पुणे जिल्हा
पुणे जिल्हा पुणे जिल्हा | |
महाराष्ट्र राज्यातील जिल्हा | |
महाराष्ट्र मधील स्थान | |
देश | भारत |
राज्य | महाराष्ट्र |
विभागाचे नाव | पुणे विभाग |
मुख्यालय | पुणे |
तालुके | १ आंबेगाव २ इंदापूर ३ खेड ४ जुन्नर ५ दौंड ६ पुणे शहर ७ पुरंदर ८ बारामती ९ भोर १० मावळ ११ मुळशी १२ राजगड १३ शिरूर १४ हवेली |
क्षेत्रफळ | |
- एकूण | १५,६४२ चौरस किमी (६,०३९ चौ. मैल) |
लोकसंख्या | |
-एकूण | ९९,२४,२२४ (२००१) |
-लोकसंख्या घनता | ४६१.८५ प्रति चौरस किमी (१,१९६.२ /चौ. मैल) |
-साक्षरता दर | ८०.७८ |
-लिंग गुणोत्तर | १.०८ ♂/♀ |
-खासदार | सुप्रिया सुळे, मुरलीधर मोहोळ, श्रीरंग बारणे, अमोल कोल्हे, |
पर्जन्य | |
-वार्षिक पर्जन्यमान | ६५० मिलीमीटर (२६ इंच) |
प्रमुख_शहरे | पुणे,पिंपरी चिंचवड,सासवड,जेजुरी,बारामती |
संकेतस्थळ |
पुणे जिल्हा हा पश्चिम महाराष्ट्रातील एक प्रगत जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे.[१] पुणे जिल्ह्यासंदर्भात एक म्हण ''पुणे तिथे काय उणे '' प्रचलित आहे . महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र विभागात असलेल्या ह्या जिल्ह्याला मोठा इतिहास आहे. पुणे शहर हे महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. पुणे जिल्ह्याच्या वायव्येला ठाणे जिल्हा, पश्चिमेस रायगड जिल्हा, दक्षिणेस सातारा जिल्हा, आग्नेयेस सोलापूर जिल्हा तर ईशान्य व पूर्वेस अहमदनगर जिल्हा आहे.
शिक्षण
[संपादन]पुणे शहरातील पुणे विद्यापीठ हे जगप्रसिद्ध असून पुण्यास "पूर्वेचे ऑक्सफर्ड" असेही म्हणतात.त्याचबरोबर गोखले अर्थशास्त्र व राज्यशास्त्र संस्था,डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था ही स्वायत्त विद्यापीठे आहेत. पुणे विद्यापीठाचे नामकरण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ केले आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये जगातील सर्व देशांचे विद्यार्थी संशोधन व डिग्री घेणेसाठी प्रवेश घेत असतात .त्यामुळे पुणे शहरास विद्येचे माहेर घर म्हणतात . बरेचसे क्रांतिकारक तसेच स्वातंत्र्य सेनानी येथे जन्माला आले .कित्येक चळवळी येथे जन्माला आल्या .येथे थोर संत जन्मले . छत्रपती शिवाजी महाराज ,छत्रपती संभाजी महाराज यांची जन्म ठिकाण पुणे जिल्ह्यातील अनुक्रमे जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर ,व पुरंदर किल्ल्यावर झाला .[२]
विशेष
[संपादन]अखिल विश्वासाठी पसायदान मागणाऱ्या व श्रीकृष्णाने सांगितलेली गीता प्राकृत भाषेत सोपी करून सांगणाऱ्याया संत ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी पुणे जिल्ह्यात आहे. साध्या-सरळ मराठी माणसाला अध्यात्म आणि जीवनविषयक तत्त्वज्ञान गाथेतील अभंगांच्या माध्यमातून अतिशय सुगम भाषेत सांगणाऱ्या संत तुकारामांची, पुणे जिल्हा ही जन्मभूमी व कर्मभूमी होती. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता.
संत ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी आणि संत तुकाराम महाराजांचा जन्म व त्यांची साधना यांमुळे पुणे जिल्हा, हा महाराष्ट्रासाठी आध्यात्मिक दृष्टिकोनातून एक सात्त्विक व पवित्र ऊर्जा केंद्रच आहे. दर आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी ज्ञानोबा-तुकारामाच्या नावांच्या पालख्या लाखो वारकऱ्यांसह ह्याच जिल्ह्यातील देहू-आळंदीतून प्रस्थान करतात.
शिवाजी महाराजांच्या काळापासून पुण्याचे स्थान महाराष्ट्रात नेहमीच महत्त्वाचे राहिले आहे. केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला दिशा देणाऱ्या अनेक संस्थांची व व्यक्तींची खाण म्हणजे पुणे. पुणे हे संस्कृतीचे व शिक्षणाचे माहेरघर समजले जाते. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या शहरात व जिल्ह्यात उद्योगांचा पायाही तेवढाच भक्कम आहे. एवढेच नव्हे तर पुणे हे लष्करीदृष्ट्याही महत्त्वाचे केंद्र आहे.
पुणे तिथे काय उणे असे गमतीने किंवा उपरोधानेही म्हणले जाते. परंतु पुणे शहराचा व जिल्ह्याचा सर्वांगीण विकास पाहता ते खरेच असल्याचे दिसून येते. प्रामुख्याने शिक्षणाचे, माहिती तंत्रज्ञान व अन्य उद्योगांचे देशातील मुख्य केंद्र म्हणून पुणे जिल्हा हा जोमाने वाटचाल करत आहे. पुणे शहरातील विविध स्वयंसेवी संस्था प्रसिद्ध आहे.
ऐतिहासिक महत्त्वाचे
[संपादन]हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व स्वराज्याचा अभिमान सर्वसामान्य मराठी माणसांत जागृत करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यातील महत्त्वाचा काळ पुणे शहरात (व जिल्ह्यातही) व्यतीत केला होता. फाल्गुन वद्य तृतीया, इ.स. १६३० (संदर्भ : शहर पुणे, खंड-२ , पृष्ठ ५७६) या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जिल्ह्यातील जुन्नर येथील शिवनेरी किल्ल्यावर झाला. इ.स. १६४१ पासून शिवाजी महाराज व जिजाबाई यांचे वास्तव्य अधिक काळ पुण्यात होते. खेड शिवापूर येथे व पुण्यातील लाल महाल येथे शिवाजी महाराजांचे बालपण गेले. इ.स. १६४५ मध्ये महाराजांनी तोरणा (तालुका- वेल्हा) किल्ला जिंकून स्वराज्य स्थापनेचा शुभारंभ केला. १६४५ ते १६४८ या काळात तोरण्यासह पुणे जिल्ह्यातील कोंढाणा, राजगड व पुरंदर हेही गड छत्रपतींनी हस्तगत केले. पुणे शहरासह सध्याच्या पुणे जिल्ह्यातील जुन्नर, पुरंदर, भोर, मावळ, मुळशी व राजगड हे तालुके शिवकालीन इतिहासात महत्त्वाचे होते. अखिल विश्वासाठी पसायदान मागणाऱ्या व श्रीकृष्णाने सांगितलेली गीता प्राकृत भाषेत सोपी करून सांगणाऱ्याया संत ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी पुणे जिल्ह्यात आहे. साध्या-सरळ मराठी माणसाला अध्यात्म आणि जीवनविषयक तत्त्वज्ञान गाथेतील अभंगांच्या माध्यमातून अतिशय सुगम भाषेत सांगणाऱ्या संत तुकारामांची, पुणे जिल्हा ही जन्मभूमी व कर्मभूमी होती. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता.
वानवडी येथे श्रीमंत सरकार महादजी शिंदे महाराज यांची शिंदे छत्री आहे. अतिशय सुंदर वास्तु कलेमध्ये ही वास्तू गणली जाते. पुणे आणि पेशवाई यांचा संबंध अतूट आहे. पेशवाईचे संस्थापक बाळाजी विश्वनाथ यांचे पुत्र थोरले बाजीराव पेशवे यांच्या काळात पेशव्यांचा पुण्याशी प्रत्यक्ष संबंध आला. बाजीराव पेशव्यांच्या १७२० ते १७४० या काळातील उज्ज्वल कारकिर्दीचे केंद्र पुणे हेच होते. बाजीरावांनी पुण्यात १७३१ मध्ये शनिवारवाडा ही भव्य, सुसज्ज, किल्लासदृश वास्तू बांधून पुण्याच्या वैभवात भर टाकली. शिवाजी राजाने महाराष्ट्राची, तर बाजीरावाने बृहन्महाराष्ट्राची निर्मिती केली, असे वंग इतिहासकार यदुनाथ सरकार म्हणतात.
थोरले बाजीराव पेशवे यांचे पुत्र नानासाहेब पेशवे यांच्या काळात (इ.स.१७४०-१७६१- कारकीर्द) पुणे हे महाराष्ट्राचेच नव्हे तर हिंदुस्थानचे सत्ता केंद्र बनले. नानासाहेबांनी पुण्याचा सर्वांगीण विस्तार व विकास केला आणि शहराची व मराठी राज्याची आर्थिक घडी नीट बसवली. पुण्याच्या सुशोभीकरणाकडे लक्ष दिले, पर्वती देवस्थान व सारसबागेची निर्मिती केली. पेठा वसवल्या, हौद, वाडे, मंदिरे, रस्ते यांचा विकास केला. कात्रज तलावातून पुणे शहरासाठी पाणी आणले. (काही इतिहासकारांच्या मते पाणी पुरवठ्याचे काम बाजीरावांनी केले.) पेशवाईतील मुत्सद्दी राजकारणी नाना फडणवीस यांचे योगदानही पुण्याच्या संदर्भात उल्लेखनीय आहे. १७७४ ते १७९५ या काळात नाना फडणवीसच पेशवाईचे सूत्रधार होते. निजाम, हैदर, टिपू, इंग्रज व फ्रेंच यांच्याशी मैत्री, लढाई व भेदनीती अशी सूत्रे वापरत त्यांनी पेशवाई टिकवण्याचा प्रयत्न केला. पण १८०० साली झालेल्या नानांच्या मृत्यूनंतर पेशवाईचे व पर्यायाने पुण्याचे वैभव ओसरत गेले. इ.स. १८१८ मध्ये मराठेशाहीचा व पेशवाईचा अस्त झाला. पुढील काळात, १८१८मध्ये शनिवारवाड्यावर इंग्लंडचा युनियन जॅक फडकवला गेला.
भूगोल
[संपादन]पुणे जिल्हयाचा अक्षवृत्तीय विस्तार १७ अंश ५४’ ते १० अंश २४’ उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे आणि रेखावृत्तीय विस्तार ७३ अंश १९’ ते ७५ अंश १०’ पुर्व रेखावृत्तापर्यत आहे. पुणे जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्र १५.६४२ चौ. कि. मी. आहे. पुणे जिल्हा हा क्षेत्र नुसार राज्यात दुस-या क्रमांकावर आहे तसेच राज्याचे ५.१० टक्के क्षेत्र पुणे जिल्हयाने व्यापलेले आहे. पश्चिम महाराष्ट्रात सहयाद्रीपायथ्यापाशी पुणे जिल्हा तीन भागात विभागला गेला आहे:”घाटमाथा”, “मावळ” आणि “देश”. पुणे जिल्हा अतिशय ऊष्ण मोसमी वारे असलेल्या भूप्रदेशाचा भाग आहे आणि त्यामुळे तापमानात तसेच पर्जन्य मानातही बदल जाणवतो. पुण्याचा पश्चिम भाग हा थंड आहे तर पूर्व भाग ऊष्ण आणि कोरडा आहे.उन्हाळा : २२°सेल्सियस ते ४१°सेल्सियस हिवाळा :८ ° सेल्सियस ते २५° सेल्सियस पाऊस : ६५० ते ७०० मिमी
पुणे जिल्ह्याच्या सीमा
- उत्तरेस व पूर्वेस अहमदनगर जिल्हा,
- आग्नेयेस सोलापूर जिल्हा,
- दक्षिणेला सातारा जिल्हा,
- पश्चिमेला रायगड जिल्हा
- वायव्येला ठाणे जिल्हा आहे.
पुणे जिल्ह्यातून पुढील नद्या वाहतात. - भीमा नदी ही जिल्हातील सर्वांत मोठी नदी आहे. भीमेचा उगम भीमाशंकर (ता. खेड) येथे होतो.
इतर नद्या पुढीलप्रमाणे - इंद्रायणी नदी, कऱ्हा, कुकडी नदी, घोड नदी, निरानदी , पवना नदी, मांडवी, मीना, भामा, मुठा नदी, मुळा नदी
पुणे जिह्यातील धरणे:-
खडकवासला,पानशेत,भुशी,मुुळशी,भाटघर, वीरधरण पिंपळगाव-जोग,वरसगाव,टेमघर,भामा-आसखेड,येडगाव,चास-कमान,माणिकडोह,ठोकरवाडी,नाझरे,आंध्रा-vally,गुंजवणी,निरा-देवधर,उजनी,वळवण.
पहा : जिल्हावार नद्या
प्रसिद्ध व्यक्ती
[संपादन]छत्रपती शिवाजी महाराज संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज,छत्रपती संभाजी महाराज,पेशवा बाजीराव,महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, स्वातंत्र्यवीर सावरकर आगरकर, क्रांतीवीर हुतात्मा शिवराम हरी राजगुरू गोपाळ कृष्ण गोखलेपु.ल. देशपांडे, प्रल्हाद केशव अत्रे,पं. भीमसेन जोशी, लोकमान्य टिळक.., पंडिता रमाबाई , राजमाता जिजाऊ
उद्योगधंदे
[संपादन]महाराष्ट्र औद्योगिक विकास प्राधिकरण (MIDC) या संस्था जिल्ह्यात अनेक ठिकाणी आहेत. पुण्यात अनेक माहिती-तंत्रज्ञान कंपन्या आहेत. हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्क येथे माहिती-तंत्रज्ञान संस्था एकटवल्या आहेत. पिंपरी चिंचवड ह्या पुण्याच्या जुळ्या शहरात बजाज, टेल्कोसह अनेक मोठे उद्योग आहेत, तसेच खराडी येथे इऑन, झेनसर, अमेझॉन, बार्कलेस, फायझर्व या सारख्या नामांकित आय टी पार्क देखील आहेत. मुंबई नंतर पुणे हे राज्यातील सर्वाधिक औद्योगिकदृष्ट्या विकसित शहर आहे. पुणे-मुंबई ही दोन राष्ट्रीय महत्त्वाची शहरे जोडणाऱ्या महामार्गावरील पिंपरी, चिंचवड हा परिसर औद्योगिक घनता जास्त असलेला पट्टा आहे. पुणे शहर हे मध्यवर्ती औद्योगिक केंद्र असलेल्या या जिल्ह्यात लोणी देवकर (इंदापूर), आबी, उर्से, कुरकुंभ, चाकण, जेजुरी, टाकवे, पिंपरी-चिंचवड, बारामती, बेबडओहळ, भोसरी, रांजणगाव व हिंजवडी येथे बऱ्याच औद्योगिक वसाहती आहेत.
ग्रंथालये
[संपादन]पुणे जिल्ह्यातील सरकारमान्य सार्वजनिक ग्रंथालयांची संख्या ५६२ असून त्यांशिवाय संस्थांची अनेक ग्रंथालये असून इतरही बरीच खासगी ग्रंथालये आहेत.
शेती
[संपादन]पुणे जिल्हयाचा अक्षवृत्तीय विस्तार १७ अंश ५४’ ते १० अंश २४’ उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे आणि रेखावृत्तीय विस्तार ७३ अंश १९’ ते ७५ अंश १०’ पुर्व रेखावृत्तापर्यत आहे. पुणे जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्र १५.६४२ चौ. कि. मी. आहे. पुणे जिल्हा हा क्षेत्र नुसार राज्यात दुस-या क्रमांकावर आहे तसेच राज्याचे ५.१० टक्के क्षेत्र पुणे जिल्हयाने व्यापलेले आहे. पश्चिम महाराष्ट्रात सहयाद्रीपायथ्यापाशी पुणे जिल्हा तीन भागात विभागला गेला आहे: जिल्ह्यात तांबडी, तपकिरी व काळी अशी तिन्ही प्रकारची मृदा (माती) आढळते. पश्चिमेकडून पूर्वेकडे जावे तशी जमिनीची सुपीकता वाढत जाते. पूर्वेकडील बारामती व इंदापूर तालुक्यांतली प्रामुख्याने काळी आहे.
जिल्ह्यातील मुख्य पिकांचा तपशील व सिंचनाचे प्रमाण पुढीलप्रमाणे आहे.
क्र. | तपशील | क्षेत्र (हेक्टर्स) |
---|---|---|
१ | लागवडीखालील जमीन | ९९८५२२ |
२ | जिरायत | ७५६११८ |
३ | बागायत | २४२४०४ |
क्र. | हंगाम | महत्त्वाचे पीक |
---|---|---|
१ | खरीप | बाजरी, तांदूळ |
२ | रब्बी | गहू, हरभरा |
३ | खरीप व रब्बी | ज्वारी |
ऊस (बारामती, भोर, इंदापूर) व द्राक्षे (बारामती, इंदापूर) ही नगदी पिकेही जिल्ह्यात घेतली जातात. ‘आंबेमोहोर’ हा भोर तालुक्यातील सुवासिक तांदूळ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. तसेच मावळ तालुक्यातील इंद्रायणी तांदूळ प्रसिद्ध आहे पुणे जिल्ह्यात एकूण ११ साखर कारखाने आहेत. त्यांची सूची पुढे दिली आहे.
क्र. | कारखान्याचे नाव | गाव, तालुका |
---|---|---|
१ | श्रीविघ्नहर सहकारी साखर कारखाना | शिरोली, जुन्नर |
२ | संत तुकाराम महाराज सहकारी साखर कारखाना | हिंजवडी, मुळशी |
३ | राजगड सहकारी साखर कारखाना | निगडे, भोर |
४ | घोडगंगा सहकारी साखर कारखाना | न्हावरे, शिरूर |
५ | भीमा सहकारी साखर कारखाना | मधुकरनगर, दौंड |
६ | सोमेश्वर सहकारी साखर कारखाना | सोमेश्वर, बारामती |
७ | माळेगाव सहकारी साखर कारखाना | माळेगाव, बारामती |
८ | श्रीछत्रपती सहकारी साखर कारखाना | भवानीनगर, इंदापूर |
९ | इंदापूर सहकारी साखर कारखाना | बिजवडी, इंदापूर |
१० | यशवंत सहकारी साखर कारखाना | थेऊर, हवेली |
११ | भीमाशंकर सहकारी साखर कारखाना | अवसरी बुद्रुक, आंबेगाव |
भारतीय अॅग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन उरळीकांचन (बाएफ) (हवेली) व नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स (पुणे शहर) या कृषिविषयक संस्थाही येथे कार्यरत आहेत.
प्रेक्षणीय स्थळे
[संपादन]आळंदी (संत ज्ञानेश्र्वरांची संजीवन समाधी) व देहू (संत तुकारामांचे गाव) ही दोन महत्त्वाची तीर्थस्थळे पुणे जिल्ह्यात आहेत. आळंदी पुण्यापासून 25 कि.मी. अंतरावर आहे. आळंदी सर्वतोमुखी देवाची आळंदी म्हणून ओळखली जाते. येथे संत कवी ज्ञानेश्वर महाराज यांचे मंदिर व समाधी आहे. हे मंदिर सन 1570 मध्ये बांधण्यात आले. संत ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेचे मराठीत रूपांतर केले त्याला ज्ञानेश्वरी असे म्हणतात. आळंदीमधील विठ्ठल-रुक्मीणी मंदिर, राम मंदिर, कृष्ण मंदिर व मुक्ताई मंदिर ही आळंदी मधील आणखी काही प्रसिद्ध ठिकाणे आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या आयुष्यातील जास्तीत जास्त काळ आळंदीतच घालवला. आषाढ महिन्यात यात्रेकरु पालखी बरोबर आळंदी ते पंढरपूर जवळजवळ 150 कि.मी. अंतर चालून जातात.प्रसिद्ध भिंत ज्यावर बसून ज्ञानेश्वर महाराज चांगदेवांना भेटायला गेले ती भिंत अजूनही आळंदी येथे आहे.
अष्टविनायकांपैकी पाच गणपती : महाराष्ट्रात श्री गणपतीच्या आठ मंदिरांना विशेष स्थान आहे. विविध जिल्ह्यांत असलेल्या या अष्टविनायकांचे दर्शन घेण्यासाठी केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे, तर भारतातून गणेशभक्त येतात. या अष्टविनायकांपैकी पाच स्थाने पुणे जिल्ह्यात आहेत:- चिंतामणी (थेउर)-थेऊर,महागणपती (रांजणगाव)-रांजणगाव, मोरेश्वर (मोरगाव)-मोरगाव, विघ्नहर (ओझर)-ओझर, गिरिजात्मज (लेण्याद्री)-लेण्याद्री - हे ते पाच विनायक होत.
जेजुरी : श्री खंडोबा म्हणजे महाराष्ट्राचे कुलदैवत! येथील गडावर असलेले खंडोबाचे स्थान प्रसिद्ध आहे. सोमवती अमावास्या या दिवशी यात्रेला येथे लाखो भाविक येतात. लग्न झाल्यानंतर नव दांपत्याने कुलदैवताचे दर्शन घ्यावे अशी प्रथा असल्यामुळे, नव्याने लग्न झालेली जोडपी श्री खंडोबाच्या दर्शनासाठी येथे गर्दी करतात.खंडोबाचा येऽऽळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार हा खंडोबाचा गजर महाराष्ट्रभर प्रसिद्ध असून, जेजुरी-गडावर दर्शन घेताना भंडारा (हळद) मोठ्या प्रमाणावर उधळला जातो. जेजुरी हे पुरंदर तालुक्यात असून पुण्यापासून ५० कि.मी. अंतरावर आहे. येथून अष्टविनायकांतील मोरगाव केवळ १५ कि.मी. अंतरावर आहे.
भीमाशंकर : भारतातील बारा ज्योतिर्लिंगापैकी पाच ज्योतिर्लिंगे महाराष्ट्रात आहेत, आणि त्यांपैकी एक पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात भीमाशंकर येथे आहे. निसर्गरम्य जंगलात, सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या मंदिरातील श्री शंकराचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण भारतातून लाखो भाविक येतात. येथील जंगल (अभयारण्य), नागफणी कडा प्रसिद्ध असून येथूनच पुणे जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या नदीचा - भीमा नदीचा - उगम होतो.
भीमाशंकर अभयारण्यात शेकरु ही मोठी खार आढळते. शेकरू (Giant Squirrel) ही खार महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. या अभयारण्यात कारवी ही अंधारात चमकणारी वनस्पती आढळते.
उपरोक्त स्थानांबरोबरच पुण्याचे ग्रामदैवत- कसबा गणपती व ग्रामदेवता-तांबडी जोगेश्वरीचे मंदिर, चतुःशृंगीचे मंदिर, पुरंदर तालुक्यातील बोपदेव घाटातील कानिफनाथ मंदिर, चिंचवड येथील नदीकाठचे गणेश मंदिर व गणेशभक्त मोरया गोसावी यांची समाधी, तसेच संत ज्ञानेश्वरांचे बंधू सोपानदेव यांची सासवड येथील समाधी, पुणे शहरातील एका दगडात कोरलेले, आठव्या शतकातील पाताळेश्र्वर (महादेवाचे) मंदिर, पुण्यातीलच पर्वती टेकडी-मंदिर, कार्ले - भाजे येथील लेणी, वानवडी येथील महादजी शिंदे यांची छत्री इत्यादी ठिकाणे उल्लेखनीय आहेत. महाराष्ट्रातील किल्ले आपल्याला इतिहासाकडे नेतातच, त्याचबरोबर पर्यटनाचा, प्रसंगी गिर्यारोहणाचा आनंद लुटण्यासाठीही साद घालतात.
निरा नरसिंहपूर हे तीर्थक्षेत्र पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात आहे.नीरा भीमा या पवित्र संगमावर भक्त श्रेष्ठ प्रल्हादाने आपल्या आराध्य दैवताची स्थापना केली. त्याने केलेल्या वालुकामूर्तीत श्री नृसिंहांनी प्रवेश करून आपल्या भक्तांसाठी या ठिकाणी नेहमीकरिता वास्तव्य केले. त्यामुळे या क्षेत्राला श्रेष्ठ तीर्थक्षेत्राचे स्वरूप प्राप्त झाले आहे. हे दैवत श्रीलक्ष्मी नृसिंह या नावाने प्रसिद्ध आहे. सांप्रतचे श्रींचे देवालय हे उत्तुंग व भव्य असे असून पेशवे काळातील वास्तुतशिल्पाचा हा आदर्श आहे.
पर्वती
पर्वती ही महाराष्ट्रातील पुणे शहराच्या आग्नेय कोपऱ्यात स्थित असलेली टेकडी आहे.पुण्याच्या अनेक भागांतून ती दृष्टीस पडते. हिच्या माथ्याची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे ६४० मीटर (२१०० फूट) आहे.सुमारे १०३ पायऱ्या चढून येथे पोहोचता येते.या पायऱ्या भव्य अशा नौबतखान्याजवळ संपतात.हिच्या माथ्यावर देवदेवेश्वर मंदिर व अन्य काही देवदेवतांची मंदिरे आहेत. मराठा साम्राज्याचे पंतप्रधान असलेल्या नानासाहेब पेशवे यांनी देवदेवेश्वर मंदिर बांधून घेतले.
लोणावळा - खंडाळा
लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण सहयाद्री पर्वतरांगेच्या कुशीत समुद्रसपाटीपासून सहाशे तीस मीटर उंचीवर आहे.पुण्यापासून 150 किलोमीटरवर आहे. लोणावळा, खंडाळा आणि सभोवतालचा परिसर आल्हाददायक आहे. नयनरम्य निसर्ग, किल्ले, नैसर्गिक तळी, तलाव व विविध वनस्पतींनी समृद्ध आहे. भुशी व लोणावळा ही तळी पाहण्यासारखी आहेत.येथून खंडाळा हे थंड हवेचे ठिकाण अवघ्या पाच किलोमीटरवर आहे. लोणावळयापासून पाच किलोमीटर अंतरावर मळवली या ठिकाणाहून जवळ असलेले लोहगड, तिकोणा व विसापूर हे किल्ले इतिहासप्रेमी तसेच गिर्यारोहकांचे खास आकर्षण आहेत.
सिंहगड
पूर्वी कोंढाणा या नावाने ओळखला जाणारा सिंहगड हा किल्ला पुण्यातील एक सुप्रसिद्ध व लोकप्रिय किल्ला आहे. हा किल्ला हवेली तालुक्यातील डोणजे गावात आहे. हा किल्ला पुणे शहरापासून ३५-४० कि.मी. अंतरावर असून तो 1290 मी. उंचीवर आहे. छत्रपती शिवाजी महराजांचा विश्वासू व शूर सरदार तानाजी मालुसरे यांचे याच ठिकाणी मुघल सत्तेशी युद्ध झाले. तानाजी मालुसरेंच्या मृत्युची बातमी ऐकुन छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले ” गड आला पण सिंह गेला” त्यानंतर त्यांनी कोढाणा किल्ल्याचे नाव बदलून सिंहगड असे ठेवले.
शिवनेरी किल्ला
शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात आहे. जुन्नर मध्ये शिरतानांच शिवनेरीचे दर्शन होते. महाराष्ट्राचे दैवत श्री शिवछत्रपती यांच हे जन्मस्थान आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मामुळे ‘शिवनेरी’ किल्ल्यास महाराष्ट्राच्या इतिहासात एक वेगळेच अन् अढळ स्थान आहे.या किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असून जिंकावयास कठीण असा बालेकिल्ला आहे. किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर व जिजाबाई व बाल-शिवाजी यांच्या प्रतिमा आहेत.
शनिवारवाडा पहिला बाजीराव पेशवा यांनी सन 1736 साली 13 खोल्यांचा पेशव्यांचा राजवाडा म्हणजेच शनिवार वाडा बांधला. हा वाडा पेशव्यांचे मुख्य ठिकाण होते. हे पुण्याच्या संस्कृतीचे प्रतिक आहे. सुरक्षिततेला जास्त प्राधान्य देऊन शनिवारवाडयाची रचना करण्यात आलेली आहे. शनिवार वाडयाचे मुख्य प्रवेशद्वार दिल्ली दरवाजा या नावाने व इतर दरवाजे गणेश, मस्तानी, जंभळ, खिडकी अशा नावांनी ओळखले जातात. शनिवार वाडयासमोर पहिल्या बाजीरावाचा घोडयावर बसलेला पुतळा आहे. शनिवारवाडयात गणेश महल, रंग महल, आरसा महल, हस्तीदंत महल, दिवाणखाना आणि कारंजे अशी अनेक ठिकाणे पाहावयास मिळतात. पेशव्यांचा इतिहास सांगणारा लाईट व म्युझिक शो शनिवार वाडयावर दररोज आयोजित केला जातो. पेशव्यांची सत्ता असलेला हा राजवाडा सन 1928 मध्ये आगीमुळे नष्ट झाला. आता फक्त राजवाडयाच्या मजबूत तटबंदी असणा-या भिंती व सुरक्षिततेसाठी अणकुचीदार टोक असणारा भक्कम दरवाजा शिल्लक आहे.
आगाखान पॅलेस गांधी मेमोरियल सोसायटीचे आगाखान पॅलेस हे इटालियन आर्चेस व लॉन आहे. ब्रिटीशांनी या जागेचा उपयोग महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी व महादेवभाई देसाई यांचेसाठी भारत झोडो आंदोलनात तुरुंग म्हणुन केला होता. कस्तुरबा व महादेवभाई यांनी याच जागेत अखेरचा श्वास घेतला त्यामुळे या ठिकाणी त्यांचे स्मरणार्थ संगमरवरी स्मारक बांधण्यात आले.
ऐतिहासिक
- शनिवारवाडा - (पुण्याच्या संस्कृतीचे प्रतीक. पहिल्या बाजीरावाने बांधलेला शनिवारवाडा ही पेशव्यांची राजधानी होती).
- लाल महाल - (दादोजी कोंडदेव यांनी बांधलेला हा महाल शनिवारवाड्याजवळ आहे. शिवाजी महाराज व जिजाबाई येथे वास्तव्यास होते).
- इतर- शिंदे छत्री, विश्रामबाग वाडा, आगाखान पॅलेस, दिनकर केळकर वस्तुसंग्रहालय.
तालुक्यानुसार
[संपादन]- हवेली तालुका - देहू(संत तुकाराम महाराज मंदिर), कसबा गणपती, चतुःशृंगी, सिंहगड किल्ला, खडकवासला धरण, माळशेज घाट, सारस बाग, वानवडी शिंदे छत्री, पाताळेश्र्वर मंदिर व गुहा, शनिवार वाडा, लाल महल.
- खेड(राजगुरुनगर) तालुका - (आळंदी ज्ञानेश्वर समाधी), भीमाशंकर अभयारण्य, भीमाशंकर,चास कमान धरण,चाकण भुईकोट किल्ला
- मावळ तालुका - लोणावळा, खंडाळा, राजमाची, कार्ला लेणी भाजे लेणी, भुशी डॅम भाजे कार्ला येथे भगवान बुद्धांच्या मुर्ती भग्न अवस्थेत आहेत तसेच देशाचा खरा इतिहास दडलेला आहे.
- बारामती तालुका - मोरगावचा मयूरेश्वर
- पुरंदर तालुका - जेजुरी, वीर नारायणपूर, सासवड, लोहगड, भुलेश्वर
- शिरुर तालुका - वढू तुळापूर (संभाजी महाराजांची समाधी)
- राजगड तालुका - राजगड, तोरणा किल्ला, मढेघाट, पानशेत धरण, वरसगाव धरण,चापेट धरण.
- आंबेगाव तालुका - डिंभे धरण
- भोर तालुका - बनेश्वर भाटघर धरण
- दौंड तालुका - बहादुरगड, मलठण, कुरकुंभ
- जुन्नर तालुका - शिवनेरी (शिवाजी महाराजांचे जन्मस्थान), ओझर
मुळशी तालुका मध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्थापित हिंदवी स्वराज्याचे पहिले पायदळ प्रमुख सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांची पवित्र समाधी पिरंगुट येथे आहे. शिवाय, जगदीश्वर मंदिर आहे.पुण्यापासुन जवळच केंदुर पाबळ येथे संत कान्होराज महाराजांची समाधी आहे.
तालुके
[संपादन]पुणे जिल्ह्यात खालीलप्रमाणे तालुके आहेत :
राजकीय संरचना
[संपादन]लोकसभा मतदारसंघ ( ४ ) : पुणे ,बारामती,शिरूर व मावळ.
(मावळ लोकसभा मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील मावळ, चिंचवड, पिंपरी या विधानसभा मतदारसंघांसह रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत व उरण हे विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत.)
विधानसभा मतदारसंघ (२१) : जुन्नर, आंबेगाव, खेड-आळंदी, शिरूर, दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर, मावळ, चिंचवड, पिंपरी , भोसरी, वडगाव शेरी, शिवाजीनगर, कोथरूड, खडकवासला, पर्वती, हडपसर, पुणे कॅंटॉन्मेंट व कसबा पेठ.
जिल्ह्यात ७५ जिल्हा परिषद मतदारसंघ असून १५० पंचायत समिती मतदारसंघ आहेत. या जिल्ह्यात १,४०१ ग्रामपंचायती आहेत.
शेती
[संपादन]जिल्ह्यात तांबडी, तपकिरी व काळी अशी तिन्ही प्रकारची मृदा (जमीन) आढळते. पश्र्चिमेकडून पूर्वेकडे जावे तशी जमिनीची सुपिकता वाढत जाते. पूर्वेकडील बारामती व इंदापूर तालुक्यांत काळी जमीन प्रामुख्याने आढळते.
ऊस (बारामती, भोर, इंदापूर) व द्राक्षे (बारामती, इंदापूर) ही नगदी पिकेही जिल्ह्यात घेतली जातात. आंबेमोहोर हा भोर तालुक्यातील सुवासिक तांदूळ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.
दळणवळण
[संपादन]पुणे जिल्हा हा राज्याच्या राजधानीला व आजूबाजूच्या इतर जिल्ह्यांना रस्ते व लोहमार्गांनी जोडला आहे.एकमेकांना जोडलेल्या रस्त्यांमध्ये द्रुतगती मार्ग, राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, व मुख्य जिल्हा मार्ग यांचा समावेश होतो. जिल्ह्यामध्ये ब्रॉडगेज दुहेरी मार्ग व एकेरीमार्ग रेल्वेचे जाळे पसरलेले आहे.जिल्ह्यातील मुख्य ठिकाणावरून हवाईमार्गाने देशातील इतर मुख्य विमानतळांपर्यत व काही ठराविक आंतरराष्ट्रीय ठिकाणांशी वाहतूक व आयात-निर्यात केली जाते. जिल्हयामध्ये नद्यांना बारामाही पाणी उपलब्ध नसलेने जलमार्गाचा वापर केला जात नाही.पुणे जिल्हयातील रस्त्यांची एकूण लांबी 13,642 कि.मी. आहे. त्यातील 5,394 कि.मी. लांबीचे रस्त्यांचा पृष्ठभाग हा ज्वालाग्राही पदार्थांपासून तयार झालेला आहे, 3,554 कि.मी. रस्ते हे पाण्याने बांधलेले खडीचा पृष्ठभाग असलेले आहेत आणि 4,694 कि.मी. इतर पृष्ठभागाने बनलेले म्हणजेच खडीचा नसलेला रस्ता आहे. रस्त्याचे त्यांचे महत्त्वानुसार विभागणी केली आहे. जिल्हयातील रस्त्यांच्या एकूण लांबीपैकी 331 कि.मी. हा राष्ट्रीय महामार्ग आहे आणि 1,368 कि.मी. रस्ता राज्य महामार्ग आहे. मुख्य व इतर जिल्हा रस्ते यांची एकूण लांबी 5,388 कि.मी. असून ते सर्व तालुक्यांतून जातात. जवळजवळ सर्वंच गावे खडीचे रस्त्यांनी जोडलेली आहेत. गावातील रस्त्यांची एकूण लांबी 6,555 कि.मी. आहे
पुणे-मुंबई हा सहा पदरी द्रुतगतीमार्ग (एक्सप्रेस हायवे) महाराष्ट्राचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. मुंबई - बंगलोर(राष्ट्रीय महामार्ग क्र. ४) पुणे - हैद्राबाद(राष्ट्रीय महामार्ग क्र. ९) व पुणे-नाशिक(राष्ट्रीय महामार्ग क्र. ५०) हे तीन राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्यातून जातात. उपरोक्त महामार्गांबरोबरच पुणे जिल्ह्यात अनेक घाट आहेत. जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवर असलेल्या घाटांमुळे कोकण व मुंबई हे भाग पुणे जिल्ह्याला जोडले गेले, आहेत. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईला जोडणारा पुणे-मुंबई लोहमार्ग हा जिल्ह्यातील सर्वांत महत्त्वाचा लोहमार्ग आहे. ब्रिटिश काळातच हा लोहमार्ग बांधला गेलेला आहे. खंडाळा, लोणावळा ही जिल्ह्यातील निसर्गरम्य स्थाने याच मार्गावर आहेत. अनेक द्रुतगती रेल्वे गाड्या पुणे-मुंबई दरम्यान दररोज धावतात. मुंबई-कोल्हापूर हा रेल्वे मार्गही पुणे जिल्ह्यातून जातो. भारतातील अनेक मोठी शहरे पुण्याला रेल्वेच्या माध्यमातून जोडली गेली असून पुण्याजवळील खडकी हे लष्करी केंद्रही रेल्वेने जोडले गेले आहे. पुणे-दौंड-बारामती हा रुंदमापी मार्गही जिल्ह्यात असून पुणे व दौंड ही जंक्शन्स जिल्ह्यात आहे.
पुणे येथे लोहगाव विमानतळ हा राष्ट्रीय विमानतळ आहे. सध्या येथून दुबई, सिंगापूर, अबू धाबी, फ्रॅंकफर्ट आदी ठिकाणी जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय सेवाही उपलब्ध आहेत.
संदर्भ
[संपादन]- ^ "पुणे जिल्हा".
- ^ "पुणे विद्यापीठ नामविस्तार सोहळ्यात श्रेय घेण्याची अहमहमिका". लोकसत्ता. 2020-03-29 रोजी पाहिले.
बाह्य दुवे
[संपादन]- "पुणे जिल्हा". 2012-10-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-06-17 रोजी पाहिले.
- पुणे जिल्हा परिषद संकेतस्थळ
ठाणे जिल्हा | अहमदनगर जिल्हा | अहमदनगर जिल्हा | ||
रायगड जिल्हा | अहमदनगर जिल्हा | |||
पुणे जिल्हा | ||||
सातारा जिल्हा | सातारा जिल्हा | सोलापूर जिल्हा |