Jump to content

आशा खाडिलकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आशा खाडिलकर
आयुष्य
जन्म ११ जानेवारी इ.स. १९५५
जन्म स्थान सांगली, महाराष्ट्र, भारत
व्यक्तिगत माहिती
धर्म हिंदू
नागरिकत्व भारतीय
देश भारत
भाषा मराठी
पारिवारिक माहिती
जोडीदार श्री. माधव खाडिलकर
अपत्ये पुत्र ओंकार खाडिलकर, कन्या वेदश्री ओक
नातेवाईक जावई आदित्य ओक
संगीत साधना
गुरू श्री. बाळकृष्णबुवा मोहिते,माणिक वर्मा,पं. यशवंतबुवा जोशी, वसंतराव देशपांडे
गायन प्रकार हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत, भजन, अभंग,
संगीत कारकीर्द
पेशा गायकी

आशा खाडिलकर (जन्म : ११ जानेवारी, इ.स. १९५५ - हयात) या हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिका असून शास्त्रीय, उपशास्त्रीय, नाट्यगीतभक्तिगीत गायनासाठी प्रसिद्ध आहेत.

पूर्वायुष्य[संपादन]

इ.स. १९५५ मध्ये महाराष्ट्रातील सांगली येथे आशाताईंचा जन्म झाला. त्यांनी प्रारंभीचे सांगीतिक शिक्षण कै. श्री. बाळकृष्णबुवा मोहिते यांचेकडून घेतले. लहान वयातच त्यांनी संगीत नाटकांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. अवघ्या तेराव्या वर्षी त्यांनी आपल्या गायनाचा पहिला कार्यक्रम सादर केला. इ.स. १९७५ मध्ये लग्नानंतर मुंबईस स्थलांतर केल्यावर आशाताईंनी ख्यातनाम गायिका माणिक वर्मा यांच्याकडे गायनाचे शिक्षण चालू ठेवले. पुढच्या काळात त्या ग्वाल्हेर घराण्याचे समर्थ गायक पं. यशवंतबुवा जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली गायनकलेची आराधना करत होत्या.

सांगीतिक कारकीर्द[संपादन]

आशाताईंनी वेगवेगळ्या संगीत घराण्यांना आपल्या गायनात समाविष्ट करून त्यातून आपले गाणे अधिक कसदार बनविले आहे. किराणा घराणे, ग्वाल्हेर घराणेआग्रा घराणे यांच्या गायन शैलीची अनेक वैशिष्ट्ये आशाताईंच्या गायनात दिसून येतात. त्यांनी पं. यशवंतबुवा जोशी, पंडिता पद्मावती शाळिग्राम, जितेंद्र अभिषेकी, वसंतराव देशपांडे अशा अनेक संगीताचार्यांचे मार्गदर्शन घेतले आहे. आशाताई पारंपरिक मराठी भावगीते, भजने व नाट्यगीतेही तितक्याच प्रभावीपणे सादर करतात. देशोदेशी त्यांचे कार्यक्रम होत असतात.

आशाताईंनी संगीत दिग्दर्शन व संगीत रचनाही केल्या आहेत, तसेच अनेक बंदिशी रचल्या आहेत. 'संगीत आराधना' व 'संगीत कविराज जयदेव' यांसारख्या नव्या काळातील मराठी संगीतिकांचे त्यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे.

जाहीर कार्यक्रमांच्या जोडीला आशाताईंनी वेगवेगळ्या संकल्पनांवर आधारित कार्यक्रम, जसे, 'होली रंग रंगीले', 'सावन - रंग', 'ऋतु-रंग', 'रचनाकार को प्रणाम', सादर केले आहेत.

इ.स. १९९४पासून आपले पती श्री. माधव खाडिलकर यांच्या सहयोगाने आशाताईंनी ठाणे, मुंबई येथे 'उत्तुंग सांस्कृतिक परिवार' नामक सांस्कृतिक संस्था सुरू केली असून तिचा उद्देश संगीत, नृत्य, नाट्य व साहित्य विश्वातील नव्या दमाच्या प्रतिभेला आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आहे. ह्या क्षेत्रांत लक्षणीय कामगिरी करणाऱ्यांसाठी ही संस्था 'उत्तुंग पुरस्कार' जाहीर करते.

संगीत ध्वनिमुद्रिका[संपादन]

एच. एम. व्ही., टिप्स यांसारख्या नामवंत ध्वनिमुद्रण कंपन्यांनी आशाताईंच्या शास्त्रीय तसेच भावसंगीत व भक्तिगीतांच्या ध्वनिमुद्रिका प्रकाशित केल्या आहेत.

पुरस्कार व सन्मान[संपादन]

  • महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागातर्फे उपशास्त्रीय संगीतातील योगदानाबद्दल पुरस्कार
  • 'सह्याद्री' मराठी दूरदर्शन वाहिनीतर्फे 'स्वर-रत्‍न' पुरस्कार
  • माणिक वर्मा पुरस्कार
  • पंडित कुमार गंधर्व पुरस्कार
  • कै. श्रीमती हिराबाई बडोदेकरांच्या हस्ते 'नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार'
  • महाराष्ट्र शासनातर्फे मराठी नाट्य-विश्वातील सर्वोत्कृष्ट संगीत रचनाकार पुरस्कार
  • जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनातर्फे सन्मान
  • सांगीतिक क्षेत्रात एकूणपन्‍नास वर्षे पूर्ण केल्याबद्दल पुण्यातील सांस्कृतिक कला अकादमीकडून सत्कार (जानेवारी२०१७)