बलवंत संगीत मंडळी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बलवंत संगीत मंडळी (१८१८ ते १९३३) ही दीनानाथ मंगेशकर यांची नाट्यसंस्था तात्यासाहेब परांजपे यांच्यासारख्या गुणज्ञ धनवंताच्या प्रेरणेने व सक्रिय सहकार्याने मुंबईच्या बोरीवली उपनगरात१८ जानेवारी १९१८ रोजी स्थापन झाली.

बलवंत संगीत मंडळीचा पहिला मुक्काम तात्यासाहेब परांजपे यांच्या ग्रॅंट रोडवरील पन्‍नालाल टेरेस या राहत्या जागेत होता. महिन्याभरात्च कंपनीची जुळवाजुळव झाल्यावर बोरीवलीत दाजीबा दांडेकर यांच्या बंगल्यात कंपनीने मुक्काम हलवला. मराठी रंगभूमीचे शिल्पकार बलवंत पांडुरंग किर्लोस्कर तथा अण्णासाहेब किर्लोस्कर आणि लोकमान्य बलवंत ऊर्फ बाळ गंगाधर टिळक यांना मानाचा मुजरा करण्याच्या उद्देशाने या नाटक मंडळीचे नाव बलवंत संगीत मंडळी ठेवण्यात आले. हे नाव राम गणेश गडकरी यांनी सुचवले.

बलवंत संगीत मंडळीचा पडदा[संपादन]

ज्या नाट्यगृहात बलवंत संगीत मंडळीच्या नाटकाचा प्रयोग होणार असेल त्या नाट्यगृहाच्या मंचाला कंपनीचा पडदा लावला जाई. हा दर्शनी पडदा हेतुनिदर्शक होता. पडद्याच्या वरच्या बाजूला अण्णासाहेब किर्लोस्कर यांची रेखांकित प्रतिमा होती, तर पडद्याच्या खालच्या बाजूवर लक्ष्मी आणि सरस्वती या येथे एकत्र नांदत आहेत आणि त्या दोघींची आमच्यावर सदैव कृपा राहो; सर्वांवर येणारी संकटे दूर करून सर्वांचे भले होवो; सर्वांच्या कामना पूर्ण होऊन सर्वजण नित्य आनंदात राहोत, अशा अर्थाचे दोन संस्कृत श्लोक लिहिलेले होते. हे श्लोक राम गणेश गडकरी यांनी सुचविले होते. श्लोक असे होते :-

परस्परविरोधिन्योरेकसंश्रय दुर्लभम्‌।
संगतं श्रीसरस्वत्योर्भूतयेऽस्तु सदा सताम्‌॥१॥
सर्वस्तरतु दुर्गाणि सर्वोभद्राणि पश्यतु।
सर्वः कामनावाप्नोतु सर्वः सर्वत्र नन्दतु॥२॥

बलवंतचे कर्मचारी[संपादन]

सुरुवातीला ‘बलवंत’मध्ये जेमेतेम ३० माणसे होती. पुढे वाढत वाढत ही संख्या ८०-९०वर पोहोचली. नट मंडळीत कृष्णराव कोल्हापुरे, बालनट गणू मोहिते, चिंतामणराव कोल्हटकर, मास्टर दीनानाथ, परशुराम सामंत, विसूभाऊ भडकमकर, शंकरराव मोहिते, सदाशिव नेवरेकर हे आणि इतर होते.

नाटकाचा पहिला प्रयोग[संपादन]

मुंबईत २९-३-१९१८ रोजी बॅरिस्टर मुकुंदराव जयकर यांच्या अध्यक्षतेखाली बलवंत संगीत मंडळींच्या पहिल्या नाटकाचा - ‘संगीत शाकुंतल’चा - पडदा उघडला. शकुंतलेच्या भूमिकेत दीनानाथ मंगेशकर होते.

बलवंतची पुढची नाटके[संपादन]

उग्रकंगल, एकच प्याला, कॉंटो में फूल, गैरसमज, चौदावे रत्‍न (त्राटिका), जन्मरहस्य, ताज-ए-वफा (उर्दू), धरम का चॉंद, पुण्यप्रभाव, ब्रह्मकुमारी, भावबंधन, मानापमान, हिंदी मानापमान, मूकनायक, मृच्छकटिक, रणदुंदुभी, राजसंन्यास, विद्याहरण, वीर विडंबन, वेड्यांचा बाजार, सौभद्र, शारदा, संन्यस्त खड्ग, इत्यादी.

बलवंतला लाभलेल्या नाटककारांमध्ये आनंदप्रसाद कपूर, अण्णासाहेब किर्लोस्कर, न.चिं. केळकर, वा.बा. केळकर, अच्युत बळवंत कोल्हटकर, चिंतामणराव कोल्हटकर, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, वासुदेवशास्त्री खरे, वि.सी. गुर्जरराम गणेश गडकरी, वीर वामनराव जोशी, शेषराव पीलखाने, मुन्शी इस्माईल फरोग, विश्राम बेडेकर, रघुनाथराव दर्द, मो.आ. वैद्य, स्वातंत्र्यवीर सावरकर असे प्रथम श्रेणीचे नाटककार होते.

संगीत ब्रह्मकुमारी हे बलवंत संगीत मंडळींचे शेवटचे नाटक. १९३३ सालच्या दिवाळीत सोलापूरला या नाटकाचा शेवटचा प्रगोग झाला आणि बलवंत संगीत मंडळी बंद झाली. तिचे रूपांतर चित्रपटनिर्मिती करणाऱ्या ‘बलवंत पिक्चर्स’मध्ये झाले.

बलवंत पिक्चर्सने अंधेरी दुनिया, कृष्णार्जुन युद्ध आणि भक्त पुंडलिक हे तीन चित्रपट बनवले आणि तीही कंपनी बंद झाली.