प्रभा अत्रे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
प्रभा अत्रे

एका कार्यक्रमात गायन करताना प्रभा अत्रे
आयुष्य
जन्म १३ सप्टेंबर, १९३२ (1932-09-13) (वय: ९१)
जन्म स्थान पुणे, ब्रिटिश भारत
व्यक्तिगत माहिती
धर्म हिंदू
नागरिकत्व भारतीय
देश भारत ध्वज भारत
भाषा मराठी
पारिवारिक माहिती
आई इंदिराबाई अत्रे
वडील आबासाहेब अत्रे
संगीत साधना
शिक्षण * पुणे विद्यापीठ (बी.ए.)
  • गंधर्व महाविद्यालय संगीतविद्यालय (पीएच.डी.)
गायन प्रकार हिंदुस्तानी गायन, भजन, अभंग,
घराणे किराणा घराणे
संगीत कारकीर्द
पेशा गायकी
कारकिर्दीचा काळ १९५०- सद्य
गौरव
गौरव * पद्मविभूषण
पुरस्कार संगीत नाटक अकादमी पुरस्कार
बाह्य दुवे
संकेतस्थळ

प्रभा अत्रे (१३ सप्टेंबर, १९३२) या किराणा घराण्याच्या गायिका आहेत.[१] डॉ. प्रभा अत्रे यांनी ११ पुस्तके (एकाच मंचावरून) प्रकाशित करण्याचा जागतिक विक्रम केला आहे. त्यांनी १८ एप्रिल २०१६ रोजी इंडिया हॅबिटॅट सेंटर, नवी दिल्ली येथे हिंदी आणि इंग्रजीमध्ये संगीतावरील ११ पुस्तकांचे प्रकाशन केले.[२]

अत्रे या अग्रगण्य हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिकांपैकी एक म्हणून गणल्या जातात. त्या पं. सुरेशबाबू माने आणि हिराबाई बडोदेकर यांच्या शिष्या आहेत.

भारत सरकारने त्यांना संगीतक्षेत्रातील योगदानाबद्दल १९९० मध्ये "पद्मश्री" आणि २००२ मध्ये "पद्मभूषण" पुरस्काराने सन्मानित केले. हे पुरस्कार भारतातील अनुक्रमे चौथ्या तिसऱ्या क्रमांकाचे पुरस्कार आहेत. २०२२ मध्ये "पद्मविभूषण" देऊन त्यांचा गौरव केला. हा भारतरत्न नंंतर सर्वोच्च नागरी सन्मान आहे.[३][४][५]

पूर्वायुष्य[संपादन]

प्रभा अत्रे यांचा जन्म पुण्यात आबासाहेब व इंदिराबाई अत्रे यांचे पोटी झाला. इंदिराबाई गाणे शिकत असताना त्यापासून प्रेरित होऊन प्रभाताई वयाच्या आठव्या वर्षी शास्त्रीय गायनाकडे वळल्या. हिराबाईंकडे शिकत असताना प्रभाताई त्यांना भारताच्या विविध भागांत होणाऱ्या कार्यक्रमांत साथ करत असत. संगीत शिकत असतानाच त्यांनी विज्ञान व कायदा विषयांत पदवी संपादन केली. नंतर त्यांनी संगीतात डॉक्टरेटही केली.

आबासाहेब अत्रे यांनी पुण्यात रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटी स्थापन करून मुलीसाठी हायस्कूल काढले.

शिक्षण[संपादन]

सांगीतिक कारकीर्द[संपादन]

प्रतिभावंत गायिका, संगीत रचनाकार, लेखिका, प्राध्यापिका व विदुषी म्हणून प्रभा अत्रे यांचा लौकिक आहे. ख्याल गायकीसोबत ठुमरी, दादरा, गझल, उपशास्त्रीय संगीत, नाट्य संगीत, भजन व भावसंगीत गायकीवरही त्यांचे प्रभुत्व आहे. भारतीय शास्त्रीय संगीताचा जगभर प्रसार करण्याचे कामी त्यांचे मोठे योगदान गणले जाते. आपल्या कार्यक्रमांत त्या अनेकदा स्वतः रचलेल्या बंदिशी सादर करतात. त्यांच्या काही रचना, जसे, मारू बिहाग रागातील 'जागू मैं सारी रैना', कलावती रागातील 'तन मन धन', किरवाणी रागातील 'नंद नंदन', ह्या श्रोतृवृंदाच्या विशेष पसंतीच्या रचना आहेत.

प्रभाताईंनी अपूर्व कल्याण, मधुरकंस, पटदीप - मल्हार, तिलंग - भैरव, भीमकली, रवी भैरव यांसारख्या नव्या रागांची रचनाही केली आहे. तसेच किराणा घराण्याच्या गायकीत त्यांनी प्रथमच टप्पा गायनाचा परिचय करवून दिला.

तरुण वयात प्रभाताईंनी संगीत शारदा ,संगीत विद्याहरण, संगीत संशयकल्लोळ, संगीत मृच्छकटिक, बिरज बहू, लिलाव यांसारख्या संगीत नाटकांमध्ये प्रमुख स्त्री भूमिका केल्या. इ.स. १९५५ पासून त्या देशोदेशी आपले गायनाचे कार्यक्रम सादर करत आहेत. भारताच्या व विदेशांतील अनेक ख्यातनाम व महत्त्वपूर्ण संगीत महोत्सवांमध्ये त्यांचे कार्यक्रम सादर झाले आहेत.

ध्वनिमुद्रिकांची यादी[संपादन]

  1. मारू बिहाग, कलावती, खमाज ठुमरी
  2. निरंजनी - १ : पूरिया कल्याण, निरंजनी - २ : शंकरा, बसंत.
  3. अनंत प्रभा - ललित, भिन्न षड्ज, भैरवी ठुमरी.
  4. बागेश्री, खमाज ठुमरी.
  5. जोगकंस, तोडी, ठुमरीयां.
  6. मालकंस, दादरा.
  7. चंद्रकंस.
  8. मधुकंस.
  9. मधुवंती, देसी.
  10. यमन, भैरव.
  11. श्याम कल्याण, बिहाग, रागेश्री ठुमरी.
  12. युनिक एक्सपीरिअन्स वुइथ डॉ. प्रभा अत्रे - लाइट म्युझिक (त्यांच्या गझल रचना, भजने व इ.स. १९७० च्या दरम्यान केलेल्या संगीत कार्यक्रमांचे ध्वनिमुद्रण)

लेखन[संपादन]

डॉ. प्रभा अत्रे यांनी मराठीइंग्लिश भाषेत अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यांचे मराठीतील पहिले पुस्तक 'स्वरमयी' असून त्यात संगीतावर आधारित निबंध व लेख आहेत. ह्या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. स्वरमयी प्रमाणेच त्यांच्या 'सुस्वराली' (१९९२) या दुसऱ्या पुस्तकालाही लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. मध्य प्रदेश शासनाने दोन्ही पुस्तकांचे हिंदी भाषेत अनुवाद प्रसिद्ध केले आहेत. त्यांच्या स्वरांगिणी ( इ.स. १९९४) व स्वररंजनी (इ.स. २००६) या मराठी भाषेतील पुस्तकांत त्यांनी रचलेल्या ५०० शास्त्रीय रागबद्ध रचना व लोकरचना आहेत. (त्यांसोबत ध्वनिमुद्रिका संचाचा समावेश असतो.) त्यांचे पाचवे पुस्तक, 'अंतःस्वर' हा त्यांनी लिहिलेल्या कवितांचा संग्रह आहे. ह्या पुस्तकाचा इंग्रजी भाषेत अनुवाद झाला आहे.

प्रभाताईंची इंग्रजी भाषेतील 'एनलायटनिंग द लिसनर' (इ.स. २०००) व 'अलॉंग द पाथ ऑफ म्युझिक' (इ.स. २००६) ही ध्वनिमुद्रिकांच्या संचासह विक्रीस उपलब्ध असलेली पुस्तके वैश्विक श्रोतृवृंदाला भारतीय संगीत जाणण्यासाठी मदत करतात. याखेरीज प्रभाताईंनी भारतात व परदेशांत संगीत विषयावर अनेक सप्रात्यक्षिक व्याख्याने दिली असून संगीताधारित विषयांवर विविध संशोधनपर लेख सादर केले आहेत.

संगीत क्षेत्रातील कार्य[संपादन]

  • आकाशवाणीच्या संगीत विभागात सहाय्यक निर्मात्या म्हणून त्यांनी काम पाहिलेले आहे.
  • आकाशवाणीच्या मराठी व हिंदी भाषा विभागाच्या 'अ' श्रेणीच्या नाट्य कलाकार.
  • व्यावसायिक संगीत नाट्यांमध्ये प्रमुख स्त्री भूमिका.
  • नेदरलँड्स, स्वित्झरलंड येथील शैक्षणिक संस्थांमध्ये; तसेच कॅलिफोर्निया व कॅलगरी (कॅनडा) येथील विद्यापीठांमध्ये संगीताच्या मानद प्राध्यापिका.
  • महाराष्ट्र सरकारतर्फे संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल प्रभाताईंची 'विशेष कार्यकारी न्यायाधीश'पदी नियुक्ती.
  • मुंबईच्या श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठात प्राध्यापिका व संगीत विभाग प्रमुख म्हणून काम पाहिले.
  • इ.स. १९९२च्या दरम्यान प्रभाताईंनी पंडित सुरेशबाबू माने व हिराबाई बडोदेकर संगीत संमेलन हा वार्षिक संगीत महोत्सव सुरू केला. दरवर्षी डिसेंबर महिन्यात मुंबई येथे हा महोत्सव आयोजित करण्यात येतो.
  • इ.स. १९८१ पासून 'स्वरश्री' ध्वनिमुद्रण कंपनीच्या मुख्य संगीत निर्मात्या व दिग्दर्शिका.
  • केंद्रीय चित्रपट प्रमाण बोर्ड, मुंबई यांच्या सल्लागार समितीत सदस्या, इ.स. १९८४.
  • पुणे येथील 'गानवर्धन' ह्या प्रसिद्ध संगीत संस्थेच्या २२हून अधिक वर्षे अध्यक्षा.

प्रभाताईंनी पुण्यात 'स्वरमयी गुरुकुल' संस्थेची स्थापना केली. ह्या संस्थेद्वारा पारंपरिक गुरू-शिष्य शैलीतील संगीत शिक्षण व समकालीन संगीत शिक्षणाचा मेळ घालण्यात आला आहे. ह्या संस्थेमार्फत, प्रभा अत्रे फाउंडेशनद्वारा अनेक नव्या कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते.

शिष्य[संपादन]

प्रभाताईंच्या शिष्यवर्गात अनेक आकाशवाणी कलाकार, दूरदर्शन कलाकार, पार्श्वगायक, संशोधक, हिंदुस्तानी संगीत गायक इत्यादींचा समावेश होतो. इ.स. १९६९ पासून त्या संगीत अध्यापन करत आहेत. त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये भारतीय व परदेशी कलावंतांचा समावेश असून त्यांच्या १० विद्यार्थ्यांना आज पर्यंत डॉक्टरेट शिष्यवृत्ती मिळाली आहे. त्यांच्या शिष्यवर्गात सरला देसाई, डॉ. आशा पारसनीस - जोशी, रागिणी चक्रवर्ती, पद्मिनी राव, आरती ठाकुर, चेतना बाणावत, अश्विनी मोडक, वीणा कुलकर्णी व अतींद्र सरवडीकर यांचा समावेश आहे.

प्रभा अत्रे यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]

  • अंतःस्वर (मराठी कवितासंग्रह)
  • अलॉंग द पाथ ऑफ म्युझिक (इ.स. २००६, इंग्रजी)
  • एनलायटनिंग द लिसनर (इ.स. २०००, इंग्रजी)
  • स्वरमयी (मराठी आणि हिंदी)
  • स्वररंजनी (इ.स. २००६, मराठी)
  • स्वरांगिणी ( इ.स. १९९४, मराठी)
  • सुस्वराली (१९९२; (मराठी आणि हिंदी)

प्रभाताईंची इंग्रजी भाषेतील ' व '

पुरस्कार[संपादन]

इ.स. २०११ पासून तात्यासाहेब नातू ट्रस्ट व गानवर्धन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने संगीत साधना करणाऱ्यांना प्रभा अत्र्यांच्या नावाचा 'स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे राष्ट्रीय शास्त्रीय संगीत पुरस्कार' प्रदान करण्यास सुरुवात झाली.

बाह्य दुवे[संपादन]


संदर्भ[संपादन]

  1. ^ "This honor of a musical instrument done for so many years Emotions expressed by Dr Prabha Atre | इतकी वर्षे केलेल्या संगीत साधनेचा हा सन्मान; डॉ प्रभा अत्रे यांनी व्यक्त केली भावना | Lokmat.com". LOKMAT. 2022-01-25. 2022-01-26 रोजी पाहिले.
  2. ^ "Who is Prabha Atre? All you need to need to know about the vocalist who has been awarded Padma Vibhushan". Free Press Journal (इंग्रजी भाषेत). 2022-01-26 रोजी पाहिले.
  3. ^ "Padma Awards" (PDF). Archived from the original (PDF) on 2015-10-15. 2022-01-26 रोजी पाहिले.
  4. ^ "Padma awards to vocalist Prabha Atre, Dr Cyrus Poonawalla". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2022-01-25. 2022-01-26 रोजी पाहिले.
  5. ^ "अजून खूप काही करायंच आहे : पद्मविभूषण प्रभा अत्रे | Prabha Atre". eSakal - Marathi Newspaper. 2022-01-26 रोजी पाहिले.