Jump to content

दिनकर कैकिणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दिनकर कैकिणी
आयुष्य
जन्म ऑक्टोबर २, इ.स. १९२७
जन्म स्थान भारत
मृत्यू जानेवारी २३, इ.स. २०१०
व्यक्तिगत माहिती
धर्म हिंदू
नागरिकत्व भारतीय
देश भारत ध्वज भारत
भाषा मराठी
पारिवारिक माहिती
जोडीदार शशिकला
अपत्ये योगेश साम्सी
आदिती कैकिणी उपाध्या
संगीत साधना
गुरू पं. के. नागेश राव
पं. ओंकारनाथ ठाकूर
पं. विष्णू नारायण भातखंडे
पं. श्रीकृष्ण नारायण रातंजनकर
एस. सी. आर. भट्ट
चिदानंद नगरकर
के. जी. गिंडे
गायन प्रकार हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत
संगीत कारकीर्द
पेशा गायकी
गौरव
पुरस्कार संगीत नाटक अकादमी पुरस्कार
तानसेन पुरस्कार, इ.स. २००३
संगीत रत्न (स्वर साधना समिती, मुंबई) शारंगदेव पुरस्कार (सूर सिंगार संसद)
आय टी सी पुरस्कार

पं. दिनकर कैकिणी (ऑक्टोबर २, इ.स. १९२७ - जानेवारी २३, इ.स. २०१०) हे हिदुस्तानी संगीतातील भारतीय गायक होते. ते आग्रा घराण्याचे गायक होते. त्यांच्या गायकीत ग्वाल्हेर घराणेआग्रा घराणे या दोन्हींचा उत्तम संगम दिसून येतो.

पूर्वायुष्य

[संपादन]

वयाच्या सातव्या वर्षी दिनकर कैकिणी यांनी एका संगीत सोहळ्यात उस्ताद अल्लादिया खान, उस्ताद फैय्याज खान व उस्ताद अब्दुल करीम खॉं या तीन संगीत दिग्गजांचे गाणे ऐकले. उस्ताद फैय्याज खानांचे गाणे ऐकल्यावर ते इतके प्रभावित झाले की त्यांनी तिथेच संगीत कलेची साधना करण्याचा व फैय्याज खानांच्या गायनशैलीला आत्मसात करण्याचा निश्चय केला.

त्यांचे प्रथम संगीत गुरू पतियाळा घराण्याचे पं. के. नागेश राव हे होते. त्यानंतर त्यांनी दोन वर्षे ग्वाल्हेर घराण्याच्या पं. ओंकारनाथ ठाकूर यांच्याकडे संगीत शिक्षण घेतले. वयाच्या अकराव्या वर्षी त्यांनी लखनौच्या मॉरिस कॉलेजात (भातखंडे संगीत संस्थान विश्व विद्यालयात) प्रवेश घेतला. तिथे त्यांना पं. विष्णू नारायण भातखंडे व उस्ताद फैय्याज खान यांचे शिष्य पं. श्रीकृष्ण नारायण रातंजनकर यांच्याकडून संगीताची तालीम मिळाली. ह्या अतिशय कठीण प्रशिक्षणात एस. सी. आर. भट्ट, चिदानंद नगरकर, के. जी. गिंडे यांसारख्या आपल्या अन्य सहाध्यायांबरोबर कैकिणींनी संगीताचा कसून अभ्यास केला. त्याचा परिणाम म्हणूनच की काय, इ.स. १९४३ मध्ये त्यांना संगीतातील पदवीसोबत ख्याल गायनासाठी मानाचे समजले जाणारे भातखंडे सुवर्णपदक प्राप्त झाले.

सांगीतिक कारकीर्द

[संपादन]

त्यांनी इ.स. १९४६ साली आपले संगीत कार्यक्रम करण्यास सुरुवात केली. एक गायक व संगीत प्रशिक्षक म्हणून त्यांनी देशोदेशींचे दौरे केले. संगीत क्षेत्रात त्यांनी अनेक मानाची पदे भूषविली. इ.स. १९५४ सालापासून त्यांनी आकाशवाणीवर सुरुवातीस रचनाकार व नंतर निर्माता म्हणून काम पाहिले. ते भारताच्या सूचना व प्रसारण मंत्रालयाच्या प्रबंध विभागाचे सहायक संचालक होते. त्यानंतर ते दीर्घ काळासाठी मुंबई येथील भारतीय विद्या भवनच्या संगीत व नृत्य शिक्षापीठाचे प्राचार्य पदी नियुक्त होते. अनेक वेगवेगळ्या समित्यांमध्ये त्यांचा समावेश होता, तसेच विविध परीक्षा मंडळांतही त्यांचा सहभाग होता.

इ.स. १९७४ साली भारत सरकारतर्फे त्यांना युगोस्लाव्हिया आणि पूर्व जर्मनी येथे पारंपरिक भारतीय संगीत या विषयाचे अभ्यासक म्हणून पाठवण्यात आले होते. तेथील विद्यापीठांमध्ये तसेच सांस्कृतिक केंद्रांमध्ये त्यांनी आपली कला सादर करण्याबरोबरच व्याख्यानेही दिली होती.

कैकिणींनी ख्याल, ध्रुपद, धमार, ठुमरीभजन शैलींत शेकडो नवीन रचना केल्या व अनेक नवे राग बांधले. त्यांनी समूह गायनासाठीही विविध रचना बांधल्या, 'मीरा' (इ.स. १९७९) या चित्रपटात पार्श्वगायन केले, तसेच पंडित रविशंकर यांच्या सहयोगाने 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' ह्या बॅले नृत्यनाटिकेला संगीत दिले.

त्यांनी बंदिशींवर 'रागरंग' नावाचे पुस्तकही लिहिले आहे. स्वरचित राग आणि बंदिशींवरील त्यांच्या ध्वनिमुदिकाही प्रकाशित झाल्या आहेत. संजीवनी भेलांडे, आरती अंकलीकर-टिकेकर, उदित नारायण, निषाद बाक्रे, सुधींद भौमिक यांसारखे शिष्य त्यांनी घडवले आहेत. गायक, संगीतकार आणि गुरू अशा वेगवेगळ्या भूमिका त्यांनी पार पाडल्या.

वैयक्तिक जीवन

[संपादन]

कैकिणींचे सर्व कुटुंब संगीत साधनेत आहे. त्यांच्या पत्नी शशिकला ह्या नभोवाणी गायिका होत्या व भवन्स संगीत व नृत्य महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका पदावरून निवृत्त झाल्या. त्यांचे धाकटे पुत्र योगेश साम्सी हे नामवंत तबला वादक असून त्यांच्या कन्या आदिती कैकिणी उपाध्या या शास्त्रीय संगीत गायिका आहेत.

पुरस्कार व सन्मान

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]
  • "दिनकर कैकिणींना श्रद्धांजली" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  • "श्रद्धांजली लेख" (इंग्लिश भाषेत). 2010-01-31 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-05-18 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  • "आदिती कैकिणी उपाध्या यांचे संकेतस्थळ" (इंग्लिश भाषेत). 2011-04-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-05-18 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)