Jump to content

विश्व हिंदू परिषद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(विश्‍व हिंदू परिषद या पानावरून पुनर्निर्देशित)

विश्व हिंदू परिषद (विहिंप) सेवाकार्य करणारी देशातील एक स्वयंसेवी संस्था आहे. दादासाहेब आपटे हे या संघटनेचे एक संस्थापक होत. विश्व हिंदू परिषद हिंदू समाजातील उच्चनीचता, भेदाभेद दूर करून समग्र समाजाला एका समान पातळीवर संघटित करण्याचे कार्य करते. या परिषदेची स्थापना १७ ऑगस्ट १९७४ मध्ये केली गेली आहे. समाज कल्याणासाठी अनेक सेवाप्रकल्प ही संस्था चालवते. संघटीत व समरस समाज आणि समर्थ भारत हे ध्येय समोर ठेवून विश्व हिंदू परिषद वाटचाल करत आहे.[] हिंदूंचे धर्मातर रोखणे, अस्पृश्यता संपविणे, विदेशातील हिंदूंची धार्मिक कर्मभ्रष्टता संपवून त्यांना हिंदूमार्गावर आणणे, गोरक्षा करणे आदी विहिंपच्या स्थापनेमागील हेतू होते.[]

लक्ष्ये

[संपादन]

विश्व हिंदू परिषदेने आपल्या समोर चार लक्ष्ये ठेवली.

  • संघटित हिंदू - हिंदू समाजाला संघटित, सामर्थ्यशाली करून त्याला अजेय करणे आणि यासाठी वैज्ञानिकतेचा आधार घेऊन सामाजिक आणि धार्मिक साहित्याची निर्मिती करणे.
  • हिंदू रक्षा व संवर्धन - हिंदू जीवनदर्शन आणि अध्यात्माची रक्षा व संवर्धन करणे.
  • विदेशात संबंध - विदेशात राहणाऱ्या हिंद‌ुंशी संबंध प्रस्थापित करून त्यांच्यात हिंदू आस्था जागृत ठेवण्याचा प्रयत्न करणे.
  • भेदभावांना मूठमाती - उपासना, पंथ, लिंग, जात, वंश आणि वर्ण या कशाच्याही आधारे भेदभाव न करता सर्व भेदभावांना मूठमाती देणे.

विहिंपने जातीजातीतील वैमनस्य संपवणे व परस्पर समन्वय वाढवण्यावर भर दिला. ज्ञातीसंस्था संपर्क विभाग, समन्वय मंच, सदभाव बैठका अशा उपक्रमांद्वारे सर्व जाती-जमातींचे प्रतिनिधी एकत्र येऊ लागले. विहिंपच्या प्रयत्नातून एका जातीच्या धार्मिक, सामाजिक उत्सावाला इतर जातींच्या पंचांनाही सन्मानाने बोलावून त्यांचा सत्कार करण्याची पद्धत सुरू झाली.[]

कार्य

[संपादन]

हिंदू समाजाला संघटित करणे, त्याचा स्वाभिमान जागवणे, यासाठी विशेष प्रयत्नांची गरज आहे असे परिषद मानते. भारतातील मठ, मंदिर आणि आखाडे यांना एकत्र आणण्याचे कार्य या संस्थेने पार पाडले आहे. या धार्मिक संस्थांना विश्वासात घेऊन हा विश्वास दिला की धार्मिक संस्थांचे प्रश्न सोडवणे, हिंदू समाजाची जागृती अशा विषयांसाठीच एकत्र येणे आवश्यक आहे. संतांचे मंडळ हेच विश्व हिंदू परिषदेचे मार्गदर्शन करते. धर्मसंसद, संतसमिती, मार्गदर्शक मंडळ अशा विविध मार्गाने विश्व हिंदू परिषदेच्या कार्याला दिशा दिली जाते. विश्व हिंदू परिषदेच्या राष्ट्रीय कार्यकारिणी यांचा सहभाग असतो. जातिसंस्थांना एका व्यासपीठावर आणण्याचे कार्यही या संस्थेने केले आहे. मंदिरांना सर्व जातीतून प्रशिक्षित पुजारी मिळवून देणे, पुजाऱ्यांच्या धार्मिक शिक्षणाची चांगली व्यवस्था करणे, वेदपाठशालांना आर्थिक मदत देणे, सर्व जाती-जमातींतील पुजाऱ्यांना वेदशिक्षण देण्याची व्यवस्था केली गेली आहे. तामिळनाडू येथे मंदिर पुजाऱ्यांची एक राज्यव्यापी संघटना उभी झाली आहे. भजन, कीर्तन, संस्कारवर्ग यासारखे कार्यक्रम घेतले जातात.[] विहिंपच्या विविध सेवाप्रकल्पांत सर्व जातींच्या लोकांना समान सेवा मिळते हा अनुभव सार्वत्रिक आहे.[]

प्रकल्प

[संपादन]

समाजासाठी अनेक प्रकारचे प्रकल्प संस्था चालवते आहे.[]

  • बालवाड्या
  • शाळा
  • महाविद्यालये
  • हॉस्पिटल्स
  • आरोग्य सल्ला केंद्रे
  • गावागावात जाऊन सेवा देणारे आरोग्यरक्षक
  • गोशाला गोमूत्र व गोमय यापासून विविध औषधी उत्पादने निर्माण करणारे उद्योग.
  • शेती विकास प्रकल्प
  • ग्रामविकासाच्या योजना
  • रोजगार प्रशिक्षण उपक्रम

आज भारतात ५१ हजार एकल विद्यालये, १२५ वसतिगृहे, ४५ अनाथाश्रम, ११०० ठिकाणी वैद्यकीय सेवा केंद्रे अशी वेगळ्या प्रकारची ५८ हजार सेवाकार्ये भारतात चालू झाली आहेत.[]<ref>

जाती परस्पर समन्वय

[संपादन]

‘हिंदू धर्मात अस्पृश्यतेला स्थान नाही‘, असे १९६९ साली विहिंपच्या उडुपी अधिवेशनात १३५ धर्माचार्यांनी जाहीर केले आहे. विश्व हिंदू परिषदेने जातीजातीतील वैमनस्य संपवणे व परस्पर समन्वय वाढवणे यावर भर दिला. ज्ञातिसंस्था संपर्क विभाग, समन्वय मंच, सद्भाव बैठका अशा उपक्रमांद्वारे सर्व जातीजमातींचे प्रतिनिधी एकत्र येऊ लागले. या सर्वांना एकत्र येण्याचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. एका जातीच्या धार्मिक, सामाजिक उत्सवाला इतर जातीच्या पंचांनाही सन्मानाने बोलावून त्यांचा सत्कार करण्याची पद्धत आहे. गोरक्षण, धर्मांतर, लव्ह जिहाद या हिंदू धर्म विरोधी गोष्टींना संघटित विरोध करण्याचे कार्य संस्था करते.

आर्थिक

[संपादन]

सामाजिक विषमतेबरोबरच आर्थिक विषमताही दूर करणे हे संस्थेचे उद्दिष्ट आहे. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्यसंस्कार या किमान मानवी गरजांची सोय झालीच पाहिजे अशी संस्थेची धारणा आहे.

जागतिक हिंदू संघटन

[संपादन]

विश्वभरातील अनेक देशांत वेदमंदिरांची स्थापना केली आहे. जगातील शंभरहून अधिक देशांत सक्रिय कार्यसमिती आहे. निरनिराळ्या देशातील हिंदूंना एकत्र करून सण, उत्सव साजरे केले जातात. चिन्मय मिशन सारख्या संस्थासोबत यासाठी कार्य केले जाते. परदेशात आपले कुणी आहे आणि अडचणीत आधार आहे या मुळे हिंदू बांधव एकत्र येत आहेत. प्रशिक्षित पुजारी मंदिरांसाठी पाठवण्याचे काम केले जाते. त्यामुळे सर्व प्रकारचे धार्मिक विधी सुरू झाले आहेत. सांस्कृतिक मूल्यांची माहिती व्हावी, म्हणून विविध स्पर्धापरीक्षा विदेशातही घेतल्या जाऊ लागल्या आहेत. विश्‍व हिंदू परिषदेचे आचार्य गिरीराज किशोर हे आंतरराष्ट्रीय उपाध्यक्ष होते.

आंदोलने

[संपादन]

हिंदू देव देवतांची निंदानालस्ती करणे, जाहिरातीमध्ये त्यांचा विकृत प्रकारे उपयोग करणे अशा घटना रोखण्यासाठी संस्था आंदोलने करते. याविरोधात सरकारवर दबाव निर्माण केला जातो. खटले दाखल केले जातात. जगात कुठेही हिंदूंवर अन्याय होत असेल, तर सर्व देशांतील हिंदू समाजातर्फे त्या घटनेच्या विरोधात आवाज उठवला जातो. मानवाधिकार समितीकडे, प्रसंगी जागतिक न्यायालयाकडेही परिषदेतर्फे दाद मागितली जाते.

धर्मांतरास विरोध

[संपादन]

मीनाक्षीपुरम येथे हिंदूंचे झालेले सामूहिक मुस्लिम धर्मांतर ही हिंदू समाजावर मोठा आघात होता. या निमित्ताने परिषदेने देशभर ‘जनजागरण अभियान’ केले.

हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्यदुवे

[संपादन]
  1. ^ Banerjee, Sikata (2012-02). Make Me a Man!: Masculinity, Hinduism, and Nationalism in India (इंग्रजी भाषेत). SUNY Press. ISBN 9780791483695. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ "Sampadakiya news ,Editorial Stories, Marathi articles Online". Loksatta. 2018-03-22 रोजी पाहिले.
  3. ^ a b "सेवाव्रती". Lokmat. 2014-08-23. 2018-03-22 रोजी पाहिले.
  4. ^ "संग्रहित प्रत". 2014-08-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-08-13 रोजी पाहिले.
  5. ^ Rajagopal, Arvind (2001-01-25). Politics After Television: Hindu Nationalism and the Reshaping of the Public in India (इंग्रजी भाषेत). Cambridge University Press. ISBN 9780521648394.
  6. ^ http://tarunbharat.net/Encyc/2014/8/17/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7.aspx?PageType=N[permanent dead link]