Jump to content

मार्कंडा किल्ला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मार्कंडा किल्ला
मार्कंडा किल्लाचे ठिकाण दाखविणारा नकाशा
मार्कंडा किल्लाचे ठिकाण दाखविणारा नकाशा
मार्कंडा किल्ला
नाव मार्कंडा किल्ला
उंची ४३८३ फूट
प्रकार गिरिदुर्ग
चढाईची श्रेणी मध्यम
ठिकाण महाराष्ट्र
जवळचे गाव कळवण तालुक्यातले बाबापूर
डोंगररांग अजंठा सातमाळ
सध्याची अवस्था बरी
स्थापना {{{स्थापना}}}


मार्कंडा, मार्कंड्या किंवा मार्कंडेय या नावाने ओळखला जाणारा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.

नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी गडासमोरच दिसणाऱ्या डोंगरावर मार्कंड्या किल्ला आहे. सप्तशृंगीगड व रवळ्याजावळ्या गडांपासून खिंडीमुळे वेगळ्या झालेल्या डोंगरावर पुरातन काळी मार्कंडेय ऋषींचे वास्तव्य होते, असे सांगितले जाते. त्यामुळे हा डोंगर व त्यावरील किल्ला मार्कंड्या या नावाने ओळखला जातो.

इतिहास

[संपादन]

शहाजहानच्या काळात दक्षिणसुभा औरंगजेबाच्या ताब्यात होता. औरंगजेबाने अलिवर्दीखानाला नाशिक जिल्ह्यातील किल्ले जिकण्याचा हूकूम दिला. इ.स. १६३९ मध्ये अलिवर्दी खानाने सप्तशृंगीगड, मार्कंड्या, रवळ्याजावळ्या, धोडप हे सर्व किल्ले जिंकून घेतले. याबद्दलचा फारसीतील शिलालेख इंद्राई किल्ल्यावर पाहता येतो. वणी – दिंडोरीच्या लढाईनंतर नाशिक परिसरातील किल्ले शिवाजी महाराजांनी जिंकून घेतले. त्यात मार्कंड्याचा समावेश होता. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर मोगलांनी हे किल्ले परत जिंकले.

मार्कंड्या गडाकडे जाण्यासाठीचे रस्ते

[संपादन]

सापुतारा रस्त्यावर नाशिकपासून ४० किलोमीटरवर वणी नावाचे गाव आहे. या गावातून एक रस्ता कळवण गावाकडे जातो. या रस्त्यावर वणीपासून ९ कि.मी. अंतरावर बाबापूर नावाचे गाव आहे. हे मार्कंड्या किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. या गावापासून रस्ता वर चढत जाऊन २ कि.मी. वरील मुळणबारी खिंडीत येतो. येथपर्यंत एसटीने किंवा खाजगी वहानाने जाता येते. या खिंडीतून कळवण गावाकडे जाताना उजव्या बाजूची वाट रवळ्या–जावळ्याला तर डाव्या बाजूची मार्कंड्या किल्ल्यावर जाते.

गडावर पोहोचण्याच्या वाटा

[संपादन]

मार्कंड्या व रवळ्या–जावळ्या किल्ल्याच्या मध्ये जी खिंड आहे, तिला मुळणबारी या नावाने ओळखतात. या खिंडीतून मार्कंड्या गडाच्या दिशेने चढून गेले की पहिल्या टप्प्यावर एक पठार लागते. ही गडाची माची आहे.

माचीवरून बालेकिल्ल्याकडे जाण्यासाठी असलेल्या वाटेवर दगडात कोरलेल्या, बांधलेल्या पायऱ्या आहेत. या वाटेवरच डावीकडे एका कातळकड्याखाली कातळात कोरलेल्या दोन गुहा आहेत. त्यांना ‘ध्यान गुंफा’ म्हणतात. येथून वर चढताना उजव्या हाताला बुरुजाचे व डाव्या हाताला तटबंदीचे अवशेष दिसतात. हा पायऱ्यांचा टप्पा संपला की समोर सप्तशृंगी गड दिसतो. त्यानंतर लागणाऱ्या डाव्या बाजूच्या कातळात खोदलेल्या वाटेने बालेकिल्ल्यावर जाता येते.

काय पहावे?

[संपादन]

बालेकिल्ल्यावरून गडावर जाण्यासाठी तीन टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यावर एका घुमटीखाली कोरलेले टाके पाहाता येते. या टाक्याला ‘कमंडलू तीर्थ’ म्हणतात. या टाक्यात पिण्याचे पाणी बारामाही असते. दुसऱ्या टप्प्यावर एका रांगेत खोदलेली तीन पाण्याची टाकी पाहायला मिळतात. त्यांच्या बाजूलाच एक सुकलेले टाके आहे. गडाच्या सर्वोच्च टोकावर मार्कंडेश्वराचे मंदिर आहे. मंदिरात मार्कंडेय ऋषींची मूर्ती व शिवलिंंग आहे. गडाच्या या सर्वोच्च टोकावरून सप्तशृंगी गड, रवळ्या जावळ्या आणि धोडप हे किल्ले दिसतात.

जाण्यासाठी लागणारा वेळ

[संपादन]

मुळणबारी (मुळाणे) खिंडीतून गडावर पोहोचायला एक तास लागतो.

गडावरील सोयी

[संपादन]

गडावर रहाण्याची, जेवणाची सोय नाही. गडावरील कमंडलू तीर्थ या टाक्यात बारमाही पिण्याचे पाणी आहे. गडावर धार्मिक काम करणारे आश्रम नानामहाराज वडाळीभोईकर यांच्या आश्रमात मुक्कामाची सोय होऊ शकते.

संदर्भ

[संपादन]

हे सुद्धा पहा

[संपादन]