विजय घाटे (तबलावादक)
विजय घाटे | |
---|---|
जन्म |
विजय १७ जुलै, १९६८ महाराष्ट्र |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
नागरिकत्व | भारतीय |
पेशा | तबलावादक |
कारकिर्दीचा काळ | इ.स. १९९० पासून |
मूळ गाव | पुणे |
विजय घाटे (: १८ ऑक्टोबर १९६८, जबलपूर) हे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत पद्धतीमधले तबलावादक आहेत. त्यांना २०१४ मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळाला.
बालपण आणि उमेदीचा काळ
[संपादन]घाटे यांचा जन्म जबलपूर, मध्यप्रदेश येथे झाला. त्यांच्या आईचे नाव विजया आणि वडिलांचे नाव जयंत उर्फ बाळ घाटे आहे. अगदी लहानपणीच त्यांची तालाची आवड लक्षात आल्यामुळे आई वडिलांनी त्यांना तबला वादनाचे शिक्षण देण्यास सुरुवात केली.त्यांनी वयाच्या तिसऱ्या वर्षापासून जबलपूरमध्ये भातखंडे विद्यालयात तबला वादनाचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली. वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी पंडित किरण देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली तबला वादनातील ‘संगीत विशारद’ ही पदवी मिळवली. वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांना केंद्र सरकारची राष्ट्रीय प्रतिभा शिष्यवृती मिळाली. काही वर्षे त्यांनी भोपाळला वास्तव्य केले.वयाच्या सोळाव्या वर्षापासून त्यांनी मुंबईला पंडित सुरेश तळवलकर यांच्याकडे तबला वादनाचे शिक्षण गुरुकुल पद्धतीने घेण्यास सुरुवात केली. सुमारे बारा वर्षे ते तळवलकरांकडे शिकले.[१] तसेच त्यांना पंडित झाकीर हुसेन यांचेही मार्गदर्शन मिळाले.[२]
कारकीर्द
[संपादन]विजय घाटे यांनी याच्या सोळाव्या वर्षापासून एकल तबला वादनाला सुरुवात केली. त्यांनी पुढे पंडित हरिप्रसाद चौरासिया, उस्ताद विलायत खान, कौशिकी चक्रवर्ती, पंडित शिवकुमार शर्मा, पंडित अमजद अली खान, शाहीद परवेझ, पंडित विश्वमोहन भट अशा अनेक हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील गायक वादकांना तसेच बिरजू महाराज आणि नंदकिशोर कपोते या कथक कलाकारांना तबल्याची साथ केली.
घाटे यांनी जाझ गिटारवादक लॅरी कोरीएल, जॉर्ज ड्यूक्स, अल्जेरेयू, रवी कोल्टारीन आणि सॅक्सोफोनवादक जॉर्ज ब्रुक्स यांच्या बरोबरसुद्धा तबला वादन केले आहे. त्यांनी कर्नाटक संगीतातील डॉ. एल. सुब्रमणियम, विद्वान विक्कू विनायकम, एम. एस. गोपालकृष्णन, यू. श्रीनिवास यांच्याबरोबर फ्यूजन संगीताचे कार्यक्रम सादर केले आहेत.
पुण्यात विजय घाटे यांची हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत शिक्षणाच्या प्रसारासाठीची ‘तालचक्र’ अकादमी आहे. या अकादमीत त्यांच्याबरोबर मंजुषा कुलकर्णी आणि शीतल कोळवलकर अध्यापनाचे काम करतात. त्यांनी अन्य काही लोकांच्या सहयोगाने तालचक्र संगीत महोत्सवाला सुरुवात केली. या महोत्सवात तरुण कलाकारांना सादरीकरणाची संधी दिली जाते. विविध प्रकारचे संगीत यामध्ये कलाकार प्रस्तुत करतात.[३] विजय घाटे यांनी कोडार्टस् विद्यापीठ, रॉटरडॅम येथे अभ्यागत प्राध्यापक म्हणून काम केले आहे.
सादरीकरण
[संपादन]घाटे यांनी अनेक महोत्सव तसेच कार्यक्रमात आपल्या कलेचे सादरीकरण केले आहे. त्यापैकी काही:
- भारत -फ्रान्स महोत्सव, पॅरीस (१९८४)
- भारतीय महोत्सव, रशिया (१९८५)
- राष्ट्रपती भवन, नवी दिल्ली
- संसद, नवी दिल्ली
- भारत भवन, भोपाळ
- सवाई गंधर्व संगीत महोत्सव पुणे
- हरिवल्लभ संगीत महोत्सव, जालंधर
- तानसेन समारोह, ग्वाल्हेर
- गुणीदास संमेलन, मुंबई
- उस्ताद अल्लादिया खान संगीत महोत्सव, मुंबई
- कालिदास महोत्सव, नागपूर
- खजुराहो महोत्सव
- विष्णू-दिगंबर संगीत उत्सव, नवी दिल्ली
अल्बम
[संपादन]- द तबला सिरीज (२००५ )
- गोल्डन कीर्तीज (२००३)
- द डिव्हाईन व्हील (२००५)
- समय (२००५)
- किरवाणी- मेसेज ऑफ बर्डस (२००६)
गौरव
[संपादन]विजय घाटे यांना मिळालेल्या पुरस्कारांपैकी काही :
- पंडित जसराज पुरस्कार[४]
- सरस्वतीबाई राणे पुरस्कार
- डॉ. वसंतराव देशपांडे पुरस्कार
- पद्मश्री (२०१४)
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "Taalchakra". taalchakra.com. 2018-08-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-11-08 रोजी पाहिले.
- ^ "तबल्याची साथ पूरक हवी; मारक नको! (विजय घाटे) | eSakal". www.esakal.com. 2019-11-08 रोजी पाहिले.
- ^ "Taalchakra is back for music lovers - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2019-11-08 रोजी पाहिले.
- ^ "Padma awards for Mashelkar, Iyengar, Dabholkar". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2019-11-08 रोजी पाहिले.
बाह्य दुवे
[संपादन]- लोकसत्ता मधील लेख (मराठी मजकूर)
- सकाळ मधील लेख (मराठी मजकूर)