Jump to content

चंद्रपूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हा लेख चंद्रपूर शहराविषयी आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या
  ?चंद्रपूर

महाराष्ट्र • भारत
टोपणनाव: चांदा
—  शहर  —
Map

१९° ५७′ ००″ N, ७९° १८′ ००″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जिल्हा चंद्रपूर
तालुका/के नागभिड, राजुरा, जिवती, कोरपना, भद्रावती, सावली, पोंभुर्णा, ब्रम्हपुरी, वरोरा, मुल, चिमूर, बल्लारपूर, सिंदेवाही, चंद्रपूर (१५)
लोकसंख्या ३,७३,००० (२०११)
महापौर राखी कंचर्लावार
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४४२४०१
• +९१७१७२
• MH 34

चंद्रपूर (आधीचे रुढ नाव चांदा/लोकपूर) हे चंद्रपूर जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. गोंडराजे खांडक्या बल्लाळशाह ह्याने १३ व्या शतकात चंद्रपूर शहराची स्थापना केली.

चंद्रपूर हे त्यावेळेस ह्या गोंड राज्याची राजधानी होती. यास पूर्वी चांदागढ म्हणूनही ओळखले जात असे, त्यालाच चांदाही म्हणत असत.

  • ११ जानेवारी १९६४ रोजी महाराष्ट्र शासन निर्णय क्र. एन.एम.सी./१०६३ हा निर्गमित करण्यात आला होता, त्यानुसार याचे नाव चांदा हे नांव बदलून चंद्रपूर असे करण्यात आले.[]

शहरात शंकराचे (अंचलेश्वर) व महाकालीची प्राचीन मंदीरे आहेत.

  • येथे महाकाली अर्थात कालीमातेचे एक प्रसिद्ध देऊळ आहे.

या गावापासून जवळच सुमारे ५ कि.मी. अंतरावर दुर्गापूर येथे औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प आहे.

इतिहास

[संपादन]

इ.स.१९५६ पूर्वी‌ हा जिल्हा मध्यप्रांत व बेरार राज्यात होता. त्यापूर्वी मद्रास प्रांतात चंद्रपूर जिल्ह्याचा काही भाग समावेशीत होता.

गोंड राजवंशातील १०वा, परंतु चंद्रपूर येथे राज्य करणारा १ला राजा खांडक्या बल्लाळशाह याने १४७२ च्या सुमारास या शहराचा पाया घातला व त्याची राजधानी बल्लारपूर येथून चंद्रपूरास हलवली.[][]

  • तेल ठाकूर नावाच्या वास्तुशिल्पकाराने परकोटाचा नकाशा तयार केला व साडेसात मैल परिघाची आखणी करून पायाभरणी केली.
  • कर्णशहाचा नातू धुंड्या रामशहा (१५९७- १६२२) याच्या कारकिर्दीत परकोटाचे काम पूर्ण झाले. परकोटाचा आकार दीर्घ वर्तुळाकार असून पूर्व-दक्षिण बाजूंना झरपट तर पश्चिमेस इरई नदी वाहते.
  • परकोटाच्या ४ प्रवेशद्वारांची नावे जटपुरा, अंचलेश्वर, पठाणपुरा व बिनबा अशी आहेत, तर त्यास बगड, हनुमान, विठोबा, चोर व मसाण अशा ५ खिडक्या आहेत. खिडक्यांचा आकारही प्रचंड असून त्यातून ट्रक-ट्रॅक्टर यांची वाहतूक सहज होत असते. ही सर्व नावे भोसल्यांच्या अमलात पडली आहे. जटपुरा दरवाज्यावर गणेशराव जाट, अंचलेश्वर दरवाज्यावर भानबा माळी, पठाणपुरा दरवाज्यावर अलिखान पठाण आणि बिनबा दरवाज्यावर बिनबा माळी असे जमादार होते. ते सगळ्या प्रकारच्या आवक-जावकीची नोंद ठेवत असत. त्यांच्याच नावावरून पुढे या दरवाज्यांना नावे देण्यात आली.[]
    Chandrapur Jatpura Gate

रामाळा तलाव

[संपादन]

शहराच्या मध्यभागी हा माजी मालगुजरी (मामा) तलाव आहे. तो धुंड्या रामशहा या राजाने निर्माण केला होता.

चंद्रमा (Ranger's College)

[संपादन]

चंद्रपुरात वन अकादमी (Forest Training Academy) आहे. याचे अधिकृत नांव चंद्रपूर वनविकास, व्यवस्थापन व संशोधन प्रबोधिनी असे आहे, तर संक्षिप्तरूपात यालाच चंद्रमा असे म्हणले जाते.

  • या संस्थेत RFO अर्थात वनक्षेत्रपाल (वन परिक्षेत्र अधिकारी) यांचे प्रशिक्षण होते.
  • या संस्थेचा प्रमुख/संचालक APCCF दर्जाचा अधिकारी म्हणजेच अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक असतो.
  • पूर्वीचे वनपाल-वनक्षेत्रपाल महाविद्यालय आता प्रबोधिनीत रुपांतरीत झाले आहे.
  • हे महाराष्ट्र वनविभागाच्या प्रशिक्षणाचे मुख्यालय आहे.

दुसरी दीक्षाभूमि

[संपादन]
ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.


१९५६ मध्ये डॉ. बी. आर. आंबेडकर आणि त्यांच्या अनुयायांनी केलेला ‘दीक्षा’ सोहळा बौद्ध धर्माच्या ऐतिहासिक स्वरूपाचा शहरात १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे आपल्या कुटुंबातील सदस्यांसह बौद्ध धर्म स्वीकारला. त्यानंतर लवकरच बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील कित्येक भागांतून आलेल्या लाखो अनुयायांचे बौद्ध धर्मात रूपांतर केले. १६ ऑक्टोंबर १९५६ रोजी डॉ. बी. आर. आंबेडकर यांनी चंद्रपूर येथे अनुयायांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली. त्यानंतर या जागेला “दीक्षाभूमी” म्हणून ओळखले जाते. दीक्षा म्हणजे अक्षरशः धर्म स्वीकारणे आणि भूमी म्हणजे जमीन. हे बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचे जन्मस्थान आहे. आंबेडकरांनी केवळ धर्मपूर (बौद्धधर्म स्वीकार) साठी नागपूर व चंद्रपूरची निवड केली आणि म्हणूनच चंद्रपूरला ऐतिहासिक महत्त्व आहे. बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांनी “डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय ”दीक्षाभूमीच्या आवारात. बुद्धगया पासून बौद्धवृक्षाची एक शाखा आवारात लावली आहे आणि कृपेने वाढत आहे. या पवित्र ठिकाणी दरवर्षी १६ ऑक्टोबरला “धम्मचक्र प्रवर्तन दिन”चे २-दिवसीय कार्यक्रम आयोजित केले जातात. समारंभात हजारो यात्रेकरू आणि भिक्षू दीक्षाभूमीला भेट देतात. दीक्षाभूमी रेल्वे स्थानक व बसस्थानकापासून अवघ्या १ किमी अंतरावर आहे. वाहन रिक्षा सहज उपलब्ध आहे.

भूगोल

[संपादन]

दरवाजे (४)

[संपादन]
  • अंचलेश्वर गेट
  • जठपूरा गेट
  • पठाणपुरा गेट
  • बिनबा गेट

खिडक्या

[संपादन]
  • चोर खिडकी
  • बगड खिडकी
  • हनुमान खिडकी
  • विठ्ठल खिडकी
  • मसन खिडकी

पेठा

[संपादन]
  • भानापेठ
  • बाबूपेठ
  • लालपेठ

बाजार परीसर

[संपादन]
  • गोल-बाजार
  • छोटा-बाजार

उपनगरे

[संपादन]
  • तुकुम
  • बापटनगर
  • उर्जानगर
  • शास्त्री नगर
  • रामनगर
  • सरकार नगर
  • बंगाली कॅम्प

वॉर्ड

[संपादन]
  • एकोरी
  • अष्टभुजा
  • एकवीरा
  • बालाजी
  • गंज
  • घुटकाळा
  • भिवापूर वॉर्ड

कॉलनी

[संपादन]
  • सिस्टर कॉलनी
  • रामबाग वनवसाहत
  • रैय्यतवारी

हवामान

[संपादन]

तापमान किमान ७.१ ते कमाल ४७.२ से.च्या दरम्यान असते. पर्जन्यमान १३९८ मि.मी इतके आहे. जिल्ह्याचे हवामान एकंदरीत उष्ण असून मुख्यत: दोन ऋतू आहेत उन्हाळा व हिवाळा. उन्हाळा मोठा व कडक असतो तर हिवाळा कमी कालावधीचा पण सौम्य असतो.

जैवविविधता

[संपादन]

औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रे

[संपादन]
  1. उर्जानगर (CSTPS) - ३४५० मेगावॅट
  2. बल्लारपूर - १००० MW विद्युत निर्मिती क्षमता
  3. दुर्गापूर- ८४० मेगावॅट विद्युत निर्मिती करण्याची क्षमता

औद्योगिक नगरी

[संपादन]

चंद्रपूर आणि आसपासच्या परिसरात उच्च दर्जाचा दगडी कोळसा मुबलक प्रमाणात आहे. म्हणून संपूर्ण भारतात चंद्रपूर Black Gold City (मराठी: काळ्या सोन्याचे शहर) ह्या नावाने ओळखले जाते.

चंद्रपूर शहरालगत सिमेंटचे बरेच कारखाने आहेत. उदाहरणार्थ Larsen and Toubro Limited (L&T) , माणिकगढ सिमेंट, Ultra Tech & अंबुजा. चंद्रपूरपट्टा खनिजसंपत्तीत समृद्ध आहे.

प्रशासन

[संपादन]

नागरी प्रशासन

[संपादन]
  • नगरपालिका: ८
  • नगरपंचायत:१०

जिल्हा प्रशासन

[संपादन]
  • जिल्हाधिकारी
  • पोलीस अधीक्षक
  • जिल्हा शल्यचिकित्सक
  • मुख्य वनसंरक्षक, चंद्रपूर वनवृत्त
  • जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
  • जिल्हा माहिती अधिकारी
  • जिल्हा आरोग्य अधीक्षक

वाहतूक व्यवस्था

[संपादन]
  1. एकल मार्ग वाहतूक : जठपुरा गेट ते गांधी चौक

लोकजीवन

[संपादन]

गोंडी परंपरा

संस्कृती

[संपादन]

झाडीपट्टीतील लोकरंगभूमी

[संपादन]

महाराष्ट्राच्या पूर्वेकडील चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया या चार जिल्ह्यांचा प्रदेश पूर्व विदर्भ म्हणून गणला जातो. हा प्रदेश ब्रिटिश काळापासून ‘झाडी मंडळ’ नावाने ओळखला जातो. प्रचंड घनदाट जंगले आणि विपुल वनसंपदा यांनी नटलेला हा भूभाग आहे. धानाचे मुख्य पीक आणि वनसंपत्तीवर आधारित व्यवसाय करणारा हा प्रदेश आहे. या पट्ट्यातील लोककला, लोकजीवन, लोकसंस्कृती आणि लोकपरंपरा झादिबोलीने सांभाळल्या आहेत. शेकडो वर्षांपासून लोकरंजनासाठी काही लोककला व लोकपरंपरा म्हणजेच वैशिष्ट्यपूर्ण लोकनाट्यकला या पट्ट्यात अस्तित्वात आहेत. व्यापक प्रमाणात लोकरंजनासाठी लोकनाट्याचा इथे प्रभावीपणे वापर करण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्हा आदिवासीबहुल जिल्हा असल्यामुळे येथील लोककला लोक परंपरा ह्या अतिशय प्राचीन असल्याचे दिसते. विरंगुळा म्हणून श्रमपरिहार करण्यासाठी कित्येक वर्षांपासून आपल्या पारंपरिक लोककलांची जपणूक येथील जनता करीत आली आहे. भिंगीसोंग, दंडार, राधा, दंडीगान, खडीगंमत, डहाका, कथासार गोंधळ, बैठकीचे पोवाडे ही या भागातील पारंपरिक मनोरंजनाची तथा कलाभिव्यक्तीची साधने आहेत. लोक जीवनामध्ये पारंपरिक लोककलांचे स्थान आजही महत्त्वपूर्ण आहे. चंद्रपूर गडचिरोली भागात सादर होणाऱ्या काही लोककलांचा उल्लेख पुढीलप्रमाणे करता येईल.

दंडार — भंडारा जिल्हा गॅजेटियर मधील उल्लेखानुसार दिवाळीच्या दिवशी गोंड आणि इतर जाती ‘दंडार’ हे नृत्य सादर करतात. दंडार हे एक ‘दंड’ नृत्य असून प्रत्येक माणूस हातात दोन दंड घेऊन वेगवेगळे नाच करीत असतो. दंडार ही समूह कला असून ती कृषीनिष्ठ कला आहे. काळानुरूप या दंडारीत झडत्या व लोक गीतांनी प्रवेश केला असावा कारण ढोलकी, डफ, सोबत ताळ आणि एक तार असलेला तुंतूना हे या दंडारीचे वाद्ये आहेत. पुढे दंडारीमध्ये अनेक प्रकारचे सोंग येऊ लागले. दंडारीतील शंकर, गणपती, राक्षस, लावडीन, तंट्याभिल्ल आदींचे सोंग कलावंत सादर करताना दिसतात. दंडारीत नाचणारी साधारणतः आठ मुले असतात. यातील स्त्रीपात्रे नऊवारी लुगडे घालतात, डोक्यावर चमकदार मुकुट, आकर्षक मण्यांच्या माळा आणि हातात पाटल्या घालतात. पुरुषपात्रे पांढरे सदरे, चुडीदार पायजामा किंवा धोतर कुर्ता वापरतात. ऐतिहासिक - पौराणिक दंडारीत भडक भरजरी पोशाख वापरला जातो. गावातील दंडारींना दिवाळी-भाऊबीजेपासून प्रारंभ होतो. दंडारीच्या सादरीकरणावरून तिचे तीन प्रकार पडतात. १. बैठकी दंडार - गायक शाहीर ढोलक्या, तुन्तुनेवाला आणि एक-दोन साथीदार असे सामूहिक रूपात बैठकित ही बैठकी दंडार सादर करतात. पोवाडे, लावण्या, पौराणिक कथा आदींचे गायन केली जाते. यात नाच आणि सोंग यांना फाटा दिला जातो. २. खडी दंडार - हा लोकप्रिय दंडार प्रकार आहे. सादरीकरणांमध्ये काही हलकेफुलके सामाजिक विषय घेऊन सोंग दाखविले जातात. हे विनोदी प्रसंग समाज प्रबोधनासोबतच लोकांचे रंजन करतात. ३. प्रसंगी दंडार - यात प्रमुख गायक सूत्रधार असतो. त्याला टाळ, ढोलके, तुन्तुने आदी परंपरागत वाद्य सोबत करीत असतात. या दंडारीत नर्तकांचे सामुहिक नृत्य व सोंग असतात. मधेमधे झडत्या आणि लावण्या गातात. शाब्दिक विनोदाचा भडिमार या प्रकारामध्ये असतो.

राधा — झाडीपट्टीतील ‘राधा’ या लोकनाट्याने दलित रंगभूमीचा उदय झाला, असे अभ्यासकांचे मत आहे. यात सहभाग घेणारी पाच-सात कलावंत असतात. मुलीसारखा गोंडस चेहरा असलेल्या तरुण मुलाला भडक रंगाचे चमकदार लुगडे नेसून अंगावर नकली दागिने घालून त्याला राधा म्हणून नाचायला सज्ज करतात. टाळ, ढोलकी, तुन्तुना, तसेच खड्या आवाजात गायन करणारा शाहीर, असा राधेचा खेळ सुरू होतो.

खडी गंमत — अतिशय लोकलोकप्रिय असलेल्या तमाशाचे वैदर्भिय रूप म्हणजे खडीगंमत होय. दलित आदिवासी रसिकांचे रंजन करणारा हा प्रकार आहे. यात स्त्रीसुलभ हावभाव करणारा देखणा तरुण नर्तक असतो. यात शाहीर हा सूत्रधार असतो. शाहीराने गाणे गायले की पायात चाळ बांधलेला नर्तक ढोलकीच्या तालावर स्वतःभोवती फेर धरून नाचतो. त्याच्यासोबत मावशी, सोंगाड्या, पेंद्या, ढोलकी वादक, तुन्तुनेवाला, झिलकारी असे आठ-दहा लोकांचा संच लोकांचे रंजन करतात. प्रारंभी शाहीर गणेशस्तवनपर गण गातो. नंतर गवळण, कृष्णलीला सादर करतो. राधा, गोपिका, मावशी मथुरेच्या बाजाराला जातात. तेव्हा कृष्णा आणि पेंद्या त्यांना अडवून दही लोण्याच्या रूपात कर मागतो आणि कथा पुढे वाढते. या माध्यमातून लोकांचे रंजन केले जाते. या लोकनाट्य प्रकारात दोन पक्ष प्रामुख्याने दिसतात १. कलगीवाले - हे शक्तीचे उपासक असतात. २. तुरेवाले - हे शिवाचे उपासक होत.

डहाका — शिवाच्या डमरूचे मोठे रूप म्हणजे डहाका होय. हे वाद्ये धार्मिक वातावरणात देवीची आराधना करण्यासाठी वापरले जाते. डहाकागायन केल्याशिवाय देवी प्रसन्न होत नाही. असी इथल्या जनतेची श्रद्धा आहे. विवाहादी कार्यामध्ये आदल्या रात्री देवतांचे पूजन करण्यासाठी डहाकावादन केले जाते. एखादी कथा पोवाड्याच्या रूपात तयार करून, विविध चालीवर गाऊन रसिकांची साथ त्याला मिळवली जाते.

भिंगी सोंग — बहुरूपीप्रमाणे ‘भिंगीसोंग’ ही झाडीतील एक महत्त्वाची कला म्हणून मान्यता पावली आहे. झाडीपट्ट्यातील हा भिंगी कधी पोलिस अधिकारी, कधी तंट्याभिल्ल, जोगी इत्यादी सोंगे काढून दारात बोजाऱ्याच्या अपेक्षेने उभा राहतो. तर कधी निळकंठ म्हणून साक्षात शंकराचे रूप घेतो. तर कधी दंडात सुरे खूपसून असलेला तंट्याभिल्ल बनून लोकांना भावनिक साद घालतो.

दंडी गान — दंडार या लोकनाट्याशी सदृश्यता सांगणारा हा प्रकार असून यात सर्व पुरुष पात्रे असतात. एक म्होरक्या पुढे उभा राहतो आणि त्याच्या मागे तीन सहकारी सोबत करतात. म्होरक्याच्या हातात वीणा असते, तर सहकारी टाळांनी साथ देतात. म्होरक्या पोवाडा गातो आणि सहकारी त्याची री ओढतात. दीर्घकथानक दंडीगानातून सादर करण्याची प्रथा आहे. दंडी हे परंपरागत भाट असून अनेक पिढ्यांच्या वंशावळी त्यांच्याकडे उपलब्ध असतात. प्राचीन काळात राजाचे गुप्तहेर म्हणूनही हे काम करायचे. यांना ‘करपल्लवी’ नावाची कला प्राप्त होती. या कलेद्वारे बोटाच्या इशाऱ्यांवरून एखादा संदेश देण्याचे कसब त्यांना प्राप्त होते.

डरामा — ‘डरामा’ हा झाडीपट्टीतील लोककला प्रकार साधारणतः गोंदिया भंडारा जिल्ह्यात हिंदी भाषिक लोकांमध्ये अधिक प्रसिद्ध दिसतो. दंडार या प्रकारचे आधुनिक रूप म्हणून डरामा हा प्रकार बघितला जातो. दंडार या प्रकाराला हिंदी भाषेत ‘नौटंकी’ असे संबोधतात. डरामा हा मौखिक लोकनाट्य प्रकार आहे. कलावंत लिखित संहिता पूर्ण पाठांतर करून आपल्या अंगभूत कौशल्याचा वापर करून रात्रभर प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. नाटकाप्रमाणे स्टेज तयार केला जातो. पडद्यांचा वापर होतो. पुरुष स्त्रियांची भूमिका करतात.

कथासार गोंधळ — प्राचीन काळापासून झाडीपट्टीत सणउत्सव, लग्न, बारसे, तेरवी आदीप्रसंगी कथासार गोंधळाचे आयोजन केले जाते. यात ‘संबळ’ हे वाद्य प्रमुख असते. एक किंवा दोन शाहीर, दोन नाचे, एक विदूषक, गमत्या, चोंडका, टाळ वाजवणारे आणि दोन-तीन झिलकारी असा जवळपास दहा कलावंतांचा संच ही कला सादर करतो. गणपतीला नमन करून गायनाला सुरुवात होते. नाच्या मुलगा वाद्याच्या तालावर फेर धरून नाचतो. पुढे प्रेक्षकांच्या मागणीनुसार गाणे सादर केले जातात. रात्रभर लोकांचे रंजन करणारा हा कलाप्रकार आहे. लोक रंजनासाठी हौसेखातर इतर प्रसंगी यात उत्तान शृंगारिक भाव-भावना उद्दीपित करणारे गीत साभिनय सादर केले जातात. तर सण-उत्सवप्रसंगी ही उत्ताणता बघायला मिळत नाही.

बैठकीचे पोवाडे — गावात बैठक लावून पोवाडे गाण्याची पद्धत आहे. एक मुख्य शाहीर ढोलकी वादक, टाळवाला, तुन्तुनेवाला, दोन झिलकारी असा सहा लोकांचा संच यात असतो. प्रारंभिक गण गाऊन पौराणिक कथांवर आधारित पोवाडे गाण्याचे काम हा संच करतो. रामायण, महाभारत, शिवकाल किंवा समाजातील काही इतर विषय घेऊन, तसेच देश प्रेमावर सहा ते सात कडव्यांचे पोवाडे यात असतात. पोवाड्यावरील विषयांवरून त्यांचे रामायण, ऐतिहासिक, गतकालीन, सामाजिक व राष्ट्रीय पोवाडा असे वर्गीकरण करता येते. प्रत्येक कडव्याच्या अखेरच्या भागाला ‘उडान’ असे म्हणतात. ते झाले की पुन्हा ध्रुवपद गायले जाते. उचित रसात कथा गाऊन सांगणे हे शाहिराचे काम असते. शाहिराच्या गायकीतून वीर, करून, शृंगा,र भक्ती अशी प्रसंगोपात रसांची निर्मिती होऊन रसिकांचा ते वेध घेते. प्राचीन काळात झाडीपट्टयात या सर्व कला लोकरंजन व लोकप्रबोधनाचे कार्य उत्तमरीत्या पार पडत होती. 1970 च्या दशकात वरील सर्व लोककलांवर झाडीपट्टीतील नाटकांनी प्रभाव टाकला आणि या कला लोकाश्रय आणि राजाश्रयासाठी विव्हळू लागल्या. कालांतराने त्या नष्टप्राय झाल्या. परंतु त्यापूर्वी खूप मोठा कालखंड या कलांनी लोकांचे मनोरंजन केले, लोकसेवा केली हे विसरता येत नाही.

संदर्भ १. बोरकर डॉ. हरिश्चंद्र - ‘झाडीपट्टीची दंडार’, दास्ताने आणि कंपनी, प्रकाशन पुणे. आवृत्ती पहिली, 1999 २. लांजे हिरामण - ‘महाराष्ट्राची लोकनृत्य नाट्यधारा’, विवेक प्रकाशन, नागपूर. आवृत्ती पहिली 2000 ३. मोहरकर डॉ. श्याम - ‘झाडीपट्टी रंगभूमीची शतकोत्तर वाटचाल’, राघव प्रकाशन, नागपूर. आवृत्ती पहिली 2013

चित्रपट

[संपादन]

खवय्येगिरी

[संपादन]

राजकारण

[संपादन]
  1. मारोतराव कन्नमवार, २रे मुख्यमंत्री
  2. शोभा फडणवीस, कॅबिनेट मंत्री
  3. श्री. वामनराव गड्डमवार, माजी वनमंत्री
  4. हंसराज अहिर, अध्यक्ष- राष्ट्रीय मागासवर्ग आयोग(NCBC)
  5. विजय वडेट्टीवार, माजी विधानसभेचे विरोधी पक्षनेते
  6. शांताराम पोटदुखे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री (१९९१)
  7. सुधीर मुनगंटीवार, राज्याचे माजी वित्त,वने व सांस्कृतिक-कार्य मंत्री
  8. श्रीमती यशोधरा बजाज, माजी मंत्री
  9. किशोर जोरगेवार, चंद्रपूरचे विक्रमी मतांनी अपक्ष आमदार राहिले.

प्रसारमाध्यमे

[संपादन]

वृत्तपत्रे

[संपादन]
  • दै. महा विदर्भ

वृत्त वाहिन्या

[संपादन]
  • सिटी केबल

शिक्षण

[संपादन]

चंद्रपूर शहर आपल्या शैक्षणिक सोयी-सुविधांसाठी प्रसिद्ध आहे.

चंद्रपूरात तीन मुख्य पारंपारिक पदवी महाविद्यालये आहेत.

व्यावसायिक महाविद्यालये

[संपादन]

चंद्रपूर शहरात नवीनच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (GMC) सुरू झाले आहे.

अभियांत्रिकी

[संपादन]

शहरातील बाबुपेठ परिसरात सुप्रसिद्ध असे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (GEC) आहे. येथील विद्यार्थ्यांना कॉलेजमधूनच नौकरीच्या संधी उपलब्ध होत आहेत, बऱ्याच साॅफ्टवेअर कंपन्या ह्या कॉलेजमध्ये 'कॅम्पस भरती' (Campus Recruitment) साठी येत असतात. त्याचप्रमाणे राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय (RCERT) हे चंद्रपूरातील दुसरे प्रसिद्ध अभियांत्रिकी महाविद्यालय विनाअनुदानीत तत्त्वावर चालवले जाते.

  • साई तंत्रनिकेतन
  • सोमय्या तंत्रनिकेतन
  • रिनेसन्स तंत्रनिकेतन

औषधनिर्माण

[संपादन]
  • बजाज औषधनिर्माण (पदविका) पॉलिटेक्निक
  • हाय-टेक महाविद्यालय

विधी महाविद्यालय

[संपादन]
  • शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालय

प्राथमिक व माध्यमिक शिक्षण

[संपादन]
  1. कर्मवीर दादासाहेब कन्नमवार उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय (ज्युबिली हायस्कूल),
  2. लोकमान्य टिळक विद्यालय (LTV),
  3. लोकमान्य टिळक कन्या विद्यालय (LTKV),
  4. विद्यानिकेतन उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय,
  5. विद्याविहार महाविद्यालय,
  6. भवानजीभाई चव्हाण हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय,
  7. महर्षी विद्यामंदिर,
  8. जनता महाविद्यालय,
  9. केंद्रीय विद्यालय,
  10. माऊंट कार्मेल महाविद्यालय.
  • गिर्यारोहण
  • राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धांचे यशस्वी आयोजन (२०२३)

पर्यटन स्थळे

[संपादन]
जटपुरा गेट

चंद्रपूर शहरात व शहराच्या आसपास खालील पर्यटन स्थळे सुप्रसिद्ध आहेत:

  1. महाकाली मंदिर: चंद्रपूर येथील हे महाकालीचे मंदिर राज्यात प्रसिद्ध आहे. चंद्रपूर शहराच्या बस स्थानकापासून पूर्वेस ७ किमी वर हे मंदिर आहे. मंदिरात जाण्यासाठी ऑटो रिक्षा मुबलक प्रमाणात मिळतात. येथे दरवर्षी हिवाळ्यात चैत्र पौर्णिमेला भरणारी महाकालीची यात्रा अतिशय प्रसिद्ध आहे.
  2. ताडोबा: हा भारतातील सुप्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे. चंद्रपूरपासून अवघ्या ४० किमी अंतरावर असलेले ताडोबा एक मोठे पर्यटन स्थळ म्हणून उदयास आले आहे. विशेष म्हणजे उन्हाळ्यात येथे भरपूर विदेशी पर्यटक येत असतात.

आनंदवन:

हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ अविनाश साबापुरे, लोकमत न्यूझ नेटवर्क. "पुण्यापाठोपाठ चंद्रपूरचेही नाव बदला". 2018-11-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-11-16 रोजी पाहिले.
  2. ^ गारे, (डॉ) गोविंद, महाराष्ट्रातील आदिवासी जमाती, पृष्ठ - ६७
  3. ^ "संग्रहित प्रत". 2020-01-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-01-29 रोजी पाहिले.
  4. ^ "संग्रहित प्रत". 2020-01-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-01-29 रोजी पाहिले.