Jump to content

दुसरे बाजीराव पेशवे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पेशवा बाजीराव दुसरा या पानावरून पुनर्निर्देशित)

दुसरा बाजीराव (इ.स. १७७५२८ जानेवारी, इ.स. १८५१) हा १८०२ ते १८१८ या काळातील पेशवा होता. मराठा साम्राज्याला उतरती कळा याच्याच काळात आली. अनेक चुकीचे निर्णय, चैनीसाठी शत्रूंशी केलेले नुकसानकारक समझोते, ऐन युद्धात मोक्याच्या क्षणी पळून जाणे अश अनेक कारणांनी याला 'पळपुटा बाजीराव' असेही म्हणतात.[ संदर्भ हवा ]

जन्म आणि बालपण

[संपादन]

बाजीराव हा रघुनाथराव आणि आनंदीबाई यांचा मुलगा होता. आनंदीबाई यांना नारायणराव पेशव्यांच्या खुनाच्या आरोपाखाली माळवा प्रदेशातील धारच्या किल्ल्यात नजरकैदेत ठेवण्यात आले होते. येथेच १० जानेवारी १७७५ला त्यांनी बाजीरावास जन्म दिला. बाजीराव जन्मापासून ते वयाच्या १९ व्या वर्षापर्यंत नजरकैदेतच वाढला. इतर पेशव्‍यांना जसे लष्‍करी पद्धतीचे शिक्षण मिळाले होते व त्‍यांचे व्‍यक्तिमत्त्व जसे बहुआयामी घडले होते तसे व्‍यक्तिमत्त्व दुसरा बाजीराव यांस मिळाले नाही कारण त्‍याचे शिक्षण मुख्‍यतः फक्‍त भिक्षुकी शिक्षण झाले.[]

पेशवेपद

[संपादन]

सवाई माधवरावांच्या आत्महत्येनंतर त्यांना वारस नसल्यामुळे रघुनाथरावांचा मुलगा बाजीराव याचा पेशव्यांच्या गादीवर हक्क होता. पण असे झाले तर आपले राजकीय वर्चस्व धोक्यात येईल अशी भीती नाना फडणवीसांना होती. त्यामुळे त्यांनी बाजीरावचा धाकटा भाऊ चिमणाजी याला पेशव्यांच्या गादीवर बसवले. त्यासाठी त्यांनी सवाई माधवरावांच्या पत्नीस चिमणाजी याला दत्तक घ्यावयाचे सांगितले. सन १७९६ला चिमणाजी पेशवेपदावर आले. परंतु पुन्हा काही दिवसांतच दौलतराव शिंदे आणि नाना फडणवीस यांनी छत्रपतींना सांगून बाजीरावास पेशव्यांची वस्त्रे दिली.

१८०० साली नाना फडणवीसांच्या मृत्यूनंतर दुस-या बाजीरावाच्‍या मनमानी कारभाराला लगाम घालणारा कोणी मातब्बर असा, पुणे दरबारात उरला नाही. दुस-या बाजीरावास राज्‍यकारभार चालविण्‍याचे शिक्षण मिळालेले नव्‍हते. त्‍याने सत्तेचा दुरुपयोग करून प्रजेच्‍या संपत्तीचा अपहार करणे सुरू केले. त्‍याच्‍या अंमलामध्‍ये प्रजेला आपल्‍या मालमत्तेची व जीविताची खात्री वाटेनाशी झाली. सत्तेमध्‍ये सर्वत्र लबाडांचा उदोउदो सुरू झाला. पेशवेपदी आल्‍यावर दुस-या बाजीरावाने आपले वर्तन उदार ठेविले नाही. सत्ताधीशाने सूड उगवावयाचा नसतो, प्रजेचे पालन करावयाचे असते, मात्र दुस-या बाजीरावाने सत्तेचा दुरुपयोग करून आपल्‍या वडिलांच्‍या विरोधातील राजकारणी लोकांना भयभीत केले. त्‍यामुळे पिढ्यानपिढ्या मराठी सत्तेच्‍या कल्‍याणासाठी प्राणपणाने झटणारे सत्तेचे चाकर दुस-या बाजीरावाच्‍या काळात झपाट्याने राज्‍यकारभारामधून बाजूला झाले. एका बाजूला सत्तापदावर बसलेला दुसरा बाजीराव व त्‍याला साथ होती दौलतराव शिंदे याची या दोघा अपरिपक्‍व तरुणांनी बेबंद कारभार करून प्रजेला सळो की पळो करून सोडले.

इ.स. १८०० च्‍या सुमारास पेशवे विरुद्ध होळकर, होळकर विरुद्ध शिंदे (सिंदिया) अशा लढाया जुंपल्‍या. मोठमोठे सरदार आपल्‍याच मुलखात लुटालूट करत सुटले. यामध्‍ये यशवंतराव होळकराचा वडील भाऊ विठोजी देखील होता. दुस-या बाजीरावाने त्‍याला पकडून अतिशय क्रूरपणे हत्तीच्‍या पायाशी बांधून ठार मारिला. त्‍यामुळे यशवंतराव होळकराने इंदूरवरून पुण्यावर चाल केली. त्‍याला आपण काय करतो आहोत हे कळत होते त्‍यामुळे त्‍याने शक्‍य तेवढे सबुरीने घ्‍यायचे धोरण ठेवले. त्‍याने दुस-या बाजीरावाकडे समेट करण्‍यासाठी माणसे पाठविली. मात्र त्‍या माणसांना देखील दुस-या बाजीरावाने कैद केले. यामध्‍ये मोरोबादादा, समस्‍त फडके मंडळी, गोपाळवराव मुनशी हे लोक होते. त्‍यांच्‍यापैकी कित्‍येकांस कैद होऊन त्‍यांची रवानगी अवघड किल्‍ल्‍यांवर झाली. सरतेशेवअी यशवंतराव होळकराने पुण्‍यावर हल्‍ला चढवला तेव्‍हा त्‍याच्‍याशी सामना देणे दुस-या बाजीरावाला शक्‍य झाले नाही. तो वसई येथे इंग्रजांच्‍या आश्रयाला गेला. त्‍यावेळी जगाच्‍या राजकारणात वरचष्‍मा राखून असलेले इंग्लिश लोक ही दैवदुर्लभ संधी कशी सोडतील? त्‍यांनी दुस-या बाजीरावाकडून वसई येथे तह करून घेतला. याच तहामुळे पुढील काही पिढ्यांचे पारतंत्र्य निश्चित झाले.

२ मे १८०२ला बाजीरावांचाच दत्तक भाऊ अमृतराव पेशवेपदावर आला.

डिसेंबर १८०२ला बाजीरावाने इंग्रजांशी वसईचा तह केला. या तहानुसार इंग्रज बाजीरावाला त्याचे पेशवेपद परत मिळवून देणार होते, पण त्याबदल्यात इंग्रजांना त्यांचे सैन्य मराठा साम्राज्यात ठेवण्याची तसेच त्यांचे राजकीय कारभार पुण्यातून करण्याची परवानगी हवी होती. १८०३ला बाजीराव पेशवेपदावर आले खरे पण इथून प्रत्येक बाबतीत इंग्रज मराठी सत्तेत ढवळाढवळ करू लागले. होळकर आणि शिंदे यांना ब्रिटिशांची मराठ्यांच्या सत्तेत होणारी ढवळाढवळ मान्य नव्हती. यातूनच १८०३ला दुसरे इंग्रज-मराठा युद्ध सुरू झाले. होळकर आणि शिंदे यांच्यातील गैरसमजुतींमुळे मराठे हे युद्ध हरले.

तिसरे इंग्रज-मराठा युद्ध

[संपादन]

दुसऱ्या इंग्रज-मराठा युद्धानंतर शिंदे-होळकरांचा बराचसा प्रदेश इंग्रजांनी बळकावला होता. त्यामुळे त्यांनी पेंढाऱ्यांना इंग्रजांच्या प्रदेशात जाऊन लूट करण्यासाठी उत्स्फूर्त केले. पेंढाऱ्यांनी इंग्रजांची एकामागून-एक खेडी लुटायला सुरुवात केली. या उपद्रवाला कंटाळून इंग्रजांनी त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पेशव्यांकडे आणि काही मराठी प्रमुख सरदारांकडे मदत मागितली. पण जवळपास सर्वच मराठी सरदारांना पेंढाऱ्यांबद्दल सहानुभूती असल्यामुळे त्यांनी हे सरळ-सरळ नाकारले. त्यामुळे पेशवे आणि इंग्रजांमध्ये सतत धुसफूस चालूच राहिली. त्यातच बाजीरावाने मोठे राजकारण करून इंग्रजांच्या कैदेत असलेल्या त्र्यंबकजी डेंगळ्यांची सुटका घडवून आणली. इंग्रजांनी बाजीरावास 'त्र्यंबकजी डेंगळेंना आमच्या कैदेत द्या' अशी मागणी परत-परत करूनही बाजीरावाने ह्याना त्या कारणाने इंग्रजांच्या मागण्या धुडकावून लावल्या.शेवटी इंग्रजांच्या अनेक तहांना आणि अटींना कंटाळून १८१७ला बाजीराव पेशव्यांनी सरदार बापू गोखले, कारभारी मोरदीक्षित यांना हाताशी घेऊन, त्र्यंबकजी डेंगळे तसेच शिंदे-होळकर-भोसले यांच्या बळावर इंग्रजांविरुद्ध युद्धाची घोषणा केली. आणि तिसरे इंग्रज-मराठा युद्ध सुरू झाले.

सन १८१७, महिना नोव्हेंबर, बाजीराव पेशव्यांनी प्रथम इंग्रजांच्या पुण्यातील वसाहतींवर हल्ला चढवला. पुण्यातील खडकी येथे युद्धाला तोंड फुटले. काही दिवस हे युद्ध असेच चालू राहिल्यानंतर बाजीरावांनी 'पुण्यावर संकट येऊ नये' म्हणून पुण्यापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. आणि सरदार घोरपडेंना गारपीराकडे जाऊन जालन्याकडून येत असलेल्या ब्रिटिश फौजेला अडवण्याचे आदेश दिले, पण जसा-जसा बंदूक-तोफांचा आवाज जवळ येऊ लागला तसे ऐनवेळेस सरदार घोरपड्यांनी आपली फौज माघारी फिरवली. इंग्रजांना ही वाट मोकळी झाली. तिथून मराठे आणि इंग्रजांमध्ये धावते युद्ध सुरू झाले. प्रथम पेशव्यांनी पुरंदर गाठले. नंतर मुळा-मुठा नदीकाठी मराठ्यांचे पाच हजार सैन्य विंचूरकरांच्या सरदारकीखाली ठेवून ते साताऱ्यास गेले. इंग्रजांचे हात सातारकर छत्रपतींपर्यंत पोहोचले आहेत याची खबर बाजीरावांना होती. तेव्हा इंग्रजांच्या राजकारणापासून लांब ठेवण्याचे स्वतः छत्रपतींचेच पेशव्यांना आदेश होते. म्हणून बाजीरावांनी साताऱ्यास छत्रपतींची भेट घेतली. पेशवे साताऱ्याला आहेत याची खबर लागताच जनरल स्मिथनी पुण्यावर कब्जा केला आणि १७ नोव्हेंबरला शनिवारवाड्यावर ब्रिटिशांचा झेंडा फडकला. पेशव्यांनी कोरेगाव गाठले. जनरल स्टोटन ५०० पायदळ,२ तोफ आणि २०० घोडदळ घेऊन कोरेगावाजवळ हजर झाले. १ जानेवारी १८१८ला या दिवशी ब्रिटिश ईस्ट इंडीया कंपनीच्या कॅप्टन एफ.एफ. स्टॉंटन यांच्या नेतृत्वाखालील दुसऱ्या बॉंबे नेटिव्ह इन्फन्ट्री बटालियनने २५००० पेशवे सैन्याचा पराभव केला

त्यात पेशव्यांचे मराठा १८०० सैनिक कामी आले  भीमा नदीकाठी मोठे युद्ध पेटले. युद्धात १७५ ब्रिटिश सैनिक मेले, अर्ध्याहून जास्त जखमी झाले. त्र्यंबकजी डेंगळेंनी, बापू गोखल्यांच्या मुलाचा खून केलेल्या लेफ्टनंट चिशमला ठार मारून बदला घेतला. पण ह्या युद्धात मराठ्यांचेसुद्धा मोठे नुकसान झाले. जवळपास ५०० मराठे मारले गेले. शिंदे-होळकर-भोसले यांच्या मदतीची वाट बघत पेशव्यांनी इंग्रजांबरोबर अनेक छोट्या-मोठ्या लढाया केल्या. पण त्यांच्याकडून योग्य ती मदत मिळाली नाही.

पेशवाईचा अस्त

[संपादन]

शेवटी १९ फेब्रुवारीला पेशवे पंढरपुरास निघाल्याचे समजताच जनरल स्मिथनी आष्टी येथे पेशव्यांवर हल्ला केला. ह्या युद्धात बापू गोखले मारले गेले. पेशव्यांसोबत असलेले छत्रपती इंग्रजाच्या ताब्यात सापडले.आणि ब्रिटिशांचे राजकारण साध्य झाले. ब्रिटिशांनी छत्रपतींमार्फत जाहीरनामा काढला. त्यात 'बाजीरावांचे पेशवेपद काढून घेतल्याचे' लिहिले गेले होते. १० एप्रिल १८१८ला जनरल स्मिथनी सिंहगड आणि पुरंदर हे किल्ले घेतले. ३ जून १८१८ला बाजीरावांनी धुळकोट येथे शरणागती पत्करली.

इंग्रजांनी बाजीरावाची रवानगी कानपूरजवळील ब्रह्मावर्तास केली. इंग्रजांनी रायगड किल्लादेखील ताब्यात घेतला. रायगडवर त्यांनी सगळी हिशेबाची आणि दरबारी कागदपत्रे जाळली व सगळ्या मुख्य इमारती जमीनदोस्त केल्या. इंग्रजांचा काळा कालखंड भारतावर सुरू झाला.

इतिहासकार प्रफुलचन्द्र गुप्ता म्हणतात की "ह्या युद्धाच्या फार काळ आधीपासूनच मराठी सत्तेची अवकळा सुरू झाली होती. यापूर्वी कधीही कोणत्याही पेशव्यावर अशी वेळ आली नव्हती. बाजीरावाच्या जागी कोणताही शूर असता तरी त्याला हे टाळता येणे शक्य नव्हते."

मराठ्यांच्‍या सत्तेचा अस्‍त का झाला याविषयी रियासतकार सरदेसाईंनी विस्‍तृत विवेचन केले आहे, ते पुढीलप्रमाणे -

''एक पक्ष म्‍हणतो की इंग्रजांकडे उत्तम प्रतीची शस्‍त्रास्‍त्रे व कवायती युद्धपद्धती असल्‍यामुळे इंग्रजांनी मराठ्यांवर विजय मिळविला. तर दुसरा पक्ष म्‍हणतो की इंग्रजांमध्‍ये एकता असल्‍याने इंग्रजांनी मराठ्यांवर विजय मिळविला. मात्र तसे पाहू गेले तर महादजी शिंद्यांनी (सिंदिया) अलिगढ येथे फ्रेंचांच्‍या मदतीने अत्‍याधुनिक शस्‍त्रांचा कारखाना काढला होता. तसेच फ्रेंच सेनापतींच्‍या मदतीने कवायती फौज देखील उभी केली होती. मात्र मराठ्यांच्‍या पक्षामध्‍ये सर्वांना सावरून घेणारा, सांभाळून घेणारा, पुढे नेणारा कोणी नेता नव्‍हता त्‍यामुळे मराठ्यांच्‍या पक्षाचा पराभव झाला. यावेळी इंग्रजांकडे एकाहून एक धुरंधर सेनानी, मुत्‍सद्दी व राजकारणी होते ते सर्व एकत्र विचार करून चर्चा करून राजकारणाचे धोरण काय ठरवावयाचे याचा निर्णय घेत.

(मुंबईच्‍या फोर्ट विभागातील रॉयल एशियाटिक सोसायटीच्‍या इमारतीमध्‍ये (इमारतीचे बांधकाम वर्ष अंदाजे इ.स. १८०४), मोठी लोखंडी (आगप्रतिबंधक) तिजोरी आहे. त्‍या तिजोरीमध्‍ये ठेवलेले कागदपत्र आगीमध्‍ये जळणार नाहीत. मुंबईमधील एका पारशी कंपनीने ही तिजोरी तयार केलेली आहे. ही तिजोरी प्रदर्शनार्थ ठेवली आहे. चार माणसांना देखील ही तिजोरी उचलता येणार नाही एवढी ती जड आहे. या तिजोरीमध्‍ये पुना दरबार, ग्‍वालियर दरबार, बडोदा दरबार, नागपूर दरबार अशी लेबल लावलेले छोटे छोटे ड्रॉव्‍हर आहेत. बहुधा या ड्रॉव्‍हरमध्‍ये या ठिकाणच्‍या इंगज वकिलांनी (रेसिडेन्‍ट) पाठविलेली माहिती ठेवली जात असावी व त्‍याचा एकत्रित विचार करून पुढील राजकारण ठरविले जात असावे. मराठी रियासतमध्‍ये असा उल्‍लेख आहे की, सर्व ठिकाणच्‍या दरबारांतील इंग्रजांचे रेसिडन्‍ट आपल्‍याला समजलेली स्‍थानिक माहिती चार पाच प्रतींमध्‍ये तयार करून मुंबई, कलकत्ता, मद्रास तसेच इतर सहकारी रेसिडन्‍टना पाठवीत असत.)

हे सर्व इंग्लिश लोक अनेक वर्ष राजकारणात, सैनिकी सेवेत अनुभव मिळविलेले होते. इंग्रजांकडे एका फळीतील मुत्‍सद्दी निवृत्त झाल्‍यावर त्‍याची जागा पुढे चालविण्‍यासाठी यथायोग्‍य उमेदवार निवडून त्‍याला पारंगत करण्‍यासाठी विशेष प्रयत्‍न केले जात. याउलट मराठ्यांच्‍या पक्षाकडे असे काही धोरण नव्‍हते. केवळ वंशपरंपरा चाललेल्‍या सरदारक्‍या व दरबारी पदे अयोग्‍य व्‍यक्‍तींच्‍या हातात आली. खरेतर राष्‍ट्रहिताला प्राध्‍यान्‍य देऊन, सवाई माधवरावाच्‍या आत्‍महत्‍येनंतर सर्व सरदारांनी एकत्र येऊन विचारविनिमय करून राष्‍ट्राच्‍या प्रगतीची दिशा ठरवावयास पाहिजे होती. मात्र आपसातील फाटाफुटीमुळे हे सर्व झाले नाही.

[] शिवकालात जसे चारित्र्यसंवर्धन झाले व सर्वसामान्‍य माणसाचा देखील राष्‍ट्रनिर्मितीच्‍या कार्यात उपयोग झाला ते चारित्र्य अगदीच रसातळास गेले. प्रमुख राजकारणी मंडळी देखील यातून सुटली नाहीत. वाणीची सत्‍यता राहिली नाही. शब्‍दावर विश्वास राहिला नाही. थोडक्‍यात म्‍हणजे राज्‍य चालविण्‍याइतकी तपश्‍चर्या राजकारणी लोकांची राहिली नाही व स्‍वातंत्र्य उपभोगण्‍याची योग्‍यता सर्वसामान्‍यांची राहिली नाही तेव्‍हा स्‍वातंत्र्य गेले.''

संदर्भ

[संपादन]

ना. सं. इनामदार;"झेप",कॉन्टिनेन्टल प्रकाशन,पुणे,१९६३
ना. सं. इनामदार;"मंत्रावेगळा",कॉन्टिनेन्टल प्रकाशन,पुणे,१९६९

"मराठी रियासत भाग ८" - रियासतकार सरदेसाई - पॉप्‍युुलर प्रकाशन

अधिक माहिती

[संपादन]

ना. सं. इनामदार यांनी " मंत्रावेगळा " या कादंबरीतून श्रीमंत दुसरे बाजीराव पेशवे यांच्या स्वभावातील तसेच त्यांनी केलेल्या राजकारणातील बारकावे सांगत पेशवाईचा अखेरचा काळ (सन १८१५ ते १८१८) आपल्या डोळ्यांसमोर उभा केला आहे.

"मराठी रियासत भाग ८" - रियासतकार सरदेसाई - पॉप्‍युलर प्रकाशन - शहाजी महाराजांपासून दुसरे बाजीराव पेशवे यांच्‍यापर्यंतच्‍या प्रदीर्घ कालखंडाचा तारखांप्रमाणे (ऐतिहासिक कागदपत्रांच्‍या आधारे लिहिलेला) इतिहास. रियासतकार सरदेसाई हे बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्‍या सेवेत होते. त्‍यावेळी सयाजीरावांबरोबर त्‍यांना अनेक वेळा परदेशी जाण्‍याची संधी मिळाली त्‍यावेळी तेथील इतिहासाची साधनांचा अभ्‍यास करता आला. सयाजीरावांच्‍या विश्वासातील असल्‍यामुळे मुंबईच्‍या इंग्रज दप्‍तराचे मुक्‍तपणे अवलोकन करता आले व इतिहासाची मूळ साधने पडताळून पाहता आली. अशा ठोस आधारावर मराठी रियासतचा चिरेबंदी वाडा उभा राहिला आहे.


  1. ^ a b सरदेसाईकृत मराठी रिसायत