Jump to content

व्हायोलिन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(फिडिल या पानावरून पुनर्निर्देशित)
व्हायोलिन
व्हायोलिनचे वेगवेगळे प्रकार

वर्णन

[संपादन]

व्हायोलिन एक तंतुवाद्य (तारवाद्य) आहे. सर्व रसांमध्ये वाजविले जाणारे 'व्हायोलिन' हे एकमेव वाद्य आहे, असे विख्यात व्हायोलिनवादक मोठ्या आत्मविश्वासाने सांगतात. व्हायोलिनलाच फिडल म्हणतात. भारतात या वाद्याला बेला हे नाव आहे..

चित्रपट, नाटक, शास्त्रीय संगीताची मैफल, लोकगीते यांमध्ये 'व्हायोलिन'चा उपयोग मोठ्या प्रमाणावर केला जातो. चार्ली चापलिन यांच्या सर्व चित्रपटांना व्हायोलिनचा वापर करून पार्श्वसंगीत दिले गेले आहे. मोहब्बते या हिंदी चित्रपटात शाहरुख खानने व्हायोलिनचा उपयोग प्रेमाची वातावरण निर्मिती करण्यासाठी केला आहे. ऋषी कपूर, राज कपूर यांनी देखील आपल्या गीतांमध्ये व्हायोलिन वापरले आहे. आनंद, दुःख, गंभीरता, शांतता, मनाची द्विधावस्था इत्यादी सर्व प्रकारांत व्हायोलिन वाजवून वातावरण निर्मिती केली जाते. साथ-संगतीसाठीही इतर वाद्यांबरोबर व्हायोलिनचे वादन केले जाते.

भारतीय वाद्यसंगीत परंपरेत तंतुवाद्यांना खूप प्राचीन परंपरा आहे. या परंपरेनुसार तंतुवाद्याचे तारा छेडून वाजवावयाची वाद्ये व गजाने वाजवावयाची वाद्ये, असे दोन प्रकार अस्तित्वात आहेत. भारतामध्ये व्हायोलिनची प्राचीन जातकुळी सांगणारी वीणाकुंजू, पुल्सुवन, केंदू, पेना, बेनाम, किन्नरी, रावणहट्टा ही तंतुवाद्ये आहेत, असे मानले जाते. व्हायोलिन हे वाद्य भारतीय नाही. जरी ते परकीय असले, तरी आज देशामध्ये मैफलीच्या मध्यभागी विराजमान झालेले ते वाद्य आहे. वरील वाद्ये व्हायोलिनप्रमाणेच उलटी धरून गजाने वाजविली जातात. या वाद्यांचा वापर अभिजात शास्त्रीय संगीतात आढळत नाही. त्यांचा विशेष वापर लोकसंगीतात होत होता.

इतिहास

[संपादन]

आजच्या व्हायोलिन वाद्याशी मिळते-जुळते पहिले चित्र ९ व्या शतकात आढळते. तेराव्या शतकात युरोपमध्ये प्रचारात आलेले 'व्हिएसे' हे वाद्य व्हायोलिन वाद्याच्या आजच्या स्वरूपाचे जनक मानले जाते. कारण पुढील दोनशे ते अडीचशे वर्षांच्या कालखंडात अनेक प्रकारचे आकार घेत, १७ व्या शतकात आजचे व्हायोलिन युरोपात नावारूपाला आले.

युरोपपासून भारतापर्यंतचा प्रवास करण्यास व्हायोलिनला फारसा काळ लागला नाही. पाश्चात्त्य लोकांमुळेच त्याचा आपल्या देशात प्रसार आणि प्रचार झाला. या वाद्याचा भारतीय संगीतात पहिला प्रवेश दक्षिण भारतातील संगीतामधून झाला. त्यानंतर कर्नाटक संगीतातील वासूस्वामी दीक्षितार, मुत्तुस्वामींचे शिष्य वडिवेसू यांनी त्याचा वापर केला. आज दक्षिण भारतातील कोणताही संगीत प्रकार व्हायोलिनच्या साथसंगतीशिवाय सादर होऊ शकत नाही. महाराष्ट्रात व्हायोलिनला स्वतंत्र स्थान मिळवून देण्याचे श्रेय कै. पंडित गजाननबुवा जोशी यांना जाते. त्यानंतर पंडित व्ही.जी. जोग, प्रभाकर जोग, श्रीमती डॉ. एम. राजम, एम. एस. गोपालकृष्णन, लालगुडी जयरामन इत्यादी श्रेष्ठ व्हायोलिन वादकांनी आपआपल्या वादनांची खास शैल्या निर्माण केल्या आहेत.

कसे वाजवितात

[संपादन]

सारंगी, व्हायोलिन, सनई, बासरी ही वाद्ये गायकी अंगाने वाजविली जातात. गायक गळ्याने गातो, तर वादक बोटाने गातो. गायकाच्या कंठाला (गळ्याला) जे शक्य नाही ते बऱ्याचवेळा वादकाच्या बोटाला शक्य असते. म्हणूनच गायनशैली व वादनशैली यात फरक पडतो. आज व्हायोलिन वादनाच्या मैफलीची एक खास शैली बनू पाहत आहे. रागांची शास्त्रशुद्ध मांडणी, ताल-लय यांचा क्रमबद्ध विकास, याबरोबरच गजकामाच्या कसरती, फिगरिंग बोर्डचा अवांतर वापर, तबल्याबरोबरचे सवाल-जवाब, भन्नाट लयीत पोहोचणारा 'झाल्या'सारखा प्रकार, या सर्व आतषबाजींकडे व्हायोलिनवादनाची मैफल झुकू लागली आहे. भारतातील श्रेष्ठ वादक-कलाकार पंडित व्ही. जी. जोग, उस्ताद बिस्मिल्ला खाँ, पंडित सामता प्रसाद या त्रिकुटाने व्हायोलिन-सनई-तबला या वाद्यांच्या जुगलबंदीने अफाट लोकप्रियता मिळवली होती.

व्हायोलिनचा जो एक मोकळा, दमदार, घुमदार आवाज आहे, तो त्याच्या लाकडी 'बॉडी'मुळे. त्या बॉडीलाच 'ध्वनिपेटिका' असे म्हणतात. हे लाकूड विशिष्ट प्रकारचे असते. आपल्याकडे जसे तंबोऱ्याचे भोपळे पंढरपूर, मिरज या भागातच होतात, तसे व्हायोलिनचे लाकूड युरोपातील विशिष्ट प्रदेशात उपलब्ध होते. म्हणूनच इटालियन व जर्मन बनावटीची व्हायोलिने जगात सर्वोत्तम मानली जातात. या विशिष्ट लाकडापासून बनविलेली व्हायोलिनची ध्वनिपेटिका, त्याचा विशिष्ट आकार, धातूच्या तारा यामुळे व्हायोलिनला विशिष्ट आवाज प्राप्त झाला आहे. तरफांच्या जादा तारा लावताना व्हायोलिनच्या ध्वनिपेटिकेला कडेने खुंट्यांची सोय केली जाते. त्या वेळेस ध्वनिपेटिकेचे लाकूड दाबले जाते व त्यातून बद्ध व दबलेला आवाज येतो.

हे वाद्य जितके मधुर वाजते, तितकेच सुंदर दिसते. याचा नाजूक, आकर्षक, कमनीय आकार व बदामी तुळतुळीत रंग प्रथम दर्शनीच लक्ष वेधून घेतो. केवळ चार तारा सुरांत लावल्या की, मनात योजाल ते संगीत साकार करता येते. या वाद्याला कोठी (बॉडी), त्याला लागून असलेली लांब दांडी आणि गज असे तीन भाग आहेत. कोठीला चार तारा असतात. धातूच्या या तारांची लांबी सारखी असली तरी जाडी कमी-जास्त असते. जाडीवर तारेच्या स्वरांची उंची अवलंबून असते. तारेची लांबी व तिची कोठ्यापासूनची उंची यांचे प्रमाण व्यस्त असते. तार जितकी लांब तितका स्वर ढाला, खर्जातला असतो. तार जितकी आखूड तितका स्वर उंच असतो. लांबीला समान असणाऱ्या व्हायोलिनच्या तारांचा स्वर त्यांच्या जाडीवर अवलंबून असतो.


संदर्भ

[संपादन]