विकिपीडिया:सद्य घटना/मे २००८

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
मे २००८
सो मं बु गु शु सो मं बु गु शु सो मं बु गु शु सो मं बु गु शु सो मं बु गु शु
<< १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१ >>


आजचे छायाचित्र                                                                                  दि. २५ जानेवारी २०२१, सोमवार


Webysther 20190306142802 - Edifício Altino Arantes.jpg

दि. ३१.०५.२००८[संपादन]

सामूहिक विवाहांसाठी पात्रतेची खात्री न करता वाटले ४.४३ कोटी
शेतकरी आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्यांमध्ये सामूहिक विवाहांसाठी अनुदान देताना लाभार्थ्यांच्या पात्रतेची खात्री न करता ४.४३ कोटींच्या मदतीचे वाटप झाल्याचा ठपका कॅगने आपल्या अहवालात ठेवला आहे. राज्य शासनाच्या पॅकेजमध्ये तणावग्रस्त शेतकर्‍यांना तत्काळ दिलासा देणार्‍या बाबींमध्ये सामूहिक विवाहांसाठी अनुदानाचा समावेश होता. सामूहिक विवाह कार्यक्रमाअंतर्गत विवाह करणार्‍या शेतकर्‍यांच्या मुलींना प्रत्येकी १० हजारांची मदत वस्तुरूपात देण्याची योजना होती. विवाहांचे आयोजन करणार्‍या गैरसरकारी स्वयंसेवी संस्थांना प्रतिजोडपी एक हजार रुपयांचे अनुदानही जाहीर करण्यात आले. त्याचसोबत लाभार्थींची पात्रता ठरविण्यासाठी काही अटीही घालण्यात आल्या. वधू आणि वर महाराष्ट्रातील रहिवासी असावे, वधू शेतकर्‍याची मुलगी असावी, अशा अटींचा समावेश करण्यात आला. वधू ही शेतकर्‍याचीच मुलगी असल्याचा पुरावा म्हणून रेशनकार्ड, शाळा सोडल्याचा दाखला किंवा इतर कागदपत्रे गाह्य धरणे अपेक्षित होते. कॅगने पाहणी केलेल्या १६ तालुक्‍यांमध्ये २००५ ते २००७ या कालावधीत सामूहिक विवाह योजनेअंतर्गत चार हजार २७ विवाहांवर ४.४३ कोटी रुपये खर्च झाले. लेखापरीक्षणात लाभ र्थींची पात्रता तपासून पाहिल्यावर वधूची ओळख केवळ शाळा सोडल्याच्या दाखल्यावरूनच करण्यात आल्याचे निदर्शनास आले. सहा जिल्ह्यांमध्ये २००५-०७ या कालावधीत झालेल्या १० हजार ७८६ सामूहिक विवाहांपैकी ८ हजार ३२९ प्रकरणांमध्ये (७७ टक्के) शासकीय आदेश असतानाही जिल्हा महिला व बालविकास अधिकारी व निबंधकांनी विवाह प्रमाणपत्रच दिले नसल्याचे आढळून आले. यातील धक्कादायक बाब म्हणजे, अमरावती भागातील तीन हजारांवर प्रकरणांमध्ये शासकीय आदेशाचे उल्लंघन करून गैरशासकीय संस्थांच्या माध्यमातून विवाहप्रमाणपत्रे दिली गेली.
सकाळ


राजस्थान अंतिम फेरीत
शेन वॅटसनच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सनी दिल्ली डेअरडेव्हिल्सचा १०५ धावांनी पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला. ५२ धावांची आक्रमक खेळी व १० धावांत ३ बळी मिळविणारा शेन वॅटसनच आजच्या सामन्याचा खरा हीरो ठरला. दिल्लीला विजयासाठी १९३ धावांचे आव्हान होते; मात्र त्यांचा डाव १६.२ षटकांत ८७ धावांतच गुंडाळला.
सकाळ


अज्ञात रेड इंडियन्सचे ब्राझीलच्या सीमेवर दर्शन
सुधारलेल्या जगाच्या अद्याप संपर्कात न आलेल्या रेड इंडियन जमातीतील एका समूहाचे नुकतेच ब्राझील आणि पेरूच्या सीमेवर दर्शन झाले. ऍमेझॉनच्या घनदाट जंगलात राहणार्‍या या जमातीची हेलिकॉप्टरमधून टिपलेली छायाचित्रे आज प्रसिद्धीस देण्यात आली. मात्र, पेरूतील जंगलतोडीमुळे या जमातीचे अस्तित्व धोक्‍यात येण्याची भीतीही वर्तविण्यात आली आहे. अद्याप आदिम पद्धतीने जगणार्‍या शंभरावर जमाती सध्या जगात आहेत. त्यातील बहुसंख्य ब्राझील आणि पेरूमध्ये आहेत. मात्र, गेल्या तीन-चार शतकांत युरोपीय वसाहतवाद्यांशी संघर्ष आणि इतर कारणांमुळे रेड इंडियन जमातींचे अस्तित्व धोक्‍यात आले. या जमातींच्या संरक्षणासाठी ब्राझीलमधील विशेष खात्यातील (फुनाई) अधिकारी जोस कार्लोस रीस मेरिलेस ज्युनिअर यांना एका मोहिमेत नुकतेच अशा समूहाचे दर्शन घडले. सर्व्हायव्हल इंटरनॅशनल ग्रुपने ही मोहीम आयोजित केली होती.
सकाळ

दि. ३०.०५.२००८[संपादन]

नगर जिल्ह्यातील कोळसांगवीतील "साक्षी"वर बरसल्या नोटा
कोळसांगवी (ता. पाथर्डी) गावाने स्त्री जन्माचे स्वागत कृतीतून करून आगळावेगळा उपक्रम राबविण्याचा निर्धार केला आहे. गावाने कन्या शुभजन्म दिन योजना आखली असून, गावातील बहुतेक महिलांची मानसिकता नव्या उपक्रमाला अनुकूल आहे. "कन्या शुभ जन्मदिन" योजनेत सुमारे शंभर महिलांनी सदस्यत्व स्वीकारले आहे. गावात मुलगी जन्मली, की मंडळाच्या सदस्यांनी प्रत्येकी शंभर रुपये द्यावेत, असे बैठकीत ठरले. योजनेची पहिली लाभधारक कन्या म्हणून साक्षी संदीप पेटारेचा तिच्या आईसह सत्कार करण्यात आला.
सकाळ


छटपूजेसाठी मुंबईत येणारच - लालूंचे राज ठाकरेंना आव्हान
छटपूजेसाठी आपण मुंबईत येणारच आहोत. शिवाजी पार्कवर छटपूजा करण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली, तर समुद्रावर जाऊन आपण छटपूजा करू. छटपूजा हा आमचा सण-उत्सव आहे. त्याला कोणी रोखू शकत नाही, असे प्रतिआव्हान रेल्वे मंत्री लालूप्रसाद यादव यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना आज येथे दिले. राज ठाकरे यांनी लालूंनी मुंबईत येऊन छटपूजा करून दाखवावी, असे आव्हान दिले होते. ते आज लालूंनी स्वीकारले आहे. ते म्हणाले, की आपण छटपूजा करणार आहे, असे प्रसिद्धिमाध्यमांशी बोललो होतो; मात्र माझ्या या विधानाचा विपर्यास्त करण्यात आला. राज ठाकरे यांच्या घराजवळ किंवा शिवाजी पार्कवर छटपूजा करणार आहे असे सगळीकडे पसरविण्यात आले; मात्र आता छटपूजा मुंबईत होणार आहे. तो आमचा सण आहे.
सकाळ


मराठी निर्मातीचा "डॉटर" हिंदी वितरक लॉबीमुळे रखडला
हिंदीमधील वितरकाच्या एका लॉबीने मराठी निर्मात्या- दिग्दर्शकांच्या "डॉटर" या चित्रपटाचे वितरण करण्यास नकार दिला आहे. मराठी माणसांच्या मुंबईत असा प्रकार घडणार असेल तर आम्ही जायचे कुठे, असा प्रश्‍न या चित्रपटाच्या निर्मात्या-दिग्दर्शकद्वयींनी केला आहे. वयात आलेल्या मुलांना दत्तक घेताना कोणत्या अडचणी उद्‌भवतात, यासारख्या सामाजिक विषयाला हात घालणार्‍या डॉटर या हिंदी चित्रपटाच्या निर्मात्या-दिग्दर्शकांना या चित्रपटाच्या वितरणासाठी वणवण करावी लागत आहे. निर्माते-दिग्दर्शक मराठी, त्यातच मराठी कलाकारांचा अधिक भरणा आणि एकूणच मराठी माहौल या चित्रपटात असल्यामुळे हिंदीमधील वितरकाच्या एका लॉबीने या चित्रपटाचे वितरण करण्यास नकार दिला आहे. मराठी माणसांच्या मुंबईत असा प्रकार घडणार असेल तर आम्ही जायचे कुठे, असा प्रश्‍न या चित्रपटाच्या निर्मात्या-दिग्दर्शकद्वयींनी केला आहे.
सकाळ


अवैध सावकारीवर बंदीची घोषणा ठरली पोकळ
अवैध सावकारांकडून कर्ज घेणार्‍या शेतकर्‍यांनी स्वतःला कर्जमुक्त समजण्याची शासकीय घोषणा प्रसिद्धीअभावी हवेतच विरल्याने शेतकर्‍यांना सावकारी कर्जाच्या बाबतीत दिलासा देण्यात सहकार खात्याला अपयश आल्याचा ठपका कॅगने अहवालात ठेवला आहे.योग्य कायदेशीर आधाराविनाच अवैध सावकारांविरुद्ध कारवाई केल्याने सहकार खाते याबाबतीत अक्षरशः तोंडघशी पडले आहे. शासनस्तरावर होणार्‍या घोषणा किती पोकळ असतात, याचा पाढाच कॅगने शेतकरी पॅकेजवरील लेखा परीक्षण अहवाल वाचला आहे. विदर्भात सावकारी कर्जाचे प्रमाण मोठे आहे. त्यापायी शेतकर्‍यांची अक्षरशः लूट होते. त्यावर उपाय म्हणून पॅकेजमधील तत्काळ करावयाच्या उपाययोजनांमध्ये सावकारी कर्जापासून शेतकर्‍यांना दिलासा देण्याच्या उपायांचाही समावेश होता.
सकाळ


वनविभाग अवैध मासेमारी रोखण्यास असमर्थ
वनकर्मचार्‍यांची अपुरी संख्या, वाहने, बोटी, हत्यारे चालविण्याचे प्रशिक्षण नसल्याने पेंच राष्ट्रीय उद्यानातील तोतलाडोह जलाशयात अवैध मासेमारी रोखण्यास असमर्थ ठरत असल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. महाराष्ट्र- मध्यप्रदेश सीमेवरील पेंच नदीवर दोन्ही राज्यांतर्फे संयुक्तरीत्या तोतलाडोह जलविद्युत प्रकल्पाची उभारणी करण्यात आली. त्याकरिता ७,५०० हेक्‍टर वनक्षेत्रावर तोतलाडोह जलाशयाची निर्मिती करण्यात आली. ७,५०० हेक्‍टर पैकी २,५०० हेक्‍टर क्षेत्र राज्यातील पेंच व्याघ्र प्रकल्पात येते. जलाशयाचे क्षेत्र राखीव वन असल्याने त्याचा समावेश राष्ट्रीय उद्यान क्षेत्रामध्ये केला आहे. यामुळे या परिसरात १९९५ पासून मासेमारी बंद करण्यात आली आहे. तोतलाडोह जलाशय निर्मितीकरिता बाहेरून आणलेले मजूर व ठेकेदारांकरिता येथे तात्पुरती वसाहत उभारण्यात आली होती. १९९२ मध्ये तोतलाडोह संयुक्त प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर त्यापैकी बहुतांश ठेकेदार व मजूर स्थलांतरित झाले. परंतु, सुमारे १,५०० मजूर कुटुंबासह अनधिकृतरीत्या राखीव वनांवर अतिक्रमण करून तात्पुरत्या वसाहतीजवळ राहिले. त्यांच्याकडून तोतलाडोह जलाशयात अवैधरीत्या मासेमारी करणे, अवैध वृक्षतोड, अवैध शिकार केली जात होती.
सकाळ

दि. २९.०५.२००८[संपादन]

थुंकणार्‍यांनी अखेर धुतले रस्ते
रस्त्यावर थुंकण्याबाबत परदेशामध्ये कडक शिक्षा होते असे अनेकदा सांगितले जाते. फक्त दंड भरून सुटका होत नाही, तर प्रसंगी रस्ता धुण्याची शिक्षाही भोगावी लागत असल्याने तेथे रस्त्यावर अस्वच्छता करण्याचे धाडसच कोणी करीत नाही. आत्तापर्यंत परदेशात घडणारी घटना आज पुण्यात घडली आणि ती देखील कोथरूडसारख्या गजबजलेल्या भागामध्ये. महापालिकेच्या अधिकार्‍यांनी केलेल्या प्रेमाच्या सक्तीमुळे रस्त्यावर थुंकणार्‍या काही नागरिकांनी चक्क पाण्याने रस्ता स्वच्छ केला आणि आपल्या गैरकृत्याबद्दल खर्‍या अर्थाने शिक्षा भोगली. पुणे महापालिकेच्या विविध क्षेत्रीय कार्यालयातील स्वच्छता कर्मचारी आणि अधिकार्‍यांकडून सध्या अशा प्रकारची कारवाई सुरू आहे.
सकाळ


गुज्जर आंदोलनाचे लोण राजधानीपर्यंत
गुज्जर समाजाने राजस्थानात सुरू केलेल्या आंदोलनाच्या झळा राष्ट्रीय राजधानी क्षेत्राला बसण्यास सुरवात झाली असून गुडगाव, मेहरौली भागात आंदोलकांनी रास्ता व रेल रोको केल्यामुळे हे लोण आज दिल्लीच्या दारापर्यंत पोचले आहे. गेल्या वर्षी केलेल्या आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उद्या हुतात्मा दिन पाळण्यात येणार आहे. त्यामुळे शहरात उद्या आंदोलन करण्याचे राजधानीतील गुज्जर समाजाने ठरविल्यामुळे दिल्लीत सुरक्षा दलाचे सुमारे ३५ हजार जवान तैनात करण्यात आले आहेत.
सकाळ


पेट्रोल-डिझेल रेशनिंगचा इंडियन ऑइलचा इशारा
"देशात पेट्रोल आणि डिझेलची भाववाढ केली नाही, तर पेट्रोलियम पदार्थांचे रेशनिंग करण्याखेरीज पर्याय उरणार नाही" असा इशारा इंडियन ऑइल कॉर्पोरेशन या देशातील सर्वांत मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीने आज दिला. गेल्या तीन वर्षांत प्रथमच कंपनीला तोटा सहन करावा लागला आहे. या पार्श्‍वभूमीवर कंपनीला पेट्रोलियम पदार्थांची विक्री विशिष्ट पातळीवर थांबवावी लागेल, असे कंपनीचे अध्यक्ष सार्थक बेहुरिया यांनी स्पष्ट केले.
सकाळ


ज्येष्ठ अभिनेत्री जयश्री गडकर यांना चित्रभूषण पुरस्कार
मराठी चित्रपटसृष्टीवर अर्धशतकाहून अधिक काळ आपल्या घरंदाज आणि चतुरस्त्र अभिनयाने अधिराज्य गाजविणार्‍या ज्येष्ठ अभिनेत्री जयश्री गडकर यांना यंदाचा चित्रभूषण जीवनगौरव पुरस्कार आज जाहीर झाला. अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष अजय सरपोतदार यांनी या पुरस्काराची घोषणा केली. महाराष्ट्र शासनाकडून पंचवीस हजार, महामंडळाकडून अकरा हजार असे एकूण ३६ हजार रुपये, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. मुंबई येथील रवींद्र नाट्य मंदिरात राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते तीन जूनला पुरस्काराचे वितरण होणार आहे. चित्रपट महामंडळातर्फे प्रत्येक वर्षी मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ कलाकारांचा या पुरस्काराने सन्मान केला जातो.
सकाळ


सहाव्या वेतन आयोगाची रक्कम टप्प्याटप्याने देण्याची शिफारस
सहाव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करताना केंद्रीय कर्मचार्‍यांना टप्प्याटप्प्याने पैसे द्यावेत आणि त्यातील काही भाग भविष्यनिर्वाह निधीमध्ये गुंतवावा, अशी महत्त्वपूर्ण शिफारस पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार मंडळाने केली आहे. थकबाकीची रक्कम एकहाती दिल्यास उत्पादित वस्तूंची मागणी एकदम वाढून चलनवाढ आणखी फुगेल, असा दावा मंडळाचे प्रमुख आणि रिझर्व्ह बँकेचे माजी गर्व्हनर सी. रंगराजन यांनी केला आहे. "यापूर्वी वेतन आयोगाची अंमलबजावणी करताना थकबाकीची रक्कम टप्प्याटप्प्यानेच देण्यात आली होती. या वेळी तसेच करावे; अन्यथा एकहाती रकमेमुळे ग्राहकोपयोगी (कन्झ्युमर) आणि उत्पादित (मॅन्युफॅक्‍चर्ड) वस्तूंची मागणी वाढून चलनवाढ आणखी वाढेल," अशी टिप्पणी त्यांनी सादर केलेल्या अहवालात असल्याची माहिती देण्यात आली आहे. हे मंडळ पंतप्रधानांना विविध आर्थिक मुद्द्यांमध्ये सल्ला देण्याचे काम करत आहे.
सकाळ


मुंबईतच छटपूजेचा लालूंचा हट्ट!
‘ अरे छटपूजा करायला येच तू... विमानतळाबाहेर कसा येतोस, तेच बघतो ?’, असं दणदणीत आव्हान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्यानंतर केंद्रीय रेल्वेमंत्री लालुप्रसाद यादव यांनी काहीसं नमतं घेतलंय. शिवाजी पार्कवर छटपूजा करण्यात काही अडचण असेल तर मी कुठेतरी दूर समुद्रात छटपूजा करेन, अशी माघार त्यांनी घेतलेय. मात्र, छटपूजा मुंबईतच करण्याच्या भूमिकेवर ते ठाम आहेत.

राज ठाकरेंशी चर्चा करण्यास लालूंनी थेट नकार दिला. राज ठाकरेंकडे जाऊन त्यांची भेट घेण्याइतके ते कोण आहेत ?, असा खोचक सवाल त्यांनी केला. एका कार्यक्रमासाठी ते मुंबईत आले होते.

विक्रोळी आणि शिवाजी पार्कच्या सभेत राज ठाकरे यांनी मराठी भाषा आणि मराठी माणसाचा मुद्दा उपस्थित केला. उत्तर प्रदेशी आणि बिहारी नेते छटपूजेच्या माध्यमातून मुंबई-महाराष्ट्रात आपली ताकद दाखवू इच्छितात, ही दादागिरी बंद झाली पाहिजे, असा ‘ आवाज ’ त्यांनी दिला. तेव्हापासून छटपूजा इथे रोजच ‘ साजरी ’ होत आहे . रेल्वेमंत्री लालुप्रसाद यादव यांनी राजच्या आव्हानाला प्रतिआव्हान दिलं, आणि शिवाजी पार्कात त्याच्या घराशेजारीच छटपूजा करण्याचं जाहीर केलं. त्यावर, ‘ येऊनच दाखवा ’ , अशी धमकी राज यांनी दिली.

मटा.

दि. २८.०५.२००८[संपादन]

श्रीधर कांबळेकडून कागदपत्रे सादर
नासाचा संशोधक असल्याची तोतयेगिरी करणारा श्रीधर कांबळे याने सायंकाळी सव्वासहा वाजता मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील सामाजिक न्याय विभागाच्या कार्यालयात कागदपत्रे सादर केली. येथील अधिकारी बाजीराव पाटील यांच्यासह कोणीही वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित नव्हते. कार्यालयातील लिपिकांनी त्याच्याकडून कागदपत्रे स्वीकारली. श्रीधरला सामाजिक न्याय विभागाने कागदपत्रे सादर करण्यास काल उपस्थित राहण्यासाठी चार दिवसांपूर्वीच समन्स बजावले होते; मात्र तो काल आला नव्हता. आज त्याने येणार असल्याचे सांगितले होते. दिवसभर विभागाचे प्रमुख श्री. पाटील बाहेरच होते. त्यांनी कर्मचार्‍यांना श्रीधरकडून कागदपत्रे स्वीकारावीत, अशी सूचना केली.
सकाळ


गुज्जर आंदोलन चिघळले; राजस्थानच्या पंधरा जिल्ह्यांत "रा.सु.का." लागू
अनुसूचित जमातीचा दर्जा मिळावा यासाठी गुज्जर समाजाने पुकारलेले आंदोलन आणखी चिघळल्यामुळे राज्याच्या १५ जिल्ह्यांत राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू करण्याचा निर्णय राजस्थान सरकारने घेतला आहे. या आंदोलनाची व्याप्ती दिल्लीच्या दारापर्यंत पोचल्यामुळे सरकारने आंदोलकांविरुद्ध कठोर भूमिका घेण्याचा निर्णय घेतला.

आंदोलन करणार्‍या गुज्जर समाजाच्या नेत्यांनी दिल्ली आणि जम्मूकडे जाणार्‍या रेल्वेगाड्या रोखण्याची भूमिका जाहीर केली आहे. त्यानंतर राजधानीत केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अधिकार्‍यांची बैठक झाली. राष्ट्रीय राजधानी क्षेत्राला त्यामुळे अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. राजस्थान सरकारने गुज्जरांना भटक्‍या समाजाचा दर्जा देण्याची सूचना केली होती. ती त्यांच्या नेत्यांनी फेटाळून लावली आणि आंदोलन पुढेही सुरूच ठेवले. यामुळे दिल्ली-आग्रा आणि दिल्ली-जयपूर मार्गावरील वाहतूक अडकून पडली आहे. या भागातील लोहमार्गही आंदोलकांनी रोखून धरले आहेत. त्यांना हुसकावून लावण्यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्यामुळे सरकारने आंदोलनामुळे हिंसाग्रस्त बनलेल्या १५ जिल्ह्यांत राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू करण्याचा निर्णय घेतला. अजमेर, अलवार, बारन, भरतपूर, भिलवाडा, बुंदी, दौसा, धोलपूर, जयपूर, झालावार, झुनझूनू, करौली, कोटा, सवाई माधोपूर, टोंक या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकार्‍यांना कायदा व सुव्यवस्था मोडणार्‍या कोणालाही त्वरित अटक करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत, अशी माहिती राज्याच्या गृह विभागाचे प्रधान सचिव व्ही. एस. सिंग यांनी दिली.

सकाळ


पेट्रोल १० रुपयांनी; डिझेल ५ रुपयांनी वाढविण्याचा प्रस्ताव
कच्च्या तेलाच्या किमती भडकल्याने देशात पेट्रोल लिटरमागे १० रुपयांनी, डिझेल ५ रुपयांनी आणि स्वयंपाकाचा गॅस प्रतिसिलिंडर ५० रुपयांनी वाढविण्याचा प्रस्ताव पेट्रोलियम मंत्रालयाने आज पुन्हा मांडला. या विषयावर तातडीने निर्णय घेण्याचा आग्रह पेट्रोलियममंत्री मुरली देवरा यांनी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, परराष्ट्रमंत्री प्रणव मुखर्जी आणि अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या भेटी घेऊन धरला. भाववाढीचा पर्याय कोणाच्याच पचनी पडत नसल्याने पेट्रोलियम मंत्रालय नवनवे उपाय शोधून ते मांडत आहे. प्राप्तिकर आणि कंपनी करावर उपकर किंवा अधिभार लादणे हा त्यापैकीच एक उपाय पेट्रोलियम मंत्रालयाने सुचविला; परंतु त्याला चिदंबरम यांनी अनुकूलता दर्शविली नाही. जे अनुदानित इंधन वापरत नाहीत, त्यांच्यावर बोजा टाकणे योग्य नसल्याचे मत चिदंबरम यांनी व्यक्त केल्याचे सरकारी गोटातून सांगण्यात आले.
सकाळ


चेन्नई उपांत्य फेरीत; मुंबई स्पर्धेबाहेर
महेंद्रसिंग धोणीच्या "चेन्नई सुपर किंग्स"ने "हैदराबाद डेक्कन"चा सात गडी पराभव केला आणि इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यांच्या या विजयामुळे "मुंबई इंडियन्स"चे आव्हान अखेरचा साखळी सामना शिल्लक असतानाच संपुष्टात आले. मुंबई इंडियन्सचा उद्या बंगळूरविरुद्ध सामना होणार आहे; परंतु या सामन्याला आता काहीही अर्थ राहिलेला नाही. चेन्नईने प्रथम फलंदाजी करणार्‍या हैदराबाद संघाला २० षटकांत ८ बाद १४७ धावांत रोखले आणि त्यानंतर विजयाचे हे आव्हान १९.२ षटकांत पार केले. सुरेश रैनाने झुंजार ५४ धावांची खेळी केली. अखेरच्या पाच चेंडूंत सहा धावांची गरज असताना रैनाने षटकार मारला, तोपर्यंत अखेरच्या दोन षटकांत सामना रंगतदार झाला होता. त्यामुळे मुंबईच्या पाठीराख्यांच्या नाडीचे ठोके वाढले होते.
सकाळ


सोलापुरात हजार मेगावॉटचा वीज प्रकल्प
सोलापूर जिल्ह्यात होटगीजवळ केंद्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळाद्वारे १००० मेगावॉट क्षमतेचा वीज प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतल्याची माहिती केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आज दिली. कोकणातील प्रस्तावित ४००० मेगावॉटच्या प्रकल्पातून निम्मी म्हणजेच २००० मेगावॉट वीज महाराष्ट्राला देण्यात येईल. तसेच महिन्याभरात ९२९ मेगावॉट वीज केंद्र सरकार राज्य सरकारला देत आहे, अशीही माहिती त्यांनी दिली.
सकाळ

दि. २७.०५.२००८[संपादन]

फिनिक्‍स यान मंगळावर उतरले - जीवसृष्टीचा शोध सुरू
मंगळावर जीवसृष्टीची शक्‍यता तपासण्यासाठी; तसेच तेथील पाणीसाठ्याची माहिती मिळविण्यासाठी नासाने पाठविलेले फिनिक्‍स अवकाशयान आज मंगळावर उतरले. यानाने तेथील छायाचित्रे पाठविण्यासही सुरवात केली आहे. मंगळावर पाण्याचे अंश सापडल्यानंतर तेथे जीवसृष्टी असण्याची शक्‍यताही वर्तविली गेली. ही शक्‍यता पडताळून पाहण्यासाठी नासाच्या शास्त्रज्ञांनी योजना आखली होती. त्यानुसार ४ ऑगस्ट २००७ रोजी फिनिक्‍सने मंगळाच्या दिशेने झेप घेतली. तब्बल दहा महिन्यांनंतर फिनिक्‍सने स्थानिक वेळेनुसार सायंकाळी ४ वाजून ५३ मिनिटांनी मंगळाच्या कक्षेत प्रवेश केला. या वेळी यानाचा वेग प्रचंड होता. पॅराशूटच्या साह्याने वेग नियंत्रित केल्यानंतर हे यान मंगळाच्या उत्तर ध्रुवावर उतरले.
सकाळ

दि. २६.०५.२००८[संपादन]

कर्नाटकात भाजप प्रथमच स्वबळावर सत्तेवर
कर्नाटक विधानसभेच्या २२४ पैकी ११० जागा जिंकून भारतीय जनता पक्षाने दक्षिणेकडील राज्यात प्रथमच सत्तेच्या दिशेने जोरदार मुसंडी मारली आहे. काँग्रेसने ८० जागा जिंकल्या, तर देवेगौडा पिता-पुत्रांच्या धर्मनिरपेक्ष जनता दलाला २८ जागांवर समाधान मानावे लागले. साध्या बहुमतासाठी आवश्‍यक असलेल्या ११३ जागांच्या जादुई आकड्यापासून भाजप थोडासा दूर असला, तरी या पक्षाने राज्यात सत्ता स्थापण्याचा दावा केला असून, येत्या बुधवारी (ता. २८) पक्षाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार बी. एस. येडीयुरप्पा यांचा शपथविधी होण्याची शक्‍यता आहे. कर्नाटकातील या यशामुळे भाजपने आपल्या दक्षिण दिग्विजयाच्या दिशेने दमदार पाऊल टाकल्याचे मानण्यात येत आहे.
सकाळ


ठाणे पोटनिवडणूक:आनंद परांजपे विजयी
ठाणे लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेचे आनंद परांजपे यांनी ९० हजार ८७२ मतांच्या मोठ्या फरकाने दणदणीत विजय मिळवीत ठाण्यात आवाज शिवसेनेचाच, असे खणखणीत उत्तर देत राष्ट्रवादी काँग्रेसला अक्षरशः चारीमुंड्या चीत केले. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांचा बालेकिल्ला मानल्या जाणार्‍या नवी मुंबईसह बेलापूर मतदारसंघात संजीव नाईक यांना मताधिक्‍य मिळविताना अक्षरशः घाम फुटल्याचे चित्र या निकालानंतर पुढे आले. वाशी येथील कांदा-बटाटा बाजारातील लिलावगृहात झालेल्या मतमोजणीत परांजपे यांना चार लाख ६२ हजार ७६६; तर संजीव नाईक यांना तीन लाख ७१ हजार ८९४ मते मिळली. शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना सोबत घेऊन या मतदारसंघाचा कानाकोपरा पिंजून काढणारे शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा विजय महत्त्वाचा मानला जात आहे.
सकाळ


जगातील सर्वांत मोठी जैवसंपदा धोक्‍यात
गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक या तीन राज्यांच्या सीमा जिथे भिडतात, तिथे जगातील सर्वांत समृद्ध जैवविविधता पाहायला मिळते. या तीनही राज्य सरकारांच्या दुर्लक्षामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जंगलतोड सुरू असून, ही जैवसंपत्ती धोक्‍यात आली आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगांमधील हे घनदाट जंगल अनेक वन्यजीवांचे आश्रयस्थान आहे. पर्यावरणवाद्यांच्या म्हणण्यानुसार, जंगल माफिया आणि वणव्यांमुळे यातील अनेक एकर जंगल उजाड झाले आहे. या टापूत असणारे विर्दी गाव महाराष्ट्राच्या हद्दीत असून, दोन हजार वस्तीच्या या गावातील लोकांशी पर्यावरणवाद्यांनी जंगलाचा बचाव करण्यासंदर्भात अनेकदा चर्चा केली आहे. जैवविविधतेच्या जपणुकीसाठी घाऊक जंगलतोड थांबविण्याचे एकत्रित प्रयत्न गरजेचे असून, अनेक वनजमिनी खासगी मालकीच्या असल्याने हे काम अवघड बनल्याचे पर्यावरणवादी निर्मल कुलकर्णी यांनी सांगितले. राजकीय आणि सामाजिक हस्तक्षेपामुळेही वन अधिकारी फारसे काही करू शकत नाहीत, असे त्यांचे म्हणणे आहे. हजारो वन्य जीवांचे आश्रयस्थान असणारा आणि पश्‍चिम घाट म्हणून ओळखला जाणारा संपूर्ण प्रदेशच वाढती कारखानदारी आणि शहरीकरणामुळे धोक्‍यात असल्याचे त्यांनी नमूद केले.
सकाळ


तांदळाची आधारभूत किंमतही वाढविणार
गव्हाप्रमाणेच तांदळाची किमान आधारभूत किंमतही लवकरच वाढविण्यात येणार असल्याचे केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी आज येथे सांगितले. केंद्रीय मंत्रिमंडळ येत्या आठवडाभरात याबाबत निर्णय घेईल, असे ते म्हणाले. व्यवस्थितपणे कर्जफेड केलेल्या शेतकर्‍यांना नव्या कर्जासाठी व्याजदरात सवलत देण्यासंदर्भातील निर्णयही येत्या तीन-चार महिन्यांत घेण्यात येईल, अशी माहिती पवार यांनी दिली.
सकाळ


राजेशाहीचा अस्त दोन दिवसांवर
नेपाळमधील २४० वर्षांच्या राजेशाहीचा अस्त दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. लोकनियुक्त प्रतिनिधींच्या बुधवारी होणार्‍या बैठकीत माओवाद्यांच्या इच्छेनुसार राजेशाही बरखास्त केल्याची घोषणा होईल. राजे ग्यानेंद्र यांच्या त्यानंतरच्या हालचालींकडे भारतासह जगाचे लक्ष असेल. नेपाळमधील माओवाद्यांनी दहा वर्षांच्या सशस्त्र संघर्षाचा त्याग करून २००६ मध्ये राजकारणाच्या मुख्य प्रवाहात उडी घेतली आणि पहिल्याच निवडणुकीत बहुमत मिळवून ते सत्ता ताब्यात घेण्यास सज्ज झाले आहेत. दुसरीकडे, २००५ मध्ये लोकनियुक्त सरकार बरखास्त करून आणीबाणी जारी करणारे राजे ग्यानेंद्र यांना सर्वच राजकीय पक्षांचा विरोध आहे. त्यामुळे जगातील एकमेव हिंदू राजेशाही अखेरच्या घटका मोजत आहे.
सकाळ

दि. २५.०५.२००८[संपादन]

मराठी चित्रपटसृष्टीत पैशांचा पाऊस
मराठी चित्रपटसृष्टीला भरभराट आणण्यात सर्वात मोठा वाटा उचललाय तो सॅटेलाईट, व्हिडीओ तसेच म्युझिकविषयक हक्कांनी. गेल्या काही महिन्यांमध्ये प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटांना व्हिडीओ कॅसेट कंपन्यांकडून अतिशय चांगली किंमत मिळाली आहे. त्याचाच परिणाम म्हणून सध्या गाजत असलेल्या टिंग्या या चित्रपटाच्या निर्मात्यांनी आपल्या सॅटेलाईट आणि व्हिडीओ हक्कांची थेट विक्री न करता तब्बल ५१ लाखांची ऑफर दिली आहे. सॅटेलाईट तसेच व्हिडीओ हक्कांच्या विक्रीमध्ये अग्रेसर असलेल्या तीन अमराठी व्यावसायिकांनी मराठी चित्रपटसृष्टीतील ९० टक्‍क्‍यांहून अधिक चित्रपटांचे हक्क विकत घेतले आहेत. नानूभाई जयसिंघानी (व्हिडीओ पॅलेस), संजय छाब्रिया (एव्हरेस्ट) आणि सुशील आगरवाल (अल्ट्रा) हे सध्या मराठी चित्रपटांचे विविध हक्क विकत घेण्यात आघाडीवर आहेत. गेल्या तीन-चार महिन्यांमध्ये लोकप्रिय ठरलेल्या "वळू"चे सॅटेलाईट तसेच व्हिडीओ हक्क विकत घेण्यासाठी संजय छाब्रिया यांनी ४२ लाख रुपये मोजले आहेत.
सकाळ


गुर्जर आंदोलन चिघळले; गोळीबारात २१ जण ठार
राजस्थानमधील गुर्जर समाजाचे आंदोलन चिघळले असून, जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात २१ जण ठार झाले आहेत. भरतपूर जिल्ह्यात सुरू झालेल्या आंदोलनाचे लोण आता सिकर व दौसा जिल्ह्यापर्यंत पोचले आहे. दौसा जिल्ह्यातील सिकंदरा येथे संतप्त आंदोलकांनी आज पोलिस ठाण्यावर हल्ला केला. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात २१ जण ठार झाले आहेत. आंदोलनामुळे दोन दिवसांत ३७ जणांचा बळी गेला आहे. दरम्यान, हिंसाचार थांबावा यासाठी मुख्यमंत्री वसुंधराराजे यांनी गुर्जर समाजाचे नेते व संघर्ष समितीचे निमंत्रक किरोडीसिंह भैन्साला यांना उद्या चर्चेस बोलावले आहे.
सकाळ


आयपीएल: दिल्लीने मुंबईला हरविले
आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सची मधली फळी प्रथमच क्‍लिक झाली. मुंबई इंडियन्सविरुद्ध महत्त्वाच्या सामन्यात थरारक विजय मिळवून दिल्लीने उपांत्य फेरीच्या अंधुक आशा कायम राखल्या. मुंबईच्याही आशा कायम राहिल्या असल्या तरी उर्वरित दोन्ही सामने जिंकणे त्यांना आवश्‍यक आहे. दिल्लीसमोर १७९ धावांचे आव्हान होते. पाच विकेट आणि एक चेंडू राखून दिल्लीने कोटलावर विजय नोंदविला. दिनेश कार्तिक याने नाबाद अर्धशतक झळकाविले. ४ बाद ८९ अशी दुरवस्था झाल्यानंतर नेटाने वाटचाल करीत दिल्लीने बाजी मारली. कार्तिकने ३२ चेंडूंत चार चौकार व तीन षटकारांसह ५६ धावा फटकावल्या. महारूफने नाबाद २० धावा करताना अंतिम षटकात दिल्लीच्या नेहराला चौकार लगावला.
सकाळ

दि. २४.०५.२००८[संपादन]

नासाकडून निवड झाल्याचा श्रीधर कांबळेकडून बनाव
तिरवडे (ता. भुदरगड) येथील श्रीधर धुळाप्पा कांबळे या विद्यार्थ्याने आपली अमेरिकेतील नासा संशोधन संस्थेकडून अवकाश संशोधनासाठी निवड झाल्याचे खोटे भासवल्याची माहिती तपासातून पुढे येत आहे. कांबळे याची अशी कोणत्याही संशोधनासाठी निवड झालेली नसून त्यासाठी त्याने तयार केलेली कागदपत्रे खोटी असल्याचे स्पष्ट होत आहे. संशोधनासाठीचा त्याचा हा अमेरिका दौरा आर्थिक अडचणीमुळे धोक्‍यात आला होता. त्यासंदर्भात वृत्तपत्रांनी, दूरचित्रवाहिन्यांनी त्याच्या अडचणीकडे लक्ष वेधल्यानंतर राज्य सरकारने त्याच्या अमेरिकेतील सर्व खर्चाची जबाबदारी घेतली होती; परंतु कांबळे याचा हा दौराच बनावट निघाल्याने राज्य सरकारही या प्रकरणात तोंडघशी पडले आहे.
सकाळ


पेट्रोल दरवाढीचा निर्णय दोन आठवडे लांबणीवर
महागाई गगनाला भिडलेली असताना पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ करून त्यात आणखी भर घालण्याच्या मुद्द्यावरून केंद्रीय मंत्रालयांमध्येच मतभेद असल्याचे आज स्पष्ट झाले. पेट्रोल लिटरमागे १० रुपये आणि डिझेल लिटरमागे ५ रुपयांनी वाढविण्याची शिफारस पेट्रोलियम मंत्रालयाने केली, तसेच कच्च्या तेलावरील सीमाशुल्क आणि पेट्रोलियम पदार्थांच्या निर्मितीवरील उत्पादन शुल्क कमी करण्याची शिफारसही या मंत्रालयाने केली. मात्र, पेट्रोलियम पदार्थांवर मिळणारा महसूल अर्थमंत्री पी. चिदंबरम गमावू इच्छित नाहीत, त्यामुळे अर्थ मंत्रालयाने या शिफारशींवर थेट प्रतिक्रिया व्यक्त न करता, केवळ वाढत्या चलनवाढीचे कारण पुढे केल्याचे समजते. या मतभेदांमुळे दरवाढीचा निर्णय किमान दोन आठवडे पुढे ढकलण्यात आल्याचे समजते. डावे पक्ष आणि भारतीय जनता पक्ष यांनीही संभाव्य दरवाढीला विरोध दर्शविला आहे.
सकाळ


शेतकर्‍यांना दिलासा; कर्जमाफीची रक्कम ७१ हजार कोटींवर
लहान आणि मध्यम शेतकर्‍यांच्या कर्जमाफी योजनेची मार्गदर्शक तत्त्वे आज केंद्रीय मंत्रिमंडळाने जाहीर केली. त्यानुसार, या योजनेचा खर्च ७१ हजार ६८० कोटी रुपये असेल, असे रिझर्व्ह बँक आणि नाबार्डतर्फे सांगण्यात आले आहे. तर, प्रत्यक्षातील अंमलबजावणीत हा आकडा ७१ हजार कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकतो, असे सांगण्यात आले. पाच एकरांपेक्षा अधिक जमीन असलेल्या इतर शेतकर्‍यांनाही (अदर फार्मर्स) एक वेळ सवलत योजनेखाली त्यांच्या पात्र रकमेवर (एलिजिबल अमाऊंट) २५ टक्के सवलत दिली जाईल. मात्र, उर्वरित ७५ टक्के पात्र रकमेचा म्हणजेच कर्जाचा भरणा त्यांनी करणे बंधनकारक असेल.
सकाळ


नऊ महानगरपालिकांमध्ये एक ऑगस्टपासून उपकर पद्धत
मिरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली, सोलापूर, कोल्हापूर, नांदेड, अहमदनगर, अकोला, औरंगाबादजळगाव या नऊ वर्गातील महानगरपालिकांत एक ऑगस्ट २००८ पासून जकातीऐवजी उपकर आकारणी सुरू होत आहे. उपकर पद्धतीची पूर्वतयारी म्हणून सर्व महानगरपालिकांना शहरातील सर्व व्यापार्‍यांची नोंदणी करण्याचा आदेश देण्यात आला असून लहान व्यापार्‍यांचीही नोंदणी झाली पाहिजे, अशी ताकीद देण्यात आली आहे. व्यापार्‍यांच्या नोंदणीबाबतची सारी माहिती संगणकीकृत करण्यासही महापालिकांना सांगण्यात आले आहे. नोंदणी न करणार्‍यांविरोधात दोन वर्षे कैद व दंडाच्या शिक्षेची तरतूद असून त्याचा वापर करून नोंदणी मोहीम प्रभावीपणे राबवावी, असे या महानगरपालिकांच्या आयुक्‍तांना सांगण्यात आले आहे.
सकाळ

दि. २३.०५.२००८[संपादन]

पेट्रोल दरवाढीबरोबर टंचाईचाही फटका
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव आज १३० डॉलरवर पोचले असले, तरी केंद्र सरकारने मात्र दरवाढीपेक्षा तेलाची टंचाई ही बाब गंभीर असल्याची भूमिका घेतली आहे. मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत या विषयाचा उल्लेखही झालेला नसला, तरी त्यावर उद्या खास बैठकीत देशातील पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीबाबत निर्णय होण्याची शक्‍यता आहे. दोन ते पाच रुपयांपर्यंत पेट्रोलची दरवाढ सुचविण्यात आली आहे. इंडियन ऑइल, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियम या सरकारी कंपन्यांचा पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाचा गॅस यांच्या विक्रीतील दैनंदिन तोटा ६०० कोटी रुपयांपर्यंत पोचला आहे आणि येत्या काही महिन्यांत कच्चे तेल आणि अनुषंगिक उत्पादने आयात करण्यासाठी त्यांच्याकडे पैसाही उरणार नाही, अशी अवस्था येऊ शकते. या परिस्थितीत देशात पेट्रोलियम पदार्थांची प्रचंड टंचाई निर्माण होऊ शकते. पेट्रोलियममंत्री मुरली देवरा हे उद्या वरील कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांसमवेत पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांची भेट घेऊन त्यांना परिस्थितीच्या गांभीर्याची कल्पना देणार आहेत. यानंतर मंत्रिमंडळाची बैठक अपेक्षित आहे.
सकाळ


अन्नधान्य, इंधन समस्येला जागतिक संस्थाच जबाबदार; भारताची स्पष्टोक्ती
अन्नधान्य आणि इंधनाच्या आकाशाला भिडलेल्या किमतीसाठी विकसनशील देशांतील वाढती मागणी कारणीभूत नसल्याचे स्पष्ट करतानाच भारताने या समस्येसाठी जागतिक बॅंकआंतरराष्ट्रीय नाणेनिधीची धोरणे आणि विकसित देशांची कधीही न शमणारी भूक कारणीभूत असल्याचे स्पष्टपणे म्हटले आहे. जगभरातील अन्नधान्याच्या वाढत्या किमतींबाबत विचार करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेच्या विशेष बैठकीत संयुक्त राष्ट्रसंघातील भारताचे प्रतिनिधी निरुपम सेन यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. डॉलरचे घसरते मूल्य आणि जैवइंधनाच्या उत्पादनासाठी शेतीमालाचा वापर या दोन गोष्टींमुळे प्रचंड दरवाढ झाली आहे याकडे सेन यांनी या बैठकीत लक्ष वेधले.
सकाळ


ओबीसी आरक्षणासाठी दहा हजार कोटींची तरतूद
केंद्रीय विद्यापीठे, व्यवस्थापन व तांत्रिक शिक्षण संस्थांमध्ये इतर मागासवर्गीयांना (ओबीसी) राखीव जागांची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्‍यक पायाभूत सुविधांची निर्मिती करण्याकरिता १० हजार ३२८ कोटी रुपयांच्या तरतुदीस केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीने आज मंजुरी दिली. याचप्रमाणे गुजरातमधील दंगलग्रस्तांसाठीही केंद्र सरकारतर्फे वाढीव पुनर्वसन व भरपाईची आर्थिक योजनाही जाहीर करण्यात आली.
सकाळ

दि. २२.०५.२००८[संपादन]

शस्त्रसंधी पाळण्यास पाकिस्तान तयार
दहशतवादाच्या विरोधात एकत्र येऊन लढा देण्याचे भारत आणि पाकिस्तान यांनी आज पुन्हा एकदा मान्य केले; त्याचबरोबर ताबारेषेवर शस्त्रसंधी पाळण्याची तयारीही पाकिस्तानने दाखविली. परराष्ट्रमंत्री प्रणव मुखर्जी यांच्या पाकिस्तान भेटीत आज दोन्ही देशांच्या प्रतिनिधींनी कैद्यांसंदर्भातील एका महत्त्वपूर्ण करारावर स्वाक्षर्‍याही केल्या. पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग हे या वर्षाखेरीस पाकिस्तानला भेट देणार असल्याचे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी मुखर्जी यांच्यासमवेत संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर केले.
सकाळ


डाव्यांच्या लाल किल्ल्याला तडे
पश्‍चिम बंगालमध्ये मार्क्‍सवाद्यांच्या तीन दशकांच्या प्रभुत्वाला तडे जात असल्याचे पंचायत निवडणुकांमधून स्पष्ट झाले आहे. डाव्यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या नंदीग्राम आणि सिंगूर या अस्वस्थ भागातील लढतींमध्ये डाव्यांची अपेक्षेप्रमाणे पीछेहाट झाली असून, तृणमूल काँग्रेसने मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाला मोठा धक्का दिला आहे. दरम्यान, दक्षिण २४ परगणा जिल्हा परिषदेतही डाव्यांना १९७८ पासून प्रथमच पराभवाचा धक्का बसला आहे. नंदीग्राम आणि सिंगूर येथील शेतजमिनी उद्योगधंद्यांसाठी ताब्यात घेतल्यानंतर तेथे आंदोलने झाली होती. भूमी उच्छेद प्रतिरोध समितीच्या माध्यमातून तृणमूल कॉंग्रेसने या आंदोलनांना पाठबळ दिले होते. त्यामुळे या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये वारंवार चकमकी झाल्या होत्या. नंदीग्राममध्ये हिंसाचार आणि पोलिस गोळीबारामुळे वातावरण तंग झाले होते. मार्क्‍सवादी कार्यकर्त्यांनी नंदीग्राम काबीज केल्याच्या बातम्या झळकल्या होत्या. या पार्श्‍वभूमीवर, त्रिस्तरीय पंचायत निवडणुका जाहीर झाल्यानंतरही नंदीग्राम आणि परिसरात हिंसाचार झाला होता. त्यामुळे बुद्धदेव भट्टाचार्य यांच्या सरकारसाठी ही अग्निपरीक्षा ठरली होती. तसेच, पुढील वर्षी होणार्‍या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर डाव्यांसाठी या निवडणुकांना महत्त्व आले होते.
सकाळ


जयपूर बॉम्बस्फोटप्रकरणी माणगावात अतिरेकी अटकेत
जयपूर येथे झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी राजस्थानच्या गुप्तचर खात्याच्या पोलिसांनी आज सायंकाळी इम्रान काझी (वय २८) या तरुणाला अटक केली. त्याला राजस्थानला नेण्यात आले आहे. इम्रान हा म्हसाळा तालुक्‍यातील पांगलोली गावचा आहे. इम्रान हा स्फोटाच्या वेळी तेथे उपस्थित असल्याचा पोलिसांना संशय आहे. जयपूरहून तो मुंबईला आला आणि तेथे एका बारबालाबरोबर तो राहिला होता. पोलिस आपल्या मागावर असल्याचे समजल्यावर तो तेथून माणगावला आला. तेथे तो लॉजवर राहात होता. त्याने आपली दाढी व मिशा काढल्या होत्या. दरदिवशी तो लॉज बदलत होता. पोलिस पकडतील या भीतीने तो आपल्या गावीही गेला नाही. त्याने याआधी नायजेरियादुबईला भेट दिली आहे.
सकाळ


सरबजितसिंग व अफजल गुरूला एका मापात तोलू नये - भाजप
चुकून पकडलेला सरबजितसिंग आणि संसदेवरील हल्ल्यातील दोषी अफजल गुरू यांना एकाच मापाने तोलणार्‍या केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांच्या विधानाबद्दल भाजपने आज आश्‍चर्य व्यक्त केले. गृहमंत्र्यांचे हे विधान घृणास्पद मतपेटीचे राजकारण आहे, असा आरोप केला. भाजपचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर म्हणाले, की "सरबजीतच्या माफीची मागणी करता, मग अफजल गुरूला फाशी कशी देता येईल," हे केंद्रीय गृहमंत्र्यांचे विधान मतपेटीच्या घृणास्पद राजकारणाचे उदाहरण आहे. सरबजीत निरपराधी असून, तो चुकून पकडलेला आहे. तो दहशतवादी नाही, म्हणून त्याला फाशीची शिक्षा माफ करावी, अशी मागणी आहे; पण अफजल गुरूला संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरविले आहे. तो काही चुकून पकडला गेलेला नाही. असे असताना गृहमंत्री शिवराज पाटील यांनी या दोघांना एकाच मापाने तोलण्याचा प्रकार आश्‍चर्यकारक आहे.
सकाळ


चर्चगेट-विरार उन्नत रेल्वेमार्गाला तत्त्वत: मंजुरी
मुंबईच्या उपनगरी रेल्वेवरील वाढता ताण पाहता पश्‍चिम रेल्वेवरील चर्चगेट ते विरारदरम्यान सध्याच्या उपनगरी रेल्वेमार्गाच्या वर असा समांतर रेल्वेमार्ग बांधून उन्नत रेल्वे (एलेव्हेटेड) सुरू करण्याच्या रेल्वे मंत्रालयाच्या प्रस्तावास राज्य मंत्रिमंडळाने आज तत्त्वत: मान्यता दिली. उपनगरी रेल्वे सेवेसाठी सहा रेल्वेमार्ग उपलब्ध आहेत. आडवा विस्तार करण्यास जागेची मर्यादा असल्यामुळे दोन मीटर व्यासाचे काँक्रीटचे स्तंभ ठराविक अंतरावर बांधून त्यावर हा उन्नत रेल्वेमार्ग उभारला जाईल. ही रेल्वे सेवा वातानुकूलित असेल. हा प्रकल्प अस्तित्वात आल्यानंतर मुंबईत दुमजली उपनगरी रेल्वे सेवा असेल.
सकाळ


जलाशयातील अवैध मासेमारीविरुद्ध वनविभागांची सर्वांत मोठी कारवाई
महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील पेंच व्याघ्र प्रकल्पा दरम्यानच्या तोतलाडोह जलाशयातील अवैध मासेमारीला आळा घालण्यासाठी दोन्ही राज्यांच्या वनविभागांनी सशस्त्र पोलिसांच्या मदतीने मोठी मोहीम राबवून सुमारे सव्वाशेंवर मासेमारांना पिटाळून लावले. मागील पंधरा दिवसांपासून सुरू असलेली ही मासेमारी प्रतिबंधक मोहीम आजवरची सर्वांत मोठी मोहीम आहे. मासेमारीचे प्रकार कायमस्वरूपी बंद करण्याचा उपाय म्हणून महाराष्ट्राच्या वनविभागाने अँटीफिशिंग स्क्वाड स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
सकाळ


तेरा हजार हेक्‍टर शेतजमीन सिंचनाखाली येणार
हिंगणा तालुक्‍यात मिहान, कार्गो हब, ऊर्जा प्रकल्प व सिंचन प्रकल्पामुळे शेतकर्‍यांच्या शेतजमिनीचे भाव आकाशाला भिडले असून, लाखो रुपयांत शेतजमिनीची खरेदी-विक्री केल्या जात आहे. दुसरीकडे सिंचन प्रकल्पामुळे तेरा हजार हेक्‍टर शेतजमीन ओलिताखाली येत असल्याने शेतकर्‍यांत उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. तालुक्‍यातील बहुतांश शेतकरी कोट्यधीश झाले असून नाव्ही, भिवकुंड, तुरागोंदी, लखमाजूर, सावंगीनाला, वायफळ (पिटेसूर), जाम प्रकल्प, वडगाव प्रकल्पामुळे सुमारे तेरा हजार १९७ हेक्‍टर शेतजमीन ओलिताखाली येणार असल्याने कान्होलीबारा, लखमापूर, तुरागोंदी, भिवकुंड, मोहगाव (झिल्पी), वडगाव (गुजर) आदी आदिवासी भागातील शेतकरी येणार्‍या काही महिन्यांत बारमाही शेती करून ओलीत पिके घेणार असल्याची माहिती आमदार रमेशचंद्र बंग यांनी दिली आहे.
सकाळ

दि. २१.०५.२००८[संपादन]

स्थलांतरितांविरुद्ध हिंसाचारात दक्षिण आफ्रिकेत २४ मृत्युमुखी
वाढत्या महागाईने धान्य, भाजीपाल्याच्या किमती आवाक्‍याबाहेर गेल्या. बेरोजगारी वाढल्याने स्थानिक हातांना काम नाही. राहायला पुरेशी घरे नाहीत आणि शिक्षण-आरोग्याच्या सुविधांची कमतरता आहे. याला जबाबदार कोण? वर्णद्वेषाविरुद्धचा लढा जिंकलेल्या दक्षिण आफ्रिकेतील कृष्णवर्णीय जनतेने गेल्या आठवड्यात त्याचे सोपे उत्तर शोधले. ते म्हणजे- झिंबाब्वे, मोझांबिक आदी शेजारी देशांतून आलेले स्थलांतरित! त्यातून उफाळलेल्या हिंसाचारात आतापर्यंत २४ जण मृत्युमुखी पडले. या हिंसाचाराची सुरवात झाली ११ मे रोजी अलेक्‍झांड्रिया उपनगरात. गेल्या शुक्रवारपासून त्याचे लोण जोहान्सबर्गच्या बहुतांश वस्त्यांमध्ये पसरले.
सकाळ


भेदभाव करणार्‍या नव्या मसुद्याला भारताचा नकार
जागतिक व्यापार संघटनेच्या कृषी आणि औद्योगिक क्षेत्रासंबंधीच्या नव्या मसुद्यात भारतासह अन्य विकसनशील देशांच्या सूचनांना वाटाण्याच्या अक्षता लावल्याचे आज स्पष्ट झाले. त्यामुळे विकसनशील देशांमध्ये दरी निर्माण करणारा हा मसुदा भारताला पूर्णपणे अमान्य आहे, असे वाणिज्य सचिव जी. के. पिल्ले यांनी जाहीर केले. नव्या मसुद्यातील ९७ मुद्द्यांवर विविध देशांमध्ये मतभेद आहेत. गरीब शेतकर्‍यांच्या आणि देशाच्या हितास हरताळ फासण्यात आल्याने आता वाटाघाटी नाहीत, अशी भूमिकाही पिल्ले यांनी स्पष्ट केली. नव्या मसुद्यावर २६ मेपासून जिनिव्हात चर्चा होणार आहे.
सकाळ


अरुण गवळीला पुन्हा मोक्का
शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येच्या गुन्ह्यात आज आमदार अरुण गवळीला पोलिसांनी मोक्का कायद्याखाली अटक केली. यापूर्वी खंडणी व धमकावणे या आरोपांसाठीही गवळीला मोक्का लावण्यात आला आहे. जामसंडेकर यांच्या हत्येचा कट दगडी चाळीत आखला गेला, अशी माहिती उघड झाली आहे. काही दिवसांपूर्वी जामसंडेकर यांची अनोळखी व्यक्तींनी गोळ्या घालून हत्या झाली होती. मालमत्तेच्या पूर्ववैमनस्यातून झालेल्या या हत्येची सुपारी गवळी टोळीला देण्यात आली होती, अशी फिर्याद पोलिसांनी नोंदविली आहे.
सकाळ


दहशतवादाविरुद्ध इमाम सरसावले
मुस्लिमांना दहशतवादापासून दूर ठेवण्यासाठी शुक्रवारच्या नमाजानंतर मशिदींत विशेष भाषण करण्याची विनंती उत्तर प्रदेशातील इमामांना करण्यात आली आहे. कुराण कोणत्याही प्रकारच्या हिंसेचे समर्थन करीत नाही, हे वास्तव इमाम मुस्लिमांना सांगणार आहेत. इस्लामच्या नावावर दहशतवाद्यांकडून मुस्लिमांना हिंसक कारवायांसाठी प्रवृत्त केले जाते. हे सत्र रोखण्यासाठी दहशतवादाविरुद्ध चळवळ या नावाने हा उपक्रम सुरू होणार आहे. मुस्लिम धर्मगुरू आणि अभ्यासकांची (उलेमा) बैठक फेब्रुवारीत येथे झाली होती. तीत या उपक्रमाची संकल्पना मांडण्यात आली होती. इदगाहचे नायब इमाम मौलाना खलीद रशीद फिरंगीमहाली यांनी इमामांना यासंबंधी सूचना केली. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचेही ते सदस्य आहेत. निरपराध्यांचे हत्यासत्र रोखण्यासाठी जनजागरण करण्यासाठी त्यांनी या उपक्रमाची कल्पना मांडली.
सकाळ


भारतातील निम्मे कामकरी वजनदार
भारतातील उद्योगधंदे आणि व्यवसायांतील कामगार, कर्मचार्‍यांपैकी सुमारे पन्नास टक्के लोकांचे वजन सरासरीपेक्षा अधिक असून, २७ टक्के कामकर्‍यांना हृदयाशी निगडित छोट्या-मोठ्या व्याधी आहेत, असे जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) केलेल्या अभ्यासामधून दिसून आले आहे. कामाच्या ठिकाणी जाऊन कामकर्‍यांच्या आरोग्याबाबत सर्वेक्षण करण्यात आले. वाढत्या वजनाचे आणि आजारांचे प्रमाण विशेषतः शहरी विभागात अधिक असल्याचे त्यात आढळून आले. हृदयाशी संबंधित व्याधींबरोबरच, १०.१ टक्के कर्मचारी मधुमेहाने; तर ४७ टक्के कर्मचारी स्थूलतेमुळे त्रस्त आहेत. शहरीकरणाचा वेग अधिक असलेल्या भागांत हे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले. रक्ताभिसरण आणि हृदयाशी संबंधित व्याधी आटोक्‍यात ठेवण्याबाबत कर्मचार्‍यांना योग्य शिक्षण देण्याची शिफारस डब्ल्यूटीओने केली आहे.
सकाळ


फेडरल एजन्सी स्थापण्याच्या भूमिकेला संसदीय समितीचा विरोध
दहशतवादासारख्या राष्ट्रीय किंवा आंतरराज्य समस्येच्या हाताळणीसाठी एखादी मध्यवर्ती संस्था (फेडरल एजन्सी) स्थापन करण्याबाबत केंद्र सरकारने आग्रही भूमिका घेतलेली असली, तरी कार्मिक, विधी व न्याय विभागाशी संलग्न संसदीय स्थायी समितीने त्यास विरोध केला आहे. नवी संस्था स्थापन केल्यामुळे आर्थिक बोजा वाढण्याबरोबरच अधिकार-कार्यक्षेत्र यांची सरमिसळ व त्यातून संघर्ष निर्माण होण्याची शक्‍यता असल्याने सध्या अस्तित्वात असलेल्या सीबीआय या मध्यवर्ती संस्थेलाच अधिक सक्षम करावे, तसेच तिच्या स्वायत्ततेसाठी व सुरळीत कामकाजासाठी कायद्याचे पाठबळ द्यावे आणि तशी दुरुस्ती संबंधित कायद्यात करावी, अशी शिफारस समितीने केली आहे. नव्या यंत्रणेच्या स्थापनेची अजिबात गरज नाही, असे समितीने स्पष्ट केले आहे.
सकाळ

दि. २०.०५.२००८[संपादन]

बनावट सॉफ्टवेअरमुळे कंपन्यांना दोन अब्ज डॉलरचा फटका
देशात बनावट सॉफ्टवेअर (पायरसी) वापरण्याच्या प्रमाणात वाढ होत असल्याने भारतातील सॉफ्टवेअर उद्योगाला पायरसीमुळे गेल्या वर्षी दोन अब्ज डॉलरचा फटका बसला आहे. बिझनेस सॉफ्टवेअर अलियान्स (बीएसए)ने केलेल्या सर्वेक्षणात आढळून आले आहे. हे सर्वेक्षण १०८ देशांमध्ये करण्यात आले आहे. पायरसी जास्त असणार्‍या देशांमध्ये संगणकाच्या बाजारपेठेचा वेगाने विस्तार होत आहे. गेल्या वर्षी जागतिक स्तरावर पायरसीचे प्रमाण तीन टक्‍क्‍यांनी वाढले असून, ते ३८ टक्‍क्‍यांवर पोचले आहे.
सकाळ


कर्नाटक - दारू दुर्घटनेतील मृतांची संख्या ६५
कर्नाटकातील कोलार आणि तमिळनाडूतील कृष्णगिरी येथे बनावट दारू प्यायल्याने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ६५ वर पोचली आहे. काल रात्रीपासून ४४ जणांचा दोन्ही राज्यांतील विविध रुग्णालयांत उपचार घेताना मृत्यू झाला. कोलार येथील आणखी १९ जणांचा मृत्यू झाल्याने कर्नाटकातील मृतांचा आकडा ३८ वर पोचला आहे. बेंगळूरु शहरातील देवराजीवनहळ्ळी भागात बनावट दारूने २९ जणांचा बळी घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली. शहरातील दोन रुग्णालयांत आणखी काही जण मृत्यूशी झुंज देत आहेत. बेंगळूरु येथून आणलेली दारू प्यायल्याने दिनमंगलम खेड्यातील नऊ मजुरांचा मृत्यू झाला.
सकाळ


एम व्ही व्हिक्‍टोरिया जहाजाचे सोमालियन समुद्रात अपहरण
गेल्याच महिन्यात मुंबईहून निघालेले एम. व्ही. व्हिक्‍टोरिया या जहाजाचे सोमालियन समुद्रात अपहरण करण्यात आले आहे. अपहरण झालेल्या या जहाजात १० भारतीयांचा समावेश आसल्याचे डायरेक्‍टर जनरल शिपींग कार्पोरेशनच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले. मुंबई बंदरातून सोमालियातील मोगादिशू येथे जाणार्‍या या जहाजात चार हजार २०० टन साखर आहे. सोमालियन किनार्‍यापासून साधारण ५०० किलोमीटरच्या अंतरावर १७ मे रोजी ही घटना घडली.
सकाळ


प्रत्यक्ष ताबारेषेवर पाक सैन्याचा गोळीबार
प्रत्यक्ष ताबारेषेवर पाकिस्तानी सैन्याकडून आज करण्यात आलेल्या जोरदार गोळीबारात भारतीय लष्कराच्या एका जवानाचा मृत्यू झाला. जम्मू-काश्‍मीरमधील पूंछ जिल्ह्यालगत असलेल्या ताबारेषेवर हा प्रकार घडला. भारत आणि पाकिस्तान दरम्यान सुरू होणार्‍या द्विपक्षीय चर्चेला सुरवात होण्याआधीच पाकिस्तानी सैन्याकडून ही आगळीक करण्यात आली आहे.
सकाळ


तारापूर अणुऊर्जा प्रकल्पात आपत्कालीन व्यवस्था अपुरी
तारापूर येथे वीज उत्पादन प्रकल्पात आपत्कालीन परिस्थिती उद्‌भवल्यास परिसरातील लोकांना स्थलांतरित करण्यासाठी रस्त्यांची पुरेशी क्षमता नाही. बोईसर रेल्वेस्थानकापासून प्रकल्पाच्या ठिकाणापर्यंत असलेल्या रस्त्याच्या चौपदरीकरणाचा प्रस्ताव ऑगस्ट २००४ पासून न्युक्‍लिअर पॉवर कॉर्पोरेशनकडे प्रलंबित आहे. त्याकडे गांभीर्याने पाहिले नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.
सकाळ

दि. १९.०५.२००८[संपादन]

विजय तेंडुलकर कालवश
अखिल भारतीय कीर्तीचे ज्येष्ठ नाटककार विजय तेंडुलकर (वय ८०) यांचे सोमवारी सकाळी आठच्या सुमारास दीर्घ आजाराने खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्यामागे कन्या सुषमा तेंडुलकर आणि तनुजा मोहिते आहेत. त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत सकाळी दहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. तेंडुलकरांचे निकटवर्ती अशोक कुलकर्णी, विद्या आपटे तसेच रंगभूमी, चित्रपट, साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर या वेळी उपस्थित होते. गेले काही महिने तेंडुलकर "मायस्थेनिया ग्रेव्हिस" या विकाराने आजारी होते. हा स्नायूंचा विकार असून या विकारामुळे शरीरातील स्नायू शिथिल होऊन अशक्त होत जातात. गेल्या दोन वर्षांपासून त्यांना या विकाराचा त्रास सुरू होता. दहा एप्रिल रोजी त्यांना त्रास वाढल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून त्यांच्या प्रकृतीत सतत चढउतार सुरू होते. मात्र गेल्या दोन-तीन दिवसांत त्यांची प्रकृती खालावली. त्यांच्यावरील उपचारांना मर्यादित प्रतिसाद होता. ते बेशुद्धावस्थेत होते आणि कृत्रिम श्‍वसनयंत्रणेवर त्यांना ठेवण्यात आले होते, अशी माहिती डॉ. शिरीष प्रयाग यांनी दिली.
सकाळ


भारत-पाकिस्तान आजपासून बैठक
तब्बल चौदा महिन्यांनंतर भारतपाकिस्तानदरम्यान उद्या (ता. १९) पासून इस्लामाबाद येथे तीन दिवसांच्या सर्वंकष वाटाघाटींची सुरवात होत आहे. "दहशतवादमुक्त वातावरणाची निर्मिती, शांतता व सुरक्षेसह जम्मू- काश्‍मीरच्या प्रश्‍नाची सोडवणूक आणि सामाजिक व आर्थिक स्तरावरील सहकार्य, या तीन मुद्यांवर या वेळी प्रामुख्याने चर्चा होईल" अशी माहिती परराष्ट्र सचिव शिवशंकर मेनन यांनी आज येथे दिली. येत्या मंगळवारी (ता. २०) परराष्ट्रमंत्री प्रणव मुखर्जी इस्लामाबादला रवाना होत आहेत. यापूर्वी भारत-पाकिस्तान यांच्यात मार्च २००७ मध्ये सर्वंकष वाटाघाटी झाल्या होत्या. त्याचा फेरआढावा पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव सलमान बशीर व मेनन यांच्यात उद्या इस्लामाबाद येथे होणार्‍या चर्चेदरम्यान घेतला जाणार आहे.
सकाळ


अनिल अंबानी समूहाचा हॉलिवूडमध्ये चंचुप्रवेश
अनिल अंबानी यांच्या रिलायन्स बिग इंटरन्टेमेंटने (आरबीई) हॉलिवूडमधील चित्रपटनिर्मितीमध्ये चंचुप्रवेश केला असून, तेथील प्रख्यात आठ चित्रपटनिर्मिती संस्थांना वित्तपुरवठा करणार आहेत. त्यामध्ये ज्यूलिया रॉबर्ट, अँजेलिना जोली, ब्रॅड पिट, निकोलस केज यांसारख्या सेलिब्रिटीजचा समावेश आहे. यासाठी अंबानी हे एक अब्ज डॉलरपर्यंत (सुमारे चार हजार कोटी रुपये) गुंतवणूक करणार आहेत.
सकाळ


अपहृत भारतीयाची महिन्यानंतर मुक्तता
सुमारे महिन्यापूर्वी अतिरेक्‍यांनी पळवून नेलेल्या भारतीय नागरिकाची मुक्तता करण्यात अफगाणिस्तानातील सुरक्षा दलांना आज यश आले. मुहम्मद नईम (वय ४०) असे या नागरिकाचे नाव असून, २१ एप्रिलला अतिरेक्‍यांनी त्याचे अपहरण केले होते. पोलिस प्रशिक्षण केंद्रांना साधनसामग्री पुरविणार्‍या कर्मचार्‍याचे इराण सीमेजवळील पश्‍चिम आद्रस्कन जिल्ह्यातून बसप्रवास करीत असताना अपहरण करण्यात आले होते. बसचालकाला लगेच सोडून देण्यात आले होते. सुरक्षा दलांनी काल रात्री अतिरेक्‍यांविरुद्ध सुरू केलेली कारवाई आज सकाळी संपली आणि नईमसह आणखी एका अपहृताची सुटका करण्यात आली. या दोघांना काबूलमध्ये आणण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले. गुप्तचरांनी अपहृतांना ठेवलेल्या जागेचा शोध घेतल्यानंतर कारवाई करण्यात आली.
सकाळ

दि. १८.०५.२००८[संपादन]

जगन्नाथ मंदिर दहशतवाद्यांच्या लिस्टवर
पुरीच्या प्राचीन जगन्नाथ मंदिराला दहशतवाद्यांचा धोका असल्याचा अहवाल गुप्तचर विभागाने दिला आहे. हे मंदिर बाराव्या शतकातील आहे. पुरी आणि परिसरात अनेक बांगलादेशी नागरिक वास्तव्यास आहेत. बांगलादेशी अतिरेक्‍यांचा जयपूर बाँबस्फोटांत हात असल्याचा संशयही व्यक्त करण्यात येत असून, पुरीचे मंदिर दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहे, अशी माहिती मंदिराचे मुख्य प्रशासक सुरेशचंद्र महापात्रा यांनी गुप्तचर विभागाच्या हवाल्याने दिली.
सकाळ


नगर जिल्ह्यात अवकाशातून पडल्या डब्या
नगर शहरासह संपूर्ण तालुक्‍याचा परिसर काल दुपारी तीनच्या सुमारास प्रचंड आवाजाने हादरला. कशाचा स्फोट झाला, याचा खुलासा होऊ शकलेला नाही. दरम्यान, माळीबाभूळगाव येथे सापडलेल्या रिकाम्या डब्या तहसीलदारांनी आज जिल्हा प्रशासनाकडे सोपविल्या. लष्करी प्रयोगशाळा, पुण्याची राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा किंवा राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत या डब्या पाठविण्याबाबत दुपारपर्यंत निर्णय झाला नव्हता. या स्फोटसदृश आवाजानंतर, कोठेही नुकसान झाल्याची किंवा वेगळे काही घडल्याची माहिती स्थानिक प्रशासनापर्यंत आलेली नाही. गर्भगिरीच्या डोंगररांगांतील काही भाग खूपच दुर्गम व निर्मनुष्य आहे. या भागात समाजविघातक शक्तींनी स्फोटके किंवा तत्सम वस्तू लपवून ठेवल्या आहेत किंवा कसे, याचा शोध नगरबीडच्या पोलिसांनी घ्यावा, अशी मागणी नागरिक आता करू लागले आहेत.
सकाळ


संरक्षित स्मारक करणे शक्‍य नाही
महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुणे शहरामध्ये सुरू केलेल्या मुलींच्या पहिल्या शाळेची "भिडे वाडा" ही वास्तू ऐतिहासिक जागा म्हणून; तसेच संरक्षित स्मारक म्हणून जाहीर करणे राज्य सरकारला शक्‍य नसल्याचे कळविण्यात आले आहे. त्यामुळे या जागेवर राष्ट्रीय स्मारक करण्यासाठी अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेल्या तरतुदीचे नक्की काय करायचे याबाबत पुणे महापालिकेने राज्य सरकारकडेच मार्गदर्शन मागितले आहे. पालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी याबाबतचा पत्रव्यवहार स्थायी समितीच्या साप्ताहिक बैठकीमध्ये माहितीसाठी आणला असून, येत्या मंगळवारी होणार्‍या बैठकीत त्यावर चर्चा होणे अपेक्षित आहे. भिडे वाडा ही वास्तू ऐतिहासिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाची असल्याने ती संरक्षित करण्याची मागणी पुण्यामध्ये गेल्या काही वर्षांपासून विविध संस्था व संघटनांकडून करण्यात येत आहे.
सकाळ


सोनिया गांधींविषयी ऑर्कुटवर आक्षेपार्ह मजकूर
सोनिया गांधी आणि महात्मा गांधी यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर तयार करून ऑर्कुट वेबसाइटवर प्रसारित केल्याच्या आरोपावरून पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने हरियाणा येथील एका युवकास अटक केली. कॉंग्रेसचे कार्यकर्ते अमोल भोकरे यांनी १९ डिसेंबर २००७ रोजी पोलिसांकडे तक्रार केली होती. सायबर गुन्हे शाखेने तपास करून राहुल कृष्णकुमार वैद (वय २२, रा. १०९९ मारुती विहार, चकरपुर, गुरगाव, हरियाना) या युवकाला अटक केली. सहायक पोलिस आयुक्त नेताजी शिंदे, फौजदार चंद्रकांत ठाकूर, पोलिस शिपाई नवनाथ वाळके, सुनील शेळके यांच्या पथकाने आरोपीचा शोध लावला. वैद याला ता. २१ मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी संजय यादव यांनी दिला.
सकाळ


भारत-नेपाळ संबंधांवर परिणाम नाही
भारत आणि नेपाळ यांच्यातील १९५० च्या कराराचा फेरआढावा घेतल्यास उभय देशांतील संबंधांवर कोणताही परिणाम होणार नाही; तसेच नव्या समझोत्यानंतरही दोन्ही देशांमध्ये संबंध दृढ आणि विशेष असावेत, अशी आमची इच्छा असल्याचे नेपाळमधील माओवादी नेते प्रचंड यांनी आज स्पष्ट केले. नेपाळ घटना समितीच्या निवडणुकीतील विजयानंतर प्रचंड यांनी भारताशी असणार्‍या १९५० च्या कराराचा फेरआढावा घेण्याची गरज असल्याचे सांगितले होते; तसेच दोन्ही देशांतील सीमा खुल्या ठेवण्याला विरोध दर्शविला होता; तसेच भारतीय चित्रपटांना बंदी घालण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे अनेक तज्ज्ञांनी दोन्ही देशांतील संबंधांविषयी शंका उपस्थित केल्या होत्या.
सकाळ

दि. १७.०५.२००८[संपादन]

नवे घरगुती गॅसजोड नाहीत; तेल कंपन्यांचा निर्णय
देशातील सरकारी तेल कंपन्यांचा तोटा दोन लाख कोटी रुपयांपर्यंत पोचण्याचा धोका लक्षात घेऊन, या कंपन्यांनी नवे घरगुती गॅसजोड न देण्याचा आणि पूर्वीच दिलेल्या गॅसजोडच्या सिलिंडरची संख्या निश्‍चित करण्याचा निर्णय घेतला आहे. इंडियन ऑइल, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियम या कंपन्यांच्या विपणन संचालकांनी काल पेट्रोलियम मंत्रालयाला महागाई कमी करण्याच्या उपाययोजना सुचविणारे पत्र दिले. यात वरील उपाययोजना सुचविण्यात आली आहे. पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस (एलपीजी) आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे विकण्यात येणारे रॉकेल यांच्या एकूण विक्रीचा तोटा दर दिवशी ५५० कोटी रुपयांपर्यंत पोचल्याचेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य घसरत असल्याने, या कंपन्यांचा चालू आर्थिक वर्षात सुमारे दोन लाख कोटी रुपयांचा तोटा होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
सकाळ


बिहारमध्ये भ्रष्टाचाराविरुद्ध लढणार्‍याची पाठीत खिळे ठोकून हत्या
भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठविणार्‍या पंचायत सदस्याची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली. त्याच्या पाठीत सहा खिळे ठोकले आहेत.हत्या करणारे स्वत:च पोलिस असल्याने बिहारमधील वैशाली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलिस अधिकारीही संवेदनाहीन असल्याने ज्या कथित पोलिसांनी हे कृत्य केले त्यांना अद्याप निलंबितही करण्यात आलेले नाही. स्थानिक आमदार व ग्रामस्थांच्या दबावामुळे या प्रकरणी वैशाली जिल्ह्यातील भगवानपूर पोलिसांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. बुधवारी (ता. १४) रात्री एकला शेखोपूर ढरिया गावाचे पंचायत सदस्य फेंकन पंडित यांच्या घरी पोलिस गेले. यापूर्वी पंडित यांच्याविरोधात एक गुन्हा दाखल झाला आहे. तो गुन्हाही अगदी फौजदारी स्वरूपाचा नाही. त्याच्या चौकशीसाठी पंडित यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. काल (ता. १५) पंडित यांचा खिळे ठोकलेला मृतदेह बेवारस स्थितीत सापडला.
सकाळ


चीनने केली क्षेपणास्त्रे तैनात - भारत व रशिया पल्ल्यात
मध्य चीनमधील डेलिंग्हा गावाजवळ चीनने मध्यम पल्ल्याची सुमारे साठ क्षेपणास्त्रे तैनात केली आहेत. त्यामुळे भारत आणि रशियातील महत्त्वाची शहरे चीनच्या पल्ल्यात आल्याचा दावा अमेरिकेतील संशोधकाने केला आहे. गूगल अर्थ या संकेतस्थळावर या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या या तळाची छायाचित्रे दिसल्याचे त्यांनी सांगितले. दक्षिण चीनमधील हैनान बेटाजवळ पाणबुडी तळ असल्याच्या वृत्तानंतर दोन आठवड्यांतच या क्षेपणास्त्र तळाची छायाचित्रे मिळाली आहेत.
सकाळ


पुण्याची संपदा मेहता देशात २१ वी
केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) घेतलेल्या परीक्षेत महाराष्ट्रातील सुमारे चौसष्टहून अधिक विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे. पुण्यातील संपदा मेहता देशपातळीवरील गुणवत्ता यादीत २१ वी, सज्जनसिंग चव्हाण २९ वे तर अभिजित बांगर यांनी ४१ वे स्थान पटकावले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी प्रथमच मोठी आघाडी घेतली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने शुक्रवारी या परीक्षेचा निकाल जाहीर केला.
सकाळ


चलनवाढीचा वळू मोकाट
चलनवाढ आणि महागाई रोखण्यासाठी सरकारने केलेल्या उपाययोजना अपुर्‍या ठरवत चलनवाढीचा दर ७.८३ टक्‍क्‍यांवर पोचला आहे. प्रामुख्याने पोलाद आणि सिमेंटच्या दरातील वाढ आटोक्‍यात आणता आली नसल्याने, तीन मे रोजी संपलेल्या आठवड्यात चलनवाढीचा दर ७.६१ टक्‍क्‍यांवरून ७.८३ टक्‍क्‍यांवर पोचला. गेल्या ४४ आठवड्यांतील हा सर्वोच्च दर आहे. सिमेंट आणि पोलादाचे भाव उत्पादकांनी योग्य पातळीपर्यंत आणले नाहीत, तर काही प्रशासकीय उपाययोजना करण्याचा इशारा अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी पत्रकार परिषदेत दिला.
सकाळ


भारत अझलान शाह हॉकीच्या अंतिम फेरीत दाखल
शेवटच्या साखळी सामन्यात भारताने शनिवारी मलेशियाला २-१ ने धूळ चारत तब्बल तेरा वर्षांनंतर अझलान शाह हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत भारताला रविवारी ऑस्ट्रेलियाशी झुंजावयाचे आहे. भारताने आतापर्यंत तीनवेळा ही स्पर्धा खिशात घातली आहे. मात्र गेल्या दोनवर्षांत भारताला स्पर्धेत तिसर्‍या स्थानावर समाधान मानावे लागले होते.
सकाळ

दि. १६.०५.२००८[संपादन]

सरकारी कर्मचार्‍यांचा गोपनिय अहवाल आता उघड होणार
सरकारी अधिकारी, कर्मचार्‍यांचा गोपनिय अहवाल ठराविक कालावधीनंतर उघड होणार आहे. यापुढे सर्वांना त्यांच्या गोपनीय अहवालातील सर्व प्रकारचे शेरे ठराविक कालावधीत कळविण्यात येणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. त्यामुळे आता अधिकारी आणि कर्मचार्‍यांचे वरिष्ठांकडून होणारे मूल्यमापन अधिक पारदर्शी होईल. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने स्वागत केले आहे.
सकाळ


सुरक्षेच्या भीतीने वॉर्न, वॉटनस स्मिथचा आयपीएलला गुडबाय
जयपूरमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांचा इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेवर परिणाम होण्याची शक्‍यता आहे आणि त्याचा सर्वाधिक फटका राजस्थान रॉयल्स संघाला बसू शकेल. राजस्थान संघाचा कर्णधार शेन वॉर्नसह शेन वॉटसन, ग्रॅम स्मिथ आणि संघव्यवस्थापक डॅरेन बॅरी यांनी सुरक्षिततेच्या कारणावरून स्पर्धेतून माघार घेण्याचा विचार सुरू केला आहे.
सकाळ


वांद्रे-वरळी सागरी सेतू पुढील वर्षी खुला
मुंबई मेक ओव्हरमधील महत्त्वाकांक्षी अशा वांद्रे-वरळी सागरी महामार्ग प्रकल्पाचे ७८ टक्के काम पूर्ण झाले आहे. या कामातून महत्त्वाचे आणि अवघड असे केबल स्टेड बसविण्याचे काम सध्या वेगाने सुरू असून हे काम येत्या दहा दिवसांत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अध्यक्ष आणि सार्वजनिक बांधकाममंत्री (उपक्रम) अनिल देशमुख यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
सकाळ


जयपूर बॉम्बस्फोट- ई मेल साहिबाबादमधून, सायबर कॅफेचालक ताब्यात
जयपूर येथे मंगळवारी झालेल्या साखळी बॉंबस्फोट प्रकरणाची जबाबदारी स्विकारणारा ई-मेल साहिबाबाद येथील कॅफेतून पाठविल्याचे उघड झाले आहे. चौकशीसाठी विशेष कृती पथकाने उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातील या सायबर कॅफेचा मालक श्‍यामवीर ऊर्फ मधुकर मिश्रा याच्यासह त्याच्या नोकराला ताब्यात घेतले आहे. या स्फोटांची जबाबदारी स्वीकारणार्‍या इंडियन मुजाहिदीन या अतिरेकी संघटनेने हा ई- मेल पाठविला होता.
सकाळ


खासगी बँकांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले
कर्जवसुलीसाठी एजंटांमार्फत बळाचा वापर करण्याच्या खासगी बँकाच्या धोरणाविरोधात सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी सर्व बँकांना सक्त ताकीद दिली. आपण सुसंस्कृत देशात आणि कायद्याच्या राज्यात राहतो, याचे भान बँका आणि वित्त संस्थांनी ठेवावे, असे याबाबत न्यायालयाने बजावले. सर्वोच्च न्यायालयाचे न्या. तरुण चॅटर्जी आणि न्या. दलवीर भंडारी यांच्या खंडपीठाने आयसीआयसीआय बँकेची याचिका फेटाळून लावताना ही ताकीद दिली. तसेच या प्रकरणी आयसीआयसीआय बँकेने खर्चापोटी याचिकादाराला २५ हजार रुपये देण्याचे आदेशही खंडपीठाने दिले.
सकाळ

दि. १५.०५.२००८[संपादन]

जयपूर बॉंबस्फोट - संशयिताचे रेखाचित्र जारी, १२ ताब्यात
जयपूर येथे बॉम्बस्फोट मालिका घडवून आणण्यासाठी आरडीएक्‍सचा आणि अमोनियम नायट्रेटचा वापर झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. स्फोटाच्या चौकशीसाठी १२ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या स्फोटातील मृतांची संख्या ६३ झाली असून, जखमींचा आकडा १३० वर पोचला आहे. जखमींपैकी अनेक जणांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्‍यता आहे. स्फोट घडवून आणणार्‍या संशयिताचे रेखाचित्रही पोलिसांनी प्रसिद्धीस दिले आहे.
सकाळ


जयपूर बॉंबस्फोट - इंडियन मुजाहिदीनने जबाबदारी स्वीकारली
जयपूरमध्ये काल झालेल्या बॉंबस्फोटांची जबाबदारी इंडियन मुजाहिदीन या संघटनेने स्वीकारली असून, एका वृत्तवाहिनीला पाठविलेल्या ई- मेलमध्ये हा दावा करताना त्यांनी बॉंबस्फोट होण्यापूर्वीच्या तीन ध्वनिचित्रफितीही पाठविल्या आहेत. यामध्ये या दहशतवाद्यांनी भारताविरुद्ध युद्ध पुकारण्याची दर्पोक्तीही केली आहे.
सकाळ


स्फोट जयपूरला, पडसाद जगभर
बॉम्बस्फोटांचे पडसाद जगभर पोहोचविण्यासाठी अतिरेक्‍यांनी जयपूरची निवड केल्याचे उघड होत आहे. जागतिक पर्यटनाच्या नकाशावरील जयपूरचे स्थान, परदेशी पर्यटकांची तेथे होणारी गर्दी या गोष्टी बरोबर हेरून दहशतवाद्यांनी जयपूरला आपल्या हल्ल्याचे लक्ष्य केले आणि भयग्रस्त परदेशी पर्यटकांच्या मार्फत जगभरात या कृत्याचे पडसाद उमटविले. जयपूरमधील कालच्या घटनेनंतर घाबरलेले परदेशी पर्यटक राजस्थान सोडून जाऊ लागल्याची माहिती मिळू लागली आहे. जगभरात दहशतवादाचा संदेश पोचविणे, भारतातील सांप्रदायिक सलोखा नष्ट करणे आणि पर्यटनावरच आघात करून राजस्थानचे आर्थिक नुकसान करणे ही तीन उद्दिष्टे एकाचवेळी साध्य करण्याचा डाव कालच्या बॉम्बस्फोटांमागे असल्याचे गृह मंत्रालयातर्फे सांगण्यात आले.
सकाळ


हरभजनवर बंदी आणि तंबीही
वेगवान गोलंदाज श्रीशांतला थोबाडीत देणार्‍या हरभजन सिंगवर पाच एकदिवसीय सामन्यांची बंदी घालण्यात आली. भारतीय क्रिकेट मंडळाच्या शिस्तपालन समितीने हा निर्णय घेतला. भविष्यात कोणत्याही प्रकारे शिस्तभंग झाल्यास कायमची बंदी घालण्यात येईल, असा इशाराही हरभजनला देण्यात आला. त्याच वेळी श्रीशांतला आक्रमकता कमी करण्याचीही ताकीद देण्यात आली.
सकाळ


जंकमेल्सविरोधात मायस्पेसने जिंकली ऐतिहासिक लढाई
मायस्पेस या सोशल नेटवर्किंग वेबसाईटच्या सदस्यांनी स्पॅममेल ऊर्फ जंकमेल्स पाठविणार्‍या दोघा स्पॅमर्सविरुद्ध तब्बल २३ कोटी डॉलरच्या (सुमारे ९२० कोटी रुपये) नुकसानभरपाईचा खटला जिंकला आहे. ऑनलाइन धुमाकूळ घालणार्‍या स्पॅमर्सविरुद्धच्या या सर्वात मोठ्या खटल्याचे वर्णन ऐतिहासिक असे केले जात आहे. मात्र, हे दोन भामटे फरार असल्याने ही रक्कम वसूल होईल की नाही, याबाबत शंकाच व्यक्त केली जात आहे.
सकाळ


फाशीऐवजी जन्मठेपेला पाकिस्तानमध्ये विरोध
भारतीय नागरिक सरबजितसिंग याला फाशीऐवजी जन्मठेप देण्यास पाकिस्तानच्या अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाने विरोध केला आहे. असे केल्यास, देशविघातक शक्तींना जोर येणे व देशाच्या तत्त्वाशी प्रतारणा करणे ठरेल, असे या मंत्रालयाला वाटते. सरबजितसिंगसह मृत्युदंडाची शिक्षा झालेल्या कैद्यांना जन्मठेपेची शिक्षा द्यावी का, या विषयावर चर्चा करण्यासाठी अंतर्गत सुरक्षा मंत्रालयात झालेल्या बैठकीत हे मत व्यक्त करण्यात आले.
सकाळ

दि. १४.०५.२००८[संपादन]

जयपूरवर दहशतवादी हल्ला, १५ मिनिटांत ८ बॉंबस्फोट
जयपूर शहर मंगळवारी सायंकाळी पावणेआठच्या सुमारास झालेल्या आठ शक्तिशाली बॉंबस्फोटांनी हादरले. गर्दीच्या ठिकाणी झालेल्या या स्फोटांमध्ये ६० जण ठार, तर शेकडो जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये सहा महिलांचा समावेश आहे. हा हल्ला दहशतवाद्यांनी केल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे. जयपूरच्या चांदपोल, त्रिपोलिया बाजारातील हनुमान मंदिर, मानस चौक, बडी चौपाल, छोटी चौपाल व जोहरी बाजार येथे सायंकाळी ७ वाजून ४० मिनिटे ते ७ वाजून ५५ मिनिटांदरम्यान एकामागोमाग एक आठ स्फोट झाले. हे सर्व भाग अत्यंत वर्दळीचे असून, सायंकाळच्या सुमारास या ठिकाणी मोठी गर्दी असते.
सकाळ


जयपूरवर हल्ला स्फोटांमागे "हुजी"चा हात
जयपूरमध्ये आज सायंकाळी झालेल्या आठ बॉंबस्फोटांमध्ये हरकत उल जिहादी इस्लामिया (हुजी) या अतिरेकी संघटनेचा हात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या संघटनेला जैश ए महमद या अतिरेकी संघटनेचा पाठिंबा आहे. देशात गेल्या काही काळात झालेले स्फोट आणि जयपूरमधील स्फोट यात साम्य असल्याने आजच्या स्फोटांमागे हुजीचाच हात असल्याचे स्पष्ट होत आहे. उत्तर प्रदेशात झालेले तीन बॉंबस्फोट, रामपूरमध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या तळावर झालेला हल्ला, अजमेरमध्ये दर्ग्यात झालेला स्फोट यातील पद्धत व जयपूरमधील पद्धत जवळपास सारखीच आहे. महाराष्ट्रात मालेगाव येथे झालेल्या स्फोटात सायकलचा वापर करण्यात आला होता. तशाच पद्धतीने जयपूरमध्येही स्फोट घडविण्यात आला आहे.
सकाळ


"अग्नी-२"ची जबाबदारी प्रथमच महिलेकडे
अण्वस्त्रवाहू अग्नी-२ या क्षेपणास्त्राच्या प्रकल्प संचालकपदी डॉ. टेसी थॉमस या शास्त्रज्ञ महिलेची नियुक्ती केली जाणार आहे. क्षेपणास्त्र प्रकल्पाच्या संचालकपदी येणार्‍या त्या पहिल्या महिला अधिकारी असतील. लष्करात लेफ्टनंट जनरल आणि हवाई दलात एर मार्शलपदांपर्यंत महिलांनी झेप घेतली असली, तरी क्षेपणास्त्र प्रकल्पाच्या संचालकपदी कोणाची नेमणूक झाली नव्हती. डॉ. थॉमस यांना हा बहुमान मिळाला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेत (डीआरडीओ) त्या काम करतात. संस्थेत सुमारे दोनशे महिला शास्त्रज्ञ आहेत. डॉ. थॉमस सध्या तीन हजार किलोमीटर पल्ल्याच्या अग्नी-३ क्षेपणास्त्राच्या सहयोगी प्रकल्प संचालक आहेत. अग्नी-२ च्या प्रकल्प संचालकपदी त्यांची नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
सकाळ


लिस्टरच्या महापौरपदी भारतीय महिला येणार
ब्रिटनमधील बहुसांस्कृतिक शहर अशी ओळख असणार्‍या लिस्टरच्या महापौरपदी एका भारतीय महिलेची निवड होण्याची शक्‍यता आहे. मंजुळा सूद असे त्यांचे नाव असून, ब्रिटनमध्ये महापौर होणार्‍या त्या पहिल्या आशियाई महिला आहेत.
सकाळ


नॅनोला टक्कर देण्यास बजाज सज्ज
देशातील वाहनउद्योगातील आघाडीच्या बजाज ऑटो लिमिटेडने आज रेनॉल्ट निसान कंपनीबरोबर भागीदारी केल्याचे जाहीर करत टाटा मोटर्सने सादर केलेल्या टाटा नॅनो या लाखाच्या मोटारीला पर्याय म्हणून २०११ पर्यंत नवी गाडी बाजारात आणण्याचे संकेत दिले. या नव्या गाडीची किंमत साधारणतः एक लाख (२५०० डॉलर) असेल असे कंपनीकडून सांगण्यात आले.
सकाळ


मियॉंयांग शहरात १८ हजार जण गाडले गेल्याची भीती
नैऋत्य चीनमध्ये सोमवारी झालेल्या विनाशकारी भूकंपातील मृतांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्‍यता असून, एकट्या मियॉंयांग शहरातच १८ हजारांहून अधिक जण गाडले गेले असण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. चीनच्या झिन्हुआ या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत मृतांची संख्या १२ हजारांपेक्षा अधिक झाली असून, बचाव कार्यासही सुरवात झाली आहे; मात्र मुसळधार पावसामुळे मदतकार्यात अडथळे येत आहेत.
सकाळ


नोकरभरतीत मराठी टक्का वाढविण्यासाठी मनसेची व्यूहरचना
मुंबईतील नोकरभरतीत मराठी भूमिपुत्रांना १०० टक्के प्राधान्य मिळालेच पाहिजे, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी मराठी तरुणांच्या नोकरीसाठी विविध आस्थापनांमध्ये शोधमोहीम सुरू केली आहे. परप्रांतीयांची दादागिरी मोडून काढून त्या ठिकाणी मराठी उमेदवारांची वर्णी लावण्यासाठी मनसेचे पदाधिकारी व्यूहरचना आखत असल्याचे सूत्रांकडून समजते.
सकाळ


पुण्यात सर्वांत कमी तर; कोल्हापुरात सर्वाधिक बालमृत्यू
राज्यातील सर्वाधिक बालमृत्यू कोल्हापूर जिल्ह्यात झाले असून, त्या खालोखाल औरंगाबाद आणि बुलडाणा जिल्ह्याचा क्रमांक आहे. सर्वांत कमी नोंद झालेल्या जिल्ह्यांमध्ये रायगड, रत्नागिरीसह पुणे जिल्ह्याचा समावेश आहे. ग्रामीण भागातील बालमृत्यूचे प्रमाण नुकतेच राज्य शासनाने जाहीर केले आहे. त्यात ही माहिती देण्यात आली आहे. न्यूमोनिया हे बालमृत्यूचे प्रमुख कारण असल्याचे यातून स्पष्ट झाले. सुमारे सात टक्के बालमृत्यू यामुळे होतात.
सकाळ

दि. १३.०५.२००८[संपादन]

शिवसेनेच्या "बॉम्बे"विरुद्ध आंदोलनाचे लोण राज्यात
बॉम्बेला मुंबई करण्याचे आंदोलन शिवसेनेने मुंबईत छेडल्यानंतर त्याचे लोण आता राज्यभर पसरू लागले आहे. राज्यात पुणे, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबादसह संपूर्ण महाराष्ट्रात ठिकठिकाणी शिवसैनिक व भारतीय विद्यार्थी सेनेचे कार्यकर्ते उद्यापासून बॉम्बेविरुद्ध आंदोलन करणार आहेत. शिवसेनेच्या मुखपत्रातून बॉम्बेची बेटे बरखास्त करा असा लेख प्रसिद्ध झाल्यानंतर, काल शिवसैनिक व भारतीय विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत ठिकठिकाणी आंदोलन करीत बॉम्बेविरुद्ध हल्लाबोल केला. बॉम्बे स्कॉटिश शाळेच्या नावाला काळे फासत तेथे मुंबई केले, तर बॉम्बे टाइम्स या इंग्रजी वृत्तपत्राचा निषेध नोंदवीत त्या वृत्तपत्राची जाहीर होळी केली होती.
सकाळ


मराठी चित्रपटांवर कर्नाटकात करांचे ओझे
हिंदी चित्रपटांइतकीच भरमसाट टॅक्‍सची आकारणी, चित्रपट रसिकांचा बदलता दृष्टिकोन आणि कर्नाटक शासनाची अनास्था यामुळे निपाणी परिसरात मराठी चित्रपटांची वानवा जाणवत आहे.गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्रात मराठी चित्रपटाने कात टाकली असून एकापेक्षा एक दर्जेदार मराठी चित्रपट निघत आहेत; मात्र निपाणी परिसरातील चित्रपटगृहांत क्वचितच मराठी चित्रपट झळकत आहेत. येथील चित्रपटगृहांवर कन्नड, व हिंदी चित्रपटांचेच राज्य आहे. निपाणी शहरात चार चित्रपटगृहे असून त्यापैकी चंद्रमा आणि प्रभात सध्या बंद आहेत. गीतांजली व राजश्री ही दोन चित्रपटगृहे महत्त्वाची आहेत. या चारही चित्रपटगृहांमध्ये दोन वर्षांत फारच कमी मराठी चित्रपट झळकले. निपाणीत मराठी चित्रपट का लागत नाहीत, त्याची कारणे कोणती, याचा शोध घेतला असता त्याचे उत्तर समोर आले.
सकाळ


अजब फतव्याचा विद्युत निरीक्षकांना फटका
’बदल्या होईपर्यंत नियमित तपासणीचे काम करू नये’ असा अजब फतवा काढण्यात आल्यामुळे राज्यभरातील विद्युत निरीक्षक विभागातील सुमारे चारशे अभियंते गेला महिनाभर बसून आहेत. राज्यातील सर्व व्यावसायिक, तसेच औद्योगिक वीजजोडांची तपासणी करणे, त्यांची सुरक्षितता तपासणे आणि वीज अपघातांचा तपास करणे ही कामे विद्युत निरीक्षक विभागातील अभियंत्यांकडे सोपविण्यात आली आहेत. प्रत्येक अभियंत्याने रोज दहा आणि वर्षभरात तीन हजार वीजजोडांची तपासणी करणे अपेक्षित आहे. या पार्श्‍वभूमीवर हा अजब आदेश आल्यामुळे गेल्या महिनाभराहून अधिक काळ हे चारशे अभियंते केवळ बसून आहेत.
सकाळ


भारताची बेल्जियमवर मात
भारताने अझलन शाह हॉकी स्पर्धेत आज बेल्जियमचा पराभव करून सलग दुसरा विजय नोंदविला. या स्पर्धेत पहिले दोन सामने गमावल्यानंतर भारताने काल कॅनडावर ३-१ ने मात केली होती. आजच्या सामन्यात त्यांनी जोरदार सुरवात करीत पूर्वार्धातच बेल्जियमवर ५-१ अशी आघाडी मिळवली होती. या सामन्यात प्रशिक्षक ए.के. बन्सल यांनी राखीव खेळाडूंची योग्य वेळी केलेली अदलाबदली खूपच फलदायी ठरली. भारताने आज सहापैकी चार गोल पेनल्टी कॉर्नरवर नोंदिवले.
सकाळ

दि. १२.०५.२००८[संपादन]

मराठी नाट्य-कलावंतांना अमेरिकेने व्हिसा नाकारला
अमेरिकन वकिलातीतर्फे व्हिसा मंजूर करणार्‍या अधिकार्‍यांच्या मनमानीचा आणखी एक फटका मराठी कलाकारांना बसला आहे. सुयोग नाट्यसंस्थेतर्फे अमेरिकेची वारी करण्याच्या तयारीत असलेल्या अभिनेते विनय आपटे यांच्यासह तब्बल दहा कलाकारांना व्हिसा नाकारण्यात आला. मात्र सुयोगने पर्यायी कलाकार संच अमेरिकेला पाठवून तिथल्या नाट्यरसिकांची गैरसोय टाळण्याचे सौजन्य दाखविले आहे. व्हिसा मंजूर होण्यासाठी आवश्‍यक असलेल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता या कलाकारांतर्फे करण्यात आली होती. मात्र कोणतेही कारण न देता आपला व्हिसा नाकारण्यात आल्याचे आपटे यांनी सांगितले.
सकाळ


आत्मघातकी हल्ल्याचा प्रयत्न उधळला
लष्कराच्या तुकडीवर आत्मघातकी हल्ल्याचा प्रयत्न सुरक्षा दलाने उधळून लावला. सांबा विभागात दहशतवाद्यांशी सुमारे बारा तास झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना जवानांनी कंठस्नान घातले. मात्र, त्यापूर्वी दहशतवाद्यांच्या गोळीबारात सहा नागरिक आणि दोन जवानांना प्राण गमवावा लागला. वरिष्ठ पोलिस आणि लष्करी अधिकार्‍यांसह १५ जण जखमी झाले. बर्‍याच कालावधीनंतर जम्मू विभागात एवढ्या दीर्घकाळ सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात चकमक झाली. लेफ्टनंट जनरल विनय शर्मा यांनी या चकमकीची माहिती पत्रकारांना दिली. या वेळी त्यांच्या समवेत सीमा सुरक्षा दलाचे महानिरीक्षक सप्रोलिया, जम्मूचे पोलिस महानिरीक्षक के. राजेंद्र आदी उपस्थित होते.
सकाळ


व्यावसायिक बुद्धिमत्तेत टाटा अव्वल
टाइमने प्रसिद्ध केलेल्या जगातील प्रभावशाली व्यक्तिमत्त्वांच्या यादीत स्थान पटकाविल्यानंतर टाटा उद्योगसमूहाचे प्रमुख रतन टाटा यांचे नाव आणखी एका अमेरिकी नियतकालिकाने आदराने नमूद केले आहे. व्यावसायिक बुद्धिमत्तेत अव्वल असणार्‍या उद्योगपतींची यादी ’कोंडे नास्ट पोर्टफोलि’ या अर्थविषयक नियतकालिकाने प्रसिद्ध केली असून, त्यात टाटांचे नाव आघाडीवर आहे. अडीच हजार डॉलर (एक लाख रुपये) किमतीची "नॅनो" मोटार सादर करण्याचे स्वप्न साकार केल्याबद्दल टाटांना हा बहुमान मिळाला आहे.
सकाळ


आशिया करंडक: भारताला सलग चौथ्यांदा विजेतेपद
भारतीय महिलांनी शानदार कामगिरी करीत सलग चौथ्यांदा आशिया करंडकावर आपले नाव कोरले. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आज भारताने श्रीलंकेचा १७७ धावांनी धुव्वा उडवीत विजेतेपद पटकावले. दरम्यान, या शानदार यशाबद्दल संघातील प्रत्येक खेळाडूला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) प्रत्येकी पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. श्रीलंकेतील कुरुनेगाला येथे हा सामना झाला.
सकाळ


अझलन शाह हॉकी स्पर्धा: भारताचा कॅनडावर विजय
युवा हॉकीपटू दिवाकर राम याने नोंदविलेल्या दोन गोलच्या जोरावर भारताने १७ व्या अझलन शाह हॉकी स्पर्धेतील सामन्यात कॅनडावर सहज मात केली. हा भारताचा स्पर्धेतील पहिलाच विजय आहे.
सकाळ


नाशिक- अतिक्रमणविरोधी मोहीम सुरुच; राजकारण्यांनाही सोडले नाही
महापालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेच्या पक्के बांधकाम करुन रोवण्यात आलेल्या फलकापासून ते राजरोसपणे रस्त्यावर आलेल्या टपर्‍या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेच्या शनिवारच्या (ता. १०) पहिल्या दिवशी हटविण्यात आल्या. सत्ताधारी शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकार्‍यांनी महापौर विनायक पांडे यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले. अशातच, काल रविवारी (ता. ११) खाते अंतर्गत परीक्षेमुळे मोहिमेला पूर्णविराम देण्यात आला होता. त्यामुळे ही मोहिम थंडावणार की काय? अशी स्थिती निर्माण झाली होती. दुसरीकडे मात्र आज सोमवारी सकाळपासूनच अतिक्रमण हटविण्यासाठी जेसीबी धडधडू लागलायं. त्यामुळे वाहतुकीचा श्‍वास मोकळा करण्यासाठी महापालिकेऐवजी पोलिस आयुक्तालयाने केलेला संकल्प सिद्धीस जाणार असा विश्‍वास शहरवासियांच्या मनात निर्माण झाला आहे.
सकाळ

दि. ११.०५.२००८[संपादन]

टाटांना पद्मविभूषण, तर माधुरीला पद्मश्री पुरस्कार प्रदान
प्रख्यात उद्योगपती रतन टाटा, बाबा निळकंठ कल्याणी, अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष प्रा. सुखदेव थोरात यांचा राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते आज पद्म पुरस्कार प्रदान करून सत्कार करण्यात आला. रतन टाटा यांना पद्मविभूषण हा दुसरा सर्वोच्च क्रमांकाचा नागरी सन्मान, तर बाबा कल्याणी, माधुरी दीक्षित व प्रा. थोरात यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती भवनात मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या भव्य समारंभात हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
सकाळ


दाऊदला ताब्यात देण्याची तयारी; गिलानींचा दावा
दहशतवादी कारवायांचा ठोस पुरावा भारताकडे असेल, तर कुख्यात गुन्हेगार दाऊद इब्राहीम, जैश-ए-महंमदचा म्होरक्‍या मौलाना मसूद अजहर आणि लष्करे-तैयबाचा म्होरक्‍या हाफीज महंमद सईद या तिघांना भारताच्या ताब्यात देण्याची तयारी पाकिस्तानने दाखविली आहे. पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांनी एका दूरचित्रवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ही तयारी दाखविली. दाऊद, अजहर आणि सईद यांना ताब्यात देण्याच्या भारताच्या विनंतीचा विचार करण्याची तयारी बेनझीर भुट्टो यांनी दाखविली होती. त्याबद्दल विचारल्यावर गिलानी म्हणाले, "भारताकडे अधिकृत पुरावा असेल आणि तो पाकिस्तानला द्यायची तयारी असेल, तर नक्कीच या मागणीचा विचार केला जाईल."
सकाळ


प्रकल्पग्रस्त शेतकरी बनले कंपनीचे मालक
विकासकामांच्या विविध प्रकल्पांसाठी सरकारकडून जमिनी संपादित केल्या जात गेल्यामुळे विस्थापित होणार्‍या प्रकल्पग्रस्तांची संख्या मोठी आहे. उपजीविकेचे साधन गमावलेल्या या प्रकल्पग्रस्तांची परवड कादंबर्‍यांचा आणि आंदोलनाचा विषय झाला आहे. त्यांच्या नावावर स्वत:ची पोळी भाजून घेणारेही कमी नाहीत. या सर्व गोष्टींना छेद देत खेड तालुक्‍यातील निघोजे गावाच्या ७८ प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांनी नवा आदर्श इतरांसमोर ठेवला आहे. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) नवीन परतावा योजनेनुसार दिलेल्या जमिनींत त्यांनी स्वत:ची कंपनी स्थापन केली आहे. त्यामुळे हे शेतकरी आता उद्योजक बनले असून, त्यांच्या उद्योगांचा प्रारंभ अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर नामफलकाच्या अनावरणाने झाला.
सकाळ


कर्नाटकात पहिल्या टप्प्यात सरासरी ६० टक्के मतदान
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज शांततेत पार पडले. अकरा जिल्ह्यांमधील ८९ विधानसभा मतदारसंघांसाठी ९५४ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. यामध्ये १७ महिलांचाही समावेश आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात ६० टक्के मतदान झाले आहे.
सकाळ

दि. १०.०५.२००८[संपादन]

चलनवाढ ७.६१ टक्‍क्‍यांवर
सरकारी प्रयत्नांना न जुमानता वरच्या दिशेने प्रवास कायम ठेवत चलनवाढीचा दर ७.६१ टक्‍क्‍यांना भिडला आहे. चहा, मसाले, फळे आणि अन्य काही उपभोग्य वस्तूंच्या भाववाढीचा परिणाम म्हणून चलनवाढीने गेल्या ४२ महिन्यांतील ही उच्चांकी पातळी गाठली. केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेने महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी योजलेले सर्व उपाय कुचकामी ठरविताना २६ एप्रिलला संपलेल्या आठवड्यात महागाईचा निर्देशांक ०.०४ टक्‍क्‍यांनी वाढला. त्यापूर्वीच्या आठवड्यात तो ७.५७ टक्के होता. चलनवाढीचा दर गेल्या वर्षी याच तारखेला ६.०१ टक्‍क्‍यांवर होता. नोव्हेंबर २००४ मध्ये त्याने ७.७६ ही उच्चांकी पातळी गाठली होती.
सकाळ


ज्येष्ठ गायक पं. फिरोज दस्तूर यांचे निधन
किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक आणि गुरू पंडित फिरोज दस्तूर (वय ८९) यांचे शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास वृद्धापकाळाने मुंबईत निधन झाले. ते अविवाहित होते. पं. दस्तूर यांना काही दिवसांपूर्वी प्रकृतीचा त्रास झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तब्येत बरी झाल्यावर ते काही काळ त्यांचे शिष्य गिरीश संझगिरी यांच्याकडे वास्तव्यास होते. आठवड्यापूर्वीच ते ग्रँट रोड येथील स्वतःच्या घरी परत आले होते. तेथेच आज त्यांची प्राणज्योत मालवली. उद्या सकाळी (शनिवारी) सकाळी दहा वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील, असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.
सकाळ


पाकिस्तानकडून युद्धबंदीचा भंग
जम्मू काश्‍मीर सीमेवरून भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणार्‍या १० ते १५ अतिरेक्‍यांना सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी आज पिटाळले. या वेळी दोन्ही बाजूंनी जोरदार धुमश्‍चक्री उडाली. पाकिस्तानी सैनिकांनीही या वेळी गोळीबार केला. भारताने या प्रकरणी पाकिस्तानकडे अधिकृत तक्रार नोंदविली आहे.
सकाळ


कीर्तिकर, वायकर यांच्यासह १४ शिवसैनिक निर्दोष मुक्त
मुंबईत पंधरा वर्षांपूर्वी उसळलेल्या जातीय दंगलीच्या खटल्यात चिथावणीखोर भाषण करून जनक्षोभ भडकाविल्याच्या आरोपातूनशिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर, मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष रवींद्र वायकर, श्रीधर खाडे, रघुनाथ कदमविश्‍व हिंदू परिषदेचे लालताप्रताप सिंह, नंदकुमार काळे व अन्य १४ शिवसैनिकांची आज विशेष न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली.
सकाळ


भारत तीन विमानवाहू युद्धनौका बनविणार
भारताची अर्थव्यवस्था ही जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था आहे. त्यामुळे भारताच्या संरक्षणासाठी आणि शांततेसाठी आपल्याला किमान तीन विमानवाहू नौका आवश्‍यक आहेत. हे ओळखूनच आपण कोचीन येथे आपली पहिली युद्धनौका बांधत आहोत. ही नौका बांधून तयार झाल्यावर भारत लगोलग दुसरी; त्यानंतर तिसरी नौका बांधणार असल्याची घोषणा आज नौदलप्रमुख सुरीश मेहता केली. भारतातील सर्व मुख्य नौदल कंमाडरसाठी मुंबईत सुरू असलेल्या परिषदेदरम्यान घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
सकाळ


भाववाढ रोखण्यासाठी सरकार तांदूळ, तूरडाळ खरेदी करणार
भाववाढीला आळा घालण्याच्या हेतूने सार्वजनिक वितरण व्यवस्थेत रेशनकार्डावर वितरित करण्यासाठी राज्य सरकार दोन लाख २१ हजार टन तांदूळ आणि ६० हजार टन तूरडाळ खरेदी करणार आहे. महाराष्ट्र राज्य को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनकडे राज्य सरकारने खरेदीची जबाबदारी सोपविली आहे. फेडरेशनने निविदा मागवून खरेदी करण्यासाठी वृत्तपत्रातून जाहिराती दिल्या आहेत.
सकाळ

दि. ०९.०५.२००८[संपादन]

मंत्र्याच्या हॉटेलची धूळ रस्त्यावर
महापालिका प्रशासनाकडून डोळेझाक होत असल्याने राज्यातील एका बड्या नेत्याच्या बांधकामाची धूळ नागरिकांच्या डोळ्यांत व नाका-तोंडात जात आहे. बांधकामाच्या ठिकाणची माती पुणे-मुंबई महामार्गावर वाकडेवाडी येथे दोन किलोमीटरपर्यंत पसरली आहे. त्यामुळे महामार्गावर सतत धुळीचे लोट उठत असून, दुचाकी चालकांना वाहन चालविणे अवघड झाले आहे. काँग्रेसच्या या नेत्याने पुण्यात काही मोक्‍याच्या जागा घेतल्या आहेत. पुणे-मुंबई महामार्गावरील शासकीय दूध डेअरीच्या अलीकडे असलेली त्यापैकीच एक जागा. तेथे पंचतारांकित हॉटेल उभारण्यात येत आहे. त्यासाठी खोदकाम गेल्या दोन महिन्यांपासून सुरू आहे. एकापाठोपाठ एक डंपर भरून या ठिकाणाहून बाहेर पडत आहेत. त्यामुळे येथील सिमेंटच्या रस्त्यावर दोन किलोमीटरच्या पट्ट्यात माती पसरलेली आहे. ही माती काढण्याची काळजी कोणीही न घेतल्याने आता रस्त्याचा हा पट्टा सिमेंटऐवजी मातीचा रस्ता वाटावा, असा दिसत आहे.
सकाळ


महागाईच्या झळा भारतात सौम्यच - जागतिक बँक
आंतरराष्ट्रीय पातळीवर भडकलेल्या महागाईच्या तुलनेत भारतातील महागाईच्या झळा सौम्य असल्याचे निरीक्षण नोंदवतानाच अन्नधान्याच्या महागाईचा उधळलेला वारू रोखून धरण्यात भारताने अनेक प्रगत देशांपेक्षाही उल्लेखनीय कामगिरी बजावल्याचे प्रशस्तिपत्र बँकेने एका ताज्या अहवालाद्वारे दिले आहे. गेल्या अवघ्या तीन वर्षांत; म्हणजे २००५ पासून या आंतरराष्ट्रीय बाजारातील मुख्य अन्नाच्या (स्टेपल फूड) किमती तब्बल ८० टक्‍क्‍यांनी वाढल्या आहेत. मात्र, गहू व तांदळाच्या दरांत भारतातही सातत्याने वाढ होत गेली असली, तरी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा विचार करता; या किमती आजही ३० ते ३५ टक्‍क्‍यांनी कमी ठेवण्यात भारताने लक्षणीय कामगिरी केली आहे. चलनवाढ व महागाई रोखण्यासाठी भारताकडून सातत्याने ज्या उपाययोजना सुरू आहेत, त्या पाहता हे अंतर आणखी वाढू शकते, असा अनुकूल अभिप्रायही यात नोंदविण्यात आला आहे.
सकाळ


डॉ. वेणुगोपाळच पुन्हा "एम्स"चे संचालक
केंद्र सरकार आणि केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. अंबुमणी रामदास यांना सणसणीत चपराक लगावताना, सर्वोच्च न्यायालयाने अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) कायद्यातील वादग्रस्त दुरुस्ती रद्दबातल ठरविली आहे. यामुळे ज्यांना हटविण्यासाठी ही कायदादुरुस्ती करण्यात आली होती, ते डॉ. पी. वेणुगोपाळ पुन्हा एम्सचे संचालक झाले आहेत. निकालानंतर काही वेळातच त्यांनी संचालकपदाची सूत्रेही हाती घेतली.
सकाळ


पर्यावरणाची काळजी घेण्यात भारत, ब्राझील प्रथम; अमेरिका शेवटी
दैनंदिन जीवनात पर्यावरणाची काळजी घेण्यात भारतीय नागरिक प्रथम क्रमांकावर, तर अमेरिकन शेवटच्या क्रमांकावर आहेत. नॅशनल जिओग्राफिक सोसायटी आणि ग्लोबस्कॅन यांनी केलेल्या पाहणीतून हा निष्कर्ष सामोरा आला आहे. नॅशनल जिऑग्राफिक सोसायटी पर्यावरणाला वाहून घेतलेली संस्था असून, ग्लोबस्कॅन संस्था जनमत चाचण्या करते. या दोन्ही संघटनांनी चौदा देशांचा अभ्यास करून हा निष्कर्ष जाहीर केला आहे. पर्यावरणाच्या हानीला विकसित देश जबाबदार आहेत, की विकसनशील देश; हा वाद सुरू असताना या दोन संस्थांनी अमेरिकेला तळात टाकले आहे. विकसनशील देशांत पर्यावरणाबाबत जास्त जागरूकता असल्याचे या संस्थांच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
सकाळ


देशात अन्नधान्याचा पुरेसा साठा - पवार
"यंदा गहू आयात करावा लागणार नाही. गहू, तांदळासह अन्नधान्याचा देशात पुरेसा साठा असून, त्याचा वापर भाववाढ कमी करण्यासाठी करण्यात येणार आहे." असे केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. जैवइंधनासाठी अमेरिकेने गव्हाचे उत्पादन क्षेत्र कमी केल्याने जगभरात गव्हाची कमतरता निर्माण झाली, असे पवार यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी केलेल्या टिपण्णीवर सांगितले. पंजाबहरियाणातील शेतकर्‍यांमुळे गव्हाचा प्रश्न सुटला आहे. केंद्र सरकारने आतापर्यंत दीडशे लाख टन गव्हाची खरेदी केली असून, एकूण १९० लाख टन खरेदी होईल, तर तांदूळ खरेदी २७० लाख टनांपर्यंत एवढी विक्रमी होईल. एकूण धान्योत्पादनात २२७ दशलक्ष टन वाढ झाली असून, हा स्वातंत्र्यापासून आतापर्यंतचा विक्रम आहे.
सकाळ

दि. ०८.०५.२००८[संपादन]

अग्नी-३ च्या टप्प्यात बीजिंग आणि शांघायही
जमिनीवरून जमिनीवर मारा करू शकणार्‍या "अग्नी-३" या अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्राची आज यशस्वी चाचणी घेण्यात आली. तब्बल तीन हजार किलोमीटर पल्ल्याच्या या क्षेपणास्त्राच्या टप्प्यात शांघाय, बीजिंगसह चीनच्या पूर्वेकडील शहरेही येऊ शकतात. या तिसर्‍या चाचणीने हे क्षेपणास्त्र लष्करात दाखल होण्यास सिद्ध झाले आहे. ओरिसातील व्हीलर्स आयलंडवरून सकाळी ९ वाजून ५६ मिनिटांनी अग्नी-३ अवकाशात झेपावले. ८०० सेकंदांत त्याने अचूक लक्ष्यभेद केला. या यशामुळे भारत मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्रे विकसित करणार्‍या देशांच्या पंक्तीत गेला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमांना येत्या सोमवारपासून सुरवात होत असतानाच, अग्नी-३ची चाचणी झाल्याने शास्त्रज्ञांमध्ये आनंदाचे वातावरण होते.
सकाळ


"सेन्सेक्‍स"वर सांगितला पुणेकराने हक्क
शेअर बाजाराशी संबंधित अनेकांच्या हृदयाची धडधड कमी-जास्त करणारा "सेन्सेक्‍स" (निर्देशांक) वादात सापडला आहे. या शब्दाच्या व्यापार चिन्हावरून (ट्रेड मार्क) दीपक मोहोनी आणि मुंबई शेअर बाजार (बीएसई) यांच्यात न्यायालयीन लढाई सुरू झाली आहे. मोहोनी यांनी बीएसईविरुद्ध पुण्यातील जिल्हा न्यायालयात दावा दाखल केला आहे. मोहोनी हे शेअर बाजारातील तज्ज्ञ असून, विविध वृत्तपत्रांतून ते विश्‍लेषणात्मक लेख लिहितात. सेन्सेक्‍स हा शब्द आपण तयार केल्याचा दावा त्यांनी केला आहे.
सकाळ


महिला आरक्षण विधेयक मंत्रिमंडळात एकमत नाही
’महिला आरक्षण विधेयकात इतर मागासवर्गीय व अल्पसंख्याक महिलांसाठी राखीव जागांची तरतूद न केल्यास या विधेयकाला विरोध केला जाईल आणि प्रसंग आल्यास सरकारचा पाठिंबा काढून घेण्यासही मागे-पुढे पाहणार नाही’ असा इशारा राष्ट्रीय जनता दलाचे लोकसभेतील उपनेते देवेंद्रप्रसाद यादव यांनी आज येथे दिला. राष्ट्रीय जनता दल हा सत्तारूढ आघाडीतील संख्याबळाच्या दृष्टीने दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष आहे, हे कॉंग्रेसने ध्यानात ठेवावे, असेही ते म्हणाले.
सकाळ


आता खेळाडूच मागणार तिसर्‍या पंचाकडे दाद
कसोटीमध्ये मैदानावरील पंचांच्या निर्णयाविरुद्ध तिसर्‍या पंचांकडे दाद मागण्याचा अधिकार खेळाडूंना देण्याची महत्त्वपूर्ण शिफारस आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) क्रिकेट समितीने केली आहे. त्याचबरोबर पायचीतचे निर्णय घेताना हॉक आय या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची सूचनाही करण्यात आली आहे. या आणि याचबरोबर केलेल्या अन्य शिफारशींमुळे पंचगिरीच्या विश्‍वामध्ये आमूलाग्र बदल होणार आहेत.
सकाळ

दि. ०७.०५.२००८[संपादन]

म्यानमार चक्रीवादळातील मृतांची संख्या २२ हजारांवर
म्यानमारमध्ये "नर्गीस" चक्रीवादळाच्या तडाख्यात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २२ हजारांवर गेली असून, ती आणखी वाढण्याची शक्‍यता आहे. देशात अन्नधान्य, पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, हाहाकार माजला आहे. या देशाला आता मदतीची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे लष्करी राजवटीने आंतरराष्ट्रीय मदत स्वीकारण्याची तयारी दर्शविली आहे.
सकाळ


पोलिसांना गुंगारा देऊन हसन अली बेपत्ता, अटकेसाठी धावपळ
घोड्यांचा साधा व्यापारी असूनही, हजारो कोटी रुपयांची मालमत्ता असलेला हसन अली आता बेपत्ता झाल्यामुळे सरकारी तपास यंत्रणांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. त्याला अटक करण्यासाठी मुंबईपुण्यासह सर्वत्र गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पोलिस तपास सुरू आहे. तो देशाबाहेर पळाला असावा, असाही एक अंदाज व्यक्त होत आहे. मुंबईत दाखल झालेल्या गुन्ह्यात हसन अलीला (वय ५६) अटक करावी, असा केंद्रीय तपास यंत्रणांचा पोलिसांवर दबाव आहे. त्यातून ही मोहीम सुरू झाल्याचे समजते.
सकाळ


मनसे रेल्वे भरतीतील मराठी टक्का शोधणार
शिवाजी पार्कवरील शक्‍तिप्रदर्शनानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुढे काय करणार, असा प्रश्‍न असतानाच, केंद्रीय मंत्रालये तसेच विविध सार्वजनिक उपक्रमांत किती मराठी तरुणांना रोजगार मिळाला, याची माहिती मिळविणे पक्षाने सुरू केले आहे. विशेषतः रेल्वेत किती मराठी तरुणांना संधी मिळाली याचा पाठपुरावा करणे सुरू आहे. विविध सार्वजनिक उपक्रमांत मराठी तरुणांना अत्यल्प संधी मिळत असल्याची यादी राज यांनी शिवाजी पार्कच्या मेळाव्यात वाचून दाखवली होती. आता मध्य आणि पश्‍चिम रेल्वेत किती मराठी तरुण लाइनमन, खलाशी म्हणून गेल्या काही वर्षांत नोकरीला लागले याची विचारणा अधिकार्‍यांकडे केली आहे.
सकाळ

दि. ०६.०५.२००८[संपादन]

नमाज अदा करण्यासाठी महिलांना हव्यात स्वतंत्र मशिदी
मुस्लिम महिलांसाठी स्वतंत्र मशिदी निर्माण कराव्यात, अशी मागणी अखिल भारतीय मुस्लिम महिला वैयक्तिक कायदा मंडळाने केली आहे. "मुस्लिम महिलांनाही मशिदीत जाऊन नमाज अदा करता यावी, यासाठी मशिदी स्थापन करण्याच्या कामी समाजातील उलेमा आणि प्रभावशाली व्यक्तींनीसुद्धा सहकार्य करावे" असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष शाईस्ता अंबर यांनी येथे केले.
सकाळ


सचिनच्या यशाला "पद्म" पुरस्काराची झळाळी
क्रिकेटमधील अनेक विक्रम मोडणारा सचिन तेंडुलकर, संगीतप्रेमींच्या हृदयात स्थान असणार्‍या पार्श्‍वगायिका आशा भोसले, इलेक्‍ट्रॉनिक माध्यमातील आघाडीचे पत्रकार राजदीप सरदेसाई, प्रसिद्ध नेत्रशल्य विशारद डॉ. तात्याराव लहाने आणि जैन उद्योगसमूहाचे संस्थापक-अध्यक्ष भवरलाल जैन यांना राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते "पद्म" पुरस्कारांनी गौरविण्यात आले. आशा भोसले व सचिन तेंडुलकर यांना "पद्मविभूषण", तर सरदेसाई, डॉ. लहाने व जैन यांना "पद्मश्री" पुरस्कार प्रदान करण्यात आले. राष्ट्रपती भवनात आज सायंकाळी झालेल्या भव्य समारंभात या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
सकाळ


पंढरपूर:गोळ्या लागून पोलिसाचा मृत्यू
येथील श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरात सुरक्षेसाठी नेमलेल्या पोलिस हवालदार ज्ञानेश्‍वर तुकाराम चव्हाण (वय ३५) यांच्याजवळील कार्बाईन बंदुकीतील तीन गोळ्या उडून शरीरात घुसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज पहाटे चारच्या सुमारास श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरातील रुक्‍मिणी सभामंडपात घडली. हा अपघात आहे, घातपात आहे की आत्महत्या, याचा तपास पोलिस करीत आहेत.
सकाळ


म्हैसूरमध्येही स्थानिक विरुद्ध परप्रांतीय?
मुंबईप्रमाणेच आता म्हैसूरमध्येही "स्थानिक विरुद्ध परप्रांतीय" असा संघर्ष उभा राहण्याची चिन्हे दिसत आहेत. नोकरीनिमित्त बाहेरून बंगळूरमध्ये येणारे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अभियंते, तंत्रज्ञ (आयटीयन्स), तसेच आंध्र प्रदेशातील नागरिक मोठ्या प्रमाणात म्हैसूरकडे धाव घेऊ लागल्याने येथील घरांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. परिणामी, जागांच्या भाववाढीचा हा मुद्दा निवडणुकीतही तापू लागला आहे. बंगळूरपासून म्हैसूर जवळ असल्याने येथे स्थायिक होण्याकडे आयटीयन्सचा कल वाढला आहे. गेल्या दोन-तीन वर्षांत येथे मोठ्या प्रमाणात घरांची विक्री होऊ लागल्याने बांधकाम क्षेत्रातील माफियांनी स्वस्तातील जागा विकसित करून नव्या बांधकामांच्या किमती फुगवल्या आहेत. रग्गड कमाई असलेले आयटीयन्स आणि आंध्रातील लोकांनी या भागात गुंतवणुकीसाठीही स्थावर मालमत्तांची खरेदी सुरू केली आहे. मात्र, यामुळे जागांचे भाव वाढल्याने स्थानिक लोकांचे घराचे स्वप्न अपूर्ण राहण्याची, तसेच बाहेरून येणार्‍यांच्या संख्येवर नियंत्रण न आणल्यास काही वर्षांतच म्हैसूरची मुंबई होण्याची भीती व्यक्त होत आहे.
सकाळ


एफएमच्या प्रवेशानंतरही आकाशवाणी आघाडीवरच
नभोवाणी क्षेत्रातील खासगी एफएम वाहिन्यांच्या प्रवेशानंतर या क्षेत्रातील स्पर्धेत वाढ झाली असली, तरी आकाशवाणीची (ऑल इंडिया रेडिओ) आघाडी कायम असल्याचे प्रसार भारतीच्या अहवालात दिसून आले आहे. आर्थिक व पायाभूत सुविधांबाबत एफएम वाहिन्यांना बराच पल्ला गाठणे बाकी असल्याचेही यात म्हटले आहे. पायाभूत सुविधा आणि आर्थिक बाबतीत जगात सर्वांत मोठी असणारी आकाशवाणी देशाच्या २३ टक्के भागात पोचली असून, एफएम वाहिन्या केवळ ३.३ टक्के भागापर्यंतच पोचल्या आहेत. एकूण लोकसंख्येपैकी ३१ % नागरिकांपर्यंत आकाशवाणीची सुविधा पोचली असून, याबाबतीतही एफएम वाहिन्या खूप मागे आहेत. त्यांचा वाटा केवळ ९.३ टक्के इतकाच असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
सकाळ

दि. ०५.०५.२००८[संपादन]

वनक्षेत्र अतिक्रमण प्रकरण - मुंबईतील हजारो फ्लॅटधारकांना तात्पुरता दिलासा
मुंबई राखीव वनक्षेत्रातील लाखो नागरीकांना सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने तात्पुरता दिलासा दिला. या वनक्षेत्रातील निवासी घरकुलांसदर्भात परिस्थिती जैसे थे ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला. २२ ऑगस्टला याप्रकरणाची पुन्हा सुनावणी घेण्याचे आदेशही सरन्यायाधिश के. जी. बालकृष्णन आणि न्या. एम. के. शर्मा यांच्या पीठाने दिली. बोरीवली, मुलूंड, भांडूप परिसरातील सुमारे दीड लाख फ्लॅटधारकांच्या अस्तित्वाशी निगडीत हे प्रकरण आहे. तेथील बांधकामे अनधिकृत असल्याचा निर्वाळा देत उच्च न्यायालयाने बांधकामे पाडण्याचा आदेश यापूर्वी दिला होता.
सकाळ


अतिवेगामुळे द्रुतगती मार्गावर अपघात
द्रुतगती महामार्गावर खालापूरजवळ जीप ट्रेलरखाली अडकून झालेल्या अपघातात सोळा जण ठार, तर चार जण जखमी झाले. या अपघातातील मृत आणि जखमी सातारा जिल्ह्यातील कोरेगावचे रहिवासी आहेत. पहाटे चारच्या सुमारास ही घटना घडली. ट्रेलरला धडक दिल्यानंतर जीप ट्रेलरखाली घुसून त्याच्या बरोबरच ८ किलोमीटर फरफटत गेल्याने अपघातातील मनुष्यहानी वाढली. अपघातातील जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
सकाळ


अन्नधान्य दरवाढीबद्दल भारतीयांवर खापर नको - अँटनी
अन्नधान्याच्या जागतिक दरवाढीस भारत कारणीभूत आहे, या अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश यांच्या वक्तव्यावर सर्व स्तरांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त झाल्या आहेत. जगातील अन्नधान्यटंचाईचे खापर भारतीयांवर फोडल्याबद्दल संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांनी बुश यांचा निषेध केला आहे. त्यांच्या वक्तव्याबाबत मौन बाळगल्याबद्दल भारतीय जनता पक्षाने केंद्र सरकारवर टीका केली आहे, तर बुश यांचे निष्कर्ष बिनबुडाचे असल्याचे भारतीय कम्युनिस्ट पक्षाने म्हटले आहे.
सकाळ


भारताचा कार्तिकेयन विजेता
भारताच्या नरेन कार्तिकेयन याने शानदार कामगिरी करीत हंगामातील अखेरची "ए वन ग्रांप्री" फीचर रेस जिंकली. मोटारींच्या फीचर रेसमध्ये कार्तिकेयनने यजमान इंग्लंडच्या रॉबी केर याला मागे टाकले आणि इतिहास घडविला. ब्रॅंड्‌स हॅच सर्किटवर झालेल्या ४८ फेर्‍यांच्या या शर्यतीत भारताचा कार्तिकेयन आणि इंग्लंडचा रॉबी यांच्यातच खरी चुरस होती. ३८ व्या फेरीनंतर कार्तिकेयनने रॉबीवर आघाडी मिळविली आणि ती अखेरपर्यंत कायम ठेवली. कार्तिकेयनने १ तास ७ मिनिटे आणि २४ सेकंद अशी वेळ नोंदवीत बाजी मारली. रॉबीने १ तास ७ मिनिटे आणि २५.७६९ सेकंद अशी वेळ नोंदवीत दुसरा क्रमांक पटकावला. कार्तिकेयनच्या या शानदार कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने प्रथमच पहिल्या दहा संघांत स्थान मिळविले.
सकाळ


विद्यापीठे शुल्क वाढविणार
आयआयएम आणि आयआयटी या संस्थांच्या शुल्कवाढीनंतर आता देशभरातील अनेक विद्यापीठे पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी शुल्कवाढ करण्याच्या तयारीत आहेत. केंद्रीय आणि राज्यांतील विद्यापीठांच्या शुल्करचनेचा अभ्यास करण्यासाठी समित्या नेमण्याचा निर्णय विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) घेतला आहे. "विविध विद्यापीठे आणि स्वायत्त शिक्षणसंस्थांच्या शुल्करचनेचा अभ्यास करून; तसेच चालकांशी चर्चा करून या समित्या आदर्श शुल्करचना निश्‍चित करतील आणि समित्यांचा अहवाल सादर झाल्यानंतर नवीन शुल्करचनेचा निर्णय घेतला जाईल" अशी माहिती विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष प्रा. सुखदेव थोरात यांनी पीटीआयला दिली.
सकाळ

दि. ०४.०५.२००८[संपादन]

पाकिस्तानात प्राचीन मंदिराचा वापर चक्‍क गॅरेजसाठी
येथील रतन रस्तापरिसरात सुंदर कलाकुसरीचा नमुना असलेल्या हिंदू प्राचीन रतन तल्हा या मंदिराचा वापर चक्‍क गाड्या दुरूस्तींच्या गॅरेजसाठी होत असल्याने पाकिस्तानातील हिंदूंमधून संतप्त भावना व्यक्‍त होत आहे. पाकिस्तानातील औकॉफ विभागाने सदर प्राचीन मंदिर वक्‍फ मालकीकडून घेऊन त्याचा बाजार मांडला आहे. या विभागाने मंदिर एका खासगी व्यावसायिकाला भाडेतत्त्वावर दिले असून, त्या व्यावसायिकाने येथे ऑटोमोबाईल वर्कशॉप सुरू केले आहे.
सकाळ


गुंटूरचा मिरची बाजार आगीत भस्म
आशियात सर्वांत मोठा असलेल्या गुंटूरचा मिरची बाजार आज सकाळी लागलेल्या भीषण आगीत अक्षरशः भस्म झाला. सुदैवाने जीवितहानी मात्र झाली नाही. या आगीमुळे ६५ एकरांच्या आवारातील मिरची आणि शीतगृहांतील मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बाजारात आलेल्या एका ट्रकचा सकाळी नऊच्या सुमारास विजेच्या तारांशी संपर्क येऊन शॉर्टसर्किट झाले व त्यातून आग लागली. पाहता पाहता ही आग संपूर्ण बाजारपेठेत, तसेच शेजारी असलेल्या निवासी भागात पसरल्याचे अग्निशामक दल आणि पोलिसांनी सांगितले.
सकाळ


स्वातंत्र्यानंतर प्रथमच शेती उत्पादनात उच्चांक
"वाढत्या महागाईचा प्रश्‍न फक्त भारताचाच नाही, तर संपूर्ण जगापुढे तो उभा आहे. त्यामुळे शेतकरी आणि त्यांनी उत्पादित केलेला माल याच्याशी संबंध जोडून महागाईचे खापर शेतकर्‍यांवर फोडता येणार नाही. उलट स्वातंत्र्यानंतर प्रथमच भारतात शेतीचे उत्पादन वाढले आहे" अशी माहिती ज्येष्ठ नेते केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली. आमदार यशवंतराव गडाख यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, "गहू, तांदूळ, डाळी, तेलबिया यांचे दर वाढले असले, तरी इतर देशांच्या तुलनेत आपल्याकडे अजूनही ते कमी आहेत. तांदळाची निर्यात करणार्‍या थायलंडमध्ये तांदळाचे प्रतिकिलो दर ४७ रुपये आहेत. त्या तुलनेत आपल्याकडील दर कमी आहेत."
सकाळ


प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेची केवळ २५ टक्केच लक्ष्यपूर्ती
हजारो कोटी रुपये खर्चून देशातील दुर्गम आणि किमान ५०० लोकवस्तीच्या गावांपर्यंत रस्ते बांधण्याचे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे २५ टक्के लक्ष्यही गाठता आलेले नाही. पण या योजनेतील ३१२ कोटी ३४ लाख (१९.५८ टक्के) रुपये अन्यत्र वळविले गेले. ही रक्कम अनधिकृत खात्यांमध्ये जमा केल्याबद्दल संसदेच्या सार्वजनिक लेखा समितीने केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयावर ताशेरे ओढले असून, निधीच्या नियमबाह्य वापराची चौकशी करण्याची शिफारस केली आहे.
सकाळ


कारगिल युद्धाची तयारी पाकिस्तानकडून आधीच
महागात पडलेल्या कारगिल युद्धाच्या दुःसाहसाची तयारी पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांकडून खूप आधीपासून सुरू होती, अशी माहिती एका नव्या पुस्तकात देण्यात आली आहे. हे युद्ध १९९९ च्या उन्हाळ्यात झाले असले, तरी त्याची पूर्वतयारी बरीच आधी सुरू झाली होती, असे "क्रॉस्ड सोर्डसः पाकिस्तान, इट्‌स आर्मी अँड द वॉर विदिन" या पुस्तकात नमूद करण्यात आल्याचे वृत्त डेली टाइम्सने दिले आहे. माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो व माजी लष्करप्रमुख जनरल जहांगीर करामत यांचे म्हणणे त्यात घेण्यात आले असून, माजी परराष्ट्रमंत्री सरताज अझीझ यांचे मतही पुस्तकात मांडण्यात आले आहे.
सकाळ

दि. ०३.०५.२००८[संपादन]

जुन्नर परिसरात रोमन व ग्रीक लोकांच्या वसाहती
"जुन्नर परिसरात रोमनग्रीक लोकांच्या वसाहती असल्याचे तेथील उत्खननात सापडलेल्या 'टेराकोटा' व इतर मूर्तींवरून दिसून येते" असे डेक्कन कॉलेजच्या पुरातत्त्व विभागातील संशोधक प्रा. डॉ. वसंत शिंदे यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले. अधिक माहिती देताना डॉ. शिंदे म्हणाले, "डेक्कन कॉलेज जुन्नरमध्ये मागील तीन वर्षांपासून उत्खनन करत आहे. उत्खननाच्या संशोधनावरून त्या वेळचा इसवी सनपूर्व २०० ते इसवी सन २०० असा चारशे वर्षांचा कालखंड असावा, असे स्पष्ट होते. उत्खननामध्ये सापडलेल्या टेराकोटा व इतर मूर्ती, मातीची भांडी, शिंपल्यांपासून तयार केलेल्या बांगड्या, दागिने व नाणी यांवरून हा कालखंड सहज सांगता येतो. जुन्नर परिसरात रोमन व ग्रीक लोक वापरत असलेल्या लाल रंगाच्या पॉटरी सापडल्या आहेत. येथे सापडलेले कुंभ रोमन व ग्रीक मद्य ठेवण्यासाठी वापरत होते. त्यामुळे त्यांच्या वसाहतीचे पुरावे सापडतात.
सकाळ


राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय आता नव्या भूमिकेत
चित्रपटविषयक अन्य संस्थांना फक्त सहकार्य करण्याची भूमिका सोडून राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय आता स्वतंत्रपणे अनेक उपक्रम हाती घेणार आहे. या नव्या भूमिकेला केंद्र सरकारने पाठिंबा दिला असून नव्या उपक्रमांसाठी तीन कोटी रुपयांचे सहकार्य करण्यात येणार आहे. देशभरातील चित्रपटांचे जतन करणारी केंद्रीय शिखर संस्था असणार्‍या राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक विजय जाधव यांनी ही माहिती दिली.
सकाळ


राज्यातील तापमानात घट
उत्तर आणि मध्य भारतात अजूनही उष्णतेच्या लाटेचा प्रभाव जाणवत असला, तरी विदर्भ वगळता राज्याच्या बहुतांश भागातील तापमानात घट झाल्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. राज्यातील बहुतेक शहरांतील कमाल तापमान आज ३३ ते ३६ अंशांवर दरम्यान नोंदले गेले. शहरातील कमाल तापमान आज ३६.७ अंश सेल्सिअस इतके होते.
सकाळ


विदर्भात आगीचे तांडव; ६३ घरे भस्मसात
विदर्भातील बुलडाणा, यवतमाळ, अमरावती, चंद्रपूरनागपूर जिल्ह्यांत आज (ता. २) आगींच्या घटनांनी थैमान घातले. ब्राह्मणवाडा (जि. यवतमाळ) येथे लागलेल्या आगीत ३५ घरे बेचिराख झालीत. डोलारखेड (जि. बुलडाणा) येथे विजेच्या तारांतून ठिणग्या उडाल्याने लागलेल्या आगीत २८ घरे तर २४ गोठे राख झालेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी घरगुती वस्तू, चारा आदी कोट्यवधींची मालमत्ता आगीच्या भक्ष्यस्थानी पडली असून शेकडो गावकरी बेघर झाले आहेत.
सकाळ


चलनवाढ ७.५७ टक्‍क्‍यांवर
चलनवाढीचा दर ७.५७ टक्‍क्‍यांवर पोचला आहे. गेल्या ४२ महिन्यांतील हा उच्चांक आहे. एकीकडे हा दर वाढत असताना, अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी मात्र जनतेला श्रद्धा ठेवून संयम राखण्याचे आवाहन केले आहे. गेल्या आठवड्यात चलनवाढीचा दर ७.३३ टक्के एवढा नोंदविण्यात आला होता. सरकार आणि रिझर्व्ह बँकेने महागाई रोखण्याच्या काही उपाययोजना जाहीर करूनही त्याचा फारसा परिणाम न होता, तो ०.२४ टक्‍क्‍याने वाढून चलनवाढीचा दर ७.५७ टक्‍क्‍यांवर पोचला आहे.
सकाळ

दि. ०२.०५.२००८[संपादन]

सोनिया, टाटा "टाइम"च्या प्रभावी व्यक्तिमत्त्वांच्या यादीत
कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उद्योगपती रतन टाटा यांचा जगातील शंभर प्रभावी व्यक्तिमत्त्वांच्या यादीत समावेश झाला आहे. टाइम नियतकालिकाने प्रसिद्ध केलेल्या या यादीत तिबेटचे सर्वोच्च धर्मगुरू दलाई लामा यांचाही समावेश आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश, ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर, रशियाचे मावळते अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासह जॉन मॅक्‌केन, हिलरी क्‍लिंटन आणि बराक ओबामा या अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी आपापल्या पक्षाकडून शर्यतीत असणार्‍या तीन उमेदवारांच्या नावांचाही यादीत समावेश आहे. टाइमकडून दर वर्षी शंभर प्रभावी व्यक्तिमत्त्वांची यादी प्रसिद्ध केली जाते. या वर्षीच्या यादीचे पाच विभाग करण्यात आले असून, नेते आणि क्रांतिकारी, नायक आणि प्रणेते, शास्त्रज्ञ आणि विचारवंत, कलावंत आणि मनोरंजन क्षेत्रातील व्यक्ती; तसेच संघटक आणि शक्तिशाली व्यक्ती अशी ही विभागणी आहे.
सकाळ


दहशतवादाची सर्वाधिक झळ भारताला
भारताला सन २००७ मध्ये दहशतवादाचा सर्वाधिक फटका बसला असून, या वर्षात २३०० जणांचा बळी गेला आहे. दहशतवादाविरुद्ध लढण्याचे भारताचे प्रयत्नही अपुरे असून, येथील पोलिस यंत्रणा साधनांनी सक्षम नाहीत आणि न्यायव्यवस्थाही मंद व दीर्घकाळ रेंगाळणारी असल्याचा ठपका अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याच्या अहवालात ठेवण्यात आला आहे.
सकाळ


गृहकर्जाचा बोजा वाढणार नाही
कर्जावरील व्याजदरात नजीकच्या काळात वाढ होण्याची शक्‍यता नाही, असे केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी आज स्पष्ट केले. नजीकच्या भविष्यात व्याजदर स्थिर राहण्याची शक्‍यता बॅंकांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनीही व्यक्त केली. त्यामुळे गृहकर्ज घेतलेल्या कर्जदारांना तूर्तास दिलासा मिळाला आहे. रिझर्व्ह बॅंकेने नुकतीच रोख राखीव निधीच्या (सीआरआर) प्रमाणात वाढ केली. त्यामुळे बॅंकांकडून व्याजदरात वाढ होईल, अशी अपेक्षा होती. श्री. चिदंबरम यांनी आज सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली.
सकाळ


ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्त्या निर्मला देशपांडे यांचे निधन
ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्त्या, लेखिका व खासदार निर्मला देशपांडे (वय ७९) यांचे आज पहाटे येथे निधन झाले. त्यांच्यावर उद्या (ता. २) सकाळी साडेनऊला दिल्लीतील लोधी रस्ता स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्या अविवाहित होत्या. श्रीमती देशपांडे गेले काही दिवस आजारी होत्या. ज्येष्ठ साहित्यिक पु. य. देशपांडे यांच्या त्या कन्या होत. शांती व अहिंसा या मूल्यांचा अखेरपर्यंत ठाम पुरस्कार करणार्‍या श्रीमती देशपांडे यांनी वयाच्या २३ व्या वर्षीच आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीत स्वतःला झोकून दिले होते. चाळीस हजार किलोमीटरच्या भूदान यात्रेतही त्या विनोबांसह सहभागी झाल्या होत्या. गांधीविचारांवर अतूट निष्ठा असलेल्या श्रीमती देशपांडे यांनी अनेक कविता, कथा व प्रवासवर्णने लिहिली. ईशावास्योपनिषदावरही त्यांनी भाष्य लिहिले आहे. पद्मविभूषण व विद्यापीठांच्या मानद डॉक्‍टरेटसह अनेक सन्मान त्यांना मिळाले होते. त्याचप्रमाणे १९९७ मध्ये व २००४ पासून त्या राज्यसभेच्या सदस्याही होत्या.
सकाळ


वर्षअखेरीपर्यंत जगातील निम्मी लोकसंख्या शहरांत
या वर्षअखेरीपर्यंत जगातील निम्मी लोकसंख्या शहरांत राहणारी असेल, असा अंदाज संयुक्त राष्ट्रसंघाने व्यक्त केला आहे. इतिहासात पहिल्यांदाच असे होत असून, खेड्यांकडून शहरांकडे स्थलांतरित होण्याचे प्रमाण वाढल्यामुळे शहरी लोकसंख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. सध्या तीन अब्ज तीस कोटी लोक शहरांत राहत आहेत; मात्र २०५०पर्यंत हीच संख्या दुप्पट होऊन ती सहा अब्ज चाळीस कोटींवर पोचेल, असाही अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. त्या वर्षी जगातील एकूण लोकसंख्या नऊ अब्ज वीस कोटींवर जाईल, असे नमूद करण्यात आले आहे. युरोप, उत्तर अमेरिका हे सर्वांत शहरी असतील. आफ्रिका आणि आशिया खंडांत सध्या ग्रामीण भागात राहणार्‍यांची संख्या जास्त असली, तरी तेथे शहरांत स्थलांतरित होणार्‍यांची टक्केवारी जास्त असेल, असा अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. आफ्रिकेतील निम्मी लोकसंख्या २०४५ ते २०५० या काळात शहरांत स्थलांतरित होईल, तर आशियात हीच स्थिती २०२० ते २०२५ इतक्‍या लवकर येईल.
सकाळ


सरकारी डॉक्‍टरांचा आजपासून असहकार
राज्याच्या आरोग्य खात्यातील डॉक्‍टरांनी उद्यापासून (ता. २) सरकारशी बेमुदत असहकार आंदोलन पुकारले आहे. राज्यभरातील सुमारे सात हजार डॉक्‍टर यात सहभागी होणार आहेत. राज्यभरातील चार हजार १८१ डॉक्‍टरांना नोकरीत कायमस्वरूपी सामावून घ्यावे, या प्रमुख मागणीसाठी आंदोलन करण्यात येत आहे, अशी माहिती राज्यातील वैद्यकीय अधिकारी संघटनेचे अध्यक्ष डॉ. महादेव चिंचोले यांनी सकाळला दिली.
सकाळ

दि. ०१.०५.२००८[संपादन]

मराठीचा झेंडा मिरविती अमराठी कौतुके!
मराठी विरुद्ध परप्रांतीय असा वाद काही दिवसांपूर्वीच निर्माण झाला असतानाच आज काही अमराठी संस्थांनी महाराष्ट्र दिन धुमधडाक्‍यात, मराठमोळ्या वातावरणात तसेच मराठी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून साजरा केला. ....

विशेष म्हणजे शिवसेनचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे ते राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या मराठी नेत्यांनीही या कार्यक्रमांना आवर्जून हजेरी लावली. या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ३ मे रोजी शिवाजी पार्कवर होणार्‍या मेळाव्यात काय बोलतात, याकडे सर्वांचे कान लागले आहेत...

सकाळ


हे सुद्धा पहा[संपादन]