनीकरण लवकर व्हावे म्हणून 21-1-1948 रोजी मुंबईस सरदारगृहात तात्यासाहेब शिखरे, नाना कुंटे, भाऊसाहेब परांजपे, शामराव पाटील, दत्ता ताम्हाणे, वासुदेवराव करंदीकर व जव्हारचे मुकुंदराव संख्ये, केशवराव जोशी, रेवजी चौधरी, दत्तोबा तेंडुलकर अशा कार्यकर्त्यांची सभा होऊन 'जव्हार लोकसेवा संघ' स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. येथूनच जव्हार विलीनीकरणाच्या लढ्यास प्रारंभ झाला. या लढ्याचे स्वरूप ध्यानात येताच जव्हारच्या महाराजांनी मुकुंदराव संख्ये, वासुदेव करंदीकर व दत्ताजी ताम्हाणे यांना जव्हारला बोलावून घेतले. हे तिघे आणि त्यांच्यासोबत केशवराव जोशी होते. या चौघांना अचानक अटक करण्यात आली व नंतर लगेचच सोडून देण्यात आले. यानंतर करंदीकर व संख्ये यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांना व त्यांचे सेक्रेटरी श्री. व्ही. पी. मेनन यांची दिनांक 17-3-1948 रोजी भेट घेऊन सर्व हकीकत त्यांच्या कानावर घातली. या लढ्यात राष्ट्रसेवादल व समाजवादी पार्टीचे कार्यकर्तेही सामील झाले होते. शेवटी दिनांक 20-3-1948 रोजी जव्हार संस्थान विलीन होत असल्याचे आकाशवाणीने जाहीर केले.

[संदर्भ- ठाणे गॅझेट, दैनिक वर्तमानपत्रे, जव्हार संस्थानाचा अहवाल, राजे गणपतराव मुकणे चरित्र (अण्णाजी दिमोटे), जव्हार दर्शन(दयानंद मुकणे) ]

राजधानी

[संपादन]

संस्थानाची राजधानी ही सुरुवात-शेवट पर्यंत जव्हार होती. जयदेवराव यांनी जेव्हा जव्हार राज्याची निर्मिती केली तेव्हा भूपतगड किल्ला हीच राजधानी होती. मधल्या काळात कोहेजगड आणि गंभीरगड यांना उपराजधानीचा मान मिळाला होता. विक्रमशहा प्रथम यांच्या काळात जव्हारला भुईकोट किल्ला तयार झाला आणि तीच राजधानी केली नंतर याच किल्ल्याचा परिसरात जुना राजवाडा हा कृष्णशहा द्वितीय यांनी बांधला. याच राजवाड्यात अनेक दुरुस्ती झाली आणि येथूनच संस्थानाचा कारभार होत असे. पुढे यशवंतराव महाराज यांनी नवीन राजवाडा बांधल्यावर काही काळ येथे दरबार भरत असे आणि भारत स्वातंत्र्य झाल्यावर संस्थान भारतात विलीन झाले.

क्षेत्रफळ

[संपादन]

मुंबई इलाख्यातील (बॉम्बे प्रेसिडन्सी) मधील ठाणे जिल्ह्यातील (एजन्सी) एकमेव संस्थान होते आणि भौगोलिक दृष्टीने जव्हार संस्थान गुजरात स्टेट एजन्सीचा भाग होता.

उ.अ.19°43'ते 20°5'व पू.रे.72°55'ते 73°20'यांच्या दरम्यान वसलेले होते.उत्तरेस डहाणू, मोखाडे हे ठाणे तालुक्यातील तालुके आणि दमण प्रदेश पूर्वेस मोखाडे दक्षिणेस वाडे व पश्चिमेस डहाणू आणि माहीम तालुके होते. यास कोळवण असे म्हणत.

सन 1818च्या तिसऱ्या मराठा-इंग्रज युद्धात लॉर्ड एल्फिन्स्टनने कॅप्टन डिफीन्सनला जव्हार राज्य जिंकण्यासाठी पाठवले. त्यावेळी जव्हार राज्यातील 10 किल्ले आणि जव्हार जिंकले.

इ.स.1821च्या कंपनीने केलेल्या जाहीरनाम्यानुसार जव्हारच्या वतीने राणी सगुणाबाई यांनी तह केला. तेव्हा त्याना फक्त 320 चौ.किमी.एवढा प्रदेश दिला तो 1877 पर्यंत तेवढाच होता तेव्हा जव्हार संस्थानामध्ये थोरली आणि धाकटी पाती असे भाग होते.

सन 1877 मध्ये जव्हारचे राजे पतंगशहा चौथे यांनी इंग्रज यांनी केलेल्या सहकार्यबद्दल तसेच समाजसुधाराबद्दल जव्हारला अजून थोडा प्रदेश इंग्रज सरकार तर्फे देण्यात आला तेव्हा जव्हार संस्थानाचे क्षेत्रफळ हे 500 चौ. किमी. होते.

पहिल्या महायुद्धात ब्रिटिश सरकारला केलेल्या सहकार्य बद्दल संस्थानाला अजून 300 चौ.किमी.प्रदेश देण्यात आला. तेव्हा संस्थानाचे क्षेत्रफळ हे 803 चौ.किमी. होते आणि शेवट पर्यंत तेच होते. शेवटचे महाराज यशवंतराव यांनी केलेल्या सहकार्य बद्दल इंग्रज यांनी जव्हारच्या राजाला ठाणे जिल्ह्यात मोखाडे तालुकाची जबाबदारी देण्यात आली तसेच जिल्हात असिस्टंट कलेक्टर रूपात कारभार करावा असे आदेश देण्यात आले.

जव्हार संस्थानात एकूण तीन महाले/तालुके होते.मलमाड(150 चौ.किमी) कर्यात हवेली(350चौ. किमी) आणि गंजाड/कराडोह(100 चौ.किमी) असे होते. पुढे कुडाण(100चौ.किमी) हा अजून एक तालुका तयार करण्यात आला.

संस्थानात जव्हार,विक्रमगड आणि आशागड ही तीन शहरे होती.संस्थानाच्या कराडोह महालातून मुंबई-बडोदे हा रेल्वेमार्ग जात होता.संस्थानात एकही रेल्वे स्थानक नव्हते. संस्थानाच्या हद्दीवर छोटे वाणगाव रेल्वे स्थानक होते पण जव्हारकर मात्र डहाणू रेल्वे स्थानकचा वापर करत असे.

संस्थानात एकूण 108 खेडी होती.नंतर त्यांची संख्या वाढली. नाशिक जिल्यातील त्रंबक आणि इगतपुरी तालुक्यातील काही गावे संस्थानकडे होती.संस्थानाचा बराच भाग हा डोंगराळ आणि पठारी प्रदेश होता. संस्थानातून अनेक नद्या वाहत होत्या. मुंबई शहरापासून सर्वात जवळ असे जव्हार संस्थान होते.

==लोकसंख्या ५०’५३८ लोकसख्या होती

जव्हार संस्थानाची वैशिष्ट्ये

[संपादन]

1)भारतातील सर्वात जुन्या संस्थानांपैकी एक संस्थान. बॉम्बे प्रेसिडेंन्सी मधील सर्वात जुने संस्थान होते.

2)बहुजनांची मोठी परंपरा असेलेले संस्थान

3)देशभक्ती असलेले येथील राजे आणि प्रजा

4)ब्रिटिश भारताकडून महायुद्धात सहभाग महाराजा यशवंतराव मुकणे(फ्लाईट लेफ्टनंट-दुसरे महायुद्ध)

5)भारतातील स्वातंत्र्यसैनिकांचे संस्थान येथील धाकट्या पातीचे राजे देवबाराव यांनी 1857च्या लढ्यात सहभाग झाल्याबद्दल जन्मठेपेची शिक्षा झाली. या संस्थानातील व्यक्तीनी चलेजाव आंदोलन (1942), जंगल सत्याग्रह (1864), दादरा आणि नगर हवेली मुक्तीसंग्राम (1954), संयुक्त महाराष्ट्र चळवळ (1960) यात सहभाग घेतला होता. स्वातंत्र्यवीर सावरकर हे पण या संस्थानाशी संबंधित होते.

6)जगप्रसिद्ध वारली चित्रकला यासाठी प्रसिद्ध असलेले संस्थान

7)लोकप्रिय तारपा वाद्य आणि नृत्य यासाठी प्रसिद्ध असलेले संस्थान

8)महाराष्ट्रातील सर्वात जुने संस्थान, मिनी महाबळेश्वर म्हणून प्रसिद्ध, कोकणातील थंड आणि जास्त पावसाचे ठिकाण

9)स्वखर्चाने धरण(जयसागर डॅम) बांधलेले भारतातील एकमेव संस्थान

10)ब्रिटिशांकित जव्हार संस्थानास 9 तोफा (9-Gan salute) सलामी होती.

जव्हारच्या किल्ल्यात मुकणे राजांचा एकमजली जुना राजवाडा आहे. राजवाड्यातील गादी व श्रीमंत दिग्विजयसिंह यांचे येथे तैलचित्र आहे. श्रीमंत महाराज यशवंतराव मार्तंड मुकणे राजे आणि गादीवर बसलेल्या राणी प्रियवंदा यांचे मोठे चित्र म्हणजे आपल्या मनातील मराठमोळ्या राजा-राणीला मिळालेले मूर्तस्वरूपच आहे. काळाच्या उदरात गडप होऊ पाहणारे किल्ल्याचे काही भग्न अवशेष व त्या भोवतालची तटबंदी, प्रवेशद्वार, बुरूज, मनोरे इत्यादी जुन्या वैभवाची साक्ष देतात.

मुकणे राजांचा जो नवीन राजवाडा आहे तो एसटी स्टँडपासून दोन किमीवर आहे. राजवाडा अतिशय भव्य असून त्याचे बांधकाम व रचना पाहण्यासारखी आहे. आतली दालने, दरबार हॉल, छतावरील झुंबरे, भिंतीवरील राजघराण्यांतील व्यक्तींची जुनी तैलचित्रे आणि इथला एकूण परिसर आपल्याला इतिहासकाळात घेऊन जातो. भोवताली अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत.

जव्हारची समुद्रसपाटीपासूनची उंची ५१८ मीटर आहे. येथे हिल स्टेशन आहे. हे नाशिकपासून ८० कि.मी.वर आणि मुंबईपासून १५० कि.मी.वर आहे. हे एक सुंदर व समुद्रसपाटीपासून उंचीवर असलेले एक नैसर्गिक शहर आहे. जव्हार मधील ९९ टक्के जनता आदिवासी आहे. जव्हारला ऐतिहासिक वारसा आहे. खूप सुंदर ठिकाण असल्याने मुंबई, ठाणे यासारख्या प्रदूषण जास्त असणाऱ्या ठिकाणच्या लोकांना हे ठिकाण विशेष आवडते.

जव्हारमध्ये काळमांडवी धबधबा व दाभोसा धबधबा आहे. जव्हारचा जय विलास पॅलेस हा राजवाडा एक ऐतिहासिक वारसा आहे तसेच सनसेट पाॅईॅंट, हनुमान पाॅईॅंट इत्यादी ठिकाणे बघण्यासाठी खास आहेत.

१ सप्टेंबर १९१८ला राजे मार्तण्ड यांनी लोककल्याणकारी पाऊल उचलत जव्हार नगरपरिषद स्थापन केली, अशी माहिती जव्हार संस्थानच्या माहिती पुस्तकेतून मिळते. आज घडीला जुना राजवाडा भग्नावस्थेत आहे. राजवाड्याची इमारत दुमजली. जुन्या राजवाड्याच्या आतील परिसराला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. जव्हार शहराच्या परिसरात निसर्गरम्य देखावे, वारली चित्रकला आदी गोष्टी पाहावयास मिळतात. दिवाळी आणि मे महिन्याच्या सुट्टीमध्ये शाळकरी मुले- मुली तसेच पर्यटक आणि गिर्यारोहक येथे निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी येत असतात.

जव्हार राज्यातील किल्ले

[संपादन]
  1. अलंग-कुलंग
  2. अशेरीगड
  3. आसवगड
  4. इगतपुरीचा किल्ला
  5. इंद्रगड
  6. कमानदुर्ग
  7. काळदुर्ग
  8. कोहेज किल्ला
  9. गंभीरगड
  10. गुमतारा किल्ला
  11. टकमक किल्ला
  12. तांदूळवाडी किल्ला
  13. तारापूरचा किल्ला (जलदुर्ग)
  14. त्रंबकगड
  15. त्रिगलवाडी किल्ला
  16. पट्टागड
  17. बल्लाळगड
  18. किल्ले बेलापूर
  19. भास्करगड
  20. भूपतगड (राजधानी)
  21. मदनगड
  22. माहुलीगड
  23. रांजणगिरी किल्ला
  24. विवळवेढे किल्ला
  25. संजान किल्ला (जलदुर्ग)
  26. सिद्धगड
  27. सेगवा किल्ला
  28. सेवागड
  29. हरिहरगड

पर्यटन

[संपादन]
  • शिरपामाळ/शिर्पामाळ
  • हनुमान पॉईंट
  • सनसेट पॉईंट
  • जयविलास पॅलेस
  • दाभोसा धबधबा
  • काळमांडवी धबधबे
  • भूपतगड किल्ला
  • बाणगंगा महादेव मंदिर
  • धाकटी जेजुरी (खंडोबा देवस्थान)
  • जुना राजवाडा
  • जयसागर डॅम
  • विजयस्तंभ आणि क्लॉक टॉवर
  • ऐतिहासिक वास्तू

1) शिरपामाळ/शिर्पामाळ

छत्रपती शिवाजी महाराज सुरतेच्या स्वारीच्यावेळी त्रंबकेश्वराचे दर्शन घेऊन पौष शुद्ध द्वितीया 1 डिसेंबर 1661ला जव्हारचे नरेश पहिले विक्रमशहा यांना भेटावयास आले.विक्रमशहा यांनी जव्हारच्या जवळच असलेल्या एका टेकडीवर मोठा शामियाना उभारला होता. येथे मोठा दरबार भरवण्यात आला होता. शिवाजी महाराज आणि विक्रमशहा यांच्यात तहाची आणि मैत्रीची बोलणी झाली. यानंतर स्वतः विक्रमशहा यांनी शिवाजी महाराज यांच्या जिरेटोपात मानचा तुरा रोवला होता. ते ठिकाण म्हणजे आजचे शिर्पामाळ होय.यानंतर विक्रमशहा यांनी शिवराय यांना सैन्य आणि साहित्य देऊन सुरतला जाण्याचे जवळच्या वाटाचे मार्गदर्शन केले पुढे स्वारी वरून परतताना राजांनी विक्रमशहा यांना काही सम्पत्ती दिली होती.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जव्हार भेटीने दिल्लीकर सत्ताधिकारी(औरंगजेब) आणि सरदार यांच्या भुवया उंच्यावल्या होत्या.सुरतेच्या स्वारी नंतर मोघल आणि जव्हारकर यांच्या संबंधामध्ये वितुष्टाता निर्माण झाली होती. आता येथे एक मोठे स्मारक तयार करण्यात आले आहे तसेच भव्य मोठी कमान तयार करण्यात आली आहे येथे नेहमी पर्यटक यांची वर्दळ असते.

2) हनुमान पॉईंट

खळाळणारं पाणी, फेसाळत्या पाण्याचे धबधबे, हिरवीगार वनराई हे अनुभवायचं असेल तर इथे येण्याला पर्याय नाही. जव्हारमध्ये प्रवेश करताच अंदाजे ४०० मीटर्स खोली असलेली नारळीदरा ही दरी पहायला मिळते. त्यात अनेक छोटे-मोठे धबधबे वाहत असतात. जव्हारचा हनुमान पॉईंट तर प्रसिद्धच आहे. तिथे उभं राहून सभोवताली नजर टाकल्यास निसर्ग सौंदर्याचा नजराणाच तुमच्यासमोर खुला होतो. अतिशय उत्कृष्ट असा हा पॉईंट आहे. याशिवाय सूर्यास्त पाहण्यासाठी इथला सनसेट पॉईंट प्रसिद्ध आहे.

3) सनसेट पॉईंट

जव्हारचा अजून एक प्रसिद्ध पॉइण्ट म्हणजेच सनसेट पॉइण्ट आहे. शहराच्या मध्यवर्ती भागापासून पश्चिमेला फक्त अर्धा किमी वर हा पॉइण्ट आहे. जोडप्यांचा लाडका असलेला हा पॉइण्ट सूर्यास्ताचे एक अप्रतिम दृष्य दाखवतो. येथून दिसणाऱ्या दरीचा आकार हा धनुष्यासारखा आहे म्हणून पूर्वी या भागाला ‘धनुकमळ’ असे म्हणत. येथून 60 कि. मी. दूर असलेल्या डहाणू जवळच्या महालक्ष्मी डोंगराचे सुंदर दृष्य दिसते. दरीमधल्या दाट गर्द झाडीवर पडणारी सूर्य किरणे पाहण्याचा अनुभव शब्दात वर्णन न करता येण्यासारखा आहे.

4) जय विलास पॅलेस

जव्हार आणि आसपासच्या परिसरात बरीच प्रेक्षणीय ठिकाणे आहेत. यापैकी मुख्य म्हणजे जयविलास पॅलेस हा राजवाडा. हा राजवाडा खाजगी मालमत्ता असला तरी भव्यतेवरून त्याचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात येते. जयविलास पॅलेस हा ब्रिटिश-इटालियन पद्धतीने तयार करण्यात आला आहे.राजवाड्यात मुकणे घराण्यातील राजांची सुंदर तैलचित्रे आहेत. याशिवाय जुने दुर्मिळ फर्निचर आणि अन्य वस्तूही येथे जतन करून ठेवण्यात आल्या आहेत. जव्हार हे वारली पेंटिंगसाठी प्रसिद्ध आहे. अतिशय शांत वातावरणात अरण्यांनी वेढलेले वैशिष्ट्यपूर्ण हवामानाचे ठिकाण होय.राजवाड्यात 80 खोल्या आहेत त्यापैकी काहीच खोल्या आज वापरात आहेत. पॅलेसच्या मेन दरवाजा समोर एक तोफ आहे.सर्वात प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू असलेला हा वाडा ‘राज बरी’ या नावाने सुद्धा ओळखला जातो. राजे यशवंतराव मुकणे यांनी बांधलेला हा राजवाडा मुकणे घराण्याच्या राजाला राहण्यासाठी बांधला होता. येणाऱ्या शत्रूवर नजर ठेवण्यासाठी हा वाडा डोंगराच्या माथ्यावर बांधला आहे.लाकडी कोरीवकाम, दगडी घुमटे आणि आजूबाजूला पसरलेले हिरवे जंगल ही या राजवाड्याची वैशिष्ट्ये आहेत. गुलाबी दगडातून तयार केलेल्या या अद्वितीय अशा वास्तुरचनेमुळे या वाड्याचा वापर अनेक फिल्म शूटस साठी केला गेला आहे.ग्रेट ग्रँड मस्ती तसेच अनेक चित्रपट, मालिका आणि वेबसिरीजचे शूटिंग या पॅलेस मध्ये झाले आहेत. या पॅलेस मध्ये अनेक इतिहासिक वस्तू आहेत.सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजून 30 मिनिटांपर्यंत हा राजवाडा पाहण्यासाठी खुला असतो. राजवाडा आतून पाहण्यासाठी माफक प्रवेश फी आकारली जाते.

5) दाभोसा धबधबा

जव्हारचं मुख्य आकर्षण म्हणजे दाभोसा धबधबा. तुफान वेगाने कोसळणारं पाणी. या धबधब्यातल्या पाण्याचे तुषारच सुमारे १०० फूट उंचीपर्यंत उडतात. या धबधब्याशिवाय इथे हिरडपाडा धबधबाही आहे. अलीकडेच बांधण्यात आलेलं खडखड धरण लोणावळ्यातल्या प्रसिद्ध भुशी डॅमची आठवण करून देतं. जोरदार पावसाने हे धरण भरून वाहू लागलं की त्या पाण्यात भिजण्याचा मनसोक्त आनंद लुटता येतो. पाण्यात भिजण्यासाठी तिथे खास पायऱ्याही बांधण्यात आल्या आहेत. जव्हारपासून सुमारे सहा ते सात किलोमीटरवर हे धरण आहे. इथली आदिवासी आणि वारली संस्कृती प्रसिद्ध आहे.

6) काळ मांडवी धबधबे

जव्हार शहराच्या दक्षिणेस 8 कि.मी. अंतरावर आकर्षक काळमांडवी धबधबा आहे. ट्रेकिंग, रॉक क्लाइंबिंग आणि रॅपेलिंग यासारख्या साहसी खेळांसाठी या खडकाळ आणि उंच धबधबा पर्यटक यांना आकर्षित करतो.काळमांडवी धबधबा उंची सुमारे 100 फूट उंचीचा आहे आणि तो संपूर्ण वर्षभर वाहतो. या ठिकाणी सर्वत्र धबधबे आणि 'झरे सर्वात निसर्गरम्य दृश्ये पाहण्यास मिळतात. काळमांडवी धबधबा हे असून ते जवळील आपतले गन येथे वसलेले आहे.जव्हार ते कलमंडी हे झाप रोड मार्गे 5-6 किलोमीटरचे अंतर आहे.पावसाळ्यात या ठिकाणी जायचं म्हणजे तारेवरची कसरत समजावं. दोन छोट्या नद्यांचा संगम येथे होत असतो .विविध आकाराचे दिसणारे पाण्याचे खळगे आकाराने छोटे असले तरी त्यांची खोली खूप जास्त आहे .जेवढा धबधबा उंचावरून पडतो त्याचा पेक्षा चार पट खोल ते खळगे आहेत.या ठिकाणी डोहमध्ये वरतून पडणार पाणी आतल्या आतून जाऊन 50फूट पुढे जाऊन निघते .या ठिकाणी पावसाळ्यात जाणे खरतर तलाव कारण पाण्यात पडल्यावर मदतीसाठी जवळपास गाव पण नाही आणि खूप खोल दरीत असल्यामुळे तिथून वर जाऊन मदत घेणे पण खूप कठीण आहे.

7) भूपतगड किल्ला

भूपतगड जव्हार राज्याची पहिली राजधानी होती. भूपतगड हा जव्हार तालुक्यातील झाप या गावाजवळ असणारा एक किल्ला आहे. सुंदर अशी तटबंदी या किल्ल्यात आहे तसेच तेथे गरम पाण्याचे छोटे छोटे कुंड आहेत. सुंदर असे ऐतिहासिक ठिकाण आहे.ह्या किल्ल्याला मोठा इतिहास आहे. भूपतगड जव्हार मधील प्रसिद्ध किल्ला आहे. किल्ल्यावर अनेक पाण्याचे टाके आहेत तसेच अनेक कोठारे आहेत अनेक बुरुज हे ढासाळलेल्या अवस्थेत आहेत. गडावर अनेक जुन्या वाड्याचे अवशेष आहेत. जव्हार ठाणे जिल्ह्यात आहे. तेथे पोहोचण्यासाठी जव्हारला जाण्यासाठी अनेक मार्ग असून त्यांतील दोन मार्ग प्रचलित आहेत. एक म्हणजे कल्याण -कसारा – विहीगाव – मोखाडा -जव्हार हा मार्ग, तर दुसरा ठाणे जिल्ह्यातून कल्याण – भिवंडी – वाडा – विक्रमगड – जव्हार असा मार्ग. भूपतला येण्यासाठी ठाणे जिल्ह्यातीलच कुर्लोट गावामार्गेही वाट आहे. मात्र ही वाट खडी चढाईची आहे.

जव्हारवरून चोथ्याचा पाडा, केळीचा पाडा, पवारपाडा अशी छोटी आदिवासी गावे पार करत माणूस १६ किलोमीटरवरील झाप गावात येऊन दाखल होतो. जव्हारहून झापला दर तासाभराने एस.टी.ची देखील व्यवस्था आहे. भूपतगडाचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या अगदी जवळ जाईपर्यंत इथे किल्ला असल्याचे जाणवत नाही. जव्हार परिसरातील डोंगररचना अतिशय क्लिष्ट आहेत; ठळकपणे दाखवता येईल असा आकार येथील एकाही डोंगराला नाही. त्यामुळे झापवरून भूपतगडाच्या पायथ्याला वसलेल्या चिंचपाड्याची दिशा विचारून किल्ल्याकडे करण्याखेरील दुसरा पर्याय नाही. चिंचपाड्याहून भूपतगडाच्या पहिल्या पठारापर्यंत जीप जाईल असा कच्चा रस्ता तयार झाला असून इथे एक झेंडा लावलेला आहे. झेंड्याच्या शेजारी पाषाणात कोरलेली पावले आहेत. स्थानिक ग्रामस्थ या पावलांना नित्यनेमाप्रमाणे ‘सीतेची पावले’ म्हणतात.

‘सीतेची पावले’ असलेल्या या पठारावरून गर्द झाडीने भरलेला भूपतगड दिसतो. त्याच्या माथ्याच्या दिशेने सरकलेली ठसठशीत पायवाटही नजरेत भरते आणि फक्त वीस मिनिटांत भूपतगडाच्या पडलेल्या तटबंदीतून गडमाथ्यावर पोहोचता येते. किल्ल्याच्या माथ्यावर पाऊल ठेवले की उजवीकडे जाणाऱ्या पायवाटेने गेल्यास किल्ल्याच्या भग्न दरवाजाचे अवशेष दिसतात. येथे किल्ल्याच्या माथ्याकडे येणाऱ्या पायऱ्या दृष्टीस पडतात. हा किल्ल्याचा मुख्य प्रवेशमार्ग असून सध्या तो पडलेल्या अवस्थेत आहे.

भूपतगडाची दक्षिण बाजूच्या पठारावर जोडटाक्यांचा एक समूह असून पाणी अडवण्यासाठी त्याला भिंतही बांधलेली दिसते. या टाक्यांच्या खालच्याच बाजूला एक तलाव असून त्याच्या काठावरही पाणी अडवण्यासाठी भिंतीची रचना केलेली दिसते. मात्र या तलावाचे पाणी पिण्यायोग्य नसून टाकीसमूहातील एकाच टाक्याचे पाणी पिण्यायोग्य आहे. भूपतच्या दक्षिण कडय़ावर तुरळक तटबंदी सोडल्यास कोणतेही अवशेष शिल्लक नाहीत.

हवा स्वच्छ असेल तर भूपतगडाच्या माथ्यावरून उत्तरेकडे असलेली त्र्यंबक रांग दृष्टीस पडते. पावसाळ्याच्या शेवटी शेवटी या भूपतगडाचे आणि आजूबाजूच्या आसमंताचे रूप देखणे असते. सोनकीच्या फुलांनी (Senecio grahamii, Graham's groundsel) सजलेले भूपतचे पठार आणि त्याच्या माथ्यावरून दिसणारा पिंजल नदीच्या खोऱ्याचा विस्तीर्ण मुलुख, सूर्यमाळचे पठार, खोडाळ्याचा प्रदेश हा भाग म्हणजे डोळ्यांसाठी जणू पर्वणीच वाटते.

8)बाणगंगा महादेव मंदिर

जव्हारमध्ये जुन्या राजवाड्याजवळ असलेले श्री मुक्तेश्वर महादेव मदिर. या मंदिराजवळ असणाऱ्या एका जिवंत झऱ्याला बाणगंगा म्हणून ओळखले जाते. म्हणून या मंदिराला बाणेश्वर महादेव मंदिर म्हणून देखील ओळखले जाते. संस्थान काळात स्वतः राजे दर शिवरात्रीस महादेवाची महापूजा बांधत असत. या मंदिरातील पूजा-अर्चा राजघराण्याकडून होत असे. कालांतराने इतर मंदिरांसह देवस्थान समितीकडे हे महादेव मंदिर जव्हार नरेशांनी सुपूर्त केले. त्यानंतर २००१ साली या मंदिराचा जीर्णोद्धार जव्हारच्या नागरिकांच्या सहकार्यातून करण्यात आला. महाशिवरात्री, त्रिपुरारी पौर्णिमा, होळी हे उत्सव या मंदिरात आजही भक्तीभावाने साजरे होतात. श्रावण महिन्यात याठिकाणी दर्शनासाठी अलोट गर्दी होत असते. प्रत्येक श्रावणी सोमवारी मंदिरात होणाऱ्या शिव भक्तीच्या भजनाचे सूर जुन्या राजवाड्यापर्यंत घुमतात आणि या राजवाड्याचा प्रत्येक चिरा शिव महिमा ऐकायला जणू जिवंत होतो. या मंदिरासमोर असलेल्या वृक्षाच्या ढोलीतील खोडला गणपतीच्या सोंडेचा आकार आल्याने या वृक्षासमोर जाताना निसर्गाची ही किमया पाहावयाला पावले आपोआपच थबकतात.

9) धाकटी जेजुरी (खंडोबा देवस्थान)

महाराष्ट्राची धाकटी जेजुरी जव्हार येथील जागृत स्थान.!!!

खंडोबा मंदिराचे एतिहासिक महत्त्व- जव्हार राज घराण्याचे कुलदैवत म्हणून या स्थानाला महत्त्व प्राप्त झाले होते,.जव्हारची रणगर्जना हर हर महादेव ही होती.संस्थानि आमदानीत जव्हार चंपाषष्टीची फार मोठी यात्रा भरत असे. या यात्रेस नाशिक.इगतपुरी.घोटी.देवळाली आदी भागातून अनेक भाविक येत असत. जेजुरी या खंडेरायाच्या मुख्यास्थानी ज्या भाविकांना दर्शनासाठी जाने शक्य होत नसे.असे अनेक भाविक जव्हार येथील धाकटी जेजुरी येथे दर्शनासाठी येत असत. जव्हारचे राजे चवथे पतंगशाह यांच्या मातोश्री कै.राणी लक्ष्मीबाई या जेजुरीच्या रामजी चव्हाण या मराठा्च्या कन्या त्यांचे माहेरचे नाव मुक्ताबाई.मुक्ताबाई यांचे उपास्य दैवत खंडोबाराया असल्याने या दैवताचे मंदिर जव्हार येथे सुद्धा बांध असा आदेश त्यांनी आपला मुलगा राजे ४थे पतंगशाह यांना दिला.जेजुरी सारखेच कडेपठार असलेल्या स्थानावर बांधण्यासाठी जव्हार गावाच्या एका बाजूस पठारावर सूर्य तलावाशेजारी शांत व प्रसन्न जागा निवडून ४ थे पतंगशाह यांनी जव्हार येथील मध्ये बांधले.

10)जुना राजवाडा

काळा अभावी दुर्लक्षित होत चाललेला जुना राजवाडा आज फक्त क्रिकेट ग्राउंड आणि डम्पिंग ग्राऊंड म्हणुन ओळखला जातो आहे. संस्थानचा पहिला राजवाडा हा २०० वर्षापूर्वीचा सन १७५० साली कृष्णराजाने बांधला होता.पण दुर्दैवाने अवघ्या ७२ वर्षानी इ.स.१८२० साली तो अग्निनारायणाच्या भक्षस्थानी पडला.पेशव्यांचा अनुज्ञेने जव्हार संस्थानचा गादीवर बसलेले तीसरे विक्रमशाह उर्फ़ मालोजीराव इ.स.१८२१ मधे वारल्यानंतर जव्हार संस्थानचा गादीवर कोणी वारस नव्हता, त्यामुळे विक्रमशाहच्या दोन भावात तंटा निर्माण झाला.तिसरया विक्रमशाहला दोन बायका होत्या, आनंदीबाई आणि सुगणाबाई ह्या होत्या.सगुणाबाई त्यावेळी थोड्याच दिवसात प्रसूत होऊन त्याना मुलगा झाला, त्यांचे नाव तिसरा पतंगशाह ठेवले.विक्रमशाह उर्फ़ मालोजीराव इ.स.१८२१ मधे वारल्यानंतर जव्हार संस्थानचा गादीवर कोणी बसायचे यावरून खुप वादंग माजलातो इतका माजला की त्यामुळे राज्यात या प्रकरणाने बंड माजले आणि या गादीवरून झालेल्या भांडणातुन बंडखोरांनी इ.स.१८२२ साली जव्हारचा राजवाडा जाळुन कागदपत्रे,जूने ऐतिहासिक पुरावे वैगेरे सर्व जळुन राख झाले.आजही जून्या राजवाडा मधे नगारखाना तसेच नक्षी काम केलेले दगड़ी जोते दिसतात.

11) जयसागर डॅम

महाराज यशवंतराव मुकणे यांनी तत्कालीन जव्हार शहराच्या पाणी पुरवठायासाठी(1950) एक धरण बांधायचे ठरवले. त्यावेळी शहराची लोकसंख्या ही 12 हजार असावी. उन्हाळ्यात शहरात पाणी टंचाई होत असे आणि शहरातील तलावे ही पूर्ण पाणी पुरवू शकत नव्हते म्हूणन राजांनी धरण बांधले आणि आपले पूर्वज जयदेवराव यांच्या नावाने धरणास जयसागर असे नाव दिले विशेष म्हणजे त्याकाळी संस्थानिक धरण बांधण्यासाठी ब्रिटिश सरकार कडून आर्थिक मदत मागत असे परंतु राजे यशवंतराव यांनी स्वतःच्या तिजोरीतील पाच लक्ष रुपये देऊन धरण बांधले. आज शहरची लोकसंख्या वाढली आहे तरी पाण्याची गरज भासते तरी पण धरणामार्फत पाणी पुरवठा केला जातो. राजे यशवंतराव यांनी आपल्या मूळ गावातील भागासाठी(नाशिक जिल्हा) धरणासाठी शासनाला पैसे दिले होते त्यांच्या स्मारनार्थ आज मुकणे डॅम नाशिक जिल्हात आले. जयसागर डॅम मध्ये आता पर्यटनसाठी बोटिंग पण सुरू कारण्यात आली आहे.

12) विजयस्तंभ आणि क्लॉक टॉवर (clock tower)/स्मारक (1945)

महाराज यशवंतराव मुकणे हे जेव्हा दुसऱ्या महायुद्धातून विजयी परत आल्यावर त्यांच्या आणि जव्हारच्या कामागिरी बद्दल एक विजयस्तंभ शहरात उभरण्यात आला. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात जव्हारच्या संस्थानाने सहकार्य केल्यावर तसेच युद्धात ब्रिटिश यांना मदत केल्यावर तसेच जव्हारच्या राजांनी युद्धात सहकार्य केल्याबद्दल विजयस्तंभ उभरण्यात आला. तेव्हा तत्कालीन मुंबईचे प्रांताधिकारी, ठाणे आणि नाशिकचे कलेक्टर,सैन्य अधिकारी,ब्रिटिश अधिकारी उपस्थित होते. तेव्हा जव्हार मध्ये भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. जव्हारच्या सैनिक आणि पोलीस यांची परेड झाली होती. हत्ती, उंट आणि घोडे यांची मिरवणूक काढली. त्यानंतर येथे जव्हार शहराचा क्लॉक टॉवर उभारण्यात आला तसेच येथे नंतर यशवंतराव महाराज यांचे स्मारक उभरण्यात आले आजही येथे शाही दसऱ्याचे आयोजन होते.

13)ऐतिहासिक वास्तू

पूर्वीच्या काळात जव्हार हे एक ब्रिटिशांकीत संस्थान होते त्यामुळे तेथील राजांनी अनेक गोष्टी निर्माण केल्या आणि जव्हार संस्थानाचा विकास केला. यात प्रामुख्याने वाडे, पूल, इमारती, उद्याने, संग्राहलय, मंदिरे अश्या वास्तू येतात. त्यात मुख्य म्हणजे जव्हारचे संस्थानाचे दिवाण आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे सासरे चिपळूणकर यांचा वाडा होय. तसेच ब्रिटिश अधिकारी हे पर्यटन साठी आल्यावर त्यांच्यासाठी बांधलेले गेस्टहाऊस हे जव्हार मध्ये हमकास लोक पाहण्यासाठी येतात.अप्पर जिल्हा कार्यालय, राधा हायस्कुल, कृष्णा हायस्कुल, के.व्ही. विद्यालय, शासकीय टाऊन हॉल, संग्राहलय,पोलीस स्टेशन, पोस्ट ऑफिस, टांकसाळ,जिमखाना, नगरखाना, अंबरखाना, पागा, फिल्टर हाऊस आणि अनेक शासकीय कार्यालये यासारखे अनेक पुरातन वास्तू जव्हार मध्ये आहे.

जव्हार संस्थानचे राष्ट्रगीत

[संपादन]

जव्हार संस्थानच्या राष्ट्रगीताला दिनांक १३ नोव्हेंबर १९४४ रोजी राजमान्यता मिळाली. हे राष्ट्रगीत, बडोद्याचे राजकवी कवी यशवंत यांनी रचले. त्याचे पहिले गायन जव्हार नरेश श्रीमंत यशवंतराव मुकणे महाराज हे दुसऱ्या महायुद्धावरून परत आल्यानंतर त्यांच्या २७ व्या वाढदिवसा निमित्त झाले. जव्हार संस्थानची भौगोलिकता, वनवैभव, राजगुरू कृपाशीर्वाद, राजांची शौर्यगाथा, मायभूमीवरील प्रेम, जनकल्याणकरी राजा अश्या रीतीने जव्हार संस्थानाचा गौरव करणारे हे राष्ट्रगीत आहे. ते दि.१३ नोव्हेंबर १९४४ रोजी राजमान्यता मिळाल्यापासून ते जव्हार संस्थानाच्या भारतातील विलीनीकरणापर्यंत, प्रत्येक समारंभात गायले जात असे.

जय मल्हार ! जय मल्हार !
गर्जू या जय मल्हार !!
सह्याद्रीचे हे पठार I
शौर्याचे हे शिवार I
राखाया या बडिवार I
येथे नवोनव अवतार II१II

येथले धनुष्यबाण I
अजून टणत्कार करून I
टाकतात परतून I
कळी काळाचेही वर II२II

साग, शिसव, ऐन दाट I
सोन्याचे बन अफाट I
त्यांत शाह नांदतात I
दीनांचे पालनहारII३II

सदानंद -वरद- हात I
जयबांची शौर्य- ज्योत I
ध्वज भगवा सूर्यांकित I
दावी राज्य हे जव्हारII ४ II

प्यार अशी माय भूमी I
माय भूमी तव कामी I
वाहू सर्वस्व आम्ही I
होऊ जीवावर उदार II ५ II

जय वंशी क्षेम असो I
राजा वीरहो क्षेम असो I
जनता- कल्याण वसो I
त्यात सदा अपरंपार II ६ II

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Imperial Gazetteer2 of India, Volume 23, page 299 -- Imperial Gazetteer of India -- Digital South Asia Library". dsal.uchicago.edu. 4 मार्च 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-04-19 रोजी पाहिले.
  2. ^ "1911 Encyclopædia Britannica/Jawhar - Wikisource, the free online library". en.m.wikisource.org. 2020-04-19 रोजी पाहिले.
  3. ^ Elison, William (2018). The Neighborhood of Gods: The Sacred and the Visible at the Margins of Mumbai (इंग्रजी भाषेत). University of Chicago Press. ISBN 978-0-226-49490-6.
  4. ^ Tribhuwan, Robin D.; Savelli, Laurence (2003). Tribal Masks and Myths (इंग्रजी भाषेत). Discovery Publishing House. ISBN 978-81-7141-636-3.
ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.