किशोरी आमोणकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
किशोरी आमोणकर

किशोरी आमोणकर
उपाख्य संगीत सम्राज्ञी
आयुष्य
जन्म १० एप्रिल १९३१ (1931-04-10)
जन्म स्थान मुंबई
मृत्यू ३ एप्रिल, २०१७ (वय ८५)
मृत्यू स्थान मुंबई
व्यक्तिगत माहिती
धर्म हिंदू
नागरिकत्व भारतीय
देश भारत ध्वज भारत
भाषा मराठी
पारिवारिक माहिती
आई मोगूबाई कुर्डीकर
वडील माधवदास भाटिया
जोडीदार रवी आमोणकर
संगीत साधना
प्रशिक्षण संस्था एलफिन्स्टन कॉलेज
गुरू मोगूबाई कुर्डीकर
गायन प्रकार हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत
घराणे जयपूर घराणे
गौरव
गौरव संगीत नाटक अकादमी फेलोशिप, इ.स. २००९
पुरस्कार संगीत नाटक अकादमी पुरस्कार, इ.स. १९८५, पद्मभूषण पुरस्कार, इ.स. १९८७, संगीत सम्राज्ञी पुरस्कार, इ.स. १९९७, पद्मविभूषण पुरस्कार, इ.स. २००२, संगीत संशोधन अकादमी पुरस्कार, इ.स. २००२

किशोरी आमोणकर या (एप्रिल १०, इ.स. १९३१ - एप्रिल ३, इ.स. २०१७) ह्या हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिका होत्या. त्या जयपूर घराण्याच्या शैलीत गायन करत असत. त्या एक श्रेष्ठ गायिका होत्या व आदराने त्यांना 'गानसरस्वती' असे संबोधले जात असे.

पूर्वायुष्य[संपादन]

किशोरीताईंचा जन्म मुंबई येथे इ.स. १९३१ मध्ये झाला. त्यांच्या आई म्हणजे प्रख्यात गायिका मोगूबाई कुर्डीकर व वडील माधवदास भाटिया. किशोरीताईंनी आपल्या आईकडून संगीताचे ज्ञान तर घेतलेच, शिवाय विविध संगीत घराण्यांच्या गुरूंकडूनही मार्गदर्शन घेतले. त्या मुंबईच्या एलफिन्स्टन कॉलेजमध्ये शिकल्या. त्यांचे पती रवी आमोणकर हे अध्यापन क्षेत्रात होते. इ.स. १९९२ मध्ये त्यांचे निधन झाले. किशोरीताईंना दोन मुले आहेत. त्या श्री राघवेंद्र स्वामींच्या भक्त होत्या.

सांगितिक कारकीर्द[संपादन]

किशोरीताईंनी इ.स. १९५०चे दरम्यान आपल्या व्यावसायिक कारकिर्दीस प्रारंभ केला. हिंदी चित्रपट 'गीत गाया पत्थरोंने' (इ.स. १९६४) साठी त्यांनी पार्श्वगायन केले आहे. इ.स. १९९१ मध्ये प्रसारित झालेल्या 'दृष्टी' ह्या हिंदी चित्रपटाचे संगीत दिग्दर्शनही त्यांनी केले आहे. किशोरीताई त्यांच्या शास्त्रीय तसेच उपशास्त्रीय गायनासाठी प्रसिद्ध आहेत. ख्याल गायकी बरोबरच त्या ठुमरी, भजन इत्यादी गायन प्रकारांना प्रभावीपणे सादर करतात. कंठसंगीतावर वर्षानुवर्षे कठोर परिश्रम, सराव आणि अंगभूत प्रतिभेमुळे किशोरीताईंचे गाणे कसदार होते व रसिकांच्या हृदयाचा ठाव घेते. त्यांनी आजवर देशोदेशी आपले संगीत कार्यक्रम केले असून भारतातील प्रमुख संगीत महोत्सवांत त्यांना आपली कला सादर करण्यासाठी सन्मानपूर्वक बोलावले जाते. त्यांनी 'स्वरार्थरमणी - रागरससिद्धान्त' हा संगीतशास्त्रावरील ग्रंथ लिहिला आहे. शास्त्रीय संगीतातील भावप्रधान गायकीचा प्रकार त्यांनी पुनरुज्जीवित केला असे मानले जाते.

किशोरीताईंच्या सांगीतिक कारकिर्दीवर अमोल पालेकर आणि संध्या गोखले यांनी भिन्न षड्ज हा माहितीपट दिग्दर्शित केला आहे.

किशोरी अमोणकर यांना ’गानसरस्वती” या उपाधीने ओळखले जाते.

शिष्य[संपादन]

देवकी पंडित, माणिक भिडे, पद्मा तळवलकर, अरुण द्रविड, सुहासिनी मुळगांवकर, रघुनंदन पणशीकर, मीरा पणशीकर, मीना जोशी, नंदिनी बेडेकर, विद्या भागवत, माया उपाध्याय, किशोरीताईंची नात तेजश्री आमोणकर, व्हायोलिन वादक मिलिंद रायकर यांसह अनेक कलावंत किशोरीताईंच्या शिष्यवर्गांत मोडतात.

पुरस्कार व सन्मान[संपादन]

गानसरस्वती किशोरी अमोणकर यांच्या नावाचे पुरस्कार[संपादन]

दरवर्षी नाट्यसंपदा प्रतिष्ठानतर्फे किशोरी अमोणकर यांच्या नावाचे पुरस्कार दिले जातात. हा पुरस्कार मिळालेले कलावंत :-

  • भीमसेन जोशी यांना अनेक वर्षे टाळवादनाची साथ करणारे माऊली टाकळकर यांना (२०१८)

ध्वनिमुद्रिकांची यादी[संपादन]

  • राग
  • मल्हार मालिका
  • म्हारो प्रणाम
  • घट घट में पंछी बोलता
  • प्रभात
  • समर्पण
  • संप्रदाय
  • बॉर्न टु सिंग
  • लाइव्ह इन लंडन

बाह्य दुवे[संपादन]