Jump to content

राष्ट्रपती भवन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नवी दिल्लीमधील राष्ट्रपती भवन

राष्ट्रपती भवन (पूर्वीचे व्हायसरॉय हाऊस) हे नवी दिल्लीतील राजपथाच्या पश्चिमेस स्थित असलेले भारताच्या राष्ट्रपतींचे अधिकृत निवासस्थान आहे. राष्ट्रपती भवन म्हणजे फक्त ३४० खोल्या असलेल्या मुख्य इमारतीचा उल्लेख होऊ शकतो, ज्यामध्ये राष्ट्रपतींचे अधिकृत निवासस्थान तसेच ज्यात रिसेप्शन हॉल, अतिथी खोल्या आणि कार्यालये देखील आहेत किंवा या इमारतीबरोबरच तिथे असलेल्या संपूर्ण १३० हेक्टर (३२० एकर) जागेलासुद्धा राष्ट्रपती भवन म्हणले जाऊ शकते. यात विस्तीर्ण राष्ट्रपती गार्डन (मोगल गार्डन), अनेक बागा, अंगरक्षक आणि कर्मचाऱ्यांची घरे, तबेले, इतर कार्यालये आणि इतर सुविधांचा समावेश आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने हे जगातील सर्वांत मोठे राष्ट्रप्रमुखांचे निवासस्थान आहे.

इतिहास

[संपादन]

फोर्ट विल्यमचे गव्हर्नर जनरल एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत बेल्वेदेर हाऊस, कोलकाता येथे रहात असत. त्यानंतर गव्हर्मेंट हाऊस, कोलकाता (आत्ताचे राजभवन, कोलकाता) बांधण्यात आले. लॉर्ड वेलस्लीच्या आज्ञेप्रमाणे १७९९ ते १८०३ या काळात एक भव्य राजमहाल बांधण्यात आला. आणि १८५४ मध्ये बंगालच्या लेफ्टनंट गव्हर्नरने तिथे राहण्यास सुरुवात केली. डिसेंबर १९११ मध्ये दिल्ली दरबाराच्यावेळी नवी दिल्लीमध्ये ब्रिटिश व्हॉईसरॉयसाठी नवीन निवासस्थान बांधण्याचा निर्णय घेण्यात आला, कारण आता भारताची राजधानी कोलकात्याहून दिल्लीला हलवण्यात येणार होती.[]

जुन्या दिल्लीच्या दक्षिणेला नवी दिल्ली हे शहर वसवण्याचा आराखडा तयार करण्यात आला तेव्हा, भारताच्या व्हॉईसरॉयच्या नवीन राजवाड्यासाठी विस्तीर्ण जागा आणि महत्त्वाचे स्थान राखून ठेवण्यात आले.  या व्हॉईसरॉय हाऊससाठी आणि त्याच्या जवळच्या सचिवालय इमारतींसाठी सुमारे ४,००० एकर जागेचे संपादन करण्यात आले. यासाठी इथे असलेली रायसीना आणि माल्चा ही गावे आणि तेथील ३०० कुटुंबे भूसंपादन कायद्याच्या अंतर्गत विस्थापित करण्यात  आली.[]

ब्रिटिश वास्तुरचनाकार एडविन लॅंडसीअर ल्युटेन्स याला वास्तुच्या आराखड्याची प्राथमिक जबाबदारी देण्यात आली. पूर्ण झालेली वास्तू बरीचशी ल्युटेन्सने हर्बर्ट बेकरला शिमला येथून पाठवलेल्या रेखाचित्राप्रमाणेच होती. ल्युटेन्सच्या या डिझाईनमधील रंग आणि तपशीलांवर भारतीय वास्तुकलेचा प्रभाव आहे.  व्हॉईसरॉय हाऊस आणि सचिवालयाच्या इमारती बांधण्याचे काम ल्युटेन्स आणि बेकार यांनी मैत्रीपूर्ण वातावरणात सुरू केले. व्हॉईसरॉय हाऊसच्या समोरील सचिवालयाच्या इमारतींचे काम बेकर करणार होता. सुरुवातीच्या आराखड्यानुसार व्हॉईसरॉय हाऊस  रायसीना टेकडीवर बांधले जाणार होते आणि सचिवालयाच्या इमारती खालच्या बाजूला असणार होत्या. नंतर या दोन्ही इमारती पठारावर बांधण्याचे ठरले. व्हॉईसरॉय हाऊस  ४०० यार्ड मागे असणार होते. ल्युटेन्सला  व्हॉईसरॉय हाऊस उंचावर हवे होते, त्याला ते ठरलेल्या जागेपासून मागे आणावे लागले, यावरून त्याचे आणि बेकरचे वाद झाले.

ल्युटेन्सने सुमारे २० वर्षे जवळजवळ दरवर्षी भारत ते  इंग्लंड असा प्रवास केला आणि दोन्ही देशात व्हॉईसरॉय हाऊसच्या बांधकामासाठी काम केले. लॉर्ड हार्डिंग्जने आर्थिक तरतुदीत कपात केल्यामुळे ल्युटेन्सने राष्ट्रपती भवनाचा आकार १३,०००,००० घनफुटांवरून ८,५००,००० घनफुटांवर आणला. खर्च कमी करण्याचा आदेश  हार्डिंग्जने दिला असला, तरी या वास्तूची भव्यता कमी होऊ नये, असे त्याचे म्हणणे होते.[]

जेव्हा चक्रवर्ती राजगोपालाचारी यांनी पहिले भारतीय गव्हर्नर जनरल म्हणून पदभार स्वीकारला आणि ते या इमारतीत राहायला आले, तेव्हा त्यांनी  केवळ काही खोल्यांचाच वापर केला. तो आता राष्ट्रपतींच्या कुटुंबाच्या वास्तव्याचा भाग आहे आणि पूर्वीच्या व्हॉईसरॉयच्या वास्तव्याच्या भागाचे रूपांतर  अतिथींसाठीच्या खोल्यात करण्यात आले. भारताला भेट देणारे परदेशी राष्ट्रप्रमुख येथे राहतात.

रचना

[संपादन]

राष्ट्रपती भवनात ४ मजले आणि ३४० खोल्या आहेत. चटई क्षेत्र २००,००० चौ.फूट (१९,००० चौ.मी.) आहे. या बांधकामासाठी १ अब्ज विटांचा तसेच ३०,००,००० घन फूट दगडांचा वापर करण्यात आला.

इमारतीचे डिझाईन बरोक शैलीतील आहे. यामध्ये ताकद आणि राजाचा अधिकार दाखवण्यासाठी अनेक क्लासिक चिन्हे वापरली जातात. डिझाईन तयार करण्याची प्रक्रिया बराच काल चाललेली, किचकट आणि राजकीय वादाने रंगलेली होती. ल्युटेन्सची सुरुवातीची रेखाचित्रे संपूर्णपणे युरोपियन पद्धतीची होती. भारतातील स्थानिक बांधकाम परंपरा त्याला फारच प्राथमिक वाटत असे, त्याबद्दलचा त्याचा अनादर या रेखाचित्रांमध्ये दिसून येत होता. नंतर ही इमारत सभोवलाताशी चांगल्याप्रकारे एकरूप होण्यासाठी स्थानिक परिसराचे प्रतिबिंब त्यात दिसले पाहिजे, असे ठरले. बऱ्याच राजकीय चर्चेनंतर, ल्युटेन्सने स्थानिक इंडो-सारासेनिक नक्षी वापरण्याचे कबूल केले, पण ही नक्षी केवळ इमारतीच्या बाह्य भागावर सजावटीसाठी वापरण्यात आली.

इमारत १९२९ मध्ये पूर्ण झाली आणि नवी दिल्लीबरीबर १९३१ साली तिचे उद्घाटन झाले. ही इमारत पूर्ण होण्यासाठी १७ वर्षे लागली आणि त्यानंतर १८ वर्षांनी भारत स्वतंत्र झाला. १९४७ साली भारत स्वतंत्र झाल्यावर तिथे गव्हर्नर-जनरल राहत असत. १९५० साली भारत प्रजासत्ताक झाल्यावर या वास्तूचे नामकरण “राष्ट्रपती भवन” असे करण्यात आले.

चित्र दालन

[संपादन]
राष्ट्रपती भवन
मध्य घुमट
मध्य घुमट  
प्रवेशद्वाराजवळील तोफ
प्रवेशद्वाराजवळील तोफ  
भिंतीवरील हत्तींचे पुतळे
भिंतीवरील हत्तींचे पुतळे  
प्रजासत्ताक दिनानिमित्त केलेली रोषणाई
भारतीय राष्ट्रपतींच्या निवासस्थानाजवळ फव्वारा
भारतीय राष्ट्रपतींच्या निवासस्थानाजवळ फव्वारा  

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "The history of Rashtrapati Bhavan : The official home of the President of India". Jagranjosh.com. 2019-11-28 रोजी पाहिले.
  2. ^ https://www.telegraph.co.uk/news/worldnews/asia/india/8681785/New-Delhi-villagers-seek-compensation-100-years-after-being-evicted-by-Raj.html
  3. ^ Pile, John F. (2005). A History of Interior Design (इंग्रजी भाषेत). Laurence King Publishing. ISBN 978-1-85669-418-6.

बाह्य दुवे

[संपादन]