शरद साठे
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
शरद साठे | |
---|---|
आयुष्य | |
जन्म | १८ फेब्रुवारी, इ.स. १९३२ |
जन्म स्थान | भारत |
मृत्यू | १७ एप्रिल २०१९ |
मृत्यू स्थान | पुणे |
मृत्यूचे कारण | वार्धक्य |
व्यक्तिगत माहिती | |
धर्म | हिंदू |
नागरिकत्व | भारतीय |
देश | ![]() |
भाषा | मराठी |
संगीत साधना | |
गायन प्रकार | गायन |
घराणे | ग्वाल्हेर घराणे |
संगीत कारकीर्द | |
पेशा | गायकी |
पं. शरद साठे (१८ फेब्रुवारी, इ.स. १९३२ - १७ एप्रिल २०१९) हे मराठी, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायक आहेत. ते ग्वाल्हेर घराण्याच्या शैलीत गायन करतात.
पूर्वायुष्य[संपादन]
शरद साठे यांनी इ.स. १९४९ मध्ये पं. दत्तात्रेय विष्णू पलुसकर यांच्याकडे गुरू-शिष्य परंपरेत संगीत शिकण्यास सुरुवात केली. पलुसकरांबरोबर अनेक संगीत कार्यक्रमांत भाग घेण्याच्या संधीसोबत त्यांना आपल्या गुरूंसमवेत भरपूर प्रवास करायला मिळाला.
पलुसकरांचे इ.स. १९५५ मध्ये अकाली निधन झाले. शरद साठ्यांनी तेव्हा गुरूच्या शोधात इ.स. १९५६ मध्ये मुंबई गाठली व संगीतज्ञ प्राध्यापक बी. आर. देवधर यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास दहा वर्षे संगीत साधना केली. त्यांना भारत सरकारची शिष्यवृत्ती मिळाली. इ.स. १९६१ मध्ये शरद साठे गंधर्व महाविद्यालय मंडळातून संगीत विशारद झाले. प्राध्यापक देवधरांकडून त्यांना अनेक अप्रचलित रागांमधील विविध रचना शिकायला मिळाल्या.
इ.स. १९६६ नंतर त्यांनी ग्वाल्हेर घराण्याचे गायक पं. शरदचंद्र अरोलकर यांचे शिष्यत्व पत्करले. त्यांच्याकडे साठ्यांना ग्वाल्हेर घराण्यातील अनेक दुर्मिळ ख्याल रचना, टप्पे व तराण्यांचे ज्ञान मिळाले.
सांगीतिक कारकीर्द[संपादन]
पं. शरद साठे हे आकाशवाणीवर तसेच दूरचित्र वाहिन्यांवर नियमित स्वरूपात गायन कार्यक्रम करत. त्यांनी कित्येक संगीत परिषदा व संगीतोत्सवांमध्ये भाग घेतला. इ.स. १९७२ मध्ये फिल्म्स डिव्हिजन ने पं. विष्णू दिगंबर पलुसकरांवर काढलेल्या माहितीपटासाठी गाण्याचा विशेष सन्मान त्यांना लाभला.
इ.स. १९८५ मध्ये संगीत कार्यक्रमांसाठी शर साठे यांनी अमेरिकेचा दौरा केला. इ.स. १९८६-८७ चे दरम्यान त्यांनी भारतीय विद्या भवन संस्थेच्या लंडन येथील केंद्रात गायनकलेचे निवासी प्राध्यापक म्हणून काम पाहिले. त्यांनी टप्पा विषय शिकविला व काही भारतीय विद्यापीठांमध्ये परीक्षक म्हणून काम पाहिले. इ.स. १९८९, १९९३, १९९७ व २००८ मध्ये त्यांनी इंग्लंड येथे व इ.स. १९९३ मध्ये दुबई, बहरीन येथे संगीत दौरे केले.
कोलकाता येथील संगीत संशोधन अकादमी व मुंबईच्या नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स या संस्थेने आपल्या अभिलेखागार विभागासाठी पं. शरद साठे यांचे ध्वनिमुद्रण करवून घेतले आहे. इ.स. १९९७ मध्ये अमेरिकेतील सिअॅटलमधील वॉशिंग्टन विद्यापीठात ग्वाल्हेर घराण्याच्या बंदिशींचे अभिलेखागार विभागासाठी ध्वनिमुद्रण करण्यासाठीही त्यांना आमंत्रित करण्यात आले होते. स्वरश्री, मॅग्नासाउन्ड व म्युझिशियन्स् गिल्ड यांसारख्या ध्वनिमुद्रण कंपन्यांनी त्यांच्या ध्वनिमुद्रिका प्रकाशित केल्या आहेत.
पं. शरद साठे हे मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राचे अध्यक्ष होते. त्यांनी पुणे विद्यापीठातून विज्ञान शाखेची पदवीही संपादन केली आहे.
पुरस्कार व सन्मान[संपादन]
इ.स. २००६ मध्ये आय. टी. सी. संगीत संशोधन अकादमीने त्यांचा हिंदुस्तानी गायन संगीताच्या क्षेत्रातील योगदानाबद्दल सन्मान केला. इ.स. २००९ मध्ये त्यांना पंडित विनायकराव पटवर्धन स्मृति गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. आकाशवाणी व दूरचित्रवाणीचे उच्च श्रेणी कलावंत. संगीत रत्न, काशी संगीत समाज, २००७.
ध्वनिमुद्रिकांची यादी[संपादन]
स्वरश्री
मॅग्नासाऊंड
म्युझिशियन्स गिल्ड
- देवगिरी बिलावल, बिलावल, परज, ठुमरी
- मालकंस, यमन, खमाज (टप्पा).
- गुजरी तोडी, बागेश्री कानडा, भजन.
द क्विन्टासन्स ऑफ अ म्युझिकल ट्रेडिशन
- भाग १ : ललित, खमाज (टप्पा), यमन
- भाग २ : छायानट, बिहागडा, भजन (सूरदास)
- भाग ३ : कौशी कानडा, जौनपुरी, भजन - तुलसीदास.
- भाग ४ : गंधारी, मियां की सारंग, भैरवी (ठुमरी), भजन (सूरदास).